दुर्गाशक्तीदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डीव्हीडी कॉर्नर ….आजची खुश खबर २३ १ २०२४… डॉक्टर विभा देशपांडे यांची अनोखी संकल्पना

अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे अनोखे , अद्भुत , अद्वितीय आणि संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे उद्घाटन दिनांक २२ जानेवारी २०२४

श्रीराम सोहळा
जय राम श्रीराम जय जय राम
सोहळा – दि .२२- १ – २०२४

भव्य दिव्य श्रीरामाचा सोहळा बघण्यास
करोडो लोक निघाले अयोध्या नगरास …..

विविध सुंदर रांगोळ्या, सुंदर तोरणे , झेंडे ,पताका
तुतारी,ढोल ,नगारे विविध वाद्यांचा निनाद ऐका…..

फुलांची सर्वत्र छान सजावट,सारे कसे सुगंधी वातावरण
गुलाल,बुक्क्या सह आनंदाची सर्वत्र मस्त उधळण …..

वेगवेगळ्या राज्यातून रामासाठी भेटवस्तू येती
दिव्यांच्या झगमगाटात नयन दिपती…..

एकटा श्रीराम कधी नसतो , सीतामाई ,लक्ष्मण सोबतीला
हनुमान पुढे उभा राही ,हात जोडूनी सेवेला …..

धन्य तो ,एकवचनी,एक पत्नी ,एकबाणी सीतापती
धन्य ती माता कौसल्या ,पिता दशरथ भाग्यवान असती …..

रघुनंदन रामाचे तीन बंधू भरत ,लक्ष्मण , शत्रुघ्न होते
प्रेम व त्यागाची जणू आपणास शिकवणच मिळते …..

लव व कुश असे बुद्धीमान, शूरवीर पुत्र झाले राघवाला
त्या भरताग्रज रामाची तेजस्वी‌,
पवित्र अशा मूर्तीची प्रतिष्ठापना आज अयोध्येला …..

दूरदर्शनवर रघुनंदनाचा हा सोहळा बघून आनंदाश्रू ओघळतात
नतमस्तक होऊन आपोआप हात जोडले जातात …..

मंगला पुणतांबेकर . पुणे .

प्राणप्रतिष्ठेनंतर शरयू तीरावर आणि नेपाळमधील जनकपूरमध्ये ‘दिवाळी’

शरयू घाटावर दीपमहोत्सव

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर शरयू घाटावर भाविकांनी दिवे लावले आहेत. या दिव्यांच्या उजेडात शरयू तीर उजळून निघाला आहे.

प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्या काळात वियोग हा फक्त 14 वर्षांचा होता… या काळात अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे. आपल्या अनेक पिढ्यांनी वियोग सहन केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपला राम आला आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे. या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आलाय, माझं शरीर अजूनही त्या क्षणात गढून गेलंय. आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत. आता राम भव्य मंदिरात राहणार. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपला राम आला आहे. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपला राम आला आहे. प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, सियावर रामचंद्र की जय… आज आपला राम परत आला आहे. 22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक नवी उमेद घेऊन आला आहे. ते म्हणाले की, मला खूप काही सांगायचं आहे, पण त्याचा कंठ दाटला आहे. हा क्षण अलौकिक आणि पवित्र असल्याचं त्यांनी सांगितलं. शतकांच्या तपश्चर्येनंतर राम परतला. मी प्रभू रामाचीही माफी मागतो. असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की,  आजच्या आनंदाचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही. राममंदिर निर्णितीमुळे सर्वांमध्ये उत्साह आहे. नरेंद्र मोदी कठोर तपस्वी आहेत. सत्य, करुणा, सेवा परोपकाराने रामराज्य होते.आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे.  राममंदिर तयार झालेय, आता रामराज्य निर्मिती करावी.  रामराज्य आणणं नागरिकांचेही कर्तव्य आहे.

तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले. अयोध्येसह संपूर्ण देशभरात राम नामाचा जयघोष पाहायला मिळाला. नव भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्व सोहळ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा विधीवत अभिषेक सोहळा पार पडला. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रुप समोर आलं आहे. प्रत्येक देशवासिय प्रभू श्रीरामाचं लोभसवाणं रुप डोळ्यांत साठवत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा अयोध्येतील सोहळा अनुभवताना प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आहेत.

22 Jan 12:29:08 to 12:30.32  ८४ सेकंदांचा सर्वात शुभ काळ

अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे अनोखे , अद्भुत , अद्वितीय आणि संपूर्ण भारताला अभिमान वाटावा असे उद्घाटन दिनांक २२ जानेवारी २०२४  , ८४ सेकंदांचा सर्वात शुभ काळ साधावा…

मूळ मुहूर्त २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२:२९ वाजून ८ सेकंदापासून सुरू होईल, जो फक्त १२:३० मिनिटे ३२ सेकंदांपर्यंत चालेल. म्हणजे केवळ १ मिनिट २४ सेकंदात रामललाच्या प्राणाला अभिषेक होईल. मात्र, प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक तास यज्ञ, हवन, चार वेदांचे पठण आणि अनुष्ठान होणार आहे

राम मंदिर हे अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्री राम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. ५ ऑगस्ट २०२० रोजी, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत, त्यासाठी अयोध्येत पार्किंगसह विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. श्रीरामललाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील. गेल्या आठवड्यात मंदिर ट्रस्टने 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली होती.

