मी वनवासी 📗 विदर्भाची लेकबाळ, सह्याद्रीच्या कुशीत …. सिंधूताई सपकाळ
📗मी वनवासी 📗
विदर्भाची लेकबाळ, सह्याद्रीच्या कुशीत
दूधमे पकाये चावल तो उसे खीर कहते है|
मोहब्बत मे खाये ठोकर तो उसे तकदीर कहते है ।|
लकीर की फकीर हूं मै उसका कोई गम नही|
नही धन तो क्या हुवा इज्जत तो मेरी कम नही ।।
ज्या परिसरात मी काम करते तिथं माझं स्वतःचं घर नाही. पृथ्वीच्या पाठीवर मी बेघर भूमिहीन कुठंही माझं काहीही नाही. माझी एकुलती इस्टेट, संपत्ती म्हणजे ‘गाणं’ मी माझी ‘बहिणाबाई’ गाते. जोडीला काही गौळणी, भक्तिगीतं, भजन, अभंग, पारंपारिक गाणी, इत्यादी गाऊन मी रसिकांची, भाविक भक्तांची सेवा करते. माझा कार्यक्रमाचा आकडा ठरलेला नाही. मी कधीच कुणाला एवढे पैसे घेईन असं म्हटलं नाही. जनतेने जेवढे प्रेमानी दिले, तेवढेच घेतले. कधी कधी लोकांनी कार्यक्रम करूनसुद्धा काही दिले नाही, तेव्हा तोंडाने न मागता ‘गोपाळकृष्ण महाराज की जय’ म्हणून चालायला लागले. काही न घेता, मुळीच राग न बाळगता. माझा देवावर विश्वास आहे, तो देईलच. संगीत आणि संघर्ष दोघांचीही रास एकच, परंतु मी संघर्षाचा हात धरला. संगीत विसाव्याकरिता वापरलं.
आकाशवाणी पुणे केंद्रात मुलाखत घेताना श्री. एकनाथ आल्हाट यांनी मला प्रश्न केला होता की, ‘सिंधूताई, तुम्ही गाणं म्हणायला कुठे शिकलात ?’
‘मी कुठेही गाणं शिकले नाही. साहेब, एकदा माझ्या पोटाला भूक लागली. आणि भूक लागल्यावर मनुष्य रडतो ना ? मीही रडले साहेब, पण भेसूर न रडता स्वरांत रडले म्हणजे गाणं म्हटलं, ते मला माझ्या भुकेनं शिकवले
कार्यक्रमातून मदत म्हणुन
मिळालेल्या पैशांपैकी तिकीट वगैरेचा खर्च जाऊन बाकीचा पैसा वनवासींसाठी खर्च करते. पैसे संपले की कार्यक्रम सुरू आणि पैसे जमले की काम सुरू असा हा भरती ओहोटीचा प्रवास सुरू आहे. गाते म्हणून जगते आणि दुसऱ्याकडे वळून बघते.’ .
अशीच एकदा ममताला भेटायला पुण्याला गेले असता तिकिटाला पैसे कमी पडले. बालगंधर्वात काही पुणेकर मंडळींनी पत्ते दिलेच होते. त्यांना जाऊन बऱ्याच हायस्कूल-कॉलेजमध्ये मी कार्यक्रम केलेत. आंबेडकर हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाल्यामुळे सौ. टिल्लूताई मला पानमळ्यातील आपल्या कॉलनीत मंडळात घेऊन गेल्या आणि इथेच सौ. निलिमा मोकाशी यांची भेट झाली. निलिमाताईंनी श्री. संत गाडगेबाबा धर्मशाळेत येऊन, माझी मुलाखत घेऊन, माझ्या जीवनावर पहिलाच लेख लिहून दैनिक सकाळला दिला,
‘सी. सिंधूताई सपकाळ
गोड गळा- करारी बाणा.’
या लेखामुळे सर्वांच्या नजरा माझ्याकडे वळल्या आणि याच लेखामुळे पुण्याच्या विद्या सहकारी बँकेने माझा कार्यक्रम आयोजित केला. माझ्या कार्यक्रमाला मराठी चित्रपट अभिनेते सूर्यकांत मांडरे यांनी नाव ठेवून दिले, ‘सुरेल बोरी बाभूळ.’
दुसरे दिवशी सकाळला फोटोसह, जाहिरात आली. ‘सुरेल बोरी बाभूळ, सिंधू सपकाळ यांचा कार्यक्रम स्थळ :- हुजूरपागा शाळेचा हॉल. रसाळ वाणी, गोड गळा, अफाट पाठांतर; असा हा कार्यक्रम. बहिणाबाईंचाच एक आगळा आविष्कार वगैरे वगैरे आणि ही फाटक्या पातळातील तुटकी सिंधू बघायला प्रचंड गर्दी लोटली. मी स्टेजवर चढतानाच पहिली टाळी घेतली आणि श्रोत्यांना नमस्कार करून खाली बसले.
