मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

‘स्रीधन’ ©®माधुरी चौधरी. 9421860873

‘स्रीधन’

लेखिका- माधुरी चौधरी.

निकिता आणि निलेशचा विवाह दोन दिवसांपुर्वी धुमधडाक्याने पण कमीतकमी खर्चात पार पडला. दोन्ही कुटुंबे खाऊन पिऊन सुखी पण प्रचंड हौसी. लग्न ठरले तसा दोन्ही घरी प्रचंड उत्साह संचारला होता. पण एक दिवस निलेशचे आजोबा निकीताच्या घरी आले. आगत स्वागत झाल्यावर त्यांनी सरळ विषयालाच हात घातला. “अशोकराव राग येणार नसेल तर एक बोलावे म्हणतो.”
आजोबा आता काय बोलणार या भितीने निकीताच्या वडिलांच्या अंगावर काटाच आला. तरी पण स्वतःला सावरत ते म्हणाले, ” बोला ना बाबा.”
“माझा एक विचार आहे, बघा पटतो का?… तसे आम्हाला हुंडा वगैरे काहीही नको…. पण बडेजाव करून खर्च करण्यातही काय अर्थ आहे ना? मला वाटते आपण सर्व हौसमौज पुर्ण करू, पण मोजकेच लोक बोलावून नको त्या गोष्टी पण टाळू या का?….”
“हो पण मग मुले नाराज होतील की… आणि लग्न एकदाच होते ना …मग त्यांची हौस पूर्ण व्हायला नको का बाबा….”
“अरे पोरांच्या, घरातल्या आयाबायांची, आपल्या नातेवाईकांची हौसमौज करूच की आपण… पण त्या व्यतिरिक्त ही बराच वायफळ खर्च होतोच ना…. तो टाळून मुलांनाच काहीतरी करून देऊ असा माझा विचार आहे… मी तर निलेशला माझ्याकडून घराच्या बुकींगसाठी पाच लाख रूपये द्यायचे म्हणतोय… ”
ही कल्पना सर्वांना आवडली.. लग्न थोडक्यात पण जोरदार झाले. निकीताच्या वडिलांना ही फारसा खर्च परवडणारा नव्हताच. त्यांनी लग्नासाठी कर्ज काढायचे ठरवले होते त्याची गरजही पडली नाही. उलट आनंदाने त्यांनी मुलीला दोन पाटल्या आणि एक हार स्रीधन म्हणून दिले. निलेशकडून ही मणी मंगळसुत्र व दोन बांगड्या तिला दिल्या होत्या.
निलेश, भाऊ जयेश, आईबाबा, आजी आजोबा व लग्न झालेली बहीण असे कुटुंब. त्यात काका काकू ही आनंदाने सामावले जायचे. सगळे कसे आनंदात पार पडले. कुठेच गालबोट लावायला जागा नव्हती.
सकाळी सत्यनारायणाची पुजा झाली. जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळी एकेक पाहुणे जायला निघाले. पुजेसाठी आलेली निकिताची माहेरची मंडळी, नणंद-नंदोयी, काका-काकू सगळे सोबतच निघाले.
घरात आता आवरायला घेतले होते. लग्नाच्या धामधुमीचा थकवा आता सर्वांना जाणवत होता. निकिता माहेरच्या आठवणीने कोमेजली होती. वडिलांची आठवण झाली की, तिचा हात बांगड्यांवरून मायेने अगदी अलवार फिरायचा. त्या बांगड्यांमध्ये निकिता माहेरचा आशिर्वाद अनुभवायची.
निलेश तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला…. त्या पहिल्या वहिल्या स्पर्शाने ती नवथर लाजून चुर झाली. निलेश तिच्या अजून जवळ जाणार तसा त्याचा मोबाईल वाजला. नाईलाजानेच त्याने मोबाईल उचलला. समोरून निकीताचे बाबा बोलत होते.
” निलेशराव…….”
“हां ,बोला बाबा…”
“…..”
“बाबा काय झाले…. बोला ना …”
“निलेशराव… तुमच्या ताईचा.. निलांबरी ताईंचा अपघात झाला आहे..”
त्यांना पुढे बोलवेचना….
निलेशही गांगरला. पुढे काय बोलावे तेच त्याला सुचेना… त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला….
निकिताने मोबाईल उचलून वडिलांकडून सर्व माहिती घेतली. निलांबरी ताईंच्या गाडीला मागून भरधाव येणा-या ट्रकने जोरात धडक दिली होती. चौघे जण जखमी झाले होते. अशोकरावांची गाडी मागूनच येत असल्याने दवाखान्यात नेण्याची व्यवस्था लवकर झाली….
