मनोरंजन

मनापासूनलेखणीपर्यंत ——— ©®मेधा नेने

#मनापासूनलेखणीपर्यंत ♥️♥️

“काय मिसेस नेने ? काय म्हणताय ? ओळखलं का ?”….काल संध्याकाळी, मी आणि लेक भाजी मंडईत असताना अचानक मागून कोणाचीतरी हाक आली. माझं लक्षच नव्हतं. जास्तीत जास्त ताजी दिसणारी गड्डी मिळवण्यासाठी कोथिंबीरीच्या ढिगात माझं उत्खनन सुरू होतं.
खरं तर सगळ्या गड्ड्या तशा सारख्याच असतात. पण अशा उत्खननातून आपण चांगली भाजी निवडून आणल्याचं थोडसं मानसिक समाधान मिळतं.

“आई तुला कोणीतरी माणूस हाक मारतोय !”… उत्खननात रमलेल्या मला लेकीनी जागं केलं.

मी मागे वळून बघीतलं. शाळेतला एक मित्र अचानक बऱ्याच वर्षांनी भेटला होता. सोशल मीडियाच्या कृपेमुळे हल्ली कोण कुठे आहे…. सद्ध्या त्यांचं काय चाललंय हे समजत राहतं. पण प्रत्यक्ष भेट मात्र जरा दुर्मिळच आहे.

माझ्या समोर फॉर्मल शर्ट-पॅण्ट घातलेला एक मध्यमवयीन गृहस्थ उभा होता. दोन्ही हात भांज्यांच्या कापडी पिशव्या सांभाळण्यात मग्न होते. बायकोनी बहुतेक ऑफिस मधून आल्या आल्याच भाजी आणायच्या मोहिमेवर पाठवलेलं दिसत होतं. कमरेला लावलेल्या बेल्टचं बंधन,पोट अगदी पोटतिडकीने झुगारायचा प्रयत्न करत होतं.‌ डोक्यावरच्या केसांनी बेवफाई करायला सुरुवात केली होती.
ज्याला बघून ‘काका’ अशीच हाक मारायची इच्छा व्हावी, असा दिसत होता तो !

बऱ्याच वर्षांनी भेटलो, काय चालू आहे सद्ध्या, मुलं काय करतात, अजून कोणी भेटतं का , एकदा सगळ्यांचं गेट-टुगेदर करायला हवं, घरी या एकदा इत्यादी नेहमीच होणारे संवादही झाले.

“आई, कोण होते गं ते काका ?”…लेकीनी उत्सुकतेने विचारलं.

“अगं माझ्या शाळेतला मुलगा होता.”

“मुलगा ?????”….असं म्हणून लेक डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली.

तिचंही बरोबरच होतं म्हणा ! मला कितीही तो वर्गमित्र वाटला, तरी तिच्या दृष्टीने आत्ताच्या त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, ‘मुलगा’ असं संबोधणं थोडंसं हास्यास्पद वाटलं तर नवल नव्हतं. शाळकरी मुलापासून, बायको आणि दोन मुलांची जबाबदारी असणारे वडील…एवढा मोठ्ठा प्रवास आहे हा. फरक तर पडणारच.

रोजच्या रूटीनमध्ये दिवसा मागून दिवस जातात. तेच तेच चालू आहे, आयुष्यात काही बदलच नाही असं वाटत राहतं. आणि अचानक एक दिवस मागे बघीतलं की वाटतं केवढं बदलय सगळं. त्या शाळकरी मित्राला भेटल्यावर तसच जाणवलं ! आत्ता आत्ता कुठे आम्हीच शाळा-कॉलेजमध्ये होतो….
आणि आज आमची मुलं कॉलेजात जात आहेत. एवढी वर्षं गेली ???

त्या मित्राबरोबर त्याची मुलगीही होती. तिनेही, ‘मी’ कोण होते हे विचारलं असेल. मला खात्री आहे…. ‘ती माझ्या शाळेतली मुलगी होती’, असं त्याने सांगितल्यावर त्याची मुलगीही डोळ्यात पाणी येईपर्यंत हसली असेल.

©®मेधा नेने ✍️

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}