मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

लंच टाईम प्रदीप केळुसकर मोबा. ९४२२३८१२९९

लंच टाईम
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९
विश्वास जाधव बिल्डींगच्या लिफ्टमधून बाहेर पडला आणि शिळ वाजवत पार्विंâगमधील गाडीच्या दिशेने गेला. पार्विंâग लॉटमधून त्याने शिताफिने गाडी बाहेर काढली आणि गल्लीतून बाहेर पडून गाडी मुख्य रस्त्यावर आणली. आता अंधेरीचा स्टुडिओ त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला. आत स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच ग्रँड फिनाले. आज फारसे टेंशन नाही कारण स्पर्धेचा निकाल जवळपास तयार होता. गेले आठ आठवडे स्पर्धा सुरु होती. एकंदर वीस हजार गायकांमधून वीसजण निवडले गेले. आणि या वीसजणांना आपल्या तिघांच्या हातात सोपवले गेले. माधुरी ही हिंदीतील गायिका या चॅनेलच्या प्रत्येक स्पर्धेला असे. ह्या चॅनेलची स्पर्धा आणि माधुरी हे ठरलेलेच होते. तिला फॅन्स पण फार होते. गेले पाच सिझन तिने गाजवले होते. विश्वासला पण तिच्या गाण्याबद्दल आदर होता. पण परिक्षक म्हणून सोबत बसल्यावर त्याच्या लक्षात आले की ती फार गर्विष्ठ आहे आणि या चॅनेलची लाडकी असल्याने जवळ जवळ हुकूमशहा आहे. दुसरा परिक्षक मंगेश हा पॉप म्युझिक मधील लोकप्रिय कलाकार. तो स्वभावाने बरा होता. पण उडत्या चालीची गाणी आणि पाश्चात्य गाणी त्याला जास्त आवडत. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी त्याला आवडत नसत. त्यामुळे अशा गाण्यावर तो टिका करायचा हे विश्वासला आवडत नव्हते. तिसरा विश्वास. हा उदयोन्मुख संगीतकार. त्याचा पाया शास्त्रीय संगीताचा होता आणि गुरु चरणदास यांचेकडे तो शास्त्रीय गाणे शिकला होता आणि त्यांच्या गुरुकूलमध्ये अजूनही शिकत होता. विश्वासचे दोन मराठी आणि दोन हिंदी सिनेमे गाजले होते. आणि हिंदी अल्बम्सनी लोकप्रियता मिळविली होती.
खरं म्हणजे हिंदीतील या प्रसिध्द चॅनेलने विश्वासला परिक्षक म्हणून निवडले तो प्रसंग विश्वासच्या डोळ्यासमोर आला. एका मराठी चॅनेलच्या वार्षिक कार्यक्रमाच्यावेळी विश्वास आमंत्रितांच्या खुर्चीत बसला होता. एवढ्यात एक पंचवीस वर्षाची मुलगी त्याच्या जवळ आली –
‘‘आप विश्वासजी है ना ?’’
‘‘हा, आप कौन ?’’
‘‘मै, रचना एन चॅनल की तरफसे -’’
‘‘क्या है ?’’
‘‘मेरे सुपिरीयर आपसे बात करना चाहते है, जरा बाहर आओगे ?’’
विश्वास बाहेर गेला. ती त्याला पार्विंâग लॉटकडे घेऊन गेली. तिथे एका कारमध्ये तिचा सुपिरीयर बसला होता.
‘‘हाय, हाय मिस्टर विश्वास, मै शशांक प्रâॉम चॅनेल एन, हमारे चॅनेल का पाँचवा सुरसंगम एक महिनेके बाद शुरू होगा हम चाहते है की, आप सुरसंगम प्रोग्रॅमके परिक्षकके रुप में काम करें’’
‘‘लेकिन मेरी कमिटमेंट…..’’