थोड्याच वेळापुर्वी आनंदात असलेले घर असे दुःखात बुडाले होते.. निलेश, बाबा, आई, आजोबा तर काहीच बोलू शकत नव्हते.. सगळ्या घरावर दुःखाची छटा पसरली होती. शेजारीपाजारी जमू लागले. दवाखान्यात जायची तयारी सुरू झाली.
कुणीतरी बोलले, “काय पण बाई, पोरीने घरात पाय ठेवला अन् केवढा मोठा अपघात झाला… अपशकुनीच वाटते….”
हे वाक्य कानावर येताच निकीताला चर्रर झाले. पण ती खूपच धीराची होती. लग्नाआधी एका छोट्याशा कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होती… तेच कौशल्य तिच्या कामी आले.. नविन होती पण धिराची होती. तिनेच गाडीची चावी घेतली, सर्वांना गाडीत बसवले व दवाखान्यात आणले… तिचे वडील आणि इतर पाहुणे तिथेच उभे होते… लागणाऱ्या रक्तासाठी कुणाचे कुणाचे रक्त मॅच होते हे पाहणे चालू होते.
सुरवातीची काही रक्कम तिच्या वडिलांनी भरली होती. चौघेजण बेशुध्द होते. निलांबरीचे यजमानच गाडी चालवत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला भरपूर मार लागला होता. तत्परतेने ऑपरेशन करणे गरजेचे होते. निलांबरीच्या पायात पत्रा घुसला होता. जखम हाडांपर्यंत गेली होती.. गरज पडल्यास तिचेही ऑपरेशन करावे लागणार होते….
“डाॅक्टर कशी आहे माझी पोर, जावई …. नातवंड..” समोरून डाॅक्टरांना येतांना बघून आईने धावतच जाऊन विचारले.
“मी आतातरी काहीही सांगू शकणार नाही.. आधी ऑपरेशन करावे लागेल. राहिलेले सहा लाख भरा मग ऑपरेशनला सुरवात करतो…”
हे ऐकूनच सर्वजण गार झाले.. आताच घरात लग्न कार्य झालेले.. त्यात परिस्थिती जेमतेम.. बरे, नातेवाईकांकडून जमा करायचे तर तेवढा वेळही नाही. करणार काय ? विचार करायलाही वेळ नव्हता….
“लवकर सांगा काय ते..”
आतून पुन्हा एकदा नर्स येऊन बोलली. सर्वच जण कुणाला ना कुणाला फोन करायला लागले. कुठुन काही होतेय का याचा अंदाज घेऊ लागली. पण कुठुनच काही प्रतिसाद मिळत नव्हता.
निकीताची नजर हातातील बांगड्यांवर गेली. तिचे डोळे चमकले. निकिताने तिच्या वडिलांना सोबत घेतले.. अन् शहरातील सोनाराचे दुकान गाठले.
अशोकराव सुरवातीला थोडे भांबावले.” निकी, अग सासरच्यांना न विचारता तू असा निर्णय कसा घेऊ शकते? ते लोक काय म्हणतील ?”
“बाबा ते काय म्हणतील यापेक्षा ते चार जीव मला जास्त महत्वाचे वाटतात. आणि मी अशा कित्येक बांगड्या घडवेल आयुष्यात बाबा पण गेलेले जीव मात्र परत येणार नाहीत ना .” म्हणत निकिताने सोनाराकडून पैसे घेतलेही.
अशोकरावांच्या डोळ्यात एक समाधानाची चमक दिसत होती. त्यांनी हळूच निकिताच्या डोक्यावरून हात फिरवला. जणू ते सांगत होते ‘मी तुझ्यासोबत आहे’ म्हणून.
अशोकरावांनी काउंटरवर पैसे भरले आणि ऑपरेशनला सुरवात झाली… तीन तासांनी ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सर्वांचा जीव भांड्यात पडला. निकिताच्या सासू कामिनीच्या कानात मात्र त्या स्रीचे शब्द घुमत होते ‘अपशकुनी दिसते’.
सर्वजण आता ब-यापैकी सावरले होते. निकितानेच बाहेर जाऊन सर्वांसाठी चहा मागवला. चहा घेऊन जरा तरतरी आली. पण कामिनीबाई मात्र चहा घेत नव्हत्या. निकिताने स्वतः कप घेऊन कामिनीच्या समोर धरला.
“नकोय मला….. ”
“असे काय करता आई. अहो चहा घेतला की बरे वाटेल तुम्हाला ही.”
