शनिवार हॉरर स्पेशल.. ..छुम् छुम्….. श्रीराम● अरविंद बोडस ०२१२२०२३
● शनिवार हॉरर स्पेशल..
..छुम् छुम्…
..रात्रीचे बहुदा दोन-सव्वा दोन झाले असतील.. मी बाहेरच्या खोलीत बसून एकचित्ताने माझा अभ्यास करत बसलो होतो..सोसायटीत सगळीकडे कशी निरव शांतता होती..येत होता तो फक्त कुत्र्यांचा अधूनमधून आवाज…एव्हढ्यात..
. .जिन्यात कोणीतरी दबक्या पावलांनी.. वरती जातेय असा भास झाला….मध्येच थबकल्याचा आवाज..लगबगीने बाहेरच्या दाराला कान लावला..बारीक पैंजणांचा आवाज..क्षणभर वाटले दार.. उघडून बघावे तर..मनाने भीतीची जागा घेतली होती..आवाज पहिल्या मजल्यावर जाऊन थांबला..अगदी विन्याच्या..
..अंगावर एक सरसरून काटा आला..
..आतल्या खोलीत जाऊन हलक्या आवाजात गुरख्याला फोन मारला..
..”जी, शाब..
..”रतनसिंग अभी कोई आया??..
..”नही शाब..पक्का कोई नही आया..
मग मी विचार केला मग सोसायटीतली कोणी??..छे!..शक्यच नाही..बारा पैकी चार परदेशात..तीन परगावात..पांच पैकी मी एक, उरलेले कुटुंबवत्सल..सोसायटीत तशी कोणीही मुलगी नाही..मग कोण??.
..सकाळीच वरचा विनय टपरीवर भेटला..
..”कायरे विन्या!..असा काय दिसतोस??..
..”अरे, रात्री नां!.छातीत जरासे दडपल्या सारखे झाले..
..हा विनय, सुस्थितीत, एम आर, बायको नुकतीच…नैराश्यतेने तिचा..
..आठवडा असाच गेला..परत शनिवार…
.तीच वेळ तोच आवाज..माझे मन खूप अस्वस्थ झाले..हे जे काही चाललेय नां ते काहीतरी “वेगळेच” प्रकरण असावे म्हणून उद्या विन्याला जरा विचारायचेच..
..सकाळच्या ऑफिसच्या घाईगडबडीत नाही जमले विन्याला भेटायला…
..दुपारचे चार वाजत आले होते..
..”हॅलो..मी इन्स्पेक्टर शिंदे बोलतोय..
..”होय!..मीच बोलतोय..
..”आपण विनय….ओळखत असाल..
. “हो, तो आमच्या..
..”एक वाईट बातमी..
.पुढचे ऐकून घ्यायला मी भानावर होतोच कुठे??..कानांत फक्त पैंजणांचा..
..पुन्हा फोन वाजला..भानावर आलो…
..”हॅलो.. येताय ना?..पंचनामा. ..कसाबसा उठलो.तोंडावर चार हबके मारून लगेचच..
सोसायटी गाठली.
..सोसायटीत खाली बरीच मंडळी जमली होती..वाट काढत वर आलो..
..बाहेरच्या दिवाणावर विनयचे निष्प्राण कलेवर..मी जवळ गेलो..डोळ्यात दाट अश्रू जमा झाले..मी त्यांचा खूप जवळचा..थेट कॉलेज पासून, मी सिनिअर तो ज्युनिअर.. व ती तर नवीनच..परंतु माझी बालमैत्रीण..
पुढे त्यांचे सूत जमले व विवाहबद्ध झाले..
..मध्यंतरीच्या काळात आमचा ग्रुप ट्रिपला उत्तरेत मस्त जाऊन आला..तेव्हा..इंदूरच्या सराफा बाजारात तिला एक सुंदरशी पैंजण जोडी खूप आवडली होती.पण विन्या तीला नाही म्हणाला…पुढे अशीच वर्षे चार वर्षे उलटून गेली…
…वैवाहिकसुख नाही मिळाले म्हणून वासंती वैफल्यग्रस्त.!.नैराश्यातून ती पुढे जास्तच खंगतच गेली..
…मध्येच एकदा मी तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा..
..””अरे विंदा..मला एक छानसे पैंजण जोड आणशील.?..त्या इंदूरच्या सराफा…
..मी तिला लगेचच हो म्हणालोही..पण मध्यंतरीच्या अवधीत..ती गेली बिचारी..
..पोलिस गेल्यावर पुढची तयारी.. खूप वाईट वाटले..जरा एकदा विन्याला जवळुन पाहावे म्हणून मी त्याच्या जवळ गेलो..
.त्याचे ते खोल गेलेले उघडे डोळे काहीतरी सांगत होते..नाही तरी मी तसा आतून खुप टरकलोच होतो..अंगावर शहारा..
..होय..त्याच्या गडद डोळ्यात मला ती दिसली.होय तीच ती विन्याची वासंती होती…
अबोल, लाजरी बुजरी आपल्या आपल्याच मनोराज्यात रमणारी..तिचा उजवा पाय त्याच्या हातात होता अन ती जणू काही.. त्याला सुचवतच होती की.””अरे पैंजण घाल ना रे…बघ..मी आता आलेय..तेव्हढा तरी हट्ट माझा पुरा कर ना रे..
. …मी थरथरत्या हातानेच विन्याचे डोळे मिटले..एक प्रवास संपला होता..
..महिना असाच गेला..म्हटले पुन्हा आता पुढच्या अभ्यासाची तयारी करूया..
..नेमका आज त्यात पुन्हा शनिवार..तीच वेळ..तोच तो पैंजणांचा आवाज..मला तर दरदरून घामच फुटला..कापरेच भरले..
..आवाज तर आता अगदी माझ्याच…
.. दरवाज्याजवळ येऊन थांबला होता..
●श्रीराम● अरविंद बोडस ०२१२२०२३