‘‘कोई बात नहीं, ये प्रोग्रॅमकी शुटींग सप्ताहमें एक दिन होगी, सुबह १० से रात १० तक, बाकी के दिन आप प्रâी है,’’
‘‘मुझे सोचना पडेगा’’
‘‘कोई बात नही, हम फिर कल फोन करेंगे’’
रात्रौ विश्वास पत्नी अनिता बरोबर बोलला. तिलापण एवढ्या मोठ्या चॅनेलने स्वतःहून संपर्क ठेवल्याबद्दल आश्चर्य वाटले. पण चांगले पैसे मिळत असतील तर ऑफर स्विकारायला हरकत नाही असे तिने मत व्यक्त केले. दुसर्‍या दिवशी एन चॅनेलवरुन पुन्हा रचनाचा फोन आला. चॅनेलने आठवड्याला दिला लाख रुपये पेमेंट देण्याचा शब्द दिला. एक दिवस शुटींग, प्रत्येक एपिसोडचे कपडे वगैरे सर्व चॅनेल्सचे. विश्वासने विचार केला. प्रत्येक महिन्यात सहा लाख मिळत असतील आणि दोन महिने स्पर्धा चालली तर बारा लाख मिळतील. शिवाय या हिंदी चॅनेलमुळे भारतभर प्रसिध्दी. त्यामुळे हिंदी आणि प्रादेशिक सिनेमा मिळण्याची शक्यता मोठी. कार्यक्रमामुळे घराघरात आपण ओळखलो जातो हा मोठा फायदा. विश्वासला वाटले, राजापूर तालुक्यातील आपल्या गावातसुध्दा प्रत्येक घरी आपण दिसू. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, गाववाले किती खुष होतील हे त्याच्या डोळ्यासमोर आले आणि त्याने ही ऑफर स्वीकारली.
विचार करता करता त्याची गाडी स्टुडिओपाशी आली. त्याची गाडी पाहताच रखवालदार मनोहर धावला. त्याने फाटक उघडून त्याची गाडी आत घेतली. विश्वासने गाडी पार्विंâग लॉटमध्ये लावताच मनोहरने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्याची बॅग बाहेर काढून तो विश्वास बरोबर सेटच्या दिशेने चालू लागला.
‘‘मग विश्वासराव, फायनल किरण मारणार का ?’’
‘‘बघु, अजून दोन परिक्षक आहेत ना?’’
रखवालदार मनोहर हळू आवाजात म्हणाला –
‘‘तसं नव्हं, या आधी प्रत्येकवेळी धक्काच बसलाय, आम्ही अंदाज बांधतो एक आणि जिंकतो दुसराच काही करा विश्वासराव त्या किरणलाच नंबर द्या, केवढा लांबून आलाय ओ, उत्तराखंडवरुन आणि गातो काय एक नंबर. या मुंबईत त्याची लोक फॅन झालीत. गरीब आहे पोरगा. पहिल्यांदा आला तवा त्याच्या अंगावरची कापडं बघवत नव्हती. मी त्याला माझ्या पोराची कापडं आणून दिली. मग चॅनेलची कापडं आली सोडा.
‘‘बर, बघू.’’ अस म्हणून विश्वास सेटवरील आपल्या केबिनकडे गेला. त्याने पाहिले माधुरीच्या केबिनमधून मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता. म्हणजे माधुरी लवकरच सेटवर पोहोचली होती. मंगेशची केबिन बंद होती. म्हणजे तो अजून पोहोचला नव्हता. विश्वासने आपली केबिन उघडली आणि एसी चालू केला. टेबलावरील ग्लासातून पाणी प्याला आणि लॉकर उघडून गेल्या दोन महिन्यातील मार्कलिस्टवर त्याने नजर टाकली. मघाशी रखवालदार मनोहर बोलला ते त्याला पुन्हा आठवले. ‘‘या आधी प्रत्येक स्प्ार्धेत धक्काच बसला’’
धक्का का बसला ? विश्वासच्या मनात आलं, धक्का बसू शकतो, कारण सर्वसामान्य लोकांचे मत आणि परिक्षकांचे मत एक होणे कठिण असते. प्रेक्षक मुळ गायकाचा आवाज हुबेहुब काढला की खुष होतात पण परिक्षकाला सुर, ताल, राग, आलापी सर्वच पहावे लागते. तो विषय झटकून विश्वासने आठ आठवड्यातील मार्कलिस्ट समोर आणली. पहिल्या चार आठवड्यात पंधराजन कट झाले. आणि शेवटच्या महिन्यात राहिले पाचजण. जयंती, अरुण, केदार, तन्मय, निकिता. दोन मुलगे तीन मुली. त्याने स्वतः दिलेल्या मार्क्सचा अंदाज घेतला. केदार निःसंशय पहिला होता. त्याने पाहिले केदार ९० टक्केच्यावर होता. त्यानंतर जयंती, तन्मय, अरुण ही मंडळी पंच्याऐंशीच्या आसपास. आणि निकिता ऐंशीच्या खाली. त्याच्या डोळ्यासमोर केदार आला. केदार पासवान. १४-१५ वर्षाचा, उत्तराखंडमधून आलेला. चेहर्‍यावरुन कळतं होतं तेथल्या आदिवासी भागातून आला असणार. मोडकी तोडकी हिंदी बोलत होता. कदाचित त्याची मातृभाषा वेगळी असेल. पहिल्या वीसात आला तेव्हा खूप घाबरलेला होता आणि सिनीअर परिक्षक माधुरी हिंदी आणि इंग्लिश मधून बोलून त्याला नर्व्हस करत होती. पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा. त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते.
विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे.
‘‘गुड मॉर्निंग जाधव’’
‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’
‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’
‘‘बोला.’’
सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.
‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’
‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’
‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’
‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’
‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’
जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’
‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील.
‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्‍या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’
‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’
‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’
जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला.
‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन.
सरदेसाई एवढ्यात केबिनचे दार ढकलून आत आला. त्याला जाधव काही म्हणणार, एवढ्यात हातातील एक फोटो दाखवत त्याला म्हणाला, जाधव मागच्या वेळी या स्पर्धेत कबिर जडेजा परिक्षक होता. तू ओळखत असशील कबिरला ?’’
‘‘हो तर. आमच्याच गुरुकूलचा तो. मला चार वर्षे सिनीअर’’
‘‘हा, हा त्याचाच मुलगा’’ हातातला फोटो दाखवत सरदेसाई म्हणाला.
‘‘कबिर जडेजा असाच, आपले विचार आणि तत्त्वांवर ठाम, रिझल्ट बदलायला नकार देत होता. पण काय योगायोग त्याच वेळी त्याच्या मुलाचा पाचगणीत अपघात झाला. पाचगणीच्या शाळेतून दोन मिनिटावर असलेल्या हॉस्टेलमध्ये जाताना त्याला गाडीने उडवले. नशीब म्हणून तो वाचला. आता अपंग झालाय. आणि आता व्हिलचेअरवर आलाय. कबिर आता पश्चातावलाय. हातातील दुसरा फोटो दाखवत सरदेसाई जाधवला म्हणाला – ‘‘जाधव, हा तुझा मुलगा पन्हाळ्यात शिकतो काय ?’’ सरदेसाईच्या हातात आपल्या मुलाचा फोटो पाहून जाधव आश्चर्यचकित झाला. एक भितीची लहर त्याच्या कण्यापासून मेंदूपर्यंत सरकली. छातीत धडधडू लागले. आपल्याला हृदयविकाराचा त्रास आहे हे जाधवच्या लक्षात आले. त्याने चटकन बॅगेतून सॉरबीट्रेटची गोळी काढली आणि जिभेखाली ठेवली. त्याच्या केसातून मानेपर्यंत ओघळणारा घाम पाहून सरदेसाई शांतपणे म्हणाला, ‘‘जाधव शांत हो, मघा सॉरबीट्रेटची गोळी जिभेखाली ठेवलीस काय? एवढा मनाला त्रास करुन घेऊ नये बाबा. शांत हो.’’
जाधव सरदेसाईकडे शुन्यपणे पाहत होता, एकीकडे घाम पुसत होता. पुन्हा सरदेसाईने खिश्यातून एक फोटो काढला. जाधव हा तुझा बाबा काय ? रोज बॉम्बे गोवा रोडवर फिरायला जातो. त्याला सांग रस्ता बदल नाहीतर एखाद्या ट्रकची धडक बसेल. विश्वास जाधव घाम पुसत म्हणाला,
‘‘तू मला धमकी देतोस काय? पण तू माझ्याच मागे का लागतोस इतर दोघे परिक्षक आहेत ना? त्यांना सांग.’’
