आह ! केदारनाथ….हेमचंद्र साने
आह ! केदारनाथ
18 मे 27 मे दरम्यानची किन्नौर स्पिती (अप्पर हिमाचल प्रदेश) ची सहल यथाशक्ती संपन्न करून 27 मे ला मी चंदिगड येथे परत आलो. मनात काही दिवस विचार होता की चारधामचा लेटेस्ट सर्व्हे करावा म्हणून. चंदिगड ते मुंबई माझे स्वतःचे परतीचे तिकीट रद्द करून मी एक छोटीशी गाडी बुक केली दहा दिवसांसाठी 28 मे ते 6 जून. कसलेही प्लानिंग नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, तयारी नाही. मनाची तयारी कधीच झाली होती. निघालो सरळ.
29 मे ला हरिद्वारवरून निघालो व 2 जूनच्या रात्री केदारनाथजींच्या पायथ्याशी रामपूर येथे आलो. गेल्या पाच दिवसात यमुनोत्रीची पाच किलोमीटरची खडी चढण चढलो व उतरलो, कडाक्याच्या थंडीतल्या पावसात चिंब भिजलो, घाटांमध्ये तासनतास अडकून पडलो, गंगोत्रीचे दर्शन केले, खळखळ नद्या, हिमाच्छादित शिखरे, शुभ्रधवल निर्झर, अधून मधून येणारे संगम वा प्रयाग, दाट धुक्यातली बोचरी थंडी, महाप्रचंड घनघोर पहाड, त्यातून खोदून काढलेले अरुंद नागमोडी खडकाळ रस्ते – याची डोळा अनुभवले. आडवाटेवरच्या होटल्समध्ये रात्री काढल्या, मिळेल ते स्थानिक जेवण खाल्ले. मजा आली होती. उद्या 3 जून. श्री केदारनाथांची गौरीकुंडपासून 22 किलोमीटरची खडी चढण चढायची होती. मनात धाकधूक व अनामिक भीती होती. यावेळी श्री केदारनाथांचे दर्शन होईल की नाही, का मार्गातच कुठेतरी देह ठेवावा लागेल. मध्यरात्रीचे तापमान ऊणे सहा झाले होते. धाकधूक अजूनही वाढली.
3 जूनला उशीरा जाग आली. आवरून सकाळी आठला निघालो. फाटा केदारनाथ मार्गावर प्रचंड ट्राफिक जाम लागला होता. नेहमीप्रमाणे. चालत चालत सोनप्रयागपर्यंत आलो.
ते इवलेसे पिटुकले गाव पाहत पुढे मंदाकिनी नदीवरचा पूल पार करून आलो. सोनप्रयाग ते गौरीकुंड हा पाच किलोमीटरचा डांबरी रस्ता आहे. चढणीचा व अत्यंत अरुंद. तिथे इतर कोणाच्याही गाड्या जाऊ देत नाहीत, फक्त स्थानिकांच्या बोलेरो गाड्याच जातात. भाविकांची प्रचंड तुंबळ गर्दी. एक बोलेरो आली की त्यावर शेकडो भाविक धावून जायचे. एका रांगेत शिस्तीने उभे राहावे ही आपली मानसिकताच नाही. त्यावर प्रशासनाचाही पत्ता नाही. दुष्काळी भागात हेलिकॉप्टरने अन्नाची पाकीटे टाकावीत, मग जशी झुंबड उडते, तसा तो रागरंग बघून सोनप्रयागवरून गौरीकुंडपर्यंत पाच किमी चालत चढत जाण्याचे ठरवले. तोवर सकाळचे दहा वाजत आले होते व थंडीतही उन्हाची तिरीप जाणवत होती.
पाठीवरची बॅग ठीक केली. बॅगेमध्ये जास्ती काही गोष्टी नव्हत्याच. Pant shirt वाला रेनकोट, सबझिरो तापमानाचे सियाचेनवाले जॅकेट, extra floaters, जाडशी सोलापुरी चादर, एक पातळ पांढरी चादर, दोन-चार आतले बाहेरचे कपडे, पंचा, मोजे हातमोजे, कानटोपी, पाण्याची अर्धा लिटरची बाटली व परचुटण इतर काही toiletries. पाच सहा किलो असेल फक्त. बास.
