महाशिवरात्र.
महाशिवरात्र..
विजापूरहून बहलोलखान पुन्हा स्वराज्याच्या रोखाने येत होता. त्याच बहलोलखानला छत्रपती शिवरायांचे तिसरे सेनापती कुडतोजी जाधव उर्फ प्रतापरावांनी दया दाखवून सोडून दिले होते, ज्यावर राजे संतापले आणि त्यांनी रावांना पत्र पाठविले …..”हा बहलोलखान घडोघडी येतो. तुम्ही लष्कर घेऊन जाऊन, बहलोलखान येतो, याची गाठ घालून, बुडवून फत्ते करणे. नाहीतर पुन्हा आम्हांस तोंड न दाखविणे…”
//ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे..//
केवढी भयंकर शिक्षा!!!
डोळ्यात तेल घालून प्रतापराव, खानाच्या पाळतीवर होते. आणि तो दिवस उजाडला. छावणीपासून दूर अंतरावर असताना हेरांनी बातमी आणली की, बहलोलखान मोठी फौज घेऊन नेसरीच्या रोखाने येत आहे. ते ऐकल्याबरोबर दारूगोळ्याच्या कोठारावर ठिणगी पडल्यागत राव भडकले. बेभान झाले आणि देहभान विसरून नेसरीच्या दिशेने घोडा उधळला – ‘हर हर महादेव!’ ते पाहून, बरोबरच्या विठ्ठल पिलदेव अत्रे, आनंदराव मकाजी, कृष्णाजी भास्कर, विसाजी बल्लाळ, विठोजी शिंदे आणि दीपाजी राउतराव या सहाही शिलेदारांनी पाठोपाठ आपले घोडे दौडवले.. हर हर महादेव!!
बेफाम !! बेभान !! कमानीतून सुटलेल्या तीरासारखे…
//वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे..//
खान नेसरीची खिंड ओलांडत असतानांच हे सात बहाद्दर त्याच्या फौजेवर चालून गेले, तलवारी भाले परजत सात वीर घुसले. जो समोर आला तो कापलाच… पराक्रमाची शर्थच..
//आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे..//
पण इतक्या मोठ्या सैन्यासमोर एक एक करत सातही वीरांना वीरगती मिळाली..
//खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात…//
प्रतापरावांची स्वामीनिष्ठा, त्यांचा पराक्रम आणि आवेश या सगळ्याचे यथार्थ वर्णन एकाच काव्यात कुसुमाग्रजांनी करून, ह्रदयनाथजी यांनी संगीत देऊन आणि लताजींनी ते गाऊन अजरामर केले! माघ वद्य चतुर्दशी शके 1595 अर्थात 1674च्या त्या महाशिवरात्रीच्या दिवशी, आज पासून 350 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या रुद्राला या सात वीरांनी रुधीराभिषेक केला होता, ते आपले हिंदवी स्वराज्य टिकविण्यासाठी! आज महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला बेलाची पाने आणि दूध जरूर अर्पण करा, पण हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या महाराजांनी आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा विसर कधीच पडू देऊ नका..
हर हर महादेव 🙏🏼🚩