‘‘जाधव, ते दोन्ही परिक्षक चॅनेलला विकले गेले आहेत. माधुरी उगीच नाही पाच सिझनमध्ये काम करते आणि तिला बॉलीवूडमध्ये गाणी मिळतात ती कुणामुळे ? तिच्या गाण्यामुळे ? हुडत. अशा छप्पन्न माधुरी इंडस्ट्रीत आहेत. या चॅनेलमुळे तिला कामं आहेत. आणि तो मंगेश कायम गांजा ओढत असतो. त्याला माहिती आहे. चॅनेलच्या विरोधात गेला तर तुरुंगात जाईल. पण आम्हाला आमच्या प्रायोजकाला तिनही परिक्षकांची मार्कलिस्ट सादर करावी लागतात आणि ज्या स्पर्धकाला तिनही परिक्षक नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क देतात तोच विजेता होतो. आणि समजा त्या दोघांनी नव्वद टक्के दिले आणि तू कमी दिलेस तर प्रायोजकांना वाटते काहीतरी गडबड आहे आणि मग चॅनेलचे पेमेंट स्टॉप होते. म्हणून तुझेपण निकिताला नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क हवे आहेत. नाहीतर चॅनेलचे फार मोठे नुकसान होईल. आणि चॅनेल आपले नुकसान कधीच करुन घेत नाही.
सरदेसाईने घड्यात पाहिले दुपारचा दिड वाजला होता. तो बाहेर गेला आणि सीसीटीव्ही बंद करुन आला. पुन्हा सरदेसाई जाधव समोर येऊन बसला.
‘‘जाधव, मी सीसी कॅमेरे बंद केलेत. कारण माझी अर्ध्यातासाची लंच सुट्टी सुरु झाली. आता हा अर्धा तास मी चॅनेलचा माणूस नाही. खराखुरा सरदेसाई. जाधव, तुला वाटत असेल किती हा सरदेसाई दुष्ट. चॅनेलला हवा तसा रिझल्ट मिळावा म्हणून हनीट्रॅपमध्ये अडकवणारा, कबिरच्या मुलाचे फोटो दाखवून तसे तुझ्या मुलाचे होईल अशी भिती दाखविणारा किंवा तुझ्या वडिलांना सकाळी फिरायला जाताना ट्रक धडक बसेल म्हणून भिती घालणारा. पण जाधव, तू राजापूरचा आणि मी म्हापशाजवळच्या वाळपईचा. तुझ्यासारखाच मी सुध्दा गरीबीतून वर आलेला. पण मी या चॅनेलमध्ये नोकरी करतो आणि मला चॅनेलकडून दरमहिन्याला गलेलठ्ठ पगार मिळतो. सकाळ पासून तुला जो ट्रॅपमध्ये अडकवत होतो तो माझ्या नोकरीचा भाग होता. मघाशी मी तुला हॉटेलमधील तुझे फोटो दाखविले किंवा कबिरच्या व्हिलचेअर वरील मुलाचा फोटो दाखविला हे सर्व तुला दाखविण्यासाठी फक्त १५ मिनिटे आधी माझ्या हातात पडले. याबाबत काय आणि कसे बोलायचे हे पण सांगण्यात आले. जाधव, मला क्षमा कर. आता निकिताला तू पहिला नंबर देणार की केदारला देणार ते तूच ठरव. पण आता सीसीटीव्ही बंद आहेत म्हणून मी हे बोलतोय. हे कॉर्पोरेट सेक्टर फार निर्दयी आहे. इथे दया माया नाही. व्यवसाय वाढवायचा हेच यांना माहित असते आणि त्यासाठी कितीही खाली यायची यांची तयारी असते. मघापासून ज्या धमक्या तुला मिळाल्या त्या सत्यात आणण्याची त्यांची तयारी असते. असो. आता माझी लंच सुट्टी संपत आली. आता पुन्हा मी चॅनेलचा माणूस.’’ अस म्हणून सरदेसाई बाहेर गेला.
