मंथन (विचार)मनोरंजन

गुरूदक्षिणा………….. अर्जुन आहेर…..

गुरूदक्षिणा…. 💚♥️💜
—————-

गुरूजींनी वैतागून शेवटी इच्छा नसतानाही पोलीस स्टेशनची पायरी चढलीच..

साहेब,माझी तक्रार लिहून घ्या…

साहेबांनी जरा ओळखीचा आवाज ऐकून हळूच वर मान करून पाहिले…
एक सत्तरीचे गृहस्थ शर्ट- पायजमा ह्या साध्या वेषात समोर उभे होते…
साहेबांना चेहरा ओळखीचा वाटला..त्यांनी पुढे होऊन बसायला खुर्ची दिली..

बोला, काय नाव आणि काय तक्रार आहे तुमची..

माझे नाव तुकाराम काळे.. मी निवृत्त शिक्षक आहे..बायकोचे निधन झाल्याने सध्या मुलाकडे राहतो..माझी तक्रार ही आहे की, माझा मुलगा आणि सुन मला त्रास देते… मुलगा रात्री दारू पिऊन आल्यावर मारहाण करतो..

गुरुजींचे नाव ऐकून साहेब भूतकाळात गेले..
गावात पाचवी ते सातवी पर्यंत गुरूजी त्याला शिकवायला होते… गुरुजींच्या आवाजात जरब पण मनाने खूपच प्रेमळ… तो हुशार असला तरी उनाड आणि अतरंगी विद्यार्थी होता.. शाळेच्या वेळात बरेचदा रानोमाळ भटकायचा..
शाळेत मुलांच्या खोड्या काढायच्या.. गुरूजींनी छडी असूनही कधी वापर केला नाही.. छडी पेक्षा प्रेमाने समजावण्याचा जास्त प्रयत्न करायचे.. बरेचदा गुरूजी त्याला शाळेबाहेर भटकताना पाहून वर्गात आणून बसवायचे…

आज शाळेतले ते दिवस आठवून साहेब गालातल्या गालात हसत होते..

गुरूजींनी साहेबांना हसताना पाहून विचारले,” का हो साहेब.. का हसताय…

काही नाही..सहज हसतोय.. बरं तुम्ही मला तुमच्या मुलाचा मोबाईल नंबर द्या आणि बिनधास्तपणे घरी जावा..काळजी करू नका..सगळं व्यवस्थित होईल..

गुरूजी ठिक आहे म्हणत घरी निघून गेले..

गुरूजी आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा पोलीस ठाण्यात आले…
गुरूजींना पाहून साहेबांनी खुर्ची वरून उठत गुरुजींचे स्वागत करत नमस्कार केला…

या.. या.. गुरूजी.. काय म्हणतेय तब्येत..मुलगा आणि सुनबाईने काही त्रास दिला का परत…

नाही हो साहेब.. तुम्ही काय जादू केली कळालेच नाही पण घरी सध्या कमालीचा बदल जाणवतोय.. मुलगा- सुनबाई दोघेही खूपच काळजी घेताहेत.. चहा, नाष्टा,जेवण सगळं वेळेत..विशेष म्हणजे मुलाचे दारू पिऊन येणे सुद्धा बंद झाले.. तुम्ही असा काय कानमंत्र दिला..

गुरूजी,तुम्हाला हात जोडून विनंती आहे की, तुम्ही मला साहेब म्हणू नका…खरे सांगायचे मी काहीही केले नाही..फक्त फोनवरून थोडे माझ्या भाषेत समजावून सांगितले..त्याने समजून घेतल्याने पोलीस स्टेशनला बोलावण्याची वेळ आली नाही..

मी आज पुन्हा इकडे खास तुमचे आभार मानण्यासाठीच आलोय.. बाकी काही काम नव्हते…

गुरूजी, आभार मानून मला लाजवू नका.. तुम्ही मला ओळखले की नाही हे माहीत नाही पण मी तुम्हांला पहिल्या भेटीतच ओळखले.. तुम्ही मला पाचवी ते सातवी पर्यंत शिकवायला होते..

अरे,मी तर तुला ओळखलेच नाही.. खूपच आनंददायी दिवस आहे की माझा विद्यार्थी पीएसआय झालाय.. अविनाश का तू.. असे म्हणत गुरूजींनी उठून पाठीवर कौतुकाची थाप मारली…

गुरूजींची कौतुकाची थाप पाठीवर पडताच त्याला गहिवरून आले…

गुरूजी, ही सगळी तुमची कृपा आहे.. तुम्ही त्यावेळी मला प्रेमाने समजावून सांगताना म्हणाले होतात की,मी आज तुझ्या पाठीमागे छडी घेऊन पळतोय तसा तू शिकून काही दिवसांनी गुंडाच्या मागे दंडुका घेऊन पळालेला पहायचाय गुरूजी, तुमचे आणि माझेही स्वप्न पूर्ण झाले त्यात तुमचे मार्गदर्शन खूपच मोलाचे होते…परीक्षा दिली, पास झालो आणि योगायोगाने खाकी गणवेशात तुमच्या समोर बसायचे भाग्य लाभले.. खरोखरच मी खूपच नशिबवान आहे…

नाही रे.. त्यात माझे कसले योगदान.. खरी मेहनत तुझीच आहे… माझे कामच होते मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे…

गुरूजी, मी ठरवले आहे की, तुमची ताठ मान खाली जाईल असे कोणतेही काम करणार नाही.. गोरगरीबांना योग्य न्याय देण्यासाठी तसेच अपराध्यांना शिक्षा करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत राहील..

व्वा.. तू खरोखरच माझा आदर्श विद्यार्थी आहे हे तू मला काही दिवसातच तुझ्या कामातून दाखवून दिले आहे.. खरोखरच तुझे मनापासून धन्यवाद…

गुरूजी, धन्यवाद देऊन मला लाजवू नका.. तुम्ही मला तुमची मदत करण्याची अनोखी संधी दिली हीच माझ्याकडून तुम्हांला दिलेली गुरूदक्षिणा समजा… यापेक्षा चांगली गुरूदक्षिणा काय असावी..

खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद.. तुझ्याबद्दल सांगताना मला नक्कीच अभिमान वाटेल.. चल येतो मी.. तुझा हेवा आणि गर्व वाटेल असे काम असेच सुरू ठेव.. शुभेच्छा..

गुरूजी, मी आज असे तुम्हाला जाऊ देणार नाही.. जेवणाची वेळ झाली आहे.. आपण आज हॉटेलमध्ये सोबतच जेवण घेऊया…
त्याने हॉटेल मध्ये आग्रहाने गुरूजींना सोबत जेवू घालत घरी येण्याचे आमंत्रण देऊन पुन्हा भेटत राहू असे म्हणत निरोप घेतला…. 🙏

✍ अर्जुन आहेर…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}