#वाढदिवस —- ©उज्वला रानडे
#वाढदिवस
साडेसात वाजत आले तशी हाॅलमधली गर्दी ओसरली. संज्या कोपऱ्यातल्या एका रिकाम्या टेबलकडे गेला. हातातला माॅकटेल्सच्या ग्लासेसनी भरलेला ट्रे टेबलावर ठेवून त्याने गळ्यातल्या टायची गाठ सैल केली आणि ट्रेमधला एक भरलेला ग्लास उचलून सुकलेल्या ओठांकडे नेला.
गेला एक तास हाॅलमध्ये नुसती धुमश्चक्री चालली होती. शंभरेक माणसं आली काय आणि एक तासात जेवून परत गेली सुद्धा!
असं कधीच होत नसे. माणसं साडेसहापासून यायला सुरू होत. सरळ लावलेल्या खुर्च्यांची तोंड फिरवून गोलाकार बसून गप्पा छाटत. एकीकडे कोल्ड्रिंक्स, स्टार्टर्सचा समाचार घेत, मग बाया बापड्या सावकाश उठून चाट काॅर्नर कडे जात, हाॅलमधल्या डेकोरेशनच्या पार्श्वभूमीवर सेल्फिज, एकमेकांचे फोटो काढत, वधूवरांना भेटायला जाऊन मग जेवणाच्या टेबलकडे मोर्चा वळवत. इतके स्टाॅल्स लावलेले असत की मेनूत कायकाय आहे ते बघायलाच दहा मिनिटे लागत. एकूण आलेला प्रत्येक निमंत्रित दोन अडीच तास तरी कमीतकमी हाॅलमधे असे.
आज मात्र काय झालं होतं कोण जाणे. माणसं होती शंभरच. हल्ली कोरोनाच्या साथीमुळे तेवढीच बोलवायला परवानगी होती ना! साडेसहाला माणसं आली आणि वाघ मागे लागल्यासारखी जेवण उरकून सव्वासात पर्यंत हाॅल खाली झाला पण!
आता शिल्लक उरलेलं अन्न सगळ्या आचारी, वाढपी वगैरे कर्मचाऱ्यांना वाटलं की घरी जायचं! संज्याने भटारखान्यात एक चक्कर मारली. तिथे एवढीच माणसं दोनदा जेवतील एवढं अन्न अजून शिल्लक होतं! आज एवढं जेवण का उरलं बरं! क्षणभर संज्याच्या मनात प्रश्न आला. त्याला वाटलं कदाचित इथल्या कुक्सना कमी जेवण बनवायची सवय नसल्याने असं झालं असावं. या हाॅलमधे श्रीमंत लोकांचीच लग्ने होत असत. एकेका लग्नाला बाराशे पंधराशे निमंत्रित सहज असायचे. या कोरोनाच्या साथीमुळे गेल्या नऊ महिन्यात एकही लग्न झालं नव्हतं. आत्ताशी लग्न व्हायला परत सुरूवात झाली होती. पण शंभर माणसंच बोलवायला परवानगी होती म्हणे.
पंधरा दिवसांपूर्वीच केटररने सगळ्या मुलांना बोलावून सांगितलं होतं की आता प्रत्येक समारंभाचा पाचशे ऐवजी फक्त पन्नास रूपये मोबदला मिळेल. उरलेलं अन्न नेहमीसारखं घरी न्यायला मिळेल पण पैसे म्हणाल तर पन्नास रूपयेच मिळतील. शंभरच लोकांना बोलावणार असतील तर त्यात मी किती कमावणार आणि तुम्हाला काय देणार! परवडत असेल तर या नाहीतर दुसरी मुलं बघतो! पण सगळ्या मुलांनी एकमुखाने चालेल म्हणून सांगितले. त्यातली काहीजण, ज्यांत संज्या पण होता, नुसती अन्नासाठी, या माहौल मध्ये काही तास रहायला मिळावं म्हणून सुद्धा काम करायला तयार होती!
तर फक्त शंभर माणसांनाच बोलावण्याची अट घालून लग्न समारंभ करायला परवानगी मिळाल्या पासूनचं हे दुसरंच लग्न होतं. त्यामुळे आचाऱ्यांचा अंदाज चुकला असावा.
हाॅलच्या जरा बाहेर जाऊन त्याने घरी फोन लावला. “आये, आज जेवन बनवू नको. हितं खूप उरलंय. बरंच घरी न्यायला भेटंल. आज रेश्मीचा वाढदिवस आहे ना; तिला म्हनावं चाळीतल्या तुझ्या सगळ्या दोस्त मंडळींना बोलाव पार्टीला. आज नेमक्या तिच्या आवडत्या जिलब्या हाएत इथं. जास्तीतजास्त जमतील तेवढ्या घिऊन येतो. आठ सव्वाआठ पर्यंत येतोच मी.”
