मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

गड्डा जत्रा … सौ राजश्री कुलकर्णी / भावार्थी

#गड्डा जत्रा

आवरलं का पोरींनो , पटापट आवरा नाहीतर काठ्यांची मिरवणूक निघून जाईल ! धड नीट दर्शन ही घेता येणार नाही !आईचा आवाज ऐकुन आम्ही बहिणी , मैत्रिणी नटून थटून तयारच होतो , पटकन पूजेचे साहित्य घेऊन बाहेर पडलो …

आज लग्न होऊन बत्तीस वर्षे झालीत पण मागे फिरून बघताना हे लख्ख आठवते. जानेवारी महिना उजाडला की एक अनामिक स्फूर्तीने मन भरून येत असे . संक्रांत जवळ आली की दिवाळी सणाप्रमाणे लगबग चालू असे. माझे माहेर सोलापूर चे ! श्री सिद्धेश्वर मंदिराच्या तीन ही बाजूनी तलाव व मध्ये मंदिर एका बेटावर असल्याचा भास होतो. १२ व्या शतकात सिद्धराम संत होते . बसवेश्वर यांनी त्यांच्या उपदेशाचा प्रसार केला .
सिद्धराम ब्रम्हचारी होते त्यांनी एका कन्येला लग्नासाठी नकार दिला व योगदंडाशी लग्न करण्यास तिला सांगितले
….हाच तो सुंदर , रमणीय प्रतिकात्मक असा सोहळा ! दरवर्षी संक्रांतीपासून साधारण पंधरा दिवस होम मैदानावर जत्रा भरते , तिलाच गड्डा जत्रा असे म्हणतात .

संपूर्ण शहरात काठ्यांची मिरवणूक निघते .मोठ्या बांबूला छान असे सजवून आपल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर पेलवत मिरवून आणतात . सोलापुरात अनेक ठिकाणी ६८ शिवलिंगाची स्थापना केलेली आहे . इथून काठ्या नेण्याची परंपरा चालू आहे . संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्री सिद्धेश्वर यांचे लग्न लावले
जाते . रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते .
संपूर्ण शहरात ह्याचा आवाज दुमदुमतो . आम्ही गर्दी असल्याने रात्री गच्चीवरून हा प्रोग्रॅम पहात होतो .रात्री आकाशात फटाक्यांची सुंदर रोषणाई दिसे .

रात्रीच्या वेळेस गड्ड्याची जत्रा बघायला तमाम सोलापूरकर बाहेर पडतात …जत्रेत वेगवेगळ्या प्रकारची खेळणी , पाळणे बसवलेले असतात ! आरशाचा खेळ , बंदुकीने फुगे फोडणे , मोटार बाईक वरचे हॉरर शो ! मला अजूनही त्या पाळण्यात बसायचे म्हटले की पोटात गोळा येतो !

छोट्या पुंग्या वाजवत गड्ड्यावर फिरण्याची बालपणीची मजा आठवून
अजूनही चेहऱ्यावर हास्य फुलते !

वेगवेगळ्या जादुगारांचे
शो असे बरेच काही पाहायला मिळते . लहानपणी शिवराय चरित्र
वाचताना एक प्रकारे रोमांचित होऊन शौर्य गाजवायला तलवार असावी जवळ असे वाटायचे ! त्याची हौस गड्डा जत्रेत सोनेरी तलवार
विकत घेत ! ह्या जत्रेत आम्ही दोन वेळा भटकत होतो . एकदा कौटुंबिक व दुसऱ्यांदा मित्र मैत्रिणी यांच्या समवेत धुडगूस !
त्या काळी तंबूत जाऊन फोटो स्टुडिओ मध्ये काढलेले फोटो पाहून अजूनही गालावर हास्याची कळी फुलते !

ह्या सगळ्यात मला आकर्षण होते ते मौत का कुवा हा शो पहायचे ! मोटारसायकल चा तो भयानक आवाज ऐकून छातीत धडकी भरायची !
एवढे सगळे फिरून झाले की मग मात्र पोटपूजेची वेळ होई . थोडी फार खरेदी करून , भाग्यश्री चा वडा ची चव चाखून आमची पावले घराकडे वळत !

अजूनही ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या की फिरुनी पुनः बालपण अनुभवावे असे वाटते .
आणि एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ही जत्रा आमच्या हरिभाई देवकरण शाळेसमोर भरत असल्याने आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटतो .
आजही सोलापूरला गेले की शाळेकडे पाहिल्यावर
डोळ्यात आलेले अश्रू अलवार पुसते आणि मनी येते ….!

रम्य ते बालपण गेले माझं सरून …!
फिरुनी न येण्यासाठी कधीही….!

आज कितीही लांबवर असलो तरी सोलापूरच्या ऋणानुबंध च्या गाठी मायेच्या धाग्यानं जोडलेले
जीव एकत्रच आहेत .

क्षण ते आठवणीतले
पुन्हा पुन्हा आठवतात
फिरुनी मागे बघताना..
अश्रूंचा बांध फोडतात !!

 

©️®️सौ राजश्री कुलकर्णी / भावार्थी
पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}