मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डॉ. प्रविण सुरवशे. संग्रह – मेकिंग अ न्युरोसर्जन. सायलेंट हिरोज्!

डॉ. प्रविण सुरवशे.
संग्रह – मेकिंग अॉफ अ न्युरोसर्जन.
सायलेंट हिरोज्!
साधारणपणे दोन वर्षे झाली असतील या गोष्टीला.मी त्यावेळी J.J.hospital,Mumbai येथे न्युरोसर्जरी डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होतो. मेन हॉस्पिटल बिल्डिंगच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर न्युरोसर्जरी डिपार्टमेंट होते. रहाण्यासाठी जवळच हॉस्टेलमध्ये ८×१० ची रूम मिळाली होती. रूम लहान होती तरीदेखील माझ्या मिसेसनी तेवढ्यात पूर्ण संसार थाटला होता. मिसेस त्यावेळी मुंबईतील दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थेशिया शिकत होत्या. आमचा दोघांचाही २४ तास ड्युटी व नंतर १२ तास ऑफ असा दिनक्रम असायचा. त्यामुळे नुकतंच लग्न झालं असलं तरी एकमेकांना भेटायला फारसा वेळ नाही मिळायचा!
तो दिवस अगदी नेहमीसारखाच होता.मिसेस त्यांची ड्युटी संपवून रात्री घरी आल्या होत्या. त्यामुळे मी देखील सर्व कामं संपवून लवकर रूमवर आलो. मिसेस ची स्वयपाची लगबग सुरु होती. एकीकडे भाजी शिजत होती व दुसऱ्या शेगडीवर पोळी भाजणं चालू होतं आणि गरम चहा तयार होता. घरी आल्यावर फ्रेश होऊन आम्ही चहा घेत बसलो होतो. एवढयात माझ्या ज्युनिअर चा फोन आला.लक्ष्मीकांत बोलत होता . “सर , लवकर कॅज्युअल्टी मध्ये या. अमनदीपला (नाव बदलले आहे) काहीतरी झाले आहे.’’ आणि फोन कट ! फोनवरती तो बोलत असताना मला जाणवत होतं की तो कोठे तरी धावत चाललाय कारण त्याचा श्वास फुलला होता आणि त्याला धापही लागली होती. हा फोन विचित्र होता. आज पर्यंत त्याने मला कधीही असा अर्धवट फोन केला नव्हता. पण प्रकार गंभीर आहे समजून मी पटकन जायला निघालो.
आमचं बोलणं ऐकून मिसेसनी विचारलं “हा अमनदीप कोण? मी सांगितलं” तो आमचा अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट मधील सिनिअर रेसिडेंट आहे (शिकाऊ डॉक्टर).”त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाल्या मी लिफ्ट बोलावते, तुम्ही पट्कन कपडे बदलून निघा. मी सातव्या मजल्यावर रहात असल्याने लिफ्ट यायला वेळ लागायचा.मी पट्कन कपडे घातले,पायात चप्पल तशीच व बाहेर पळालो. मिसेसनी तो पर्यंत लिफ्टचं दार उघडून ठेवलं होतं. लिफ्टचं दार बंद होता होता त्या म्हणाल्या “अहो, काळजी घ्या! त्याला काहीही होऊ देऊ नका प्लीज!” आणि लिफ्टचं दार बंद झालं.
माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं! काय झालं असेल अमनदीपला? आज सकाळीच तर तो मला आणि लक्ष्मीकांतला भेटला होता. मला म्हणाला “सर , आज मेरी ड्युटी है| मैं ही कॉल डायरेक्टर हूं |(कॉल डायरेक्टर म्हणजे हॉस्पिटल मध्ये होणाऱ्या सर्व इमर्जन्सी ऑपरेशन्सना भूल देणारा. त्याच्या हाताखाली ज्युनियर अॅनेस्थेटिस्टची टीम असते व केसेसचा सिरिअसनेस बघून कॉल डायरेक्टर कुठली केस आधी घ्यायची व कुठली नंतर हे ठरवातो. तसेच एखादा पेशंट फार सिरिअस वाटत नसेल तर ती केस पोस्टपोन करुन दुसऱ्या दिवशी घ्यायला सांगायचा अधिकारही त्याला असतो.) तो म्हणाला, “सर,कोई टेन्शन नही आज ! कितने भी पेशंट आने दो, सारे केसेस करेंगे!” मी त्याच्याकडे बघून हसलो व म्हणालो, “ठीक है, देखते है! भूलना मत | तुम्हे वादा निभाना पडेगा | अॉलरेडी हमारे 2-3 पेशंटस् वेटिंगमे हैं|” “ठीक है सर! कोई टेन्शन नहीं!!” असे म्हणून तो निघून गेला .
तोच लक्ष्मीकांत मला म्हणाला “सर, हा खूप सिन्सिअर मुलगा आहे. आजपर्यंत आपली एकही केस याने पोस्टपोन (पुढे ढकलणे) होऊ दिली नाही. रात्रभर स्वतःपण जागतो आणि सर्व टीमला पण जागवतो.”
तो सकाळचा प्रसंग डोळ्यासमोरून जात होता, आणि मी लिफ्टमधून बाहेर पडलो. झपाझप पावलं टाकत मी पुढे चाललो होतो. आजूबाजूला आणखी बरेच इतर डिपार्टमेंट्सचे डॉक्टर देखील पळत कॅज्युअल्टीकडे जात असताना दिसायला लागले. जसा कॅज्युअल्टीच्या दारात पोहचलो तोच दोन रेसिडेंट समोर आले आणि म्हणाले ,”अरे सर, किधर हो आप? जल्दी चलो ना, अमनदीप को देखो !” मी कॅज्युअल्टी मध्ये शिरलो तर तिथे ३० / ४० डॉक्टर्स जमले होते. गर्दीतून वाट काढून पुढे आलो.
समोरचे दृश्य पाहून हृदयाचे ठोके थांबतील की काय अशी अवस्था झाली. अमनदीपला रक्ताच्या थारोळ्यात बेडवरती मधोमध झोपवलं होतं. डोक्याला मार लागून डोक्याचे आणि चेहऱ्याचे दोन भाग झाले होते. चेहरा ओळखू येत नव्हता. एक बाजूचा डोळा बाहेर पडला होता आणि मेंदूचा बराचसा भागही बाहेर आला होता. तशाही अवस्थेत त्या दुभंगलेल्या चेहऱ्यातून अॅनेस्थेटिस्टनी श्वासाची कृत्रिम नळी श्वासनलिकेत टाकली होती व व्हेंटिलेटर द्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास चालू केला होता.चारी बाजूला रक्त होतं. त्याच्या आजूबाजूला उभे राहिलेल्या डॉक्टरांचेही कपडे रक्ताने माखले होते.
मी लक्ष्मीकांतकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं.तो म्हणाला, “सर हा सेंट् जॉर्ज हॉस्पिटलची ड्युटी संपवून गाडीवरून जे.जे हॉस्पिटलला ड्युटी साठी येत होता.(सेंट् जॉर्ज हॉस्पिटल हे जे.जे. हॉस्पिटलचीच ब्र्ँच आहे. त्यामुळे जे.जे. हॉस्पिटलमधील एक अॅनेस्थेशियाची टीम या हॉस्पिटलमध्ये पोस्टेड असते.) बहुतेक कुणीतरी मागून ठोकर मारली असावी. नक्की माहीत नाही! पण याची बाईक घसरली आणि डोकं डिव्हायडरवर आपटलं. पोलिस त्याला लगेचच इकडे घेऊन आलेत.
काहीच करण्यासारखे राहिलं नव्हतं. पुढच्या काही क्षणात त्याचे ह्दय बंद पडेल असं दिसत होतं .मी पाठीमागे वळून बघितलं तर डॉ. वर्णन वेल्हो सर देखील समोरच उभे होते. डॉ.वर्णन वेल्हो हे जे.जे. हॉस्पिटलच्या न्युरोसर्जरी डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत. खूप हुशार आणि शिस्तबद्ध व्यक्ती. आजपर्यंत अनेक अवघड केसेस त्यांनी यशस्वी करून दाखवल्या होत्या. पण आताचा प्रसंग वेगळा होता. काहीच करणे शक्य वाटत नव्हते. आता मी आशाळभूत नजरेनं सरांकडे बघत होतो. एक वेडी आशा वाटत होती की, सरांनी म्हणावे, ” Pravin, We can still save him ! Take him in OT’ (आपण अजूनही याला वाचवू शकतो!त्याला पट्कन ऑपरेशन थिएटर मध्ये घे.) पण सर शांत उभे होते. त्यांच्या नजरेमध्ये स्पष्ट दिसत होतं की सर्व काही संपलं आहे.
इतक्यात मागून एका रेसिडेंटनी खांद्यावर हात टाकला. तो अमनदीपचाच सहकारी होता. तो मला म्हणाला , “अरे सर, कुछ तो करो ना प्लीज! ऐसे चुपचाप क्यों खडे हो? बाकी टाईम तो आप हमपे चिल्लाते रहते हो, ‘पेशंट को जल्दी ऑपरेशन थिअटर मे लो| इसको जल्दी अॅनेस्थेशिया दो|(भूल देणे)’ अभी हमारे दोस्त को जरुरत है, तो कूछ भी नही कर रहे हो ! बोलो ना सर ! ऑपरेशन थिएटर में शिफ्ट करने का अॉर्डर दो ना| हम सब तैयारी करते है|बोलो सर , कूछ तो बोलो !” एवढं म्हणून तो माझ्या गळ्यात पडला आणि मोठमोठ्याने रडू लागला. त्याचे सांत्वन करणे शक्यच नव्हते. त्याचे इतर सहकारी त्याला माझ्यापासून वेगळे करत साईडला घेऊन गेले. तिथं असलेल्या सर्वांना कळून चुकलं होतं की, आता काहीच करणं शक्य नव्हतं.अमनदीप शेवटची घटका मोजत होता!
तोच वर्णन सरांनी मला बोलावलं. ते म्हणाले , “काही करण्यासारखे नाही. पण डोक्याला ड्रेसिंग तरी करून घेऊया. कारण चुकून जर अमनदीपचे कुणी नातेवाईक आले तर ते त्याला या अवस्थेत बघू शकणार नाहीत.” मी ड्रेसिंग करायला त्याचं डोकं वर उचललं, तर रक्ताची धारच लागली! कसेबसे आम्ही ड्रेसिंग केले आणि बाजूला झालो.
पुढच्या एक दोन मिनिटांमध्ये त्याच्या हृदयाचे ठोके कमी होत गेले आणि त्याचं हृदय बंद पडलं. लगेचच आम्ही CPR (छातीवर दाब देऊन हृदय चालू करणे.) चालू केलं . ७ / ८ डॉक्टर्स एका पाठोपाठ एक उभे होते. समोरचा CPR देऊन दमला की लगेचच दुसरा त्याची जागा घेई. हृदयाला शॉक देखील देण्यात आले. पण फार उपयोग होत नव्हता. एवढ्या वेळात जवळपास १०० / १५० डॉक्टर कॅज्युअल्टीमध्ये जमा झाले होते. हॉस्