विश्वास जाधव विचार करत राहिला. काय करावे ? कोणता निर्णय घ्यावा ? त्याचं एक मन सांगत होतं या चॅनेल विरुध्द उभा रहा. या आधी हे धाडस कुणी दाखवलं नाही तु दाखव. काय होईल….. ? त्याला कबिर जडेजाच्या मुलाचा फोटो आठवला. आपले राजापूरचे गावात फिरणारे आईवडिल आठवले. समाजात मानाने वावरणारी आपली पत्नी अनिता आठवली. उद्या हॉटेलमधील माझे फोटो प्रसिध्द झाले तर अनिता मानाने जगेल काय ? कुणा कुणाला उत्तरे देणार आपण ?
विचार करता करता जाधव ने टेबलावर डोक टेकलं. आपण उगाचच या चॅनेलची जबाबदारी स्विकारली. त्याच्या डोळ्यासमोर केदार पासवानचा चेहरा आला. त्याला आपल्याकडून खूप अपेक्षा असणार पण…. विचार करता करता जाधव चा डोळा लागला दहा मिनिटात केबिनचा दरवाजा उघडून सरदेसाई आत आला. मग जाधव, तुमचा रिझल्ट तयार असेल तर या पाकिटामध्ये बंद करा. रिझल्टशीटवर आणि पाकिटावर तुमची सही करा आणि मुख्य प्रायोजक आलेले आहेत त्यांना तुमच्या हाताने हे पाकिट द्या. बाकी दोन परिक्षकपण आपापली पाकिटे घेऊन येत आहेत. जाधव पटकन उठला बेसीनवर जाऊन तोंड धुतलं आणि रिझल्टशीटवर मार्क लिहून पाकिटात घातले. पाकिट बंद केले आणि तो सरदेसाई बरोबर बाहेर पडला. सरदेसाई आणि जाधव वरच्या मजल्यावरील प्रोग्रॅम हेडच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा माधुरी आणि मंगेश बाहेरच उभे होते. मग सरदेसाई सह तिघेही परिक्षक आत गेले आणि खुर्चीवर बसलेल्या चेन्नई ऑईल आणि स्वरुप मसाले च्या डायरेक्टरांच्या हातात आपापली पाकिटे दिले. त्यांनी तिघांना बसायला सांगितले आणि एनी प्रॉब्लेम? असा प्रश्न विचारला. माधुरी तत्परतेने म्हणाली, नॉट एटऑल सर ! पाठोपाठ मंगेशही नॉट एटऑल सर  म्हणाला. त्यांनी जाधवकडे नजर टाकली. जाधव च्या तोंडातून शब्द बाहेर पडेना. शब्द अडखळू लागले. पण तो थोड्या जड आवाजात म्हणाला, नॉट एटऑल सर!
आता मुख्य स्टेज अंतिम फेरीसाठी सजले आहे. जिकडे तिकडे शोभिवंत कंदिल लागले आहेत. पायाखाली मऊमऊ गालिचा पसरला आहे. परिक्षकांसाठी आणि विशेष पाहुण्यांसाठी खास कोच ठेवले आहेत. संगीत साथ करणार्‍यांसाठी नवीन युनिफॉर्म, सर्व काही झकपक. आज काही विशेष पाहुणे आमंत्रित केले आहेत. इंडस्ट्रीमधील संगीतकार, गायक, वादक, टिव्हीवरील नट, निवेदिका जान्हवी आज विशेष वेशभूषा करुन सजली आहे. तिघेही परिक्षक आपापल्या जागेवर बसले आहेत आणि अंतिम फेरीतले पाच स्पर्धक नवीन फॅशनचे कपडे घालून सज्ज आहेत. निवेदिका जान्हवी सर्वांचे स्वागत करते आहे. आणि एक एक स्पर्धक आपली गाणी गाऊन जातो आहे. टाळ्यांचे कडकडात, विनोदांची आतिषबाजी सुरु आहे. आणि जस जसा वेळ संपायला येतो आहे तस तसा स्पर्धक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या पोटात गोळा येतो आहे.