रामललाची सेवा करण्यासाठी पुजारी नियुक्त करण्यात आले. त्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली. या भरती प्रक्रियेसाठी देशभरातून 3000 वेदार्थी आणि पुजारी (Ram Mandir Priest) यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.  अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या सेवेसाठी देशभरातील तब्बल 3 हजार वेदार्थ्यांमधून काहीचीं निवड करण्यात आली आहे. सध्या त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. पुजारी पदांसाठी अर्ज केलेल्यांपैकी 24 अर्चकांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 21 अर्चकांचं प्रशिक्षण सुरू झालं आहे

 

ll श्रीराम समर्थ ll
ll जानकीजीवनस्मरण जय जय राम ll

जेथे नाम तेथे राम ।

नामाशिवाय जो जो विश्वास । ते ते अविश्वासाचे कारण आहे खास ॥

नामाविण मानी सत्य । नाही त्याने जोडला भगवंत ॥

नामाविण मानी जग । त्याचा होऊ देऊ नये विटाळ ॥

नामाची जेथे मस्ती । तेथे रामाची वस्ती ॥

याहून जे जे वाटले सुख । ते तेच दु:खाला कारण ॥

देवळे सभामंडपे न येत कामा । ज्याने नाही ठेविले हृदयी रामा ॥

राम करून घ्या आपुलासा । तोडा तोडा जन्ममरणाचा फासा ॥

राम एक दाता । त्याचेवाचून नाही कोणी देता ॥

नामाचे अनुसंधान । प्रपंचात सर्वांचे समाधान ॥

जे जे होईल समाधानाचेच कारण । रामास व्हावे अर्पण ॥

मोह ममता देहाचा अभिमान । हा संसाराचा पसारा जाण । तेथे ठेवू नये मन ॥

नाही देहाला कष्ट देऊ । अनुसंधान न द्यावे बिघडू ॥

नामात आहे समाधान । हा विश्वास ठेवावा पूर्ण ॥

मी मागतसे एक दान । ते द्यावे तुम्ही सर्वांनी ॥

नामापरते नका मानू सुख । रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण ॥

याहून नको मज काही । एवढी भीक घालावी सर्वांनी ॥

व्यवहार लौकिक विषयाची आवड । हेच परमार्थाला मुख्य येई आड ॥

त्यांना सारावे बाजूस । एक भजावे भगवंतास ॥

नाही सत्य मानू जगी काही । रामाचा आसरा घ्यावा हृदयी ॥

जोपर्यंत देहाचा संबंध । तोपर्यंत लौकिकाची चाड ॥

प्रपंचाच्या थोडया सुखासाठी । नाही अंतर देऊ जगजेठी ॥

चार वेद सहा शास्त्रे । सर्व केल्या स्मृति पारायण ।

तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर । तोवर तेथे कोठे समाधान ? ॥

सर्व शास्त्रांचे सार । एक भजावा रघुवीर ॥

नामी ठेवावे लक्ष पूर्ण । तेणे होईल समाधान ॥

नामाची धरावी कास । देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ।

हे सर्व साधे राखता अनुसंधान ॥

आता करण्याचे उरले काही । हे किंचितही न आणावे मनी ॥

मनाने व्हावे रामार्पण । सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण ॥

चित्त ठेवावे रामापाशी । ध्यास असावा त्याचा अहर्निशी ॥

देहाने नाही करता आले । मन रामापायी गुंतवले । रामाने त्याचे कल्याण केले ॥

राम ठेवील त्यात समाधान । हेच खरे भक्तीचे लक्षण जाण ॥

गुरूकडून घेतलेले नाम । पावन करील जगास ।

हाच ठेवावा विश्वास । राम कृपा करील खास ॥

देहाची स्थिती । कायम न राहे निश्चित ॥

ते सांभाळणे आहे जरूर । न विसरता रघुवीर ॥

रामा तुझ्याकरिता राहिलो । हा भाव ठेवावा निश्चित ।शक्य तो स्मरावा रघुपति ॥

रामचरणी लावावे मन । इतुके करावे तुम्ही थोडेफार । नाही करू दुसरी यातायात जाण ॥
🌸🌹🌸
ll सद्गुरुनाथ महाराज की जय ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
ll श्रीराम जय राम जय जय राम ll

 

प्रभु राम यांचा पुत्र कुश यान उभारल राम मंदीर ,१५२८ मध्ये बाबरन चारी बाजू तोफा लावून उडवल . ५०० वर्षांचा अहोरात्र संघर्ष. राममंदिर जागतिक वारसा

राम मंदिर विषय तसा खुप मोठा नाहीच.. कारण या हिन्दुस्थानात अनेक ठिकाणी राम मंदिर असतील.. प्राचीन असतील.. नवीनही असतील.. पण श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर म्हटले की जणु काळीज चर चर कापल्याची जाणीव होते.. मग नक्की हा केवळ आस्थेचाच विषय आहे का..? तर मुळीच नाही.. कारण विषय जर फक्त आस्थेचा असेल तर या राष्ट्रातील कोणत्याही भूमिवर शेकडो एकरात भव्य मंदिर केव्हाच बांधले गेले असते.. केली असती तेथे पुजा अर्चा.. मग अयोध्याच का..?आयोध्यामधे प्रभु रामचंद्राचा जन्म झाला किंबहुना त्यांच्या पुढील पिढ्या ही येथे वाढल्या.. अशा या पवित्र भूमित त्यांचे भव्य मंदिर असावे.. कदाचित ही समस्त हिन्दूजणांची आस्था होऊ शकते.. पण हा विषय खरोखर केवळ आस्थेपुरता मर्यादित आहे का..? आणि तो ठेवला का..? तर मी म्हणेल नाही..! हा विषय केवळ आस्थापुरता मर्यादित होऊच शकत नाही.. भगवान सर्वत्र आहेत ही हिन्दूची धारणा आहे.. पण अयोध्यासाठीच अट्टहास का..? कशासाठी..? आज यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे..

आज हिन्दू राममंदिराचा विचार करत असेल तर तो बाबरी ढांचाचे पतन अर्थात १९९२ पासून.. पण हा संघर्ष केवळ १९९२ पासूनचाच होता का..? तर नाही.. शेकडो वर्षांचा हा लढा.. लाखों राम भक्तांचे बलिदान.. त्यातून साकार होत असलेले हे शिल्प किती रक्तरंजित खुणांवर पाऊल ठेवत आले आहे.. याचा केलेला हा लेखाजोखा.. हा लेख त्या हिन्दूकडे अधिक निर्देश करील ज्यांना इतिहासाचे स्मरण नसेल.. मग हे राम मंदिर कशासाठी असा ही प्रश्न पडत असेल.. आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंची केवळ आस्थाच नव्हे तर स्वाभिमान ही जागा व्हावा.. आणि अजूनही काही आव्हाने पुर्णत्वास नेण्यास हा निद्रिस्त समाज उत्थान करून सज्ज व्हावा.. याचसाठी पुन्हा पेटवलेले हे यज्ञकुंड.. या यज्ञकुंडात आजवर किती समिधा वाहिल्या गेल्या त्याची ही यशोगाथा..

