मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

तुळशीबाग – ©श्रेयस पाटील इतिहासाची स्मरणगाथा

🍁🍂 तुळशीबाग 🍂🍁

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सुप्रसिद्ध विश्रामबाग वाड्याच्या समोर असलेलं ठिकाण म्हणजेच ‘तुळशीबाग’! राममंदिरासाठी प्रसिद्ध तसंच सर्वांचंच आणि मुख्यत्वे स्त्रियांचं हे आवडतं ठिकाण. स्वयंपाकाची भांडी असोत की बाकी घरातल्या वस्तु असोत, सौंदर्य प्रसाधने असोत की दागिने असोत किंवा कपडे असोत. पुजा साहित्याचीही अनेक दुकाने, अगदी देवांच्या सुबक मुर्तींपासून पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची दुकानं इथे आहेत.
भरपुर मोठा भाग फिरलो आपण तुळशीबागेत! भुक लागली असेल नं?? चला की मग! इथे मस्त उपहार गृहे सुद्धा आहेत.
‘अहो!! पण तुळशीबाग तुळशीबाग म्हणता आणि साधी एक तुळस नाही दाखवलीत हो तुम्ही! थट्टा करता काय??’

यासाठी थोडे मागे इतिहासात जाऊया!

पेशवाईतील गोष्ट! साताऱ्याजवळ पाडळी नावाचे एक गाव आहे. या गावात आप्पाजी खिरे नावाचे एक गृहस्थ राहत. हे त्या गावचे वतनदार होते. त्यांच्याकडे या गावचं कुलकर्णीपणाची जवाबदारी होती. अप्पाजींना नारायण नावाचा धाकटा मुलगा होता. तो कुटुंबात फार लाडका होता. साधारण १७०० च्या दरम्यानचा याचा जन्म! नारायण हा खुप हट्टी होता. यामुळे त्याच्या भविष्याबद्दल आई-वडिलांना फार चिंता वाटत होती. एकदा आई त्याला यावरुन काहीतरी बोलली म्हणुन हा नऊ दहा वर्षांचा मुलगा ‘आपलं नशीब मी स्वतः घडवुन दाखवीन’ या इर्षेने घरातुन एकटाच चालत चालत निघाला आणि पुण्यात आला. पुण्यात शहरभर हा फिरला आणि दिवस मावळेपर्यंत हा एकदम थकुन गेला होता. मग पुण्यातील आंबिल ओढ्याच्या काठी असलेल्या रामेश्वराच्या मंदिरात तो आला आणि महादेवाचे दर्शन घेऊन तिथेच एका कोपऱ्यात तो निजुन गेला. त्या मंदिरात दररोज सकाळी सुर्योदयाच्या वेळी गोविंदराव खासगीवाले देवदर्शनासाठी येत. त्या दिवशी आल्यावर त्यांनी नारायणाला कोपऱ्यात गाढ झोपलेलं पाहीलं. त्याला त्यांनी उठवलं आणि त्याची आस्थेने चौकशी केली. सगळं प्रकरण कळल्यावर त्यांनी त्याला आश्रय दिला. स्वतःकडे आपल्या शागिर्दांमध्ये नोकरीस ठेवले. त्याला ते लाडाने ‘नारो’ म्हणत आणि पुढं त्यांचं तेच नाव रूढ झालं. ब्राह्मण असल्यामुळे त्याचाकडे खासगीवाल्यांनी आपल्या रोजच्या पुजा अर्चेसाठी तुळशी, बेल, दुर्वा, फुले वगैरे आणण्याचं काम दिलं. आजची जी तुळशीबाग आहे ती त्या काळी पुण्याच्या बाहेर होती. एक एकर भर पसरलेल्या या जागेत त्या काळी खासगीवाल्यांची स्वतःच्या मालकीची तुळशीची बाग होती. विविध फुले वगैरे इथे त्यांनी वाढवली होती आणि तुळस ही तिथे जास्त प्रमाणात होती. म्हणुन त्याच नाव ‘तुळशीबाग’ असे पडले. या बागेतुन तेव्हा नारो तुळस फुले आणायचा. आपल्या कामातील मेहनतीच्या बळावर त्याने खासगीवाल्यांचा विश्वास संपादन केला. कामातील निष्ठा पाहुन पुढे खासगीवाल्यांनी आपल्या लाडक्या नारोला पेशव्यांच्या खासगीतील हिशोब वगैरे करण्यासाठी चाकरीत सामावुन घेतले. पुढे नानासाहेब पेशव्यांनी त्याची कामाची पद्धत, शिस्त, वागणुक आणि चोख हिशोब वगैरे पाहुन त्याला कोठी खात्याच्या कारकून पदावर नेमले. एकदम एवढी मोठी जवाबदारी अंगावर आल्याने त्याला गर्व झाला. एकदा दसऱ्याच्या दिवशी खासगीवाल्यांनी नारोला आपल्या घरी जेवायला बोलावले. पण इतरांसारखे आपल्याला चांदीची ताटे वगैरे न देता साध्या पंगतीत बसवले, यामुळे तो चिडुन उपाशी पोटीच तिथून उठुन निघुन आला. खासगीवाल्यांना हे कळल्यावर त्यांनी लगेच दोन माणसे नारोच्या मागावर पाठवुन त्याला धरुन आणण्यास सांगितलं. त्याला आणल्यावर संतापलेल्या खासगीवाल्यांनी नारोला कडक शब्द सुनावले. त्यामुळे नारोला आपली चुक समजली आणि तो वठणीवर आला. त्याचा गर्व गळुन गेला. नारोने मग खासगीवाल्यांची क्षमा मागितली. खासगीवाल्यांनीही त्याला माफ करुन छत्रपतींच्या दरबारी साताऱ्यास जमाखर्च लिहिण्यासाठी पाठवुन दिले. तिथेही त्याने छत्रपतींची मर्जी संपादन केली. छत्रपतींनी त्याला इंदापुर प्रांताचा मुकादम केले. ‘कामाचे मर्दाने लिहिणारा’ असा नारो आप्पाजींचा लौकीक झाला. १७४७ साली पेशव्यांनी पुन्हा या हुशार माणसाची पुणे दरबारी गरज असल्याचे सांगुन त्याला पुणे दरबारी पाठविण्याची विनंती छत्रपतींना केली. छत्रपतींनी ती विनंती मान्य केली आणि नारो आप्पाजीस पुणे दरबारी पाठविले. पुण्यात आल्यावर नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुणे सुभ्याची दिवाणगिरीची जवाबदारी सोपविली. त्याचसोबत पेशव्यांच्या कोठी खात्याचे कारभारीपद देखील त्यांस दिले. १७४९ साली खासगीवाल्यांच्या तुळशीबागेची व्यवस्था नारो आप्पाजींवर सोपवली. १७५० साली त्यांची काम करण्याची पद्धत, मुत्सद्दीपणा वगैरे गुण पाहुन नारो आप्पाजीस पेशव्यांनी पुण्याचे सरसुभेदार केले. पुढे पुणे शहराचे मुख्य रचनाकार या नात्याने नानासाहेब पेशव्यांचे स्वप्नातील पुणे शहर निर्माण करण्यात नारो आप्पाजींनी खुप मोलाची मदत केली. यामुळे नारो आप्पाजींनी नानासाहेबांचा अजुनच विश्वास संपादन केला. श्रीमंती वाढली. वेळप्रसंगी अनेक गोष्टी त्याग करून आपल्या पेशव्यांसाठी स्वतःच्या तिजोरीतुन ते पैसा पुरवीत. १७५७ साली नानासाहेबांनी नारो अप्पाजींना पालखीची नेमणुक करून दिली.

१७५८ साली पुण्यात एक रामाचे मंदीर असावे असे नारो आप्पाजींच्या मनीं आले. यासाठी त्यांनी खासगीवाल्यांकडून एक एकरभर पसरलेली तुळशीबाग विकत घेतली. सर्व जागा तुळशी वगैरे काढुन मोकळी केली गेली. त्याला तटबंदी बांधली आणि पेशव्यांकडे राम मंदिर बांधण्याची परवानगी मागितली. नानासाहेबांनी ही मागणी मंजुर केली. माघ महिन्यात या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. तुळशीबागेचे मालक झाल्यामुळे त्यांना ‘तुळशीबागवाले’ म्हणुन लोक संबोधु लागले आणि त्यांचे खिरे हे आडनाव लोप पावले.

पानिपताच्या पराजयाने खचुन नानासाहेबांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने हे बांधकाम थांबले. पुर्ण पुणे या दुहेरी दुःखात बुडाले होते. थोरले माधवराव पेशवे झाले आणि काही दिवसांनी स्वतः त्यांनी तुळशीबागवाल्यांना बोलावून राम मंदिराचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याची आज्ञा दिली. १७६३ सालच्या अखेरीस मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आणि विधिपूर्वक समारंभाने मंदिरास उंबरा बसविण्यात आला. मंदिराला १४० फुट उंच शिखर बांधण्यात आले होते. त्याला नारो आप्पाजींनी सोन्याचा कळस बसविला. हे काम पुर्ण झाल्यावर थोरल्या माधवरावांनी तुळशीबागवाल्यांना वढू हे गाव इनाम दिले. मंदिराच्या रोजच्या खर्चासाठी सरखेल आंग्रे यांनी कुलाबा गाव इनाम दिला. १७६५ साली उमाजीबुवा पंढरपुरकर यांच्याकडुन रामरायाची सुंदर मुर्ती घडविण्यात आली आणि तिची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली. यानंतर राम मंदिराच्या आजुबाजुला अनेक छोटी मंदिरे बांधुन त्यात गणपती, विष्णु, त्र्यंबकेश्वर महादेव, विठ्ठल रखुमाई इत्यादी देवतांची स्थापना केली. रामापुढे दासमारूतीची स्थापना केली. या सर्व मुर्ती घडविण्यास ३५० – ४०० रुपये खर्च आला. मंदिराला एक मुख्य दरवाजा बांधण्यात आला. याचे संगीत दरवाजा असे नामकरण करण्यात आले. पहिल्या रामनवमी उत्सवास २००० रुपये खर्च आला.

१७६३ साली निजामाने पुणे उध्वस्त करु नये म्हणुन तुळशीबागवाल्यांनी निजामाला दीड लाख रुपये खंडणी देऊ केली. पण तरीही सूडाची भावना मनी घेऊन निजामाने पुणे पुर्ण जाळले. हि घटना स्वारीवर असलेल्या थो. माधवराव पेशव्यांना समजताच त्यांनी निजामाच्या राजधानीत घुसुन निजामाची पळता भुई थोडी केली. पुण्यात परतल्यावर पेशव्यांना पुण्याची अवस्था पहावली नाही. त्यांनी लगेच तुळशीबागवाले यांना ‘मुख्य नगर रचनाकार’ हे पद देऊन शहराच्या अवस्थेस सुधरवण्याची आज्ञा दिली. तुळशीबागवाल्यांनी काही वर्षातच अत्यंत खुबीने होते त्याही पेक्षा सुंदर रितीने पुणे शहर वसविले. थोरल्या माधवराव पेशव्यांवर त्यांचा विशेष जीव होता. त्यांचे थेऊर मुक्कामी निधन झाल्याने तुळशीबागवाले खुप खचून गेले होते. तशाच अवस्थेत ते खंबीर राहुन आपली सुभेदारी सांभाळीत. नारायणरावांच्या वधानंतरही पुण्याची तात्काळ नाकाबंदी करून गारद्यांपासून पुणे वाचविले. शनिवारवाड्यावर खडे पहारे ठेवले. श्रीमंत नारायणरावांच्या पत्नी गंगाबाईसाहेब यांना पुरंदर किल्ल्यावर सुखरूप हलवले. गंगाबाईंच्या नावे पेशवाईचा कारभार सुरु झाल्यावर त्यांच्या नावाची द्वाही पुर्ण पुण्यात तुळशीबागवाल्यांनी फिरवली. मार्च १७७५ साली वयाच्या ७५व्या वर्षी नारो आप्पाजी खिरे उर्फ़ तुळशीबागवाले यांचे पुण्यात देहावसान झाले.

तुळशीबागवाल्यांच्या मृत्युनंतरही तब्बल २० वर्षे राम मंदिराचे बांधकाम चालले. खरड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांनी संगीत दरवाज्यावर नगारखाना बांधला आणि तिथे वर्षासने लाऊन नित्य सनई चौघडा झडू लागला. शनिवार तिसऱ्या प्रहरी थोरल्या बाजीराव पेशव्यांना पुणे इनाम मिळाले. याची आठवण म्हणुन दर शनिवारी दुपारी ३ वाजता साधारण अर्धा तास चौघडा वाजवण्याची प्रथा सवाई माधवरावांनी सुरु केली जी आजतागायत सुरु आहे. मंदिराच्या दक्षिणेला आणि पश्चिमेलाही प्रवेशद्वार पेशव्यांनी बांधुन घेतले. १७८९ मध्ये मंदिरातील देवांच्या दागदागिन्यांची चोरी झाली. तेव्हा सवाई माधवरावांनी दोन हजार चौदा रुपये बारा अणे इतक्या किमतीचे दागिने रामरायास अर्पण केले. मंदिराचा नित्य चौघडा १८९५ मध्ये सुरु झाला. एकुण ३५ वर्ष राम मंदिराचे बांधकाम चालु राहिले, ज्याला त्याकाळी १ लाख ३६ हजार ६६७ रुपये खर्च आला. श्रीमंत सवाई माधवराव इथे नेहमी दर्शनास येत. त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर फार प्रसिद्ध झाले. एका पोवाड्यात वर्णन आहे,

श्रीरामाच्या मुर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या।
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या।।

अशी मंदिराची ख्याती होती. ह्या मंदिरात कीर्तन, प्रवचनकारांचा, पुराणिक, कथाकारांचा राबता असे. असे सांगितले जाते की, या मंदिरात जो कीर्तनकार, प्रवचनकार श्रोत्यांची वाहवा मिळावी तो सगळीकडेच श्रेष्ठ समजला जाई.

आता मंदिराच्या आजुबाजुला भरपुर दुकाने झाली आहेत. दर एकादशीला एखाद्या जत्रेसारखी तुळशीबागेबाहेर म्हणजेच या राम मंदिराबाहेर दुकाने बसत. तीच कालांतराने तिथे पन्नास साठ वर्षांपुर्वीपासून नित्य वसु लागली आणि आता या दुकानांनी प्रसिद्ध बाजारपेठेचे स्वरूप घेतले आहे. अगदी सगळीकडून पुण्यात कुणी आलं की तो तुळशीबागेत येतोच येतो. खरेदीसाठी!! पण इथुन पुढे आठवणीने खरेदी करण्या आधी या रामरायाच्या दर्शनासाठी नक्की जात जा.

पुण्याचे आद्य नगररचनाकार नारो आप्पाजी खिरे अर्थात तुळशीबागवाल्यांची ही तुळशीबाग! त्यांच्या कार्याची, प्रसंगी केलेल्या कष्टांची, त्यागाची आणि पेशव्यांप्रती, आपल्या राज्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेची जाणीव आपल्याला करुन देते. या थोर मुत्सद्याचे वर्णन एका श्लोकात खुबीने केले आहे….

जयाने स्वशौर्ये पुणें रक्षियेलें।
जयें पुण्यनगरी सह भूषविलें।
तशी मंदिरीं स्थापिलीं राममुर्ती।
अशी पंत नारो खिरे ख्यात किर्ती।।

– ©श्रेयस पाटील
इतिहासाची स्मरणगाथा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}