Kisan Diwas – मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला – ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले निलंबित..
National Farmer’s Day, or Kisan Diwas, is observed on December 23 in India to recognise farmers as the backbone of the country. The day commemorates the birth anniversary of India’s former prime minister Chaudhary Charan Singh
मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला – ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच झाले निलंबित..
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
ही गोष्ट सन १९७९ ची आहे. अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील. इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता, ज्याच्या अंगावर अतिशय मळके व चुरगळलेले कपडे होते. चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होते. पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता. कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करावयाची असेल. ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला. पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं असता, “माझा बैल चोरीला गेला आहे व त्याबद्दल मला तक्रार करायची आहे” असं त्या शेतकऱ्याने सांगितले.
त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून, तो पोलिस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलट-सुलट प्रश्न करू लागला. ‘बैल कसा चोरीला गेला ? नीट सांभाळता येत नव्हता का ?’ तू काय करत होतास ? यासारख्या प्रश्नांची सरबत्तीच त्या पोलिसाने लावली होती. बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देता देता थकला व आपली तक्रार घेण्यास त्याने कळकळीची विनंती केली. मात्र पोलिसाने अधिकच चिडून तक्रार घेण्यास नकार दिला. नाइलाजाने शेतकरी खाली मान घालून निघू लागला.
पोलिस ठाण्याच्या गेटजवळ जाताच, शेतकऱ्याला मागून एका पोलिसाने आवाज दिला तसा तो थांबला, त्याने मागे वळुन पाहिले. पोलिस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला काही पैसे देत असशील तर तक्रार घेतो. तेव्हा शेतकऱ्याकडून ३५ रुपये लाच घेऊन त्या पोलिसाने तक्रार घ्यायची मान्य केली. तक्रार अर्ज लिहून झाल्यावर, सही करणार का अंगठा ? असं त्या पोलिसाने शेतकर्याला विचारले, तेव्हा शेतकऱ्याने टेबलावरील पेन व शाईचा पॅड असे दोन्हीही उचलले. पोलिसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, याने पेन व पॅड दोन्ही का उचलले असतील ? याला नेमकी सही करायची आहे का अंगठा ?
पोलीसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली “चौधरी चरणसिंह” व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला “प्रधानमंत्री, भारत सरकार”. आता मात्र सर्व पोलिस ठाण्याचीच पळापळ सुरू झाली. कारण तो शेतकरी म्हणजेच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह होते ! हे पोलीस ठाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी घेत नसल्याचं समजल्यावर, चरणसिंह मुद्दामहून मळके कपडे घालून तक्रार नोंदवायला आले होते. या सर्व प्रकाराबद्दल व शेतकऱ्यांच्या केलेल्या अडवणुकीबद्दल चरणसिंह यांनी संपूर्ण पोलिस ठाण्यालाच तात्काळ निलंबित केले होते.
असे पंतप्रधान व असे शेतकऱ्यांचे नेते पुन्हा होणे दुरापास्तच !!🌾🌾🌾🌾🌾
देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्म दिवस 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
🙏🙏🙏