मला कोणताही विषय हाताळताना कसलीही अडचण पडत नाही. कारण मी जगते तेच मुळी असंख्य विषय एकत्रित करूनच. दुसरे म्हणजे मला अडखळणे वगैरे माहीत नाही. जीवनातील टप्प्याटप्प्याच्या रुकावटीने शाब्दिक साफ बनलेत माझे. त्याला मी काय करू? आणि माझी शैक्षणिक पात्रता अत्यंत कमी असल्यामुळे मी कागदबिगद कधी जवळ ठेवत नाही. त्याचं कधी कामच पड़त नाही. हुजूरपागेच्या दोन तासांच्या कार्यक्रमाने माझ्यावर पैशाचा पाऊस पडला. आदिवासींकरिता कपड्यांचे व भांड्यांचे ढीगच्या ढीग जमले. खूप कौतुक झालं आणि दुसऱ्या दिवशी पुण्यातील सर्व पेपरला माझ्याबाबत सविस्तर रकानेच्या रकाने भरून आले.
विंध्यवासिनी सिंधूताईचा संदेश, सिंधूताईचा कार्यक्रम ऐकताना सातपुडा पर्वत सह्याद्रीला भेटायला आला, असा भास होत होता वगैरे वगैरे; आणि इथूनच माझ्या कार्यक्रमांची मालिका सुरू झाली. एकेका दिवशी मला दोन दोन ठिकाणी प्रोग्रॅम मिळायला लागले, आणि मी ते घ्यायला लागले. वाटले होते, आपण चिखलदरा येथे सहा वर्षांपासून बांधत असलेलं मंदिर या निमित्ताने का होईना या वर्षी पूर्ण करून टाकू.
या पुण्यातील माझ्या कार्यक्रमाला मा. नानासाहेब गोरे, श्री. गजानन वाटवे, मालतीबाई बेडेकर, पद्माताई गोळे, शांताबाई किर्लोस्करही हजर होत्या. वरील सर्व निष्णात साहित्यिक मंडळी बघून कधी कधी माझी छाती दडपून जात होती. एकदा पद्माताई गोळेंनी जवळ असलेले पैसे तर दिलेच पण हातात असलेला रुमालही भरलेले डोळे न पुसता, माझ्या ओटीत टाकून दिला. असा हा प्रेमाचा, आनंदाचा, कौतुकाचा अहेर मला दर दिवशी मिळू लागला. पसरलेला ओटा परिपूर्ण भरू लागला.
जीवनभर तंगडतोड करूनही एवढी प्रसिद्धी मिळत नाही. संपूर्ण आयुष्य बेचूनही मोबदला मिळतो असे नाही, आणि आज हे माझ्या ध्यानीमनी नसतानाही काय घडतेय हेच मला कळत नव्हतं. मी प्रसिद्धीची हाव कधीच केली नव्हती. ही कसलीही आशा मला नव्हती आणि आज हे जे काही घडत होतं, ते मला भांबावून टाकणारं होतं. मंदिरासमोर बसून भीक मागणारी मी बाई, हे सर्व काय घडतेय याचा बोध होत नव्हता. अशाच एका कार्यक्रमाच्या दिवशी तर सकाळपासूनच मी गाडगेबाबा धर्मशाळेत उदास होते. काहीच कळत नव्हते.