धार्मिक मान्यतेनुसार हिन्दुचे आराध्य दैवत प्रभु रामचंद्र यांचे पुत्र कुश यांनी शरयू नदीच्या तटावर भव्य अशा राममदिरांचे निर्माण केले.. अनेक वर्षे नव्हे तर अनेक शतके हिन्दूचे ते श्रद्धास्थान ठरले..

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारकावती चैव सप्तैता मोक्षदायिका ।।

अशा प्रकारे हिंदूंच्या सात आस्था केंद्रातील प्रथम श्रद्धास्थान ती हिच आयोध्या नगरी..

आयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिर ध्वस्त करण्यासाठी बाबर हा एकमेव इस्लामी आक्रांता आला असे नव्हे तर.. त्या अगोदरही या मंदिरावर अनेक कट्टर इस्लामवाद्यांची वक्रदृष्टि होती.. त्यात प्रथम प्रयत्न केला तो १४४० साली महमूदशाहने परंतु त्याला त्यात काही यश मिळाले नाही.. राजा सुहेलदेव ने वाटेतच त्याचा खात्मा केला.. आणि मंदिर रक्षणाची जबाबदारी पार पाडली.. त्यानंतर राम जन्मभूमि रक्षणासाठी कालानुक्रमे सुमारे ७६ वेळा महायुद्ध झाली.. लाखो लोकांनी, संत महंत आणि शेकडो सम्राटानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.. आज हाच ज्वलंत इतिहास मांडण्याचा केलेला प्रयत्न..

कालखंड होता १५२६ चा इस्लामी रियासत स्थापन करण्याची मंशा घेऊन उज्बेगिस्तानमधून सुमारे पाच- साडे पाच लाख सैन्य घेऊन जहरुद्दीन मुहम्मद बाबर हिंदुस्थानच्या भूमिवर उतरला.. बाबर म्हणजे इस्लामवादाचा कट्टर पुरस्कर्ता.. वाटेत अनन्य अत्याचार करत तो मेवाडला येऊन पोहोचला.. मेवाडचे साम्राज्य म्हणजे हिंदुस्थानचे जणु सरताज.. धर्माच्या बाबतीत तितकेच कट्टर.. तत्कालीन काळात मेवाडचे महाराजा होते राणा संग्रामसिंह अर्थात राणा सांग.. बाबरचा पहिला यशस्वी मुकाबला केला तर तो याच राणा सांग ने.. तब्बल तीन वेळा राणा सांग कडून बाबरला धुळ खावी लागली.. अपमानित होऊन बाबर अवधपुर म्हणजे अयोध्याच्या दिशेने पळत सुटला.. मनात सुडाची भावना होतीच.. ती शमवणे त्याला गरजेचे वाटू लागले होते..

बाबरच्या सैन्याचे मनोधैर्य खचले होते.. एखादा विजय हवा म्हणून त्याने याच प्रभू श्रीरामाच्या अयोध्यावर आक्रमण केले.. बाबर अयोध्यावर चाल करून तेथील तत्कालीन व्यवस्था नष्ट करून अयोध्येच्या गादिवर बसला.. सुडाची आग मात्र धगधगत होती.. याच काळात अयोध्या भूमि श्यामानंद महाराज यांच्या अधीन होती.. श्यामनंद महाराज म्हणजे प्रख्यात आध्यात्मिक वारसा असलेले महागुरु.. त्यांची ख्याती ऐकून इस्लामी फकीर ख्वाजा कजल अब्बास मूसा हा त्यांचा शिष्य बनला.. कालांतराने त्याचीही कीर्ति होऊ लागली.. काही वर्षात जलालशाह नावाचा कट्टर इस्लामवादीही श्यामानंद महाराजांचे शिष्य बनले.. हे दोघे जरी वर वर शिष्य असले तरी येथील राम मंदिर मात्र नेहमी त्यांच्या डोळ्यात सलत होते..

काही दिवस असेच गेले या दोघांनी संगनमत करून मक्का प्रमाणे इथे भव्य इस्लामी केंद्रबिंदु व्हावे असा चंग बांधला.. त्यातील योजनांचा काही भाग म्हणून राम मंदिराच्या आजुबाजुच्या जमिनीत त्यांनी मृत मुसलमान लोकांचे दफन करण्यास सुरवात केली.. अल्पावधीत या भूमिचे एका कब्रस्तानमधे रूपांतर झाले.. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दोघांनी मिळून बाबरची भेट घेतली आणि येथील मंदिर पाडून मस्जिद उभारण्याची इच्छा व्यक्त केली..

बाबर आधीच सुड भावनेने पेटला होताच.. त्यात अजुन भर पडली.. हा बदला घेण्यासाठी आणि हिंदूंची आस्था नेस्तनाबूत करण्यासाठी त्याने आपला मोर्चा राम मंदिराकडे वळवला.. आपल्या शिष्यांचे हे कारस्थान पाहून श्यामनंद महाराज व्यथित झाले.. मूर्तीचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.. असा विचार करून मध्यरात्रीच त्यांनी या काळ्या पाषाणातिल सुबक मूर्ती शरयु नदीत विसर्जित केल्या आणि ते अज्ञातवासात निघुन गेले.. मंदिराच्या रक्षणासाठी पाच सहा शिष्य द्वारावर ठेवले.. जलालखान ने या सर्व पुजाऱ्यांची हत्या केली.. आणि राम मंदिर उध्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला.. हे ठरले राम मंदिर रक्षणाचे पहिले बळी..

