Heart attack Blinded by Technology
मी अंथरुणातून उठलो तर अचानक छातीमध्ये दुखू लागले. मला हार्टचा त्रास आहे का ? या विचारांमधे मी बैठकीच्या खोलीमध्ये गेलो. मी पाहिलं तर माझा पूर्ण परिवार मोबाईल बघण्यामधे व्यस्त होता.
मी माझ्या पत्नीकडे बघून म्हणालो, “माझ्या छातीमध्ये आज रोजच्यापेक्षा थोडं जास्त दुखत आहे, मी जाऊन डॉक्टरांना दाखवून येतो.”
“हो पण सांभाळून जा, गरज पडली तर फोन करा.” मोबाईलमध्ये बघता बघताच बायको म्हणाली. बाकी सर्व मंडळी याबाबतीत तर बेखबरच होती.
मी गाडीची चावी घेऊन पार्किंगमध्ये पोहोचलो. मला खूप घाम येत होता आणि गाडी स्टार्ट होत नव्हती. त्याच वेळी आमच्या घरी काम करणारा, ध्रुव सायकल घेऊन आला. सायकलला कुलूप लावल्यानंतर मला समोर बघून तो म्हणाला, “काय साहेब, गाडी चालू होत नाही का?”
मी म्हणालो, “नाही…!!”
“साहेब, तुमची तब्येत ठीक दिसत नाही. इतका घाम का येतो आहे? साहेब, या परिस्थितीमध्ये गाडीला किक मारू नका, मी किक मारून चालू करून देतो.” ध्रुवने एकच किक मारून गाडी चालू करून दिली. त्याबरोबरच विचारले, ” साहेब, एकटेच जात आहात का?”
मी म्हणालो, “हो.”
तो म्हणाला, “अशा परिस्थितीमध्ये एकटे जाऊ नका. चला, माझ्यामागे बसा.”
मी म्हणालो, “तुला गाडी चालवता येते का ?”
“साहेब, माझ्याकडे मोठ्या गाडीचं देखील लायसेंस आहे, काळजी करू नका आणि मागं बसा. “आम्ही जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ध्रुव पळतच आत गेला आणि व्हीलचेअर घेऊन बाहेर आला, “साहेब, पायी चालू नका, या खुर्चीवर बसा.”
ध्रुवच्या मोबाईलवर सतत रिंग वाजत होती. मी समजून गेलो की, फ्लॅटमधील सगळ्यांचे फोन येत असतील की तो अजूनपर्यंत का नाही आला? शेवटी कंटाळून ध्रुव कोणाला तरी म्हणाला की, “मी आज येऊ शकत नाही.”
ध्रुव, डॉक्टरांबरोबर ज्या प्रकारे चर्चा करत होता त्यावरून त्याला न सांगताच समजलं होतं, की साहेबांना हार्टचा त्रास आहे. लिफ्टमधून तो व्हीलचेअर ICU कडे घेऊन गेला. माझ्या त्रासाबद्दल ऐकल्यानंतर, डॉक्टरांची टीम तयारच होती. सगळ्या टेस्ट ताबडतोब केल्या.
डॉक्टर म्हणाले, “तुम्ही वेळेवर पोहोचलात आणि त्यातून तुम्ही व्हिलचेअरचा उपयोग करून अधिकच समजूतदारपणाचे काम केले आहे. आता कोणाचीही वाट बघणंं हे तुमच्यासाठी हानिकारक आहे, यामुळे वेळ न घालवता आम्हाला हार्टचं ऑपरेशन करून तुमचे ब्लॉकेजेस लवकरच दूर करावे लागतील. या फॉर्मवर तुमच्या नातेवाईकाच्या हस्ताक्षराची गरज आहे.” डॉक्टरांनी ध्रुवकडे बघितलं.
मी म्हणालो, “बेटा, तुला सही करता येते का?”
तो म्हणाला, “साहेब, इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकू नका.”
“बेटा, तुझी काहीही जबाबदारी नाही. तुझ्याबरोबर भले रक्ताचा संबंध नाही, तरीही तू काहीही न सांगता आपली जबाबदारी पूर्ण केलीस. खरंतर, ही माझ्या कुटुंबियांची जबाबदारी होती. एक अजून जबाबदारी पूर्ण कर बेटा. मी खाली हस्ताक्षर करून लिहून देईन, की मला काही झालं, तर ही जबाबदारी माझी आहे. ध्रुवने फक्त माझ्या सांगण्यावरून हस्ताक्षर केलं आहे. कृपा करून आता सही कर… आणि हो, घरी फोन करून सांगून दे.”