इथे तिथे बोलेरोमागे धावणाऱ्या भाविकांकडे प्रेमळपणे बघितले. लॉकडाऊननंतर धार्मिकता भारीच वाढीला लागली आहे, हे तर मला कधीच समजले होते. Smart Tour Operators त्या बोलेरोवाल्यांना जास्त पैसे देऊन सोनप्रयागमध्येच बोलवतात, त्यामुळे चेंगराचेंगरी होत नाही. मनोमन ‘हर हर महादेव’ करून सोनप्रयागवरून गौरीकुंड चढायला सुरुवात केली. तो पाच किलोमीटरचा चढणीचा रस्ता पार करायलाच दीड तास लागले. मध्येच जोराची पावसाची सर आली. जॅकेट व रेनकोटचे सव्यापसव्य केले, जे पुढच्या दोन दिवसात येजा करताना बरेचदा करावे लागले. थोडासा घामही फुटला होता. गौरीकुंडला पोहोचलो. तिथल्या मंदिराचे दर्शन घेतले व मार्गक्रमणा नेटाने पुढे चालू ठेवली.
गौरीकुंड गावामध्ये अगदी चिंचोळा रस्ता आहे, अंदाजे तीनशे मीटरचा चढणीचा व चार फुट रुंदीचा. तिकडे येजा करणाऱ्या यात्रींची भारीच गर्दी होती. श्री बाजीप्रभूंच्या पावनखिंडीची आठवण आली. पाऊण तास धक्के खात ढकलल्यागत चढत गेलो आणि शेकडो घोडेवाले उभे असलेले दिसले.
गौरीकुंड ते केदारनाथ हा 16 किलोमीटरचा चढणीचा रस्ता (केदारनाथ प्रलयानंतर हा नवीन रस्ता बांधण्यात आला आहे) जे चालत जातात, त्यांना या घोडेवाल्यांचा आधारही वाटतो व बरेचदा तापही होतो. उभ्या डोंगराला कापून अंदाजे 15 ते 20 फुटांचा रस्ता आहे. यावर हे घोडेवाले मस्तवालपणे आपले घोडे पळवतात. चालणाऱ्या भाविकांना या घोड्यांचे बरेचदा धक्के लागतात व ‘बा’चा’बा’ची अशी सिच्युएशन पैदा होते. पीक सीजन असतो तेव्हा थकलेले, वृद्ध, लंगडे घोडेही आणले जातात, व त्यांना निर्दयीपणे मारून मारून चढवले जाते. पाणी पिण्यासाठीही त्यांना थांबवले जात नाही. मग हे घोडे, चढताना व उतरताना बरेचदा तोंडावर आपटतात, त्याबरोबर वरचा यात्रीही पडतो. माझ्या डोळ्यांसमोरच अशा चार पाच घटना घडल्या. पिठ्ठू व डोली हे जास्त चांगले ऑप्शन्स आहेत, पण बरेचसे महाग आहेत. फाटा व सेरसा येथून हेलिकॉप्टर सेवा आहे पण ती हवामानावर निर्भर असते. या क्षेत्रामध्ये “जो चालतो तोच चालतो”.
जागोजाग खाण्यासाठीच्या टपऱ्या आहेत, पण फ्रीवाली अन्नक्षेत्रे वा लंगर नाहीतच. तिथे जास्त काही व्हरायटी मिळत नाही. चहा, मॅगी व आलू पराठा ह्याच तीन गोष्टी मिळतात. उत्तम हेच कि आपल्या बॅगमध्ये काही फळे, ड्रायफूट्स, ठेपले, खाकरे घेऊन चढावे. शिलाजीत वा केसर विकणाऱ्यांच्या जवळपासही थांबू नये.
सोनप्रयाग हे समुद्रसपाटीपासून 6035 feet उंचीवर. श्री केदारनाथजी महादेवांचे मंदिर समुद्रसपाटीपासून 11830 feet उंचीवर. पुढे पुढे हवा विरळ होत जाते. कधी ऊन, कधी पाऊस, कधी हिमवर्षाव, कधी सब झिरो थंडी, तुफानी वादळासारखा वारा, ही या मार्गावरील परिस्थिती. चढणाऱ्यांसाठी हेच एक मोठे आव्हान असते.
