न्यायाचा बळी श्रध्दा जहागिरदार
न्यायाचा बळी
कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. पण एखाद्याच्या आयुष्यात खरच ती चढायची वेळ आली तर त्या पायर्या चढत चढत त्या झिजतात, त्याचं अर्ध आयुष्य त्या कोर्टाचे खेटे घालण्यात जाते. मनस्ताप वेगळाच, पैसा पै पैसा खर्च होतो ते वेगळेच. म्हणूनच म्हणतात कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कोणावर येऊ नये.
सकाळी फोनची रिंग वाजली मिस्टरांनी फोन उचलला. तिकडून काका (मी येथे कोणाच्याही नावाचा किंवा, गावाचा उल्लेख करत नाही) चा आवाज आला. सर आज कोर्टाचा निकाल लागला, माझी निरपराध सुटका झाली. माझ्या मिस्टरांनी मला तेवढ्याच उत्सुकतेने ही बातमी सांगीतली.
माझ्या डोळ्यापुढे काकांचा अख्खा न्यायीक प्रवास आला. व ‘न्यायाचा बळी ‘ हे वाक्य मी उच्चारले.
काका बॅंकेत ब्रॅंच मॅनेजर होते. त्यांच्या शाखेतील पिग्मी एजंट व्यापारांकडून रोज पैसे घेऊन त्या व्यापारांच्या खात्यात जमा करत असे. व लेजर वर मॅनेजर ची सही घ्यायची. बरेच वर्षापासून हे काम चालू होते. पिग्मी एजंट हा साधा, गरिब, सरळ, मनकवडा असा माणुस. तो काही घोटाळा करेल हे कोणाच्याही मनात आले नाही. (थोडक्यात त्याने पण विश्वास संपादन केला) मॅनेजर, बॉस यांचे कागदपत्रांवर सही करणे, ते थोडक्यात तपासणे (कारण खालील कर्मचार् यांकडून ते पुर्णपणे तपासुन अभ्यास करूनच आलेले असतात.) त्यामुळे मॅनेजर हा थोडेफार तपासून त्यावर सही करत असतो. प्रत्येक ओळ न ओळ वाचून त्यांनी येथे सही करायला पाहिजे असे नाही. तेवढा वेळ पण नसतो. कारण विश्वास हे माध्यम पण येथे येते. आपल्या स्टाफ वर बॉस चा विश्वास असतो. त्याच विश्वासाचा फायदा त्या पाग्मी एजंट ने घेतला.
बॅंकेत कामाला स्टाफ कमी होता, तो एजंट व्यापारांकडून समजा 1000 रु. घेतले तर entry 100रु ची करायची. व लेजर वर मॅनेजर ची सही घ्यायची मधले 800 रु. खिशात. बरं ही सही रोज घेणे नाही 700,800 ची रक्कम दाखवायची व सही घ्यायची. हे असे कित्येक दिवस चालले होते. ही गोष्ट ना कॅशियर च्या लक्षात आली ना बॅंक मॅनेजर च्या (काकांच्या).
पण एके दिवशी Balance tally होत नव्हते तेव्हा काकांनी सखोल चौकशी करायला सुरवात केली. त्यावेळी हा घोटाळा त्यांच्या लक्षात आला. काकांच्या पायाखालची जमीन सरकली. ते चक्कर येऊन तेथेच पडले. फ्रॉड हा साधारण 5लाख-वर काही रक्कम एवढा होता. आता तो अकडा कमी वाटतो पण ही घटना साधारण 2010 मध्ये घडली. त्याकाळी त्याची किंमत भरपूर होती, त्या पेक्षा मला येथे हे सांगायचे आहे की माणूस न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत कसा फरफट ला जातो. व त्यात त्याच्या आयुष्याची वाट लागते.
नंतर ही गोष्ट काकांनी main Branch ला कळवली. आणि येथून त्यांच्या आयुष्याची वाताहात सुरू झाली. वाईट गोष्ट अशी की हा फ्रॉड खरे तर काकांच्या लक्षात आला पण कोर्टाने व बॅंकेने काकांना च साक्षीदार करायचे सोडून त्यांनाच आरोपी केले. त्यामुळे सगळा ठपका त्यांच्यावर. बॅंकेचे चेअरमन हे आमदार (राजकारणी) लोकांचा पण समावेश होता. ह्या आमदार लोकांचे ‘काका ‘ म्हणजे उजवा हात. त्या आमदार लोकांची वयक्तिक, बॅंकेतील कोणतीही कामे असली की काका पुढे. त्यामुळे काकांना त्या आमदार लोकांवर पुर्ण विश्वास होता की हे लोक मला मदत करतील. माझी खरी बाजू कोर्टापुढे मांडतील. पण येथे आपल्या समाजाची (जातीची) शोकांतिका. काका अर्थातच ‘ब्राह्मण’ सहाजिकच ‘ब्राह्मण’ भरडला जातोय ना, तो फसतोय ना फसू द्या. कोणी ही त्यांना मदत केली नाही. एवढेच नव्हे तर कॅशियर, 1-2 क्लार्क हे पण ब्राह्मण होते, कोर्टाने त्यांना पण आरोपी केले. पण ह्या पूर्ण न्यायीक प्रवासात या एकाही ब्राह्मणाने एकमेकाला मदत केली नाही. प्रत्येकाने फक्त स्वत:चा स्वार्थ पाहिला. मी येथे मुद्दाम ह्या गोष्टी चा उल्लेख करत आहे. कारण आपला समाज अजून ही आपल्याच लोकांना ‘एकमेका साह्य करू ‘ ह्या बाबतीत मागे आहे. हां ‘एकमेका खाली खेचू’ ह्या बाबतीत मात्र पुढे आहे. मला हे लिहायला पण वाईट वाटते.
