मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कुटुंब प्रमुखाला का जपायच छान लेख ? त्याचीच हि एक कथा

🌹 ॐ गं गणपतये नम:🌹

 

कुटुंब प्रमुखाला का जपायच छान लेख ?
त्याचीच हि एक कथा
©️

गावातलं एक शेतकरी कुटुंब. आई वडील व तीन मुले, त्यांच्या बायका असं एकत्र कुटुंब. वडील शिस्तबद्ध, कष्टाळू, प्रामाणिक व मेहनती, एकट्याच्या बळावर त्यांनी आपलं घर पुढं आणलेलं. मुलंही चांगली निघाली. नंतर आलेल्या सुनाही त्याप्रमाणे एकजिनसी राहू लागल्या.
मात्र घरातली कामे कोणती कुणी करायची, यात गोंधळ होऊ लागला. आणि कामे खोळंबु लागली. एकीला वाटायच की हे काम मी का करू ? धाकटीने करावं. असं इतर दोघीनाही वाटायच अन त्यात गुंता वाढत गेला.
वडिलांनी (म्हणजे सासऱ्यांनी) हे सगळं पाहिलं अन एके दिवशी तिन्ही सुनांना बैठकीत बोलावून घेतलं. स्वतःच्या बायकोलाही हाक मारली आणि त्या चौघीत कामाबद्दल चक्क वाटणीच त्यांनी करून दिली.
ते म्हणाले, “सर्वात लहान सून… हौशी आहे, नव्या काळातली आहे. आहार विहार कसा असावा हे शिकलेली आहे. तर आजपासून घरचा सर्वांचा स्वयंपाक तिने पाहायचा. बाकी दिवसभर मग तिने वाटलं तर इतरांना मदत करावी मात्र त्याची सक्ती नाही. बाकी वेळ ती आराम देखील करू शकेल.”
मधली सून…. नीटनेटकी आहे. टापटीप आहे. तर आजपासून तिने घरची धुणी भांडी पाहायची. बाकी काही नाही केलं तरी चालेल.
थोरली सून…. जुन्या काळातली आहे. कष्टाळू आहे. शेतीभातीचे ज्ञान आहे. परंपरा रीतिरिवाज माहीत आहेत. तर आजपासून तिने फक्त शेताकडे पहायच. बाकी तिन्ही मुले शेतात असतातच. त्यांना हातभार लावायचा. घरची बाकी कामे नाही केली तरी चालेल.
यावर मग सासू बोलली, “सगळ्यांना कामे सांगितली. मलाहि काम सांगा की काय करू ?”
सासरा म्हणाला, “खूप वर्ष तू माझ्या बरोबरीने कष्ट केले आहेत. त्यामुळे तुझ्यावर आता कामाचं ओझं टाकावं वाटत नाही. आराम कर, सुख घे”
तर सासू म्हणाली, “असं नको. नुसतं बसून आजारी पडेल मी ! काहीतरी काम सांगाच”
सासरा म्हणाला, “बर मग एक काम कर. आजपासून घराची मुकादम तू. सगळीकडे लक्ष ठेवायचं. पै पाव्हणे पाहायचे. आणि या तिन्ही सुना जिथं कुठं कमी पडतील तिथं तू त्यांना पाठबळ द्यायच.”
*
कामाची अशी वाटणी झालेली पाहून सगळ्याच बायका एकदम खुश !
आणि मग तेच घर पुन्हा शिस्तीत चालू लागले. गाडी रुळावर आली.
आणि अशाच एक दिवशी लहान सुनबाई स्वयंपाक करत होती. भाकरी भात वगैरे झाला होता. फक्त आता भाजी राहिली होती. भाजीही चिरून वगैरे तिने घेतली. कढई चुलीवर चढवली. फोडणी केली. नंतर चिरलेली भाजी टाकली. तिखट, मसाला, हळद टाकली. मीठ मात्र टाकलं नाही. का नाही टाकलं ? तर आधीच मीठ टाकलं तर भाजी शिजायला वेळ लागतो. म्हणून सुगरण गृहिणी नेहमी उकळीच्या वेळी मीठ घालते. (गोष्टीच्या निमित्ताने नव्या पिढीच्या महिलांना ही डीडी टीप दिली)
आणि रश्यासाठी पाणी टाकून उकळी यायची वाट पाहत बसली. इतक्यात निरोप आला की तिची माहेरी आलेली मैत्रीण आता सासरी जायला निघालीय. तर पाच मिनिट तरी उभ्या उभ्या भेटून यावं असं तिला वाटल.
पण इकडं तर भाजीला उकळी यायची होती. त्यात वेळ जाणार होता.
मग ती धाकटी सुनबाई मधल्या सुनेकडे (म्हणजे जावेकडे) गेली. अन म्हणाली की, “माझी मैत्रीण निघालीय. मला जायचय तर आजच्या दिवशी जरा भाजी उकळी आल्यावर मीठ तेव्हढं घालता का ?”
त्यावर मधली जाऊ म्हणाली, “माझ्या पेक्षा लहान असून मला काम सांगते ? तुला काय संस्कार बिस्कार आहेत की नाहीत? निघ तू…. तुझं तू बघ”
धाकटी बिचारी नंतर थोरल्या जावेकडे गेली.
थोरलीने तर मधली पेक्षा मोठा आवाज करून धाकटीला “तुझं तू बघ” म्हणून घालवून दिल.
धाकटी मग तोंड लाहान करून शेवटी हाय कमांड (सासू) कडे गेली.
तस सासूनेही नकार देत… तुझं तू पहा. मला आता काम झेपत नाही बाई असं म्हणत घालवून दिल.
या एकूण प्रकारात इतका वेळ गेला की तिकडं तेव्हड्या वेळेत भाजीला उकळी आली पण ! ते पाहून धाकटीने त्यात पटकन मीठ टाकून झाकण ठेवून ती गेली मैत्रिणीला भेटायला.
*
आणि मग या दोन सुना व सासू स्वतःशीच विचार करत बसल्या की आपण केलं ते चूक की बरोबर ?
मधलीने विचार केला, कधी नव्हे ते धाकटी मदत मागायला आलेली आपण आपण घालवून दिली. हे बरोबर नाही केलं आपण.
असं म्हणत ती स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.
थोरलीनेही तसाच विचार केला आणि थोड्या वेळाने तीनेही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.
आणि सासूलाही पश्चाताप झालेला. नको होत इतकं रागवायला तिला… असं म्हणत थोड्या वेळाने तीनेही स्वयंपाघरात जाऊन त्याच भाजीत मीठ टाकून गेली.
सर्वानी स्वतःच्या मनाला दिलासा दिला की आपण चुकलो होतो पण नंतर दुरुस्ती केली.
पण आता जिथं एक चमचा मीठ पडायचं होत त्या भाजीत चार चमचे मीठ पडलेलं.
*
दुपारी सासरे जेवायला शेतातून घरी आले.
सुनेने त्यांच्यासाठी ताट वाढलं.
सासऱ्यांनी पहिलाच घास खाल्ला अन त्यांच्या लक्षात आलं, भाजी खारट झालीय.
त्यांनी सुनेला सांगितलं, “अग बेटा, घरात दही आहे का ? असेल तर वाटीभर आण”
सुनेनेही पटकन जाऊन दही आणल. सासऱ्यांनी ते त्या भाजीत मिसळून टाकलं अन मस्त मजेत जेवण करून शेताला निघाले सुद्धा. (बाय द वे दुसरी डीडी टीप : पदार्थात मीठ जास्त पडलं असेल तर दही टाकावं. किंवा असेल तर बटाटा बारीक किसून टाकावा. काम होऊन जात)
नंतर तिन्ही मुले घरी जेवायला आली.
त्यांनाही जेवण वाढलं गेलं. मात्र त्यांनी पहिल्याच्या घासाला एकमेकांकडे पाहायला सुरुवात केली आणि खुणेने “काय खरं नाय भाजीचे” असं सांगितलं.
थोरल्या मुलाने आईला विचारलं, “आबा जेवून गेले का ?”
आईने हो सांगितल्यावर त्याने विचारलं, “काय जेवले आबा?”
तर आई म्हणाली, “हेच जेवण की जे तुम्हाला वाढलं आहे. पण आज काय माहित त्यांनी दही मागून घेऊन ते भाजीत टाकून खाल्लं बाबा”
यावर पटकन तिन्ही मुले म्हणाली, “आम्हालाही दही आणा”
त्याप्रमाणे मुलांनीही मग भाजीत दही मिसळून छान जेवण करून शेताला गेले.
नंतर जेव्हा बायका जेवायला बसल्या तेव्हा त्यांना कळलं की मीठ जास्त पडलंय. सासूने याबद्दल विचारणा केल्यावर सगळ्यांनी “मी पण मीठ टाकलं” सांगितलं. शेवटी मग त्यांनीही भाजीत दही मिसळून जेवण केलं.
गोष्ट इथं संपलीय !
डीडी क्लास : एखाद्या गोष्टीवरून हमखास जिथं वाद होऊ शकतो, मने कलुषित होऊ शकतात अशावेळी कुटुंब प्रमुख जो सल्ला देतो, जी कृती करून नकळत मार्गदर्शन करतो तो बाकीच्यांनी मानला तर मग वरील गोष्टीप्रमाणे वाद न होता तो मुद्दाच अडगळीत पडतो आणि घरात एकोपा राहतो.
प्रश्न मीठ जास्त पडण्याचा नसतो तर नंतर त्यावर काय करावं ? याचा असतो.
प्रमुख म्हणून तो सासरा रागावू शकला असता पण त्याने तसे केले नाही. कारण त्याने बिनभिंतीच्या उघड्या शाळेत असे अनेक खारट अनुभव पचवून त्यात उपायाचे दही कसे मिसळायचे हे शिकलेला असतो. त्याची दही घेण्याची कृती नंतर मुलांनीही स्वीकारली अन तेही जेवण करून खुश झाले. वाद टळले.
कुटुंबप्रमुखाला म्हणून मान द्यावा. भले काही वेळा त्याचे निर्णय तुम्हाला चुकीचे वाटत असतील पण तुमच्या पेक्षा चार पावसाळे त्याने जास्त पाहिलेले असतात त्या अनुभवाचे भांडारच ते तुमच्यासाठी उधळत असतात.
ते लाथाडु नका ! स्वीकारा !! त्यात भलाई आहे.🎉

♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}