श्रीरामजन्मभूमी मुक्तीलढा व कारसेवा
१७/१/२०२४
श्रीरामजन्मभूमी मुक्तीलढा व कारसेवा
भाग २
मा. दिलीपजी महाजन मोरया प्रकाशनाचे प्रमुख
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा लढा हा शेकडो वर्षांपासून सुरु होता… तरी सर्वसामान्य जनतेला व नव्या पिढीला या लढ्याचा सत्य इतिहास…व लाखोंच्या बलीदानाबाबत फारशी माहिती नव्हती. आमच्यातील रामभक्त… जागा झाला…रथयात्रा येईल व जाईल पण या निमित्ताने लोकांच्या घराघरात या लढ्याचा सत्य इतिहास पोचवण्यासाठी आपण कांहीं तरी केले पाहिजे असे वाटले.. त्यावेळी पुण्यात होतो व मा. बापूराव भिषीकरांकडे घरी गेलो होतो. बोलता बोलता रथयात्रेचा विषय निघाला…मी माझ्या मनातील विचार त्यांच्याकडे बोललो. बापूराव म्हणाले पुस्तिका काढ…मी लिहून देतो म्हणाले…मग काय नांवही लगेच ठरवलं…. हाक अयोध्येची… सर्व रामभक्तांना कारसेवेसाठी अयोध्या जणू हाक देते आहे….तिथे त्यांच्याशी बोलतांनाही अंगावर रोमांच उभे राहिले.हाक अयोध्येची पुस्तिका रथयात्रे निमित्त काढायची आहे तर महाराष्ट्रात जिथे जिथे रथयात्रा जाईल तिथे रथयात्रे बरोबर हाक अयोध्येची घेऊन जायचं ठरवलं.
त्यांच्या वाहना वाहानांच्या ताफ्यात आमचाही टेंपो होता….
रथयात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्याआधी हाक अयोध्येची तयार होती. रथयात्रेस अभूतपूर्व प्रतिसाद होता. सर्व राममय झाले होते.
ते दृष्य पाहून डोळ्यात पाणी आलं… रामराया अशा थाटात तुला कायम पाहूदे असं मनात येऊन गेलं…स्वागता नंतर ५ मिनीटे अडवाणीजी बोलले….
सुरुवात होती…जय श्रीराम…
सौगंध राम की खाते हैं…
हम मंदिर वहीं बनाएंगे…
अडवाणीजी वहीं शब्दाचा असा कांहीं उच्चार करीत की अंगात उत्साह संचारत असे…
ह्या रथयात्रेस रथावर सोलापुरातील श्री प्रशांतजी बडवे ध्वनिक्षेपक व लाईट व्यवस्थेत पूर्ण महिनाभर मा. अडवाणींजी बरोबर होते तेंव्हा त्यांच वय जेमतेम २५ वर्षे असेल.
ही राम रथयात्रा पुढे बिहार मध्ये लालूप्रसादांनी अडवली… अयोध्येत पोचू दिली नाही…अडवाणींना अटक झाली….
ऑक्टोबर मधील कारसेवा तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंहांनी पाशवी बळाचा वापर करुन होऊ दिली नाही…
अत्यंत कडेकोट बंदोबस्त असूनही त्याला न जुमानता कारसेवक कोठारी बंधूंनी कारसेवेचा धाडसी प्रयत्न केला पण ….
कोठारी बंधूंना प्राणास मुकावे लागले…
परिंदा भी पर नही मार सकता ही घोषणा फोल ठरली. 30 आॅकटोबर व 2 नोव्हेंबरला कारसेवा झाली.
शांतता मार्गाने चालणाऱ्या कारसेवकांवर अछूट गोळीबार झाला. शरयूनदी रक्त रंजित झाली.
आपल्या सोलापुरातील महेशजी पात्रुडकर
कारसेवेस गेले होते त्यांच वय तेंव्हा अवघ २० वर्षाचे होते. त्यांचा अनुभव
१९९० साली रामजन्मभूमी मुक्तीसाठी विश्व हिंदू परिषदेने ३०-३१ ऑ्टोबर रोजी आयोध्येत कारसेवेचे आंदोलन उभे केले. त्याच वेळी या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी श्री. लालकृष्ण आडवाणी यांनी सोरटी सोमनाथ ते आयोध्या अशी रथयात्रा काढली. सदर यात्रा सोलापूरात आल्यावर मी कारसेवेसाठी जाण्याचा निश्चय केला.
घरातील वातावरण हे हिंदुत्ववादी असल्यामुळे आईने कारसेवेला जाण्यास परवानगी दिली.
दिनाक २५ ऑक्टोबर रोजी मी व माझे २० हिंदुत्ववादी मित्र कारसेवेसाठी जाण्यास निघालो . आमच्या बरोबर सोलापुरातील संघ परिवारातील जवळपास ४००-५०० कारसेवक सुद्धा होते .. जय श्रीराम व रामलला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे अश्या घोषणा देत प्रयाग राजला कधी पोचलो हे कळलेच नाही. आयोध्येस जाण्यासाठी सगळ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता.
