उगवतीचे रंग ©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
उगवतीचे रंग
(आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी रोजी रेडिओ विश्वासवर या सुखांनो या या कार्यक्रमांतर्गत ‘ अदृश्य हात ‘ या विषयावर माझा कार्यक्रम झाला. तोच लेख मी आपल्यासाठी सादर करीत आहे. माझ्या आकाशझुला या पुस्तकातून. )
‘ अदृश्य हात….’
आठ मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. या दिवशी सगळीकडे स्त्रीशक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री, एक भोगाचे प्रतिक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका. अशा प्रकारच्या भावना सर्वानीच व्यक्त केल्या जातात. असे म्हटले जाते की Behind every successful man, there is a woman. प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एक स्त्री असते. तसेच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते, त्यामागे देखील स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. जे राष्ट, जो समाज स्त्रीची अवहेलना करतो, तो प्रगती करू शकत नाही.
डॉ कलामांनी लिहिलेल्या कवितांच्या My Journey या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला ‘ माझी जीवनयात्रा- एक व्यावसायिक आत्मकथा ‘ नावाचा अनुवाद नुकताच माझ्या हातात पडला. त्यातील कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉ कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकेही आपण वाचली असतील. पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात. काही थांबून विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या दोन कवितांनी मला मोहून टाकले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी आपल्यासाठी देणे मला उचित वाटते.
डॉ कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘अग्नी ‘ हे क्षेपणास्त्र विकसित केले. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असाच डॉ कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ. दिवसरात्र त्या संशोधनात गढून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञाने आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळे ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितले. ‘ अग्नी ‘ च्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला, तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचे त्याला दिसले. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता. पण तिचे हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिने सुद्धा त्याच्यापर्यंत पोहचू दिले नव्हते. कारण तो देशासाठी एक महत्वाचे काम करीत होता. डॉ कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता आपल्यासाठी देत आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचे योगदान आपल्या समोर नक्कीच येईल.
अदृश्य हात
दूर कोठेतरी बंगालच्या सागरात
जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच
तिथे विसावला आहे अग्नी साक्षात
गौरव भारताचा, प्रतीक, ज्ञान आणि वैभवाचा
सृजनाच्या शक्तीने राष्ट्र जागृत झालंय
निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय
समुद्रातील जलचरांनी अग्नीला वेढलंय
जाणून घ्यायला त्याच्या निमिर्तीचा स्त्रोत
तुला कुणी बनवल? तुला कोणी साकारलं
कोणी निर्माण केली ही
तंत्रवैज्ञानिक सुंदर कलाकृती
अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून
विचार करून म्हणाला
तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस-रात्र काम करतायत
आनंदाने काळजी घेताहेत बनवताना प्रत्येक भाग
चहूबाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल
तहान भूक झोप सगळे एकवटलेत माझ्यात
दिवस आणि रात्र एक झाली आहेत
मला कार्यरत करण्यात
जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम
वैज्ञानिकांनी बनवलं?
अग्नीनं उतर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत
तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच
यशासाठी आवश्यक होती इच्छा आणि प्रेरणा
पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी
ह्यांनीही केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी
कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही
माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी
मूकपणे त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली
आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी
लाखो अपेक्षांमध्ये मिसळले आशीर्वाद
आप्तेष्टांचे प्रेम आणि माया मुलाबाळांची
निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या
ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह
घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम
शुचिर्भूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर
स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र
तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य
आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळते
राष्ट्र वाढते, भरभराट होते
सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना
असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून
त्यागाच्या, बलिदानाच्या, मायेच्या, प्रेमाच्या
निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या.
समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे.
त्याच्या खळाळत्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे.
डॉ कलामांना ईश्वरावरील श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्वशक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असे ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांचे मन कळवळले. त्यांनी मदरना बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळीच्या प्रार्थनांचा उपयोग झाला. मदर काही दिवसांनी बऱ्या होऊन घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही सुंदर कविता.
यातना
वारा वादळी आहे, पाणी खवळलंय
रात्र अधिकच अंधारी आणि भयाण
चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या
रितेपणानी उभ्या आहेत कुणाची तरी वाट बघत
कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप
माझ्या हृदयात होतायत यातना आणि
वाटतंय रडावंसं ! का ?
अरे, मदर तेरेसा दु:खात आहे
जिने प्रेम केलं परमेश्वराच्या लेकरांवर
काळजी घेतली आई बनून सर्वांची
जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी
जिने सेवा केली सगळया आजाऱ्यांची
ती कां आहे आजारी आणि दु:खी ?
आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल
भटक्या माणसांना घरी कोण नेईल
खिन्न आभाळात विदीर्ण ढग
स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप
दु:खी निसर्गासह करूया प्रार्थना
हे ईश्वरा ! नको नेऊस तिला
तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे
तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी
तिला घ्यायची आहे !
या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पहिले तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श. कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उबेचा. कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा. कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श. जाणून घ्या त्या हातांमागील कष्ट, त्याग आणि प्रेम. जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात कधी असतील मदर तेरेसांसारख्या समाजसेविकांचे. सिंधुताई सपकाळ सारख्या अनाथ मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या आईचे. त्या हातांची मिठी गळ्याभोवती पडणे, ते हात अंगावरून फिरणे यातील सुख हे त्रिभुवनातील सर्व सुखांसमोर फिके आहे. त्या अदृश्य हाताना सलाम !
©विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )