काळा दोरा ते नथ एक सुरेल प्रवास नीला महाबळ गोडबोले
काळा दोरा ते नथ
एक सुरेल प्रवास
नीला महाबळ गोडबोले
नऊ-दहा वर्षाचं वय.. शाळेतली तिसरी चौथी असेल..
दिवाळीची सुट्टी संपलेली असायची.शाळेचा पहिला दिवस. वर्गात उत्साहानं प्रवेश झालेला असायचा. गप्पा जोरदार रंगलेल्या असायच्या.दारातून सुनिता वर्गात यायची. सगळ्या पोरींचं लक्ष तिच्याकडं जायचं.
आज सुनिता काहीतरी वेगळीच दिसत असलेली. अचानक लक्षात यायचं की तिनं नाकात काळा दोरा घातलाय.सगळ्यांचा तिच्याभोवती गराडा..
मग कळायचं की तिनं दिवाळीच्या सुट्टीत नाक टोचलय.
कुठे टोचलं,कसं टोचलं, किती दुखलं अशी इथ्थंभूत माहिती सुनिताकडून मिळायची नि तो सगळा दिवस डोक्यात फक्त ” नाक टोचणं” घर करून बसायचं..
” आई ,माझं नाक आजच्या आज टोचायचं ” आईचा पिच्छा पुरवलेला..
शेवटी हो नाही करत एकदाचं आईबरोबर सराफांचं दुकान गाठलेलं..
आतापर्यंत साठवलेलं सगळं धैर्य सोनारकाकांपुढे बसल्यावर कोसो दूर पळून गेलेलं..
सोन्याची काडी नाकाच्या पाळीत शिरताक्षणी नाकापासून पार डोक्यापर्यंत गेलेल्या कळीनं गच्च मिटलेल्या डोळ्यातूनही पाणी बाहेर काढलेलं..
त्या सोन्याच्या तारेत एक छानसा मोती घालून त्या तारेचं वेटोळं करून नाकाच्या आत गाठ मारलेली..
याचं नाव सुंकलं..
परवडणा-यांच्या नाकाच्या नशीबाला हे सोन्याचं सुंकलं …गरीबाच्या लेकीच्या नाकात काळ्या दो-याचं वेटोळं…
मोठ्ठं युद्ध जिंकल्याचा आनंद चेह-यावर धारण करून दुसरे दिवशी शाळेत मिरवलेलं..
दिवसातून हजारदा आरशात त्या सुंकल्याला न्याहाळून मिळालेला जगभराचा आनंद…
” सुंकलं हातानं सारखं फिरव बरंका..नाहीतर ते अडकून बसेल ”
आईची सूचना..
” अरे व्वा ..नाक टोचलं वाटतं ” भेटणा-या प्रत्येकाकडून कौतुक..
आनंदाच्या डोहात तरंगत असताना दुस-या दिवशी मात्रं नाक ठणकत असल्याची जाणीव व्हायची.नाकपुडी लालेलाल झालेली असायची.
तिसरे चौथे दिवशी लाल फोडाने त्या सुंकल्यावर आक्रमण केलेलं असायचं..
प्रचंड दुखणं ..पण आईला सांगायला कमीपणा वाटायचा..
दोन दिवस सहन करायची ती वेदना..
कदाचित स्त्री म्हणून वाट्याला येणा-या वेदनेची नि सहनशक्तीची इथूनच सुरूवात होत असावी!
आता त्या फोडात पू भरलेला असायचा..सुंकल्यातल्या मोत्याशी साधर्म्य जोडू पहाणारा तो फोड आता मात्रं आईच्या नजरेतून सुटायचा नाही..
रात्री गरम फुलवातीनं त्याला शेकण्याच्या नावानं नाकाला दिलेले चटके पार काळजापर्यंत पोहोचायचे..
सुंकल्याच्या तारेच्या गाठीचं नाकाच्या आतल्या बाजुला सतत टोचणं , ते सुंकलं पांघरुणात अडकून नाक दुखणं, कपडा काढताना सुंकल्यात अडकणं, खेळताना मैत्रीणीकडून सुंकलं ओढलं जाणं नि नाकातून जीवघेणी कळ उमटणं , चेहरा धुताना त्या सुंकल्यात हमाम साबणं अडकून मैत्रिणींचा शेंबूड अडकल्याचा गैरसमज होऊन चेष्टा होणं…
यांमुळे ” घी देखा लेकीन बडगा नही देखा ” …अशी त्या सुंकल्याची अवस्था व्हायची नि चार -सहा महिन्यांत त्या सुंकल्याशी काडीमोड व्हायचा!!
” नाक बुजू देऊ नको गं..नाहीतर लग्नात नथ घालायला अडचण यायची ” ..असे सल्ले मिळायचे नि अधूनमधून खराट्याच्या छोट्याश्या काडीनं नाकाच्या छिद्राचं अस्तित्त्व टिकवलं जायचं!
शाळेच्या स्नेहसंमेलनात छोट्याशा खोट्या कोळीछाप नथणींनं नाक सजायचं
नि ” टिमक्याची चोली बाई ” गाण्यावर मनमुराद नाचायचं..
” सागरपानी ढानी जाय सानी नजर लग जाय ” अशा गुजराती मारवाडी नाचाला मात्रं बांगडी एवढी मोठी नथणी नाकात विराजमाव व्हायची नि सुरेखशा साखळीनं ही नथनी केसाशी नाहीतर कानातल्याशी संग करायची..तिच्या सोबतीला कपाळाला महिरप करणारी मोठी बिंदीही असायची!
या नथन्या त्या बालपणात मोठा आनंद देऊन जायच्या नि हृदयातील स्मरणपेटीत निपचित पडून रहायच्या!
आयुष्याच्या प्रवासात शाळेचं गाव मागे पडलं नि महाविद्यालयाचं शहर लागलं..
या फुलपाखरी दिवसांत चित्रपटांच्या मोहमयी दुनियेनं भुरळ घातली नाही तरच नवल…
कधी रेखाची नाहीतर राखीची नाकातली रिंग तर कधी श्रीदेवीची नाकातली चमचमणारी चमकी किंवा मोरणी मनातल्या मोरपिसाला साद घालायची..
अशी चमकी घातली तर एखाद्या अमिताभ किंवा जिंतेंद्रला आपली भुरळ पडेल,अशा आशेनं मनाचं पाखरू फडफडायचं..
भाऊबिजेचे किंवा कुणीतरी खाऊला दिलेले पैसे साठवून एखादी खड्याची चमकी घेतली नि नाकात घातली की जीव शांत शांत व्हायचा..
त्या चमकीचा प्रभाव प्रत्यक्ष आयुष्यात मात्रं निष्प्रभ ठरतो; हे चार दिवसातच कळायचं नि अंतराळात भरारी मारणारं मनाचं पाखरू जमिनीवर आपटायचं..
एकदा अस्मादिकांनी मैत्रिणीबरोबर जाऊन सोन्याची चमकी घेतली नि नाकात घातली. दोन-चार दिवसांनी नाक दुखायला लागलं. अजून दोन -चार दिवसांनी चमकी दिसेनाशी होऊन त्याजागी मोठा फोड आला. फणफणून ताप आला.डॉक्टरांकडे गेल्यावर तापाचं मूळ नाकावरील फोडात असल्याचं कळलं. छोटसं ऑपरेशन करून फोड आणि त्याखालील चमकी काढावी लागली..
चमकी काढल्यावर चमकीची तार जी सोन्याची म्हणून विकत घेतलेली होती ती प्रत्यक्षात गंजलेल्या लोखंडाची निघाली..
नंतरचे अनेक दिवस औषधाचे नि आईवडिलांच्या कठोर शब्दांचे कडू डोस गपगुमान गिळावे लागले..
चमकीचं गारूड नाकाबरोबरच मनातूनही उतरलं…
आईची नथ मात्रं मनात घर करून बसली होती. मखमलीच्या छोट्याशा पेटीतली नथ प्रत्येक वेळी पाहिली की अजूनच आवडायची.सोन्याच्या तारेत गुंफलेले तजेलदार टपोरे मोती ,एखाद-दुसरा वेगळ्याच आकाराचा हिरवा नि लाल रंगाचा खडा , एखादा हिरा,एखादा पाचू नि एखादं माणिक …
कुयरीच्या लयबद्ध आकारात जमलेली ही रत्नांची मैफल मनात ठाण मांडून बसायची..
