दृष्टी नव्हे दृष्टिकोन ©️ मंदार कुलकर्णी, पुणे ०७.०१.२०२४
दृष्टी नव्हे दृष्टिकोन
गाडी चालवताना बहुतेक वेळा मी रेडिओ ऐकतो, त्यामुळे ड्रायव्हिंग ची मजा येते आणि ट्रॅफिकचा कंटाळा येत नाही. काही दिवसांपूर्वी असाच संध्याकाळी घरी येत असताना रेडिओवर ऐकले की काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर लिहिण्यासाठी ‘Writer’ हवे आहेत. ही अशी मुले होती ज्यांना अंशतः वा पूर्णपणे दिसत नव्हते. मी लगेचच रेडिओ चॅनलला संपर्क केला आणि पुढील गोष्टी ठरवल्या.
मला एका मुलीचा B.A च्या दुसऱ्या वर्षाचा Political Science चा पेपर लिहायचा होता. पेपरच्या दिवशी वेळेच्या अर्धा तास आधी मी कॉलेज मध्ये पोहोचलो. ठरलेल्या जागी मी ज्योतीला भेटलो.
त्या मुलामुलींचा साधारण १०-१२ जणांचा ग्रुप होता. एकमेकांना साथ देत खरी मैत्री निभावताना मी या मुलांना बघितले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान हसू होते. एकमेकांची काळजी घेणे, चालताना आधार देत सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे, हे अतिशय स्वाभाविक पणे करत होती ती मुले. “अगं तुझे writer आले का? चला सगळे वर्गात जाऊन बसू आता” अशी वाक्ये माझ्या कानावर पडत होती.
थोड्याच वेळात पेपर सुरू झाला. मी ज्योतीला सगळे प्रश्न वाचून दाखवले आणि ऑप्शन्स समजावले. एकदा वाचताच तिने अगदी सहजपणे कुठल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत हे ठरवले आणि मला सांगितले. या वरून तिची आकलन क्षमता उत्तम असल्याचे स्पष्ट झाले. जसं जसं ती सांगत होती तसं मी लिहीत गेलो. मार्कांच्या तुलनेत लिहिलेले मुद्दे व मजकूर पुरेसा आहे की नाही याचा अंदाज घेत ती पुढे जात होती. दिलेल्या वेळेत आम्ही पेपर लिहून पूर्ण केला आणि वर्गाबाहेर आलो.
परीक्षेतील एक टप्पा पार केल्याचे समाधान सगळ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कुठेही चिटींग नाही, कुठलीही खंत नाही आणि कशाचीही तक्रार नाही. चेहऱ्यावर केवळ आनंद आणि ओसंडून वाहणारा उत्साह. सगळे जण वर्गा बाहेर एकत्र जमल्यावर कोणी हातात हात घेत तर कोणी खांद्यावर हात टाकत एकमेकांना सावरत व सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या वसतीगृहाकडे निघाले.
मी काही वेळ तिथेच थांबलो. या अनुभवा तून मला तीव्र जाणीव झाली ती या गोष्टीची की माणसाची दृष्टी नव्हे तर त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा.
परिस्थिती ने जे शहाणपण या विद्यार्थ्यांना या वयात दिले, त्यांच्यातील तो आत्मविश्वास आणि त्यांची अतुलनीय जिद्द हे सगळे बघून मी खरंच थक्क झालो. या मुलांमध्ये जी संघटित राहण्याची भावना दिसली, त्या भावनेचा समाजा मध्ये इतका अभाव का असावा हा प्रश्र्न साहजिकच मला पडला.
पुढे काही दिवसांनी त्या रेडिओ चॅनल च्या RJ चा मला फोन आला व तिने मला त्या दिवशी काढलेला एखादा सेल्फी पाठवायला सांगितला. पण जेव्हा मी तिला म्हटले की मी त्या दिवशी एकही फोटो काढला नाही, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. मी फोटो न काढण्या मागची दोन कारणे होती, एक म्हणजे मला त्या वेळेला फोटो काढण्या पेक्षा त्या अनुभवात आणि विचारांमध्ये गुंतून राहण्यात जास्त रस होता आणि दुसरे म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि ऊर्जा, मी माझ्या मनात साठवत होतो कारण ते टिपण्याची क्षमता कुठल्याही कॅमेऱ्या मध्ये नव्हती.
©️ मंदार कुलकर्णी, पुणे
०७.०१.२०२४
दृष्टी नव्हे दृष्टिकोन लेख ऊत्तम 🙂
Excellent