त्यावेळी उत्तरप्रदेश मध्ये मुलायम सिंग यांचे सरकार होते . त्यांनी आयोध्ये मध्ये पक्षी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही असा बंदोबस्त केला होता. उत्तरप्रदेश मध्ये देशभरातून येणाऱ्या कारसेवकांचा छळ करून त्यांना कारागृहात ठेवण्यात येत होते.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी जवळपास ५०००० कार सेवकांनी प्रयागराज येथून आयोध्ये कडे जाण्यासाठी कुच केले , परंतु मुलायम सरकारने तेथील एका नदीच्या पुलावर कारसेवक आले असता अचानक लाठीमार व गोळीबार सुरू केला . त्यामध्ये अनेक कारसेवक जखमी झाले. आम्हा सर्वांना अटक करून तेथील एका शाळेत बंदिस्त केले. तेव्हा माझ्या मनात आले की आता आयोध्येत जाणे कठीण आहे. आम्ही ५०-६० कारसेवकांनी पोलीसांच्या न कळत शाळेच्या कंपाऊंड वरून उड्या मारून रात्री १०-११ च्या सुमारास आयोध्येकडे जाण्यासाठी पायी निघालो.
स्टेशनवरून एका रेल्वेत बसून आम्ही अयोध्येकडे कुच केले परंतु २५-३० किमी. गेल्यावर फाफामाऊ रेल्वे स्थानकावर गाडी अडवली व गाडी पुढं जाणार नाही असे सांगितले व अटक सत्र सुरू केले. आम्ही मात्र पोलीसांनी चुकवत आयोध्येकडे पायी कुच केले . तेथून आयोध्या १४५ किमी. दूर असल्याचे सांगितले व आपल्याला मुख्य मार्गाने न जाता रानावनातून जायचे आहे असे सूचित केले. परंतु आमच्या मनात रामाने संचार केलेला असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्यास होकार दिला व रात्री १२ च्या सुमारास पायी निघालो. आयोध्येसाठी जाणारा मार्ग कळावा म्हणून तेथील कार्यकर्त्यांनी दिशा दर्शित करणारे फलक लावले होते तसेच गावागावांमधून गावकरी जेवणाचे पाकीट देत होते व जय श्रीराम चा घोषणा देत आमचा उत्साह वाढवत होते . पुढे काही अंतरावर आम्हाला मध्यप्रदेश व बिहार मधील ७०-८० कार सेवक येऊन मिळाले..त्यामुळे तर आमच्या उत्साह द्विगुणित झाला. मनात रामनामाचे स्मरण करत आम्ही आयोध्येच्या दिशेने वाटचाल करत होतो. एके ठिकाणी जवळपास पिंढ-यांपर्यंत चिखलामधून चालत जावे लागले त्यामुळे सर्वांच्या चपला रुतून बसल्या व आम्हाला पुढे अनवाणी जावे लागले. एकेठिकाणी तर डोक्यावर पिशवी घेऊन छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून जावे लागले. काही ठिकणी पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे जे ठिकाण ५ किमी. अंतरावर आहे त्याठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला आड मार्गाने गेल्याने १०-१२ किमी. चालत जावे लागले. परंतु रामाला भेटण्याची ओढ असल्याने आम्हाला त्याचा काही त्रास होत नव्हता. आयोध्या१० किमी. वर राहिली असता आम्हाला रात्री पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून रेल्वे रुळावरून चालत जावे लागले. दिनाक ३० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास आम्हीआयोध्येत दाखल झालो. तेव्हा सर्वप्रथम आम्ही त्या पवित्र भुमिस नमस्कार केला. त्याच दिवशी कारसेवेचे आयोजन असल्यामुळे आयोध्येच्या गल्लीबोळातून हजारोंच्या संख्येने कार सेवकांनी राम जन्मभूमी कडे जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिथरलेल्या पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार , अश्रुधुरचा वापर केला. असे असून देखील काही बहादर कारसेवकांनी बाबरी मशिदीवर चढून भगवा ध्वज फडकवला 🚩..त्यामुळे पोलिस अधिकच चवताळले व त्यांनी रामभक्तांवर अमानवीय असे अत्याचार केले. यामध्ये कित्येक रामभक्त शहीद झाले. त्यानंतर दिनांक १ नोव्हेंबर रोजी बाबरी मशिदीवर भगवा ध्वज फडकवणाऱ्या कोठारी बंधूंना पोलिसांनी ठार मारले. त्याच्या निषेधार्थ रामभक्तानी मोठ्या संख्येने रामजन्मभूमीकडे कूच केलं. त्यावेळी पोलिसांनी रामभक्ताना अटक करून नेण्यासाठी १००-१५० बसेस मागवल्या होत्या. तरीही राम भक्तांनी त्यांना जुमानले नाही . पुढून पोलिसांनी गोळीबार सुरू केले व शेकडो रामभक्त धारातीर्थी पडू लागले. वाटेत माणिराम छावणी समोर पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या राम भक्ताच्या मृतदेहाचा पडलेला खच बघून मन विषण्ण झाले व रामजन्मभूमी मुक्त करण्यात अपयश आल्याने आम्ही निराश होऊन सोलापुरात परतलो.
क्रमशः भाग २