आपल्या केबिनमध्ये बसून चॅनेल हेड गुप्ता हा टिव्हीवर कार्यक्रम पाहत आहे. त्याने संपूर्ण फिल्डींग लावली आहे. त्याला माहिती होतं अंतिम विजेती निकिताच होणार आणि मग दक्षिण भारतात आपण आपल्या चॅनेलला घरोघरी पोहोचवणार. मग टिआरपी वाढणार आणि आपणाला प्रमोशन. कदाचित चॅनेलच्या सर्व भाषीक आणि हिंदी चॅनेलचे प्रमुखपण. तस झालं तर आपल्याला कदाचित सिंगापूरला जावे लागेल अशी स्वप्न पाहणारा गुप्ता खाली फ्लोवरवर लक्ष ठेवून होता. कार्यक्रम रंगत होता आणि आता परिक्षकांसह स्पर्धक स्टेजवर आले होते. मुख्य प्रायोजक स्टेजवर आले. आणि आता निकिता विजयी होणार हे निश्चित असतानाच प्रायोजकांनी परिक्षकांच्या गुणानुसार विजयी स्पर्धकाचे नाव जाहिर केले – ‘‘केदार पासवान’’
केदारचे नाव जाहिर झाले आणि संपूर्ण स्टेजवर आणि सेटवर आनंद पसरला. आमंत्रित विशेष पाहुणे आनंदित झालेले दिसले. प्रेक्षकांनी केदारला उचलून घेतले. आणि त्याच्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली.
गुप्ता आपल्या केबिनमध्ये धुसमुसत होता. त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिनही परिक्षकांना अडवून ठेवले तरी चॅनेलच्या विरोधात जाण्याचे धाडस त्यांनी कसे केले ? आणि याचा परिणाम काय होणार ? आपली हकालपट्टी की चॅनेल आपल्याला आयुष्यातून उठवणार ? तेवढ्यात त्याला आठवण झाली. सरदेसाईवर सगळी जबाबदारी होती. मग सरदेसाई गेला कुठे ? गुप्ता केबिन बाहेर आला आणि सरदेसाईच्या नावाने आरडाओरडा सुरु केला. चॅनेलमधले सर्व मॅनेजर्स, स्टाफ घाबरुन गेले. काहीजन सरदेसाईला फोन करु लागले. एवढ्यात स्टाफमधील एकजण म्हणाला – ‘‘सरदेसाई दोपहरसे बाहर गया है, उसका फोन नॉटरिचेबल है’’ गुप्ता ओरडला. ‘‘ढुंडो सरदेसाईको’’
यावेळी सरदेसाई अंधेरी पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर समोर बसला होता. इन्स्पेक्टर देसाई चॅनेल एन चे विविध कारनामे पाहत होते. परिक्षकांना अडकविण्यासाठी चॅनेल एन कसे ब्लॅकमेल करते आहे तसेच त्यांच्या खाजगी आयुष्यात, संसारात कशी विघ्ने आणते आहे आणि लहान मुलांच्या स्पर्धेत त्यांना हवा तो स्पर्धक विजेता ठरविण्यासाठी अनेक कलाकारांच्या खाजगी जीवनातील क्लिप्स त्यांनी मिळविले आहेत. इन्स्पेक्टर देसाई हे पुरावे पाहून हैराण झाले. त्यांनी ताबडतोब पोलीस कमिशनरना हे पुरावे पाठविले. कमिशनरने पण चॅनेल एन वर ताबडतोब कारवाई करावी अशी सूचना दिली. देसाईंनी सूरसंगम कार्यक्रम संपेपर्यंत वाट पाहिली. सुरसंगम कार्यक्रम संपला, सर्व मंडळी आपापल्या घरी गेली आणि त्याच वेळी इन्स्पेक्टर देसाई आणि पोलीसांनी चॅनेलचा ताबा घेतला. चॅनेलच्या सर्व स्टाफला आणि खुद्द गुप्ताला काही कळण्याआधी अटक करण्यात आली. सर्व कॅमेरे, हार्डडिस्क, कॅसेट्, पेनड्राईव्ह ताब्यात घेण्यात आले. भारतातील सर्व भाषातील चॅनेल्सनी तातडीने ही बातमी दिली. पत्रकार, संपादक यांनी सरकारची मुस्कटदाबी म्हणून आरडाओरड केली. पण कमिशनरनी चॅनेल एन ने परिक्षकांना केलेल्या ब्लॅकमेलच्या पुराव्यांचा पाढा वाचला. चोरुन घेतलेले अनेक फोटो, व्हिडीओ दाखविले. तेव्हा पत्रकारांचा विरोध कमी झाला.