बाबरची वक्रदृष्टी आयोध्येतील प्रभु राम मंदिरावर पडली आहे याची पहिली भनक लागली ती भीटीचे राजे राजा महतबसिंह बद्रीनारायण यांना.. मंदिराच्या रक्षणासाठी ते स्वतः सुमारे १ लाख ७४ हजार सैन्य घेऊन आयोध्येस पोहोचले.. बाबरच्या ४ लाख ५० हजार सैन्यावर हे तूटून पडले.. पण दुर्दैवाने बाबरच्या बलाढ्य सैन्यापुढे महतबसिंहच्या सैन्याचा पाडाव झाला.. तब्बल ७० दिवस चाललेल्या या युद्धात त्यांच्यासकट सर्व सैन्य कापले गेले.. राम मंदिर रक्षणासाठी ठरलेले हे दुसरे बलिदान होय..

बाबर किती क्रूरकर्मा होता..? तर पुढील घटनेवरुन लक्षात येईल.. बाबरच्या अंगात जणु सैतानच घुसला होता.. २१ मार्च १५२८ रोजी या बाबर ने मीर बांकी या आपल्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली चारी बाजूने तोफा लावून मंदिर उध्वस्त केले.. बाबर एवढ्यावरच थांबला नाही तर मस्जिदसाठी बनवलेल्या विटामधे त्याने पाण्याऐवजी त्यांच्याच रक्ताचा वापर केला.. ही पवित्र अयोध्या किती रक्ताने रंगली असेल यावरून त्याची कल्पना येईल..

राम मंदिरासाठी लढा आणि संघर्ष ही तर याची केवळ मुहूर्तमेढ होती.. कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर पुन्हा उभे राहिले पाहिजे यासाठी या संघर्षाची कहानी पुन्हा सुरु झाली.. प्रभु रामचंद्राची भूमि अशा पद्धतीने अपवित्र व्हावी.. हे आसपासच्या गांवाना सहन झाले नाही.. आमचे पूर्वज महर्षि भरद्वाज होते.. त्यांच्या श्रद्धास्थानाचे अशा रीतीने विटबंन व्हायला नको होते.. या जानिवेतुन देवीदास पाण्डेय यांनी आसपासच्या गावातील लोकांमधे नवी स्फूर्ति, नवी चेतना भरली आणि ९० हजारांची फौज निर्माण केली.. ५ दिवस हे युद्ध अहोरात्र चालले.. पण फितूरीने घात केला.. या युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या देवीदास पाण्डेय यांना त्यांच्याच अंगरक्षकाने विट फेकून मारली.. आणि घायाळ केले.. ही संधी साधुन मीर बांकीने अचूक नेम धरला आणि त्याच्या बंदूकीच्या गोळ्या देवीदास यांच्या छातीत घुसल्या.. या ९० हजार सैन्यांच्या रक्ताची समिधा पुन्हा एकदा स्वाभिमानासाठी वाहिली गेली.. राम मंदिरासाठी हे तीसरे समर्पण ठरले..

संघर्ष संपला नाही.. ही तर जणू सुरवात होती.. कारण देवीदास यांच्या बलिदानानंतर अवघ्या १५ दिवसातच हंसवरचे महाराज रणविजय सिंह यांनी केवळ २५ हजार सैन्य घेऊन बाबरच्या सैन्यावर हल्ला चढवला.. १० दिवस हे युद्ध चालले त्यात महाराज रणविजय सिंह धारातीर्थी पडले आणि हे २५ हजार सैन्य पुन्हा कापले गेले.. राम मंदिरासाठी हे चौथे शिरकाण ठरले होते..

आपल्या पतिचा बदला आणि आराध्य दैवताची होत असलेली उपेक्षा पाहून रणविजय सिंहाची पत्नी जयराज कुमारी मैदानात उतरली.. तीने ३ हजार लढाऊ स्रियांची पलटन तयार केली.. सोबत स्वामी महेश्वरानंद यांनीही २४ हजार चिमटाधारी संन्याशाचे दल तयार केले आणि अयोध्येवर १० वेळा आक्रमण केले.. यावेळी अयोध्येच्या गादीवर होता तो हुमायूं.. या युद्धात जयराज कुमारीने हुमायुवर विजय मिळवला.. पण तो विजय फार काळ टिकला नाही.. हुमायुने एक महिन्यातच पुन्हा सर्व शक्तिनिशी प्रतीहल्ला केला.. त्यात जयराज कुमारीसह २८ हजार सैन्य मारले गेले.. आत्मसन्मासाठी हे पाचवे प्राणाचे पुष्प वाहिले गेले होते..

हा संघर्ष काही काळ स्थिर राहिला.. पण बदल्याची भावना शांत झाली नव्हती.. हुमायु नंतर अकबर सत्तेवर आला.. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून अकबरने ३ फुटाचे छोटे मंदिर बनवले.. पण ते समाधानकारक नव्हतेच.. कारण हे मुस्लिम वेळोवेळी जन्मभूमीची जागा अपवित्र करू लागले.. या जानिवेतुन स्वामी बलरामचारी यांनी पुन्हा लढा द्यायचे ठरवले.. यासाठी त्यांनी आदिवासी, भिल्ल, क्षत्रिय, ब्राह्मण, सन्याशी अशा सर्व प्रकारच्या लोकांचे एकत्रितकरण केले आणि अयोध्येवर २० वेळा आक्रमण केले यात त्याने १५ वेळा विजय मिळवला.. शेवटी त्यांनाही या मंदिरासाठी आपले बलिदान द्यावे लागले.. बलिदानाचे हे सहावे सत्र होते..

अकबरच्या काळात छोटी मोठी बलिदानाची सत्र चालूच होती.. त्यानंतर शाहजहाँन सत्तेवर आला.. या ही काळात छोटे मोठे छुपे हल्ले होतच राहिले.. पण योग्य नेतृत्व करणारे कोणी लाभले नाही..! म्हणून हे दोन कालखंड पुन्हा नोंद घ्यावी असे ठरले नाहीत.. हा कालखंड साधारणपणे १५३० ते १५५६ पर्यंतचा होता.. तरीही या काळात १० वेळा या राम मंदिरासाठी युद्ध झाल्याची नोंद आहे.. ही सातव्या बलिदानाची यशोगाथा होती..

