फुगा.
फुगा…
तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एकेक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावे याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने,साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही हा विचार तिला सतावत होता.
काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यु ट्युब वर बघत होती. ते म्हणाले,” देवानं आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन हाताच्या ओंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्या अगोदर लोकांना देऊन टाका. कारण ते नाहीतरी जाणारच आहे.”
तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात कारण त्यांच्याकडे प्रसिध्दी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे?
पण जो संचय केला आहेस त्यातले काहीही तुला बरोबर नेता येणार नाही असे अंतर्मनाने परत परत ऐकवले आणि ती वैतागून उठली.
मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि बाहेर चालायला बाहेर गेली. रस्त्यात एक १५ वर्षाचा मुलगा हेलिअम भरून फुगे विकत होता. “ताई घ्या की फुगा. आज काही विक्री झाली नाही. लई वर जातोय बघा हा फुगा. बघा तरी! ” तो काकुळतीला येऊन म्हणाला.
तिने त्याच्याकडून सहा हेलिअमचे फुगे घेतले. तो खूष झाला. ताई, कधीही फुगे हवे असतील.. वाढदिवसाला आणि कशाला तर सांगा म्हणाला.
ती घरी आली. काय करू या फुग्याचं म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदाने उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली.”कशाबद्दल?” म्हणाली. ती म्हणाली, “असंच!” चौथा फुगा तिनं ॲाफीसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक “आज वाढदिवस आहे का कुणाचा“ म्हणत एकमेकाशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. पाचवा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून चार जास्त लोकं तिच्याकडे भाजी घ्यायला आली. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीज मधून उतरलेल्या सुट-बुटातील व्यक्तीला दिला. तो हसून थॅंक्यु म्हणाला.
ती घरी आली. साधे सहा फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात म्हणून दुसरे दिवशी तिने त्याच्याकडून बारा फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटल मध्ये पेशंटस् ना पाठवले. तिथून फोन आला अजून थोडे फुगे पाठवा.
तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरूरीच्या व रोज लागणाऱ्या चार गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकले. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॅास्पिटल्समध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरूवात केली.
माहित नसलेल्या बायका-मुला-माणसाकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा म्हणून देणगी देण्यास सुरूवात केली.
“फुगेवाली” मॅडम आता सर्वांना माहित झाली होती. आता तिने एक एक बोधकथा लिहून ती फुग्या बरोबर पाठवायला सुरुवात केली. ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले.
त्यांनी विचारले, “ मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली?”
ती म्हणाली, “ मी पहिला फुगा विकत घेतला तेव्हा त्या मुलाने साधं चपटं पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो.. त्यात त्याने हेलिअम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्याचं कारण आहे त्याच्या आत असलेली गोष्ट. नाहीतर हा एका बॉक्स मध्ये सपाट पडून होता.
जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आत देखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.
आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं तेव्हा एकेक आयडिया आपोआप येत गेली! मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितले ते केले. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत!
जे जमवले होते ते आताच देऊन टाकले कारण कधीतरी द्यावे लागणारच आहे.. मग आताच का नाही असा विचार केला. आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही. जुने होत नाही.
हा हेलिअम फुग्यालाच नाही पण मलाही वर वर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात. प्रेमाने मिठी मारतात. पत्र, मेसेजेस पाठवतात. आशीर्वाद देतात. म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका. तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल. आशीर्वाद, दुवा, शुभेछया ही आहे आताची माझी कमाई! हा माझा नवा संचय! आणि बरका हे सगळं मी बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस!
जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोणं म्हणतं?