आदिवासींची खूप आठवण येत होती. वन आठवत होते. माझा टिप्या कुत्रा मला पुन्हा पुन्हा भुंकून लवकर निघून ये म्हणतोय, असे वाटत होते. पडल्या पडल्याच पुण्याच्या मॅग्नोलिया शुक्ल या ताईंनी माझ्यावर लिहिलेले काव्य वाचीत होते. गीताचे बोल असे होते…
आज पाहिलं एक झोकून दिलेलं आयुष्य ।
रांगणाला चालतं केलं, घडविला मनुष्य ॥१॥
किती सांगितल्या गोष्टी हिचे फर्डे वक्तृत्व ।
कर्तृत्वाला नाही सीमा हिचे जाज्वल्य नेतृत्व ||२||
हिच्या स्वप्नांच्या कोंदणात एक वनवासी हिरा । कर्तृत्वाने चमकणारा, उजळणारा तारा ||३||
घरदार सोडले, आता एकच व्यवधान ।
आदिवासींच्या सुखात वनवासी राहणीत हिंस्र श्वापदे भेटली ।
सामावले समाधान ॥४॥
केली त्यांचीच शिकार, सुखरूप ही सुटली ॥५॥
आदिवासींनी रहावे सदा खुशीमध्ये मस्त ।
त्यांच्या सुख सुविधांसाठी हिची रात्रंदिन गस्त ||६|
परिस्थितीचे धनुष्य ही नेटाने पेलते ।
घनघोर अरण्यात इवली पणती तेवते ||७||
ठरल्या वेळेला कार्यक्रमाला जाणे भाग होते. उठले रिक्षात बसले. ठरलेल्या कार्यक्रमाच्या हॉलवर पोहोचले. हॉल तर माणसांनी तुडुंब भरलाच होता पण बाहेरही गर्दी मावत नव्हती. हॉलच्या गेटवरच वीणाताई देव भेटल्या. म्हणाल्या, “काय सिंधूताई, सध्या तुमचंच वारं आहे पुण्यात ?” मी नकळत बोलून गेले, “ताई, वारं आहे ते बरे आहे मात्र त्याचं वादळ होऊ नये म्हणजे मिळवली. पण आधीच अस्वस्थ असलेली मन:स्थिती अधिकच गडद बनली. आज मात्र मला स्टेजवर जायचा मूडच नव्हता. गाणं आठवतच नव्हतं म्हणून मी बोलत होते. बोलता बोलता अनुभव सांगत होते.
१९७८ साली जेव्हा मी चिखलदरा परिसरात गेले, तेव्हा एकदा उदास मन:स्थितीत जंगलातील पायवाटेने एकटीच फिरत होते. तेव्हा तेथील परिस्थिती भवानक होती. गरीब होरपळत होता. माझा निर्णय होत नव्हता. फॉरेस्टचा संताप आला होता. माझ्या हातात जर सत्ता असती तर… आणि याच विस्कळीत मन:स्थितीत मी काही करण्यासारखे नाही म्हणून रस्त्याचे दगडच उडवीत होते.
तो ठोकरसे उडा दूंगी’ हा चेहऱ्यावरचा भाव. खूपसे दगड उडता उडताच कानावर चिमणीच्या पिल्लाचं ओरडणं पडलं. बाटलं, पिल्लू सापाने गिळलं असणार. आपण त्याला वाचवायला पाहिजे, म्हणून हातात लांब काठी घेतली आणि झुडुपात मुसंडी मारून घुसले. कसलीही तमा न बाळगता अगदी आत गेले. काठीवरची पकड घट्ट केली.
कारण सापाशी सामना द्यायचा होता. पण पिल्लू सापाने गिळलचं नव्हतं हे जवळ गेल्यावर कळलं. वर खोप्यात सुरक्षित असलेल्या पिल्लाला नुकतेच फुटलेले पंख उगी बसू देत नव्हते आणि पंखात बळही नव्हतं. पिल्लू उडालं तसंच खाली पडलं, दुर्दैवाने पडलं तेही बाभळीच्या वीत बीत लांब आणि टणक फाट्यावरच पंखात बळ नसतानाही उडायची ऊर्मी अशा तन्हेने पिलाला घातक ठरली होती. दोन काटे पिलाच्या पोटात टोचले होते. काट्यावर रक्ताचा थेंबाथेंबाने अभिषेक सुरू झाला. पंख विस्कळीत झाले. पिल्लू उडू शकत नव्हते आणि पोटातील काटेही निघत नव्हते. जीवही जात नाही आणि वेदनाही सहन होत नाही, म्हणून ते ओरडत होते. मी हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत होते. पण नेमके काय करू ते सुचत नव्हते. इतक्यात जोरात फडफड झाली म्हणून वर बघितलं. एक कावळा आला, पिलाजवळ गेला. मला वाटलं आता हा कावळा पिलाला खाणार कारण भगवंतांनीच गीतेत म्हटलंय ना. ‘जीवो जीवस्य जीवनम!’
कावळा पिलाजवळ गेला आणि आपल्या चोचीत आणलेलं पाणी पिल्लाच्या चोचीत घालायला लागला. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मला हे खरे वाटले नाही. मनुष्यप्रवृत्तीच क्षणभंगुर ना ? परत कावळा आला पिलाला पुन्हा पाणी पाजू लागला, आणि चिमणीचं पिलू पाणी पितापिताच क्षीण होत, मरून गेलं- संपलं, कावळा पुन्हा उडाला. म्हणून मी आज सर्वांना विनंती करते आहे, मला आता जाऊ द्या. मला यापुढे कार्यक्रम नकोत, माझे आदिवासी, वनवासी माझी वाट बघताहेत, मला निरोप द्या. आता कार्यक्रम संपला, असं जाहीर केलं आणि धर्मशाळेत निघून आले.
सिंधूताई सपकाळ