आपल्या सर्व जवळच्या नातलगांची हत्या करून १६५८ च्या आसपास औरंगजेब सत्तेवर आला.. इस्लामचा खंदा पुरस्कर्ता आणि एक क्रूरकर्मा शासक अशीच त्याची ख्याति होती.. गादीवर येताच त्याने अयोध्येतील सर्व मंदिरे उध्वस्त करण्याचे आदेश दिले.. आणि क्षणात त्याची अमलबजावनीही झाली.. समर्थ गुरु रामदास स्वामी यांचे शिष्य वैष्णवदास यांच्या मात्र ते चांगल्याच जिव्हारी लागले.. त्यांच्या नेतृत्वाखाली चिमटाधारी संन्याशाची फौज उभी राहिली.. त्याने सुमारे ३० वेळा राममंदीरासाठी औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रुवर आक्रमण केले.. पण एवढ्या बलाढ्य शक्तिपुढे यांचा निभाव लागणे शक्य नव्हते.. या युद्धात सरदार गजराज सिंह, राजेपुरचे महाराजा कुंवर गोपालसिंह, सिसिण्डाचे ठाकुर जगदंबा सिंह सगळे मारले गेले.. याच वेळी या भागातील अनेक आदिवासी राजपूत जमातीतील समाजाने शपथ घेतली.. जोपर्यंत राम मंदिर निर्माण होणार नाही.. तोपर्यंत पायात पादत्राण आणि डोक्यावर पगडी घालनार नाही.. आजही फैजापुर, जौनपुर आणि आजुबाजुच्या जिल्ह्यातील काही जमाती ते तत्व पाळत आहेत.. अशा प्रकारे आठव्यांदा सामुहिक प्राणाची आहुति देण्यात आली..

सन १६६० च्या काळात औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिलेले पाहून त्याने जाबांज खान याच्या नेतृत्वाखाली हजारो सैन्य अयोध्येवर आक्रमणासाठी पाठवले.. मन हेलाऊन टाकनारा तो प्रसंग.. लहान मुले, स्रियां, वृद्ध कशाचीही मुलाहिजा केली गेली नाही.. यावेळी पुन्हा धावून आले ते बाबा वैष्णवदास महाराज.. अल्प काळात त्याने साधु संन्याशाची फौज उभी केली.. हा संग्राम उर्वशी कुड या ठिकाणी झाला.. पण बाबा वैष्णवदासला यश आले नाही.. आणि सर्व भगवाधारी प्रभु रामासाठी हुतात्मा झाले.. हे नववे रक्तसिंचन होते..

सुड घेण्याची भावना अधिकच तीव्र होत होती.. यातूनच १६६३ साली अमेठीचे राजा गुरुदत्त सिंह आणि पीपरपुर चे राजे कुमार सिंह यांनी पुन्हा सन्याशी आणि आजूबाजूच्या खेड्यातील सामान्य जनता यांना सोबत घेऊन ५ वेळा अयोध्येवर चाल केली.. पाचव्या वेळी मात्र त्यांनी निर्णायक विजय मिळवला आणि विवादित जागी पुन्हा श्रीरामाच्या मूर्तिची स्थापना केली..

१६६४ च्या सुमारास औरंगजेब ने पुन्हा अयोध्येवर हल्ला चढवला.. यात १० हजार हिन्दूची हत्या झाली.. अयोध्या भूमि रक्ताने लाल झाली.. याच राम मंदिर जवळ कंदर्पकूप नावाची एक विहीर होती.. औरंगजेब ने ही सर्व प्रेत या विहीरीत टाकून बाजूने मोठी भींत बांधली.. आणि त्यास नाव दिले ‘गज शहीदा’.. एवढे होऊनही हिन्दू शमला नाही.. प्राणाची पर्वा न करता तेथेच राम नवमी साजरी करण्यास सुरवात केली..

१६८० साली शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह आणि बाबा वैष्णवदास यांनी श्रीराम जन्मभूमिवर पुन्हा अधिकार मिळवण्यासाठी नव्याने सैन्य निर्माण केले आणि अयोध्येवर हल्ला चढविला.. अयोध्येवर विजयही प्राप्त केला.. पण मंदिर निर्माण करण्याआधीच त्यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला..

पुढील काही काळातच ब्रिटिश सरकार सत्तेवर साले आणि हिंदुस्थानवर एक हाती हुकूमत सुरु झाली.. या ही काळात राम मंदिर साठी संघर्ष झाला नाही असे नाही.. पण तो थोपवन्यात ब्रिटिश सरकारला यश आले असे म्हणता येईल.. कारण १८५३ मधे हिन्दू मुस्लिम यांच्यात ज्या प्रकारच्या दंगली उसळल्या त्या शमविन्यासाठी आतील बाजूत मुस्लिम आणि बाहेर हिन्दू समुदायास पुजा करण्याची अनुमती या ब्रिटीश सरकारकडून दिली गेली.
पुढे २५ मे १८८५ साली रघुवर दास यांनी राम जन्मभूमी अधिकारासाठी ब्रिटिश कोर्टात अपील दाखल केली.. पण त्यांच्या प्रयत्नास फारसे यश आले नाही.. कारण परिस्थिति जैसे थे च राहिली..

१९३४ साली पुन्हा हिन्दू मुसलमान दंगे झाले.. या वेळी हिन्दू समाज इतका आक्रमक झाला की चार दिवसात त्यांनी बाबरी मस्जिद आपल्या ताब्यात घेतली आणि तेथे श्रीरामाची मूर्ति स्थापन केली.. तेंव्हापासून या मस्जिदीत कधीही मुस्लिम नमाज साठी फिरकले नाहीत..