त्याचवेळी माझ्या पत्नीचा फोन ध्रुवच्या मोबाईलवर आला. ती काय म्हणत होती ते त्याने शांतपणे ऐकून घेतले .
थोड्या वेळाने ध्रुव म्हणाला, “मॅडम, तुम्हाला माझा पगार कट करायचा असेल, तर कट करा, मला काढून टाकायचं असेल तर काढून टाका, परंतु आत्ता ऑपरेशन सुरु होण्या आधी हाॅस्पिटलमधे पोहचून जा. हो मॅडम, मी साहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहे, की आता वेळ घालवून चालणार नाही.”
मी विचारलं, “बेटा घरून फोन होता का?”
“होय साहेब.”
मी मनात पत्नीविषयी विचार केला… अगं,तू कोणाचा पगार कट करण्याची गोष्ट करत आहेस आणि कोणाला काढून टाकण्याची गोष्ट करत आहेस? अश्रूपूर्ण डोळ्यांनी, मी ध्रुवच्या खांद्यांवर हात ठेवून म्हणालो, “बेटा काळजी करू नकोस. मी ज्या संस्थेमध्ये सेवा देतो, तिथे वृद्ध लोकांना आसरा देतात आणि तिथे तुझ्यासारख्या व्यक्तींची गरज आहे. तुझं काम भांडी धुणे… कपडे धुणे… हे नाही तर तुझं काम समाजसेवा करण्याचे आहे. बेटा, तुला पगारही मिळेल, त्याबद्दल चिंता बिलकुल करू नकोस.”
ऑपरेशननंतर मी शुद्धीवर आलो. माझ्यासमोर माझे सर्व कुटुंबीय मान खाली घालून उभे होते. मी पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले, “ध्रुव कोठे आहे?”
पत्नी म्हणाली, “तो आताच सुट्टी घेऊन गावी गेला. म्हणत होता की त्याच्या वडीलांचे हार्टअटॅकने निधन झाले आहे. पंधरा दिवसानंतर तो परत येईल.” आता मला समजलं, की त्याला माझ्यामध्ये आपले वडील दिसत असावेत. हे देवा! त्याला हिम्मत दे.
संपूर्ण कुटुंबीय हात जोडून, शांतपणे मान खाली घालून माझी माफी मागत होते. मोबाईलच व्यसन एका व्यक्तीला आपल्या हृदयापासून, आपल्या परिवारापासून, आपल्या अस्तित्वापासून किती दूर घेऊन जाते!
डॉक्टरांनी येऊन विचारलं, “सगळ्यात प्रथम मला हे सांगा, ध्रुव तुमचे कोण लागतात?”
मी म्हणालो, “डॉक्टर साहेब, काही नात्यांच्या संबंधाविषयी किंवा त्यांची खोली न मोजणं हे केंव्हाही चांगलं. अशामुळे त्या नात्याचे मोठेपण तसचं राहील, फक्त मी इतकंच म्हणेन की तो माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासाठी देवदूत बनून आला होता.”
पिंटू म्हणाला, “आम्हाला माफ करा बाबा. जे आमचं कर्तव्य होतं, ते ध्रुवने पूर्ण केलं, ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. इथूनं पुढे अशी चूक भविष्यामध्ये कधीही होणार नाही.”
“बेटा, आम्ही सर्वजण आज टेक्नॉलॉजीमध्ये इतके गर्क झालो आहोत, की आपल्या आसपासच्या लोकांचा त्रास देखील आपल्याला जाणवत नाही. एका निर्जीव खेळण्याने जीवंत माणसाला गुलाम बनवून ठेवलं आहे. आता वेळ आली आहे, की त्याचा उपयोग मर्यादित स्वरूपात करावा. नाहीतर… परिवार, समाज आणि राष्ट्रालाच नाही तर संपूर्ण विश्वाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि त्याची किंमत चुकविण्यासाठी तयार रहावे लागेल.”
“स्वतःला सत्याबरोबर जोडा, मग जे असत्य आहे ते आपोआपच गळून पडेल .”
कृपया मोबाईल या राक्षसास आपल्या परिवारापासून लांब ठेवा, कमीतकमी लहान मुलांना तर खूप जपा .🙏🙏