पुढे काकांवर केस झाली. त्यांना ससपेंड करण्यात आले. प्रत्येक तारखेला काकांनी फक्त दिवसभर कोर्टात थांबायचे वकीलाचा तर पत्ताच नसायचा. संध्याकाळी कोर्टाने पुढची तारीख काकांना कळवायची ती तारीख काकांनी वकीलाला कळवायची. एखाद्या तारखेला काका गैरहजर असले की लगेच कोर्ट वॉरंट काढणार. वकिल फक्त दर तारखेला काकांकडून एवढे पैसे द्या तरच कागद टाईप करता, तरच कागद कोर्टापुढे ठेवतो. एकाही कोर्टाने ही केस गंभीरपणे लक्षात घेतली नाही की आज ह्या माणसाचे वय काय आहे. तो दर वेळेस दुसर्या गावावरून येथे येतो. दिवसभर थांबतो बर थांबून जाताना हातात काय तर पुढची तारीख.
म्हणजे आपल्या देशाची न्याय संस्था, कायदा एवढा ढिसाळ आहे की ह्या 15 वर्षात ह्या केस मधील सगळे आरोपी निर्वतले. फक्त काका व अजुन एक जण दोघेच जिवंत राहिले. म्हणजे वर्षानुवर्षे आपल्याकडे कोर्टाच्या केसेस चाललेल्या असतात.
हा काकांचा अर्धा प्रवास मी स्वत: डोळ्याने पाहिला. केसची तारिख असली की काका-काकूंची जिवाची घालमेल व्हायची. मनस्ताप झाला, पैसा पाण्यासारखा वाहिला, आयुष्याची वाताहात झाली, मानहानी झाली. एखाद्या माणसाचे किती खच्चीकरण?
आपण पेपर मध्ये वाचतो 80 वर्षाच्या म्हातार् याला 35 वर्षांनी न्याय मिळाला. ते खरे आहे. अरे कशाचा न्याय? त्या न्यायाची वाट पाहण्यात त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते. या वयात मिळालेला न्याय त्याच्या पचनी पडतो? अशा गोष्टी वाचून खुप वाईट वाटते.
सध्या देशात समाज फक्त एका गोष्टीला घाबरून आहे ते म्हणजे ‘न्याय संस्था’ , ‘कायदा’ ह्या दोनच गोष्टींना सध्याचा समाज घाबरून आहे. मग तो कायदा का सरकार कडक करत नाही. कशाला साक्षी, पुरावे, कोर्टाच्या तारखा ह्याची वाट पहाता. म्हणजे तो गुन्हेगार गुन्हा करून पण इतका निर्ढावून जातो की तो बेल वर सुटलेला असतो. समाजात ताठ मानेने वावरत असतो. समाज पण आणि तो पण आपण गुन्हा केला हे विसरून जातो. कारण केसचा निकाल लागण्यास होणारा विलंब. पण जो निरपराध असतो त्याच्या आयुष्याची वाट लागते.
येथे वकिला ला किंवा कोर्टाला दोष देण्यात अर्थ नाही. आज जी गरिब लोकं आहेत की ते पैशा अभावी वकील लावू शकत नाही अशांसाठी मोफत वकील मिळण्याची सोय आहे. व जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कोर्ट स्थापन केले आहेत. तेथे अशा लोकांच्या केसेस लवकर चालवल्या जातात. पण लोकांना पण प्रत्येक गोष्ट पैसा मोजून च घेण्याची सवय झाली आहे. तुम्ही देता म्हणून समोरचा घेतो.
एखादा वकील जर फक्त तुमच्याकडून पैसे घेऊन जर केस न चालवता तारखा घेत असेल, किंवा फसवत असेल तर बार कॉंसील कडे तक्रार करा. कोर्टासमोर स्वत: उभा राहून ही गोष्ट कोर्टाच्या निदर्शनास आणून द्या. त्याचा निश्चितच फायदा होईल.
मुळात तळागाळापासून सर्व व्यवस्था बदलली तर वर पारदर्शकता दिसून येईल.
असो, काकांचा काहीही दोष नसताना काकांचे आयुष्यातील14-15 वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत गेले. त्यात त्यांचे खुप खच्चीकरण झाले. आता ते निरपराध सुटले. पण काकू सांगत होत्या परवाच डॉ. नी सांगितले काकांना अल्झायमर चा आजार जडला आहे. ऐकून खुप वाईट वाटले. पण मी मनाला म्हटले एवढे वर्षे झालेला त्रास, ताण सहन करून करून तो आता विसरावा म्हणून देवाची ही खेळी असावी.
मी व माझ्या मिस्टरांनी एकमेकांकडे पाहून हुश्श केले.
श्रध्दा जहागिरदार 🙏🙏