आजी आणि व्हाट्सऍप : सुखांतिका की शोकांतिका…………अजय कुलकर्णी
आजी आणि व्हाट्सऍप : सुखांतिका की शोकांतिका
आजीला गाव सोडून कुठेही जाण्याची इच्छा होत नसे. शेतीवाडीत तिचे मन रमत असे. मुलगा शहरात एका कंपनीत मोठया हुद्द्यावर होता. त्याचा अनेक दिवसांपासून आग्रह होता, “आई, इकडे येऊन रहा. सध्या शाळेला सुट्टी आहे. मुलं पण विचारत असतात आजी कधी येणार आहे.” तिलाही नातवंडांना भेटण्याची इच्छा होती. आठ दिवसांसाठी येईन असे मुलाला कळवले. रविवार असल्यामुळे सर्वजण एकत्र भेटीला म्हणून शनिवारी रात्री उशीरा आजी मुलाकडे आली.
रविवारी सकाळी उठल्यावर आजीला प्रत्येकजण वेगवेगळ्या रूममध्ये असल्याचे दिसले. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली १० वर्षांची पिंकी आजीला बघताच ‘हाय आजी’ चित्कारली. मोबाईलमध्ये डोके घालून बसलेल्या ७ वर्षाच्या पिंटूने आजीला हाय केले. आजीने दोघांनाही जवळ घेतले व नाश्त्याला काय करू असे विचारले. पिंकीने चौघांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर आजीचे म्हणणे सेंड केले. झोमॅटोने मागवून घेऊया असा आईचा मेसेज आला. ‘मला सिझलर पाहिजे’ पिंट्याने मेसेज पाठवला. पिंकीने मेसेजवर बर्गरची ऑर्डर दिली. आईने सिझलर, बर्गर व त्यांच्यासाठी पोहे व शिरा यांची ऑर्डर प्लेस केली. पंधरा मिनिटांनी नाश्ता आला. सगळं कसं सुरळीत व शांतपणे पार पडल्याचं बघून आजी आश्यर्यचकीत झाली.
मुलाने अमॅझॉनवरून नवीन मोबाईल मागवला. पिंकीने नवीन सिमकार्ड मोबाईलमध्ये टाकले व आजीला ग्रुपमध्ये ऍड केले. तिने आजीला मेसेज वाचणे, त्याला रिप्लाय देणे, ई. फंक्शंन्स समजून सांगितली. एका दिवसात आजी सर्व फंक्शन्स शिकली व प्ले स्टोअरमधून आवश्यक असलेली ऍप्स डाउनलोड केली. मुलाने आईची भेट घेऊन म्हटले, “आई तुला काही हवे असल्यास ग्रुपवर मेसेज टाकत जा. आम्ही सर्वजण तूझ्या सेवेला हजर आहोत.”
अशा प्रकारची पुनरावृत्ती रोजच होऊ लागली. दिवसभरात सर्वांच्या गाठीभेटी क्वचितच होत असे. खरे तर तिला मुलांच्या सहवासात राहायचे होते. परंतु सर्वजण मोबाईलवर बोलत असत म्हणून तिनेही ही सवय लावून घेतली. फारसे बोलणे नाही म्हणून वाद विवाद नाहीत, त्यामुळे आजी मनोमन सुखावली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मुलगा व सून दिवसभर लॅपटॉपवर काम करत असत. रोज नातवंडांचे गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज बघून आजी भांबावून जात असे. जसे काही नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व काही यंत्रवत चाललं होतं. आठ दिवसात आजी या यांत्रिक जीवनाला कंटाळली व परत गावी जाण्याचे ठरवले.
आजीने ग्रुपवर ‘मी उद्या जाणार आहे’ असा मेसेज टाकला. सर्वांनी आजीला मोबाईलवर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. सुनेने आईला पुढील वेळेस आल्यावर महिनाभर रहा असा मेसेज पाठवला. मुलाने मोबाईलवर ई-तिकीट पाठवले. पिंकीने आजी सकाळी लवकर जाणार म्हणून उबेर टॅक्सी बुक केली. निघताना मुलांनी आजीच्या मोबाईलवर मेसेज पाठवला, “बाय आजी, तु गेल्यावर आम्हाला करमणार नाही. लवकर परत ये.” तत्पूर्वी पिंकीने आजीचा मोबाईल घेऊन तिचे लाईव्ह लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर सेंड केले. तेच लोकेशन तिने बाबांना फॉरवर्ड केले. आजीचे मन कृतककोपाने भरून आले.
आजी निघाली म्हटल्यावर प्रथमच मुले आजीला येऊन बिलगली. आजीने आपले आश्रू आवरले. टॅक्सीत बसल्यानंतर आजीने मुलाला व सुनेला आशीर्वादाचा ईमोजी पाठवला. पिंकी आणि पिंटूला 501 रुपयांचा गुगल पे केलं. टॅक्सी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्म क्र. दोनच्या गेटवर सोड असा मेसेज पाठवला. मागच्या सीटवर आजीने हताशपणे डोळे मिटवले. काही वेळाने ड्रायव्हरचा मेसेज टोन ऐकून आजी जागी झाली. ड्रायव्हरचा स्टेशन आल्याचा मेसेज वाचून आजी टॅक्सीच्या बाहेर आली. रेल्वे अधिकाऱ्याचा नंबर घेऊन आजीने त्याला ट्रेन नं. 2301 कधी येणार असा मेसेज पाठवला. काही वेळाने गाडी प्लॅटफॉर्म क्र दोनवर आल्याचा आजीला मेसेज आला. संध्यकाळी आजी स्टेशन बाहेर आल्यानंतर सुखरूपपणे पोहोचल्याचा मेसेज ग्रुपवर पाठवला.
घरी आल्यावर आजीने ctrl चे बटण दाबून स्वतःवर कंट्रोल केला. नंतर व्हाट्सऍप सर्चमध्ये जाऊन ‘My Life My Family’ हा ग्रुप ओपन करून डीपीवरील दोन्ही नातवंडांना डोळे भरून बघितले. सर्वांना बायचा मेसेज टाकून आजी ग्रुपमधून एक्झिट झाली. हे कसलं मोबाइलग्रस्त जीवन. कौटुंबिक गप्पा नाहीत, सुख-दुःखाच्या गोष्टी नाहीत, मुलांचा धांगडधिंगा नाही. आजीला हुंदका अनावर झाला. पतीच्या निधनानंतर आजी पहिल्यांदाच इतकं मुसमुसून रडली….✍️
अजय कुलकर्णी