१९४७ साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला त्याच बरोबर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी सुद्धा झाली.. कट्टर इस्लामवादाचा पुरस्कर्ता जीना यांच्या प्रयत्नातुन स्वतंत्र इस्लामी राष्ट्र पाकिस्तान उदयास आले.. राहिला तो हिंदूंचा हिंदुस्थान.. आता राममंदिर निर्माणचा मार्ग मोकळा झाला, अशीच श्रीराम भक्ताची धारणा होती.. त्यातून ५ डीसेम्बर १९५० साली महंत परमहंस रामचंद्र दास यांनी विवादित क्षेत्रात पुन्हा प्रभु रामचंद्राची मूर्ति स्थापन करण्यासाठी कोर्टात जनहित याचिका दाखल केली.. त्यावेळी मात्र फैजाबाद जिल्हा न्यायालयाने विवादित क्षेत्र हिंदुना पुजाअर्चा साठी खुले व्हावे असे आदेश दिले.. देश स्वतंत्र झाला खरा.. पण प्रभु रामचंद्राचा वनवास मात्र अजुन संपला नव्हता..

मध्यांतरीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक नवी हिन्दू शक्ति उदयास आली होती.. त्यातून विश्व हिंदू परिषद अस्तित्वात आली आणि श्रीराम मंदिर निर्माण मुद्दा त्यांनी अधिक आक्रमक केला.. सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही पण विश्व हिंदू परिषदेचे असंख्य कार्यकर्ते, अनेक संत महंत यांनी राम मंदिर मुद्दा उचलून धरला..

याचे पडसाद म्हणून १९७७ साली अयोध्येत खोदकाम सुरु झाले.. हे खोदकाम निपक्षपातीपणे व्हावे म्हणून एक समिति स्थापन केली त्यात सरकारी अधिकारी, हिन्दू, मुस्लिम, महंत असे सगळ्या प्रकारचे सामिल होते.. त्यात हिन्दू अधिकारी बी. बी. लाल तर मुस्लिम अधिकारी के.के. मोहम्मद यांचा प्रमुख समावेश होता.. हे खोदकाम करत असताना असे १४ खांब मिळाले की ज्यावर अनेक देवी देवतांची चित्रे कोरलेली होती.. येथे पूर्वी राम मंदिर होते याचा हा भक्कम पुरावा होता..

पहिला टप्पा संपल्यावर पुन्हा खोदकाम हाती घेण्यात आले यावेळी नेतृत्व करत होते ते ड़ॉ. बी. आर. मनी.. यावेळी विवादित जागेवर पुन्हा ८४ खांब आढळून आले..

१९८६ साली फैजाबाद जिल्हा न्यायालयात पुन्हा जनहित याचिका दाखल करण्यात आली.. या वेळी प्रथमच कोर्टाने हिन्दू धर्मियांना विवादित क्षेत्रात पुजा करण्यास परवानगी दिली.. श्रीराम मंदिर निर्माण निर्णयाबाबत मात्र जैसे थे परिस्थिती ठेवली.

३० सप्टेंबर १९८९ पासून विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वाखाली राम शिला पूजन यात्रा काढण्यात आली.. यात अनेक दिग्गज कार्यकर्ते सामिल झाले.. त्यातून प्रकरण अधिकच आक्रमक बनले.. यात आकडेवारी नुसार ३ लाख गांव आणि ११ कोटी लोकांचा सहभाग नोंदविला गेला..

१९९० साली कारसेवा समिति स्थापन करण्यात आली.. या समितीच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी राम रथ यात्रा काढण्यात आली.. या रथ यात्रेत देशभरातून सुमारे ८ लाख कारसेवक सहभागी झाले होते.. अयोध्येला पोहचण्यापुर्वीच अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.. कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला यात किती मुत्युमुखी पडले याचा अधिकृत आकड़ा उघड़ केला नाही.. हजारो कारसेवक यावेळी जखमी झाले होते..

१९९१ साली पुन्हा सुमारे २५ लाख कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माणसाठी आंदोलन उभारले.. या वेळीही दोन वेळा गोळीबार करण्यात आला.. यात कित्येक जण मृत्युमुखी पडले..

२ डिसेम्बर १९९० उत्तर प्रदेश सरकार मुलायम सिंह यादव यानी वचन देऊनही कारसेवकांवर बेछूट गोळीबार केला.. श्रीराम भक्ताना जितके दाबण्याच्या प्रयत्न केला जात होता तितकीच त्यांची भावना अधिक उफाळून येत होती.. वास्तविक पाहता स्वतंत्र हिन्दुस्थानात हे लज्जास्पदच म्हणावे लागेल.. आजवर समोर असणाऱ्या शत्रुशी लढल्याची यशोगाथा होती तर आता स्वकियांशी झुंज देण्याची कर्म कहानी होती.. मुठभर मतांच्या पोडगीसाठी हिंदुनी हिंदुशी धरलेले हे वैर होते.. हीच मोठी शोकांतिका होती..

३ डिसेम्बर १९९२ साली पुन्हा ३ लाख कारसेवक अयोध्येच्या दिशेने कुच झाले.. यावेळी मात्र आक्रोश अधिकच उफाळून आला होता..
६ डिसेम्बर १९९२ रोजी पोलिस बंदोबस्ताला न जुमानता.. प्राणाची पर्वा न करता हजारो कारसेवक बाबरी ढाच्यावर चढले आणि ५०० वर्षाचा जहरी कलंक पुसत काही क्षणात बाबरी ढांचा जमीनोदोस्त केला.. स्वतःच्या भूमित, स्वतःच्या राष्ट्रात अशा प्रकारे संघर्ष करायला लागावा ही तर इतिहासातील मोठी शोकांतिका होती.. आपलेच आपले वैरी बनले होते.. इथे रावण एक नव्हता तर असंख्य होते..

शेवटचे बलिदान ठरले ते २७ फेब्रुवरी २००२ साली.. अयोध्येकड़ून अहमदाबादकडे येणाऱ्या साबरमती एक्सप्रेस वर अज्ञात हल्लेखोंरानी हल्ला केला.. या एक्सप्रेसमधे २००० च्या आसपास कारसेवक बसले होते.. पूर्व नियोजित कट करून एक्सप्रेसच्या काही बोगी पेटवण्यात आल्या.. त्यात ६० च्या आसपास कारसेवक होरपळून निघाले.. याची ही नोंद असणे गरजेचे वाटते..

