आंबट गोड
#आंबट गोड……
गिरगावात सोसायटीत एका अनुरूप जोडीची अव्यक्त प्रेमकथा सुरू होती….दोन बिल्डिंग मधलं अंतर जेमतेम २० फूट……
अव्यक्त म्हणायचं कारण असं की नजरानजर होण्यासाठी दोघे धडपडायचे, समोर आले तर जुजबी बोलणं व्हायचं….दोघांच्या ऑफिसच्या वेळा साधारण सारख्याच होत्या….
अशाच एका रविवारी सकाळी तो नुकताच अंघोळ करून गॅलरीत आला, कमरेला टॉवेल गुंडाळलेला होता….अंघोळीच्या वेळी स्वतःचे काही कपडे धुवून, हात वर करून दांडीवर वाळत घालत होता….गोरापान सुदृढ देह, त्याच्या छातीवर तुळशीच्या पानाची जन्मखूण होती….
समोरच्या गॅलरीतून ती त्याला अगदी मनसोक्त निरखत होती….मनात उकळ्या फुटत होत्या….ठरवलं तर आपला होणारा पुरुष तिला दिसत होता….कपडे वाळत घालून झाल्यावर त्याने त्याचे दाट केस हाताने झटकले….ते तुषार सूर्याच्या किरणात तिला दिसत होते….ती मोहरली….इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं….तीची आपल्यावर तंद्री लागली आहे हे स्पष्टपणे त्याला दिसलं…ओशाळत त्याने कमरेचा टॉवेल घट्ट केला…छातीवर हात ठेवला….ते बघून तिचं हसू त्याला ऐकू आलं….
दोघांची नजरानजर झाली, त्याने खुणेने काय विचारलं…तिने मानेने नाही म्हणलं…. तिने घड्याळाची खूण करून दहा मिनिटानी परत ये सांगितलं….तो मानेने होकार देत आत गेला….परफ्युम मारलं, कपडे घातले….स्वारी खुशीत होती….
आईने विचारलं ” काय रे, कुठे जाणारेस का? इतक्या सकाळी बाहेर जायचे कपडे घातले म्हणून विचारलं “…तो नाही ग म्हणला…
दहा मिनिटं होऊन गेली हे लक्षात आल्यावर, गॅलरीत गेला…समोर कोणीच नव्हतं…का बरं बोलवलं असेल असा विचार करत असतानाच….केसांना टॉवेल गुंडाळून, स्लीवलेस गाऊनमध्ये ती आली….तिने मनगटावर बोट ठेवून वेळ पाळली हे दाखवलं….
तो गालात हसला आणि कठड्यावर कोपर टेकवून हात हनुवटीवर ठेऊन, तिला डोळ्यात साठवत होता….तिने वाकून केसांचा टॉवेल काढला….मानेला झटका देऊन केस एकीकडे केले, लॉंग स्टेपकट होता….ओले केस चमकत होते….केसातून गळणाऱ्या पाण्याने तिचा गाऊन मागून ओला झाला होता…. टॉवेल दोन्ही हातात धरून केस झटकू लागली….तो एकटक तिच्याकडे बघत होता….ते थेंब वाऱ्यासोबत इकडे यावे असं वाटत होतं…. तो सुगंध घ्यावा…आत साठवून ठेवावा….स्लीवलेस गाऊन मध्ये तिचं रूप कमाल दिसत होतं….
त्या दोन गॅलरीत जे अंतर होतं, ते का आहे असा प्रश्न मनात आला होता….तो आपल्याला बघतोय हे माहीत असल्याने ती जितके शक्य तितके वेळा केस हाताने मोकळे करत होती…..आज तिला विचारायचं हे त्याने मनोमन ठरवलं…..एकाग्र होऊन तिला बघत असतानाच त्याची आई आली….त्याची समाधी भंग झाली….आणि त्याच्या आईला बघून ती आत पळाली…..
” काय रे इथे काय करतोय ?”….तो थोडा गडबडला, म्हणला ” कोवळं ऊन खावं असं म्हणतात, म्हणून थांबलोय “…..त्याचा मूळ उद्देश आईच्या लक्षात येणार नाही हे होऊच शकत नव्हतं…. हसून आई आत गेली….हा पण आत गेला…..
तिनेही आज ठरवलं की पूर्ण दिवस त्याला बघायचं…..थोडया वेळाने ती पुन्हा गॅलरीत आली, तो नव्हता, पण त्याची आई एका तरुणीला घेऊन गॅलरी दाखवत होती हे दिसलं….कोण ही मुलगी? आजवर दिसली नाही, आत्ताच का आली ? त्याला सख्खी बहीण तर नाहीये, म कोणती बहीण असेल का ? अनेक प्रश्न पडले होते….