वो यात्रा ही कैसी
जिसमे कठिनाई ना हो
हट्टाने चढतच राहिलो. माझ्यासारखे शेकडो हजारो भाविक डोंगर चढत होते. त्यांचाच मला आधार वाटला. श्री केदारनाथजींच्या दर्शनाची उर्मी हृदयामध्ये होतीच. आळस झटकून, माझ्यातील डोंगरी अहंकारासह चढत राहिलो आणि चढतच राहिलो.
मार्गामध्ये काही ठिकाणी mountain glaciers येतात, तिथे दुतर्फा बर्फाच्या भिंतीच असतात. रामबाडासारखी काही छोटी छोटी गावे येतात, पण ती चढणाऱ्यांच्या नजरेत येत नाहीत. वारा, पाऊस, साबुदाण्यासम हिमवर्षाव जूनच्या पहिल्या आठवड्यातही होत होता. एका घोड्याच्या पाठीवर तीन चार गॅस सिलिंडर्स होती, त्याचाही जबर धक्का माझ्या पाठीला लागला होता. सगळं मनाआड करून चढत राहिलो. या क्षेत्रामध्ये सकाळी चार वाजता उजाडते व संध्याकाळी सात वाजता मावळते. अंधार पसरून आला होता व चढण काही संपत नव्हती. माझ्या पोटात काही ग्लुकोज बिस्किटे व एक मॅगी, याशिवाय काहीच नव्हते. जागोजाग इतका चिखल व राडेराड, त्यामुळे नंतर नंतर मी अनवाणीच चालायला लागलो होतो. खूपच अंधारून आले होते. रात्रीचे साडेआठ वाजले होते. थंडीचा कडाका भारी वाढत होता. पुढची वाट टपरीवाल्यांच्या दिव्यांमुळे उजळलेली दिसत होती. अंग थरथरायला लागले होते.
एका टपरीवर थांबलो. गरमगरम ग्रेव्ही बटाटा व आठ फुलके हाणले. व नंतर हात धुतले. आणि मी एकदम हिवतापाच्या रुग्णासारखा थडथडायला लागलो. टपरीवाल्याने माझ्याकडे squarely पाहिले व म्हणाला ‘सरजी आज रात को टेंट मे ही रुक जाईये’. श्री केदारनाथ जींचे मंदिर अजूनही पाच किलोमीटर दूर होते. रागरंग पाहून रात्री तिथेच झोपण्याचा निर्णय घेतला. एका छोट्या टेंटमध्ये घुसलो. सर्वात प्रथम अंगावरील सर्व ओले कपडे उतरवून नवे सुके घातले. पोतडीमधील सोलापुरी चादर काढून अंगावर ओढून घेतली. टेन्टमध्ये ही रजया होत्या, त्या सुद्धा त्यावर ओढल्या. बऱ्यापैकी गर्मी आली. तापमान चेक केले. उणे दोन सांगत होते. माझ्या टेंट पासून पंधरा फुटांवर मंदाकिनी नदी खळखळ वाहत होती. उणे तापमानातही नदी कशी वाहते याचेच आश्चर्य माझ्या मनात होते. ती मंदाकिनी माऊली आश्वासकपणे अथक वाहतच होती. कधी गाढ झोप लागली कळलेच नाही.
पहाटे साडेतीन वाजता मोबाईलमधला अलार्म वाजला. खडबडून जागा झालो. टेन्टबाहेर आलो. अंधारच होता. अंगात बराचसा थकवा होताच. मंदाकिनी माऊली खळखळ शुभ्र वाहतच होती. काही पावले खाली दगडांमध्ये गेलो. बेसिक प्रातर्विधी उरकून आलो. घाबरट सरपटणारे जीव पायाखाली येऊ नयेत याची काळजी घेत परत आलो. वातावरण व पाणी भयंकर थंड होते. आंघोळ व व दाढीला चाट मारावीच लागली. टेन्टबाहेरच एका दगडावर बसून राहिलो. मोबाईलवर चेक केले, मध्यरात्री दोन वाजता उणे सहा तापमान होते. अधून मधून आकाशाकडे बघत होतो.
झुंजूमुंजू व्हायला लागले होते. आणखी काही मिनिटे गेली. तुटलेल्या माळेमधून सोनेरी मोती घरंगळावेत, तशी सूर्यकिरणे आसमंतात पसरत होती. उजाडत होते. आणखी काही मिनिटे गेली. घोडेवाल्यांची वर्दळ व त्या घोड्यांच्या गळ्यातील घंटांची किणकिण वाढत होती. टपऱ्यांमध्ये माणसे जागी होत होती. बरेचसे भाविकही काठ्या घेऊन निष्ठेने व नेटाने चढत होते. माणसांचा दिवस सुरू झाला होता.
