आनंदी……. प्रा. निलेश 99608 36368
आनंदी..
प्रा. निलेश
99608 36368
घरभर फिरून झाल्यावर सोफ्याजवळची जागा निमीने स्वतः साठी निवडली. घरात शिरल्यापासून सर्वत्र भिरभिरती नजर टाकत फिरत होती. खास तिच्या स्वागतासाठी लावलेले रंगीत फुगे, टेडी बिअर यापैकी तिला काही आवडले नाहीत बहुदा. पण फुलदाणीतील फुले मात्र जवळ घेवून बसली. त्यांच्याकडे पाहून हसली सुद्धा. निमी.. तिचं नाव फारसं आवडत नव्हतं. ते बदलून घ्यावं असं मनात होतं खरं पण तीन वर्षाचं जन्मतःच मायेला पारखे झालेलं लेकरू एकाच वेळी किती बदल पचवेल असा विचार करून मीच मानसीला थांबायला सांगितलं. ती घरात रुळल्यावर करूया विचार म्हणत तीही राजी झाली.
लग्नाला एक तप उलटल्यावर स्वतः चे मुल होण्याची आशा फारच धूसर झाली होती. पुन्हा आपल्या कष्टाच्या पैशातून डॉक्टरचा खिसा भरण्यात समाधान मानन्याऐवजी ज्याला आपली गरज असेल असे अनाथ लेकरू वाढवूया म्हणत वर्षभरात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर निमी घरात आली. आम्हाला आभाळ ठेंगणं झालं पण आई तितकिशी आनंदी दिसत नव्हती.
घरात रुळायला निमीला फारसा वेळ लागला नाही. मुळातच लाघवी, गोड निमी. सारखं पुढे मागे बडबड करत फिरत राहते.आतातर आम्हा दोघांचं तीच्यावाचून पानही हलत नाही. पण तिच्यामुळे घरात नवा पेच उभा राहिला. आईला घरात अशी अनाथ मुलगी नको होती, त्यात मुलगी तर मुळीच नको.. मुलगा असता तर गोष्टी सोप्या झाल्या असत्या कदाचित. एके दिवशी आई पूजा करत असताना निमी खेळत होती. खेळताना तिचा बॉल लागून पंचामृत सांडल्याच निमित्त झालं. आईने पूर्ण घर डोक्यावर घेतलं. निमी येवून चार महिने झाले पण आई एक वाक्य धड तिच्याशी बोलली नसेल. यावयात असे बदल पचवणं आईला थोडे अवघडच.. तसही ती सर्वांशीच कमी बोलते. कधी मन मोकळं करत नाही. सुटतील पेच..
निमी घरात आल्यानंतरची आताची ही पहिलीच दिवाळी. मानसी तर भलतीच उत्साही दिसत होती. कपडे, फटाके, फराळ सगळीच रेलचेल. कितीतरी वर्षांनी घर भरलेलं वाटत होते. मानसीला उद्या सुटी असेल. आजही ती जरा लवकरच आली. आल्या आल्या चकल्यांचा घाट घातला तिने. बाजारात सगळेच मिळते तरी यांना नेमकं घरीच का बनवायचं असत देवास ठावूक. दोन दिवसाची सुटी पण स्वयंपाकघरात घालवणार. उद्या धनत्रयोदशी. आज सगळ पूर्ण व्हायलाच हवे. तिचं तळणीच काम सुरू होत. आई तिच्या आवडत्या कामात मग्न होती. किती वर्ष झालीत बघतोय सडा रांगोळी हीचं आवडतं काम. रांगोळीत रंग भरताना अगदी समाधी लागते. त्याच तंद्रीत होती आजपण. निमीला मामाने घेतलेला भातुकलीचा सेट काढून देवून शांततेने खेळायला सांगून मानसी तिच्या कामाला लागली. तिला मदत करायची म्हणून मी पण गेलो स्वयंपाकघरात. मोजून अर्धा तास देखील झाला नसेल. निमी ओरडत स्वयंपाकघरात आली. “आई,पटकन चल आजी रडतेय बघ..” काय करावं आता? सणासुदीला घरात काय रामायण घडतंय… मानसीचा घामेजलेला चेहरा चिंतेने ग्रासलेला लगेच लक्षात आला. तिला नजरेनेच होईल सगळ ठीक म्हणत दोघे बाहेर आलो. रांगोळी तर सुरेख जमलेली होती पण आईच्या डोळ्यातून घडाघडा पाणी वाहत होते. काय बोलावं कळत नव्हते पण काहीतरी बोलायचं म्हणून मानसी बोलली “आई पोर लहान आहे, समज नाही तिला.” तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आईने निमीला स्वतः जवळ ओढून घेतलं. “गुणाची आहे ग माझी आनंदी.” आनंदी.. माझी लहान बहीण.. रूपवान.. गोड स्वभावाची.. माझ्याहून तीन वर्षे लहान. माझं बालपण तिच्या आठवणींनी पूर्ण पणे भरलेलं. माझ्याअगोदर आईबाबांनी थाटामाटात लग्न केलं तिचं. पण हुंडाबळी ठरली. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तिने. ती गेल्यापासून आईचा जगातील चांगुलपणावरचा विश्र्वासच उडाला. मानसीसारख्या समजूतदार मुलीला सुद्धा घरात सामावून घ्यायला बराच वेळ लागला तिला. आज पहिल्यांदा आईने तिचे नाव काढले … अचानक काय झाले असेल. माझी विचारांची तंद्री तिच्या शब्दांनी भंग पावली.
” मी अशी रांगोळी काढत बसली की माझी आनंदी म्हणायची रांगोळीतले वेगवेगळे रंग म्हणजे आपण सारे. सगळे एकत्र असलो नि आपापल्या जागी जावून बसलो की किती मोहक होते न ही रांगोळी. ही छोटी आनंदी हेच म्हटली मला. किती समज आहे या लहानगीला…. पण या लेकराला मी कधीच तिची जागा दिली नाही. माझ्या आंनदीचाच हा पुनर्जन्म. ही माझी आनंदी.” म्हणत आईने निमीला अजूनच जवळ घेतलं. तिच्या केसांवरून हात फिरवत मी तिला विचारले “मग कस वाटलं नविन नाव ?” “पण माझं नाव आनंदी का ठेवायचं?” निमीचा सहज वाटणारा पण अवघड प्रश्न. त्यावर आईनीच उत्तर दिलं “कारण तू घरातला आनंद परत आणला म्हणून.”
बऱ्याच वर्षांनी माझीही सर्वजण आनंदी पाहिलेली ही पहिलीच दिवाळी होती. आनंदीने घर आनंदमय केलं खरं.
दुखावलेल्या मनांना आनंदी केलं. दुरावलेल्याना जवळ आणले. व जीवनात आनंदाचे सुखाचे रंग भरले.
सर्वांचे जीवनातही अशाच एका आंनदीची गरज असते न….मग ती आनंदी वेगवेगळ्या रूपाने जीवनात समाविष्ट होते. कधी मुलगी म्हणून तर मुलगा, कधी मित्र म्हणून तर कधी मैत्रीण कधी रक्ताच्या नात्यात तर कधी अनोळखी असलेली .रूप कुठलही असेल पण काम मात्र एकच ते म्हणजे आनंदी जीवन जगायला शिकवणे.
शोधता येईल का तुम्हालाही तुमची ‘आनंदी ‘…..