राम भक्तांचे कार्य इथे संपले नव्हते.. येथून पुढे सुरु होते ती न्यायालयीन लढाई..१९९२ ते २०१९ पर्यंत राम जन्मभूमि खटला अधिकच रंगत गेला.. अगदी राम कल्पनिक चरित्र आहे.. इथपर्यंत मजल गेली.. तब्बल तीन दशके ही न्यायालयीन लढाई चालू राहिली.. आणि या लढाईचा गोड अंत झाला तो ९ नोव्हेम्बर २०१९ ला.. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की विवादित क्षेत्र ही श्रीराम जन्मभूमिच होती.. तिथे हिन्दूचे अस्थाकेन्द्र असलेल्या राम मंदिराचे पुन्हा निर्माण व्हावे.. तो क्षण म्हणजे ५०० वर्षाच्या संघर्षाचा अभूतपूर्व विजय होता.. हा ऐतिहासिक विजय बहाल केला नव्हता तर तो मिळवला होता..

५ ऑगस्ट २०२० हाच तो मंगल दिवस.. लाखो राम भक्तांच्या बलिदानाचे सार्थक ठरलेला क्षण.. अर्थात भव्य राम मंदिर निर्माण साठी झालेले भूमिपूजन.. एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात अश्रु असा तो भावनाविवश क्षण.. कारसेवकांच्या रूपाने अनेक यातना भोगलेल्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाल्याचा हा क्षण.. गेली पाच सहा शतके लाखो हिंदूंच्या त्या विजयी गाथेचे सार्थक होत असलेला हा क्षण..

शेकडो वर्षाच्या बलिदानाच्या पायावर दिमाखात उभे राहिलेले हे मंदीर केवळ श्रीराम मंदीर नाही तर ते या देशाचे राष्ट्रामंदीरही आहे.. केवळ आस्थाच नव्हे तर येथील घुमणारा घंटानादही त्याग आणि समर्पणाचा इतिहास सांगेन.. २२ जानेवारी २०२४ (सोमवार, पौष शुद्ध द्वादशी, शके १९४५) रोजी या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या मंदीराची प्राणप्रतिष्ठा होत आहे.. आणि आपण सारे या मंगल प्रसंगाचे साक्षीदार होत आहोत..

इतिहास साक्षीदार आहे.. रणांगणाचा यज्ञकुंड करून प्राणाची आहुति देण्याचा जीवघेणा खेळ वर्षानुवर्षे खेळला जातोय तो याच भूमित.. कशासाठी ही प्राण देण्याची स्पर्धा तर स्वतःसाठी नव्हे तर स्वत्वासाठी.. कधी या भूमिचे, कधी धर्माचे, कधी राष्ट्राचे, तर कधी अस्मियतेचे संरक्षण करण्यासाठी.. याच कारणासाठी ही भूमि सदैव रक्तरंजित राहिली.. जेथे नरच नव्हे तर नारीही हातात शस्र घेऊन लाखोंच्या शत्रुवर तुटुन पडू शकते.. अशी ऐत्याहासिक उदाहरणे प्रेरणा म्हणून ठेवली जातात ती याच भूमित.. अशा भूमिचा भूमिपुत्र जेंव्हा स्वार्थ बुद्धिने फितूर होऊन प्रश्न उभा करतो.. अशावेळी.. नेत्रात अंगार टाकून त्यांची झापडे उघडी करावीच लागतात..

प्रस्तुत लेख लिहताना संघर्षाच्या उत्तरार्धाची लेखात फारसी नोंद केली नाही.. कदाचित त्याकडे राजकीय वक्रदृष्टितुन पाहिले जाईल.. किंबहुना आज अनेक जण त्याचे साक्षिदारही असतील.. हा विजय म्हणजे समस्त हिन्दूचा विजय आहे.. कारण जे लढले.. झगडले ते हिन्दू म्हणून.. कशासाठी..? तर हिन्दू अस्मितेसाठी..

प्रस्तुत इतिहासाच्या नोंदी २००५ च्या आसपास टीपुन ठेवल्या गेल्या होत्या.. त्यासाठी अनेक जुन्या पुस्तकांचा आधार होता.. समग्र लिहायचे ठरले तर कितीतरी खंड निर्माण होतील.. काही शेष राहिलेही असेल.. त्या बाबत दिलगिरी ही व्यक्त करतो..

कदाचित प्रश्न पडेल की एवढ्या वर्षानंतर आज का सूचले..? तर त्याचे ही कारण आहे.. हिन्दूवासीयांनो.. खरे तर आव्हाने अजुन बरीच आहेत.. काशी विश्वेश्वर परिसर आणि ज्ञानवापी मस्जिद, मथुरा, भोजशाळा अशी अनेक पवित्र क्षेत्र आहेत जी अजूनही वर्षानुवर्षे मिनारखाली गुदमरुन पडली आहेत.. त्यांची मुक्तता करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिन्दू संघटन.. आजची परिस्थिती पाहता येणारा काळ किती भयानक असेल त्याची कल्पना न केलेली बरी..

खरे तर येथील समाज हिन्दू.. यातील काही आज स्वतःला पृथक समजत असेल तरीही.. काही राष्ट्रविघातक समूह आज समाजात अलगपणाची बीजे रुजविन्याचा प्रयत्न करत आहे.. दुर्दैवाने आमचा समाज अंधपणे त्यास बळीही ठरत आहे.. हिन्दू केवळ धर्म नाही तर संस्कृती आहे.. जीने आजवर हा हिन्दू समाज विविधता असूनही एकसंध बांधून ठेवला आहे.. आज हीच संघटीत भावना राष्ट्राचे बलशाली केंद्र आहे.. या दुष्ट प्रवृत्तिकडून या संघटीत भावनेवरच आघात केला जात आहे.. त्यासाठी, जातिवाद, प्रांतवाद, वर्णवाद, अशा संकुचित अस्मिता जागृत केल्या जात आहेत.. या भूलथापांना बळी पडून आम्ही आमचे स्वत्व गमावून बसत चाललो आहे.. बाबर ने फक्त मंदिर उध्वस्त केले.. आज ते उभे ही राहिले.. पण हिन्दू ऐक्य नष्ट झाले.. तर गल्लोगल्ली असे अनेक बाबर निर्माण होतील..