इकडे दादर स्टेशन जवळील हॉटेल प्रितममध्ये सरदेसाई बसला होता. त्याच्या समोर परिक्षक मंडळी माधुरी, मंगेश आणि जाधव बसले होते. प्रत्येकाच्या समोर भरलेले बिअरचे ग्लास होते. सरदेसाई सांगू लागला.
‘‘या चॅनेलला धडा शिकविण्यासाठी कधीपासून संधी शोधत होतो. मागील प्रत्येक वेळी घाबरट परिक्षक मिळत होते. यावेळी जाधव सारखा धाडसी परिक्षक मिळाला. चॅनेलच्या सुचनेनुसार मी जाधववर अनेक प्रकारे दडपणे आणत होतो. पण माझ्या लक्षात आले की तो डगमगणार नाही. लंच च्या आधी लक्षात आले की, काहीही झाले तरी जाधव केदार पासवानलाच पहिला नंबर देणार. लंच टाईम मध्ये सीसीटीव्ही बंद होते त्याकाळात मी माधुरीला ही गोष्ट सांगितली. आता यापुढे माधुरी सांगेल’’
माधुरी बोलू लागली – ‘‘मला माझ्या दुसर्‍या स्पर्धेच्या वेळेपासून चॅनेलने ट्रॅप करायला सुरुवात केली. एकदा मी माझ्या मित्राबरोबर अहमदाबादला एक रात्र राहिले आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ करुन चॅनेल मला ब्लॅकमेल करु लागले. माझा नवरापण माथेफिरु त्यामुळे चॅनेल सांगेल तस तो ऐकणार त्यामुळे चॅनेलचे ऐकण्याशिवाय माझा इलाज नव्हता. यावेळी पण निकिताला पहिला नंबर देण्याबद्दल चॅनेलची सक्ती होती. एवढ्यात लंच टाईममध्ये सरदेसाई मला म्हणाला, जाधव कोणत्याही परिस्थितीत निकिताला नंबर देणार नाही. तो केदारलाच पहिला नंबर देणार. त्यामुळे मी धाडस करुन केदारलाच नंबर दिला. मंगेश म्हणाला – मी मजा म्हणून रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेतले होते. त्याची कॅसेट चॅनेलकडे आहे. ती कॅसेट पोलीसांकडे देण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे नाईलाजस्तव चॅनेलसमोर मान टेकावी लागत होती. लंच टाईममध्ये सरदेसाई मला येऊन म्हणाला, माधुरी आणि जाधव केदार पासवानलाच पहिला नंबर देणार तेव्हा मी धाडस केले.
सरदेसाई पुढे म्हणाला – तिघांचे रिझल्ट निश्चित झाले तशी पाकिटे प्रायोजकांकडे देऊन मी सेटच्या बाहेर पडलो. माझ्या मोबाईलमध्ये तुम्हा तिघांसाठी दिलेले व्हिडिओ होतेच शिवाय तुम्हाला धमकविण्यासाठी दिलेल्या तुमच्या मुलांचे, नातेवाईकांचे फोटो होते ते सर्व अंधेरी पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर देसाईंना दाखविले आणि तिघा परिक्षकांना आणि मला जीवाची भिती असल्यानेपण कळविले. एवढे सगळे पुरावे मिळाल्यानंतर पोलीसांची धाड पडली आणि त्यांना भरभक्कम पुरावे मिळाले. आता ह्या चॅनेलविरुध्द केस उभी राहिल आणि चॅनेल एनची पुरती बदनामी होईल. याचे सर्व श्रेय त्या मधल्या लंच ब्रेकला. तो अर्ध्या तासाचा लंच ब्रेक मिळाला नसता तर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली काहीच शक्य नव्हते. सरदेसाई जाधवला म्हणाला,
‘‘जाधव, तुझ्यासारखा धाडशी कोकणी माणूस होता म्हणून हे शक्य झाले.’’
त्याच रात्री सरदेसाई चेन्नईला जाणार्‍या विमानात बसला आणि मून चॅनेलला जॉईन होण्यासाठी चेन्नईला रवाना झाला.
प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}