त्या पेटीतून दरवळणारा मंदसा अत्तराचा सुगंध त्या मैफिलीला साथ करायचा..
घरच्या एखाद्या लग्नात भरजरी शालू नेसून अंगभर दागिने घातलेल्या आईने नाकात नथ घातली की तिचं अगोदरचं सोज्ज्वळ सौंदर्य स्वर्गीय भासायचं…!!
आमच्या मिरजेत त्याकाळी अगदी घरच्या हळदीकुंकवालाही बायका नथ घालत. अगदी ओठापर्यंत ओघळणारी ती नथ पाहिली की या बायका कशा जेवत असतील ? त्यांना नथीमुळे शिंका येत नसतील का? नाक दुखत नसेल का? असले अचरट प्रश्न पडत …
नि आपण कधीही नथ घालायची नाही,असा नकळत निश्चय मन करून टाकी..
लग्न लागलं..सुन्मुख पाहण्याचा दागिना म्हणून सासुबाईंनी एक सुरेखशी ,छोटीशी चांदीची पेटी हातात दिली..
उघडून पाहिली.आत सुरेखशी नथ होती. आईकडे होती तशीच ..मोती,हिरे,माणिक नि पाचुची..
” ही माझ्या सासुबाईंनी मला दिली होती..ती मी तुला देतेय ..मोठ्या सुनेचा मान आहे हा ..तुझ्या सरळ नाकावर ही छान दिसेल ”
आता ही नथ दागिना राहिली नव्हती..
ती जबाबदारी होती ..घरातल्या थोरल्या सुनेची …
आधीच्या किती पिढ्यांची कितीतरी गुपितं,आनंद , दु:खं, जबाबदा-या ती बरोबर घेऊन आली असेल…!!
मी अचानक मोठी झाले..
लेकीच्या बारशाला या नथीनं अजून मोठं केलं..!!
आता यापुढे त्या नथीचा प्रवास कसा असेल माहीत नाही..!!
सुंदर दिसावं ही प्रत्येक स्त्रीची इच्छा..नि त्यासाठीच्या प्रयत्नातलाच नथ हा एक अविष्कार…
फक्त महाराष्ट्रातच नाहीतर भारतात नि परदेशातही आढळणारा…
केवळ हिंदूच नव्हे तर इतर सगळ्याच धर्मात असणारा..
मंगळसुत्राखालोखाल सौभाग्याचं प्रतीक म्हणून हिचा मोठा मान…
तिची रूपं अनेक ..अगदी छोट्याशा चमकीपासून ते मोठ्या पेशवाई नथीपर्यंत..कुणी एका नाकपुडीत तर कुणी दोन्हीतही घालतं..
या अलंकाराचं एक वैशिष्ट्य असं की या अलंकारावर फक्त स्त्रियांचाच अधिकार..
नाकात नथणी घालणारे पुरुष मी तरी अजून पाहिले नाहीत..
महिलांच्या शरीराची डावी बाजू ही प्रजननाचं प्रतिनिधित्त्व करते..
म्हणून डाव्या नाकपुडीत नथ घालायची पद्धत..
यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता वाढते, बाळंतपणाच्या वेदना सोसण्याची शक्ती येते..गर्भाशयाचे आजार होत नाहीत, असं म्हटलं जातं..
खरंखोटं त्या परमेश्वरालाच ठाऊक…
मधल्या काळात नथीचं महत्त्व थोडं कमी झालेलं…
पण आता मात्रं नथीचा सुवर्णकाळच सुरू झालाय..
इतरवेळी जीन्समधे वावरणारी महिला समारंभातमात्रं पैठणी नेसते नि आवर्जून नथ घालते.
नथ आता नाकापुरती मर्यादित न राहता अगदी मंगळसूत्रं,कानातलं,अंगठी
अगदी उंची साडीवरही दिसू लागलीय…!!
असतो एकेकाचा काळ …
कालाय तस्मै नम: !!
नीला महाबळ गोडबोले
सोलापूर