आज काही निर्लज्जांकडून प्रश्नही उपस्थित होत आहे की, कशासाठी मंदिराचा एवढा अट्टहास..? तर मी एवढेच म्हणेन की, काही बाबी या राष्ट्राच्या आत्मसन्मानाच्याही असतात.. विरोधासाठी विरोध करून आपली राजकीय पोळी भाजनारे करंटे येथे काही कमी नाहीत.. यांना हिन्दू म्हणावे की हिंदुना लागलेला कलंक म्हणावे तेच समजत नाही..

राम मंदिर निर्माण हा केवळ आस्थेचा विजय नाही तर एक अभूतपूर्व संघर्षाचा विजय आहे.. धार्मिक हिंदुस्थानचे धार्मिक अधिष्ठान, परंपरा, संस्कृती आणि लाखो बलिदानाची ती यशोगाथा आहे.. ५०० वर्षे रक्ताने लाल झालेली ही शरयु नदी आज खऱ्या अर्थाने आनंदाश्रु वाहत असेल.. आजवरच्या या रक्तरंजित इतिहासाची ती साक्षीदार होती.. सांस्कृतिक राष्ट्र म्हणून जशी या हिंदुस्थानची ओळख आहे तशीच ही योध्यांचीही भूमि आहे.. याचा विसर न पडावा.. केवळ पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी त्याग आणि बलिदान देण्यासही येथील समाज मागेपुढे पाहत नाही.. हेच या भूमिचे सत्व आणि तत्व आहे.. यातूनच ही राम मंदिराची आकांक्षा..

तरीही एक प्रश्न पडतोच.. राजकीय उल्लेख नकोच पण ओघाने येतोच.. आज या देशात अनेक हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन दिवसरात्र झटणारे.. झिजणारे कार्यकर्ते आहेत.. कोणी त्यांना ठराविक राजकीय पक्षाचे चेले म्हणत असतील..पण विचार केला तर राजकीय समिकरणे वाढीस लागली ती आत्ता.. या पाच सहा दशकात.. पण आत्मउन्नतिची आणि स्वाभिमानाची ज्योत अखंड ठेवत आहे ती गेल्या दोन हजार वर्षापासून.. ज्याला तुम्ही काही जण म्हणत असाल त्या काही जनांच्या त्याग आणि परिश्रमातुन हे राष्ट्र आजही तितक्याच जोमाने उभे आहे.. लक्षात ठेवा, कळत नकळत कोणीतरी तुमच्याही वाट्याची लढाई लढत असतील.. त्यांना साथ देणे हे ही धर्म कर्तव्यच.. केवळ हिंदू म्हणून.. आणि म्हणूनच हे राष्ट्र सुरक्षित आहे..

विपरीत परिस्थितिशी मुकाबला करून हा राष्ट्रसन्मान पुन्हा मिळवणे हा तर येथील दिव्य वारसा.. अगदी मौर्यकाळ, विक्रमादित्य काळ, त्यानंतर छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा काळ याची साक्ष देईल.. आम्हाला सहजच काही गोष्टी प्राप्त होतच नाही.. लढा आणि संघर्ष जणू या मातिचा गुणधर्म बनला आहे.. पण मुळात शत्रुचे हे इस्पीत का साध्य होते.. तर षंड आणि गद्दार रक्त येथे आजही नव नवीन चेहरे घेऊन उदयास येते.. ही सुद्धा या भूमिची शोकांतिका..

असो.. भविष्यात अनेक आव्हाने पेलायची आहेत.. जेंव्हा आत्मविस्मृति होईल तेंव्हा पूर्वजांचे पराक्रम, त्याग, बलिदान आठवावे.. तोच भूतकाळ पुन्हा नव संजीवनी निर्माण करून नव्या आव्हानासाठी सज्ज राहण्यास प्रेरणा देईल.. लक्षात ठेवा.. राष्ट्रउद्धारासाठी हिन्दू ऐक्यशिवाय पर्याय नाही एवढेच शेवटचे सांगून थांबतो..

पिढ्यापिढ्याच्या संघर्षातुन झाला महाविजय साकार..!
गुढी उभारा दिग्विजयाची श्रीरामाचा जय जयकार..!!

*।। सियावर रामचंद्र की जय ।।
|| जय श्री राम ||•

 

बहारदार कमाल सोहळा झाला आजचा श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेचा…!😃👌🏻

रस्ते आणि पूर्ण परिसर शब्दश: भगवी नदी वाहत असल्यासारखा फुललेला होता… गल्लोगल्ली पूजापाठ, स्तोत्रपठण, आरती, भजन असे धार्मिक कार्यक्रम चालू होते…जागोजागी प्रसाद वाटले जात होते…चौकाचौकात मोठाले स्क्रीन्स लावून प्राण प्रतिष्ठापना सोहळा live दाखवला जात होता…

ओळख पाळख नसताना लोकं एकमेकांना “जय श्रीराम” अभिवादन करत होते…सर्वत्र दिवाळी/नवरात्री पेक्षा दहापट अधिक आनंद, उत्साह, प्रसन्नता आणि एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा पसरली होती…आणि अजूनही हे सर्व चालूच आहे, फटाक्यांची आतिशबाजीही चालू आहे…थक्क करणारा अनुभव!!🙏🏻आज आपण सर्व जण—~ केवळ एका देवळाच्याच नव्हे तर हिंदू धर्माच्या पुनरुत्थान प्रक्रियेचे…

~ भारताला भविष्यात ‘हिंदुराष्ट्र’ घोषित करण्याच्या प्रक्रियेच्या सुरुवातीचे…~ सनातन धर्माच्या सामर्थ्याची जगाला आणि आपल्या स्वतःला सुद्धा जाणीव करून देण्याऱ्या प्रेरणेचे…थोडक्यात म्हणजे -आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाच्या क्रांतिकारक घटनेचे साक्षीदार झालो आहोत, हे आपलं खूप थोर भाग्य आहे …🙏🏻🙏🏻

|| जय श्री राम ||•

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}