बघता बघता दुपार झाली….
तिची आई एका कार्यक्रमाला गेली असल्याने, स्वयंपाक करून बाबांना वाढायची तिच्यावर जबाबदारी होती….त्यामुळे घरात डांबून ठेवल्यासारखं झालं होतं….मगाशी बघितलेल्या मुलीबद्दल विचार करत, दर काही मिनिटांनी ती गॅलरीत येत होती….
काही वेळानंतर तिला बाहेर बोलण्याचा आवाज आला, ती पुन्हा गॅलरीत आली, याच्या गॅलरीत त्याचे बाबा साधारण समवयीन जोडप्याला गॅलरीतून खाली बोट करून काहीतरी दाखवत होते….ते जोडपं आनंदी दिसत होतं….आणि हिचा जीव खालवर झाला होता….मनातल्या मनात चिडत होती, पुटपुटत होती..…काय मुलगा आहे हा, काहीच कळत नाही….तणतणत आत गेली….
बाबांना वाढलं, बाबा म्हणले ” तुला नाही का जेवायचं ? “….ती म्हणली ” बाबा, मी नंतर बसते, आधी मला एक काम पूर्ण करू देत “…..बाबांनी डोक्याला हात लावला….त्रासिक चेहेरा त्यांनी ओळखला होता….
ही पुन्हा गॅलरीत गेली….संतापाचा कडेलोट झाला होता….आता तो, अजून एका वेगळ्याच मुली आणि एका वयस्कर गृहस्थासह गॅलरीत येऊन दिशा सांगत होता….त्याने आपल्याकडे बघावं म्हणून तिने कुंडीतलं खुरपे जमीनीवर अक्षरशः फेकलं…त्याचं लक्ष गेलं आणि त्याच क्षणी तिने खाली पार्किंगमध्ये ये अशी खूण केली, त्याने हात दाखवत पाच मिनिटं केलं…..
तिने पटकन वनपीस घातला आणि तरातरा खाली उतरून त्याची पार्किंगमध्ये वाट बघत बसली…..पंधरा मिनिटांनी तो आणि मगाचची मुलगी आणि ते गृहस्थ असे खाली आले, त्यांचा निरोप घेऊन तो तिच्यासमोर आला….तिच्या चेहेऱ्यावरचा राग स्पष्ट कळत होता….उंच स्वरात ती बोलली,
” पाच मिनिटं म्हणालास आणि किती वेळ लागला रे ?, कोण होतं इतकं ? ” …..त्याने बोलायचा प्रयत्न केला, पण ती पुन्हा रागाने म्हणली ” आज सकाळपासून बघत्ये, कोण कोण येतंय, तुझ्या घरच्यांनी तुला बघण्याचा कार्यक्रम ठेवला की काय ? मग आपलं काय ? माझ्याकडे गूळ लावून, वेगळ्याच माळा गळ्यात घालायचा बेत मी हाणून पाडीन, लक्षात ठेव आणि काय रे, त्या बॉयकटवाल्या मुलीला काय दाखवत होतास ?”….
त्याने तिला शांत करत म्हणलं ” अग काय बोलत्येस तू, कशाबद्दल चालू केलं आहे, मला कळू तर दे “…..
तिने त्याचा हात धरला ” वेड घेऊन पेडगाव नकोय, कोण होती आत्ता गेलेली माणसं, मला सहन होत नाहीये तुझं नाटक “…..त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं, जोरात हसायला लागला….
” सांगू ? “…..
” आता सांग नाहीतर……..”
” अग वेडे, पुढच्या महिन्यात माझ्या बाबांची बदली मुंबईबाहेर होण्याची शक्यता आहे, कदाचित पुण्याला जावं लागेल, त्यामुळे मी पण माझ्या ऑफिसमध्ये बोलून बघणार आहे, म्हणून माझ्या धोरणी मातोश्रीनी हे घर भाड्याने देण्यासाठी लोकांना घर बघायला बोलावलं होतं….तीच लोकं आज रविवार आहे म्हणून येत आहेत “…..
कळी खुलली होती, गालात हसू उमटलं होतं, पार्किंगमधल्या कोणत्याही नजरांची तमा न बाळगता तिने त्याला घट्ट मिठी मारली…..
डोव्ह शॅम्पूच्या मंद सुवासात तो गुरफटून गेला….ती हळूच म्हणाली….
” मला पण पुणेकर व्हायला आवडेल “….
©पराग दामले