वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ? मकरंद करंदीकर यांचा हा लेख

आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?
मकरंद करंदीकर यांचा हा लेख वाचनात आला. नक्की वाचा.

समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात. लगेचच सर्वांची ‘ कर्णपिशाच्च ‘ बाहेर येतात. सर्वजण तात्काळ स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोणकोण आलाय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसांची बेटं होऊन बसतात. मोबाईलवरील हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडं इकडेतिकडे बोलायचे. त्यातही नैसर्गिक संवाद नसतातच. अरे आहेस कुठे, हल्ली काय नवीन, युसला गेला होतास ना, तू किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना, असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी अकृत्रिमपणे बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्रकुटुंब मोडून छोटीछोटी कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकला की मनुष्यबळ उभे करता येते. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील कॅटररच्या फौजेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्वकांही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतत. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेबंधुंची गरज संपत चालली आहे.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा अडवणूक करतात. बोलणं बंद करतात, नाती तोडतात…. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

तरीही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.. काय झालाय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?
तुम्हाला कांही उत्तर सुचतंय का ?

मनमोकळेपणाने राहता येत नाही का ? सुचलं तर सांगा ……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}