“नाही सांगितले ना….”
“आई अहो आता धोका टळलाय ना… मग का जीवाचे हाल करताहेत तुम्ही…”
“एकदा सांगितले ना …. समजत नाही का … मला तुझ्या हातचे काहीही नकोय ते.”
हे ऐकता बरोबर निकिताच्या कानात पुन्हा तेच शब्द घुमले ‘अपशकुनी दिसते’.
आता मात्र आजोबांनी स्वतः चहा कामिनीला दिला.. पण चहा देतांना निकिताचे हात त्यांच्या दृष्टीतून सुटले नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सर्व काही ठीक झाले. दवाखान्यात निलेशचे बाबा व निलांबरीचे सासरे थांबले व सर्वजण घरी निघाले..
कालपासून कामिनी मात्र निकिताशी एक शब्दही बोलली नव्हती. निकिताही शांत होती. ही शांतता आजोबांना जाणवत होती.
घरी येताबरोबर आजोबांनी निकिताला सरळ खिचडी लावायला सांगितली. सर्वजण एकत्रच गरमागरम खिचडी खायला बसले.कामिनी मात्र ‘मला भूक नाही’चाच पाढा रटत होती.
आता मात्र आजोबांना राहवेना. “सुनबाई, तुला खरेच भूक नाही की तुला निकी च्या हातचे खायचे नाही…”
“नाही तसे काही नाही बाबा…”
“हे बघ सुनबाई हे केस काही उन्हात पांढरे झाले नाही हो. मी कालपासून बघतोय, तू पोरीशी नीट बोलत पण नाही…. तुला पण असेच वाटतेय का की ती अपशकुनी आहे म्हणून…”
“तसे नाही मामंजी.. पण…”
“पोरी, आज ही पोर होती म्हणून तुझी पोर वाचली हे लक्षात ठेव… अगं लक्ष्मीच्या पावलांनी आलीय पोर. नशीब आपले…”
“हिच्यामुळे निलांबरी वाचली…? काय बोलता काय मामंजी….?”
“का ? येवढे पैसे कुणी भरले हे नाही विचारले तू? जरा पोरीचे हात बघ.. तिने तिचे स्रीधन मोडले तेव्हा ती चौघे वाचली बरे का… आणि तू मात्र तिलाच अपशकुनी ….”
“काय….?”
कामिनीने निकिताचे दोन्ही हात हातात घेतले. तिचा हिरवा चुडा मात्र दिमाखात मिरवत होता.. तिच्या हातांना कपाळाला लावून कामिनीने अश्रूंना वाट करून दिली…
“पोरी मला माफ कर गं. पण आता तुझ्या माहेरच्यांना आम्ही आता काय उत्तर देणार गं… अजून तर तुझी मेहंदी पण उतरली नाही हातावरची आणि तुझे स्रीधन….”
“आई बांगड्या काय, पुन्हा होतील पण माणसे महत्वाची हो ना. आणि हो निलेश करून देतील की मला नंतर. हो ना हो….”
निलेश मात्र कृतज्ञापुर्वक, प्रेमळ नजरेने निकिताकडेच बघत होता. तेवढ्यात आबांचा मोबाईल वाजला.
“बोला अशोकराव”
“कशी आहे तब्बेत आता पोरांची…”
“पोरांची तब्येत आता सुधारतेय हो ”
“चला देवाची कृपा”
“हो तसेच म्हणायचे.. पण तुमच्या निकीचे स्रीधन …. माफ करा अशोकराव आम्हाला. पण आम्ही करून देऊ हो…”
“बाबा, अहो मी सोबतच होतो तिच्या तेव्हा… आणि हो, स्रीधनाचे म्हणाल तर या सोन्यानाण्यापेक्षाही अमुल्य स्रीधन तिच्याजवळ आहे.”
“समजले नाही ओ…”
“बाबा आमचे संस्कार, प्रेम, जिव्हाळा, आणि हो, आता तर तुमचेही प्रेम आहेच की…. मग काय कमी तिला…”
“हो, हे ही खरेच.” म्हणत आजोबांनी मोबाईल बंद केला..
कामिनी मात्र मस्तपैकी निकिताशी गप्पा मारत होती. निलेश चोरट्या प्रेमळ नजरेने निकिताकडे बघत होता… निकिताचा हिरवा चुडा किणकिणत तेवढ्याच प्रेमाने साद घालत होता….
©®माधुरी चौधरी.
9421860873
(आवडल्यास शेअर करताना कथेत कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}