देश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

वर्तमानपत्र: भाषा ओळखीचे, भाषा शिक्षणाचे साधन.  …वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड. 

वर्तमानपत्र: भाषा ओळखीचे, भाषा शिक्षणाचे साधन.
मध्यंतरी एका व्हॉट्सअॅप समूहावर, राजकीय विषयावरील मतभेदांमुळे एक ठराविक वर्तमानपत्र वाचणे बंद करावे, अशा आशयाच्या बऱ्याच पोस्ट येत होत्या. यात तसे आक्षेप नोंदवण्यासारखं काही नाही. पण बऱ्याच जणांनी याच्याही पुढे जाऊन वर्तमानपत्र वाचणेच बंद करावे असाही सूर लावला होता.
या प्रसंगी मला सकाळ मध्ये साधारण १ वर्षापूर्वी आलेल्या एका खूप छान लेखाची प्रकर्षाने आठवण आली. ( या लेखाचे कात्रण माझ्याकडे अजून आहे)
त्या लेखात लेखिकेने वृत्तपत्र लहान मुलांसाठी “भाषा ओळखीचे साधन” म्हणून कसे वापरता येईल ह्याचे सुंदर विवेचन केले होते. अगदी नवीन अक्षर ओळख झालेल्या मुलांपासून शब्द ओळख, वाक्य रचना किंवा अगदी व्याकरण सुध्दा सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी वृत्तपत्राचा उपयोग करता येईल याची चिकीत्सा या मध्ये केली होती. मला वाटतं मराठी सारखेच इंग्रजी भाषा ओळखीचे साधन देखील या संकल्पनेच्या आधारे करता येईल. विशेषतः जी मराठी मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात त्यांना, मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा समृद्ध करण्यासाठी ही संकल्पना अमलात आणता येईल.
याच अनुषंगाने मला वर्तमानपत्राचे “भाषा शिक्षणासाठी किंबहुना भाषा संवर्धनासाठी” चे महत्त्व अधोरेखित करावेसे वाटते. माझ्या सुदैवाने अगदी लहानपणापासून मला वर्तमानपत्र वाचनाची सवय पालकांनी लावली होती. अर्थात त्याकाळी दूरचित्रवाणी माध्यम अस्तित्वात नव्हते. पण आज देखील, दूरचित्रवाणी व वर्तमानपत्र यांच्या भाषेतील अंतर सगळ्यांना जाणवते. हल्ली असाही एक प्रवाह आहे की व्यवहारात वापरली जाणारी भाषा “प्रमाण भाषा” असावी असे नाही. सर्व भाषांमध्ये हा प्रवाह दिसून येतो आहे. पण मला वाटतं अधिकृत व्यवहारात, कायदेशीर प्रसंगी प्रमाण भाषा आवश्यक आहे. वर्तमानपत्रात  नेहमीच प्रमाण भाषा वापरली जाते. शाळा, महाविद्यालय शिक्षणानंतर तसा भाषा विषयाशी संबंध सुटतो. अशा वेळी प्रमाण भाषेशी संपर्क तुटू नये म्हणून वर्तमानपत्र उपयुक्त ठरू शकते. मराठी किंवा इंग्रजी दोन्ही साठी. आजकालच्या पिढीला दोन वाक्ये एखाद्या विषयावर, साधा एखादा अर्ज लिहिता येत नाही हे वास्तव बहुतेकांना पटेल. महत्त्वाचे म्हणजे लिखित स्वरूपात प्रमाण भाषेला पर्याय नाही.
वर्तमानपत्रात फक्त राजकीय बातम्या असतात असे नाही. अनेक विषयांवर छोटे छोटे लेख असतात. सर्व प्रकारच्या कला, क्रीडा, साहित्य, नाटक, सिनेमा आदी विषयांवर नामांकित व्यक्तींचे लेख असतात. आजकाल सर्व काही इंटरनेटवर उपलब्ध आहे असं सांगितलं जातं. मी जरी जुन्या पिढीतील असलो तरी बऱ्यापैकी इंटरनेटशी माझी ओळख आहे. तेथे ढीगभर माहिती उपलब्ध असते आणि त्यातील कोणती माहिती आपल्या उपयोगी पडेल, हे समजणे मला तरी अवघड वाटते. शिवाय गूगल वरील भाषांतरित मजकूर व शुद्ध लेखन याबद्दल न लिहिलेलच बरे. एक मात्र कबूल करावेसे वाटते की हल्ली वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यात देखील शुद्ध प्रमाण भाषा प्रदूषित होत आहे, कारण बातमीदार देखील प्रमाण भाषा शिक्षित नाहीत. पण लेखांच्या बाबतीत ही उणीव नसते.
रोज मराठी किंवा इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र अर्धा तास जरी वाचले तरी आपली भाषेची समृध्दी टिकून राहू शकते. बाकीच्या वेळात अत्याचरित भाषा कानावर आदळत असतेच.
वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}