संज्या या नोकरीवर बेहद्द खूष होता. एकतर त्याला काॅलेज करून हे काम करता येतं होतं. प्रत्येक रिसेप्शनला मिळणाऱ्या पाचशे रूपये मोबदल्यापेक्षा इथल्या जादूमय वातावरणात चार-पाच तास रहायला मिळण्याचं त्याला आकर्षण होतं. ते मंद संगीत, उंची वस्त्रे आणि दागदागिन्याने सजलेले स्त्री-पुरुष, त्यांच्या अंगावर फवारलेल्या सेंटचा, डेकोरेशनच्या फुलांचा सुवास, कधी ज्यांची नावं सुद्धा ऐकली नाहीत असे सुग्रास अन्नपदार्थ नुसते खायलाच नाही तर उरलेले घरी न्यायला पण मिळत! केटररने दिलेला युनिफॉर्म तर भारीच होता! तो सूट, टाय, बूट अंगावर चढवले की त्याला अगदी ‘साला मैं तो साहब बन गया’ असं वाटे. मागच्या गल्लीतल्या मंजीनं आपल्याला या कपड्यात बघावं असं त्याला नेहमी वाटे पण हे कपडे घरी न्यायला परवानगी नव्हती.
इथे आलं की त्याला वाटे स्वर्ग यापेक्षा काय वेगळा असणार आहे! आपला दारूडा बाप, दहा घरची धुणीभांडी करून, बापाचा मार खाऊन पिचलेली आई, तिच्याकडे सतत कसलातरी हट्ट करणारी रेश्मी, आजूबाजूच्या खोल्यांमधला धिंगाणा, वहाणारी गटारं, घोंघावणारे डास सगळ्यांचा त्याला विसर पडे.
मागे एकदा याच हाॅलमध्ये एका उद्योगपतीच्या मुलीचा वाढदिवस साजरा झाला. रेश्मीच्याच वयाची असावी ती. त्यावेळचा थाटमाट पाहून संज्याचे डोळे दिपले होते. रेश्मीचा वाढदिवस एकदातरी आपल्याला जमेल तेवढ्या थाटात करायचा असं त्याने ठरवलं होतं. आज नेमका तिचा वाढदिवस होता. तिच्या आवडत्या जिलब्या घरी न्यायला मिळणारच होत्या, शिवाय घरी जाताना केक न्यायचा! रेश्मीच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलेल ते त्याला दिसत होतं!
खुशीत शीळ घालत तो हाॅलमध्ये शिरला तर आतला माहौल अनपेक्षित होता. टेबलांवर नवे कव्हर्स चढवले जात होते. अन्नपदार्थांचे रिकामे झालेले ट्रेज परत भरण्याची लगबग सुरू होती. गोंधळून हे काय चाललंय असा विचार तो करत असताना त्यांच्या खांद्याला पकडून त्याला खेचतच सुपरवायझर बोलला, “अरे कुठे बाहेर टाईमपास करतोस! चल तुझे ट्रेज भरायला घे…”. “ट्रेज भरायचे? आता कशाला? गेली ना माणसं!…” संज्या गोंधळून म्हणाला. “अरे बाबा, एवढ्या माणसांनी काय होतं! ही पार्टी खूप मालदार आहे. त्यांच्या वरपर्यंत ओळखीही आहेत. शंभर माणसं बोलावण्याच्या नियमातून त्यांनी मस्त पळवाट काढली आहे. सव्वासातला शंभर माणसं जेवून गेली; आता साडेसातला पुढची शंभर येतील; नऊला अजून शंभर येतील. पोलीस कधीही हाॅलमधे चेकिंग साठी आले तरी त्यांना हाॅलमधे शंभर माणसंच दिसतील! त्यांचं ही बरोबर आहे, ही करोनाची भानगड नसती तर तीन हजार माणसं बोलावली असती असं म्हणत होता तो शेठ. चल, तू ट्रेज भरायला घे. माणसं यायला लागली बघ…”
संज्या सुन्न झाला. पुन्हा दोन वेळा मागच्या सारखीच धुमश्चक्री झाली. पुढचे चार तास तो यंत्रवत गर्दीतून माॅकटेलचे ट्रेज फिरवत राहिला. घरी फोन करून यायला उशीर होईल, जेवण पण बहुतेक आणता येणार नाही हे सांगायला त्याला वेळच मिळाला नाही. सगळं संपून वेळ मिळाला तेव्हा सांगून उपयोग नव्हता!
साडेदहा वाजता सगळं आटोपलं तेव्हा सगळ्या स्टाॅल्सवरचं अन्न संपत आलं होतं. जिलब्यांच्या भांड्यानी तर पार तळ गाठला होता. थोडं उरलेलं अन्न घेऊन केटररचा सगळा कर्मचारी वर्ग जेवायला बसला. भूक नाही सांगून संज्या निघाला.त्याने मोबाईल मध्ये पाहिलं. आईचे अनेक मिस्डकाॅल्स येऊन गेलेले दिसत होते. अकरा वाजता तो घरी पोहोचला तर आई काळजीत होती. “आरं कुटं व्हतास रं? रेश्मीच्या सगळ्या मैतरणी आल्या व्हत्या. तुझी किती वेळ वाट पायली. शेवटी वडापाव आनून दिला त्यांना; रेश्मी तर काही न खाताच रडून रडून झोपली.” “उद्या सांगतो काय झालं ते, झोप आता ” एवढं बोलून तो कपडे बदलायला गेला. पाणी पिऊन रेश्मीच्या बाजूच्या अंथरूणावर आडवं होऊन त्याने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला. रेश्मीच्या तोंडून झोपेतच हुंदका बाहेर पडला.
©उज्वला रानडे