श्री केदारनाथजींच्या दर्शनाच्या उर्मीने बॅग पाठीला मारली व भक्तीने चढायला सुरुवात केली. डोंगरांमध्ये चढताना नेहमी पोट रिकामे ठेवावे. बरेच वेळा अंडरवेअर भिजते, सुकते, भिजते व सुकते. चढताना त्यामुळे बरेचदा जांघांमध्ये जखमा होतात. अंडरवेअर घालूच नये किंवा भरपूर खोबरेल तेल जवळ ठेवावे हेच उत्तम.
मंदिर अजून पाच किलोमीटर दूर होते. चढणीचा रस्ता फार होता. भरभर चालायला सुरुवात केली. तासभर गेला. रंगमंचावर पडदा उघडल्यानंतर नटसम्राट जसा दमदार पावले टाकत पुढे येतो, तसे सूर्यराज, ढगांच्या पडद्यातून हसत हसत दाखल होत होते. कोवळे ऊन पडायला सुरुवात झाली होती. सकाळचे सहा वाजले व नॉन स्टॉप हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाली होती.
चढतच राहिलो. उतरणारे काही भाविक भेटत होते. श्री केदारनाथजींच्या दर्शनामुळे त्या भाविकांचे चेहरे भारीच तृप्त, उजळलेले व हसरे होते. त्यांच्याशी मोजके बोलून पुढे होत राहीलो.
दुतर्फा शेकडो शेकडो टेन्ट्स होते. त्याची नोंद घेऊन पुढे चालत राहिलो. श्री केदारनाथ धामची कमान आली. बडासू – सोनप्रयाग – गौरीकुंड – श्री केदारनाथ मंदिर हा ३३किलोमिटरचा शिवमार्ग मी चढून आलो होतो. (श्री केदारनाथजींच्या दर्शनानंतर एवढेच अंतर मी आंतरिक समाधानाने, हसत खेळत उतरत पार केले होते. मला बडासूला पोहोचेपर्यंतच रात्रीचे आठ वाजले होते. असो.) सकाळचे साडेसात वाजले होते. गर्दी होती थोडीफार. शेकडो घोडे उजव्या बाजूला दैनंदिन निर्विकारप्रमाणे खडे थांबले होते. हेलिपॅड डाव्या बाजूला होते, तिथे थोडावेळ थांबून काही फोटो व व्हिडिओज घेतले. दोन रांगा होत्या, तिथे मी नंतर आलो, पण त्याआधी प्रचंड ऊर्जेने भरभर चालत राहिलो. मंदाकिनी नदीवर एक मोठा पूल आहे, त्यावर काही भाविक रांगेमध्ये घुसाघुशी करत होते व भांडणे गलका चालू होता. सगळीकडे दुर्लक्ष करून, ओढीने भरभर भरभर चालत राहिलो. केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याचशा धर्मशाळा आहेत. कुशल आट्यापाट्यापटू सारखा गर्दीला चुकवत, एका छोट्याशा गल्लीमधून श्री केदारनाथजींच्या मंदिरासमोरच आलो.
श्री केदारनाथजींच्या मंदिराजवळ प्रचंड प्रचंड प्रचंड ऊर्जा आहे. सगळा थकवा पळून गेला होता. मंदिरापासून मी फक्त पंचवीस पावले उभा होतो. मम तपाला शेवटी फळ आले होते. पाठीवरची बॅग उतरवली, ती घरंगळत माझ्या पायाशी पडली. त्याबरोबर घरंगळला होता माझ्या बालिश मनीचा डोंगरी अहंकार. ताठ उभा राहिलो. डोळे भरून मंदिराकडे पाहिले. लहान बाळासारखी मी माझी थरथरती उजवी तर्जनी उंचावून त्या साक्षात उग्र महादेवाकडे पाहिले. डोळ्यातून घळाघळा अश्रू व माझ्या घोगऱ्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले. आह केदारनाथ 🙏🙏🙏🙏🌹♥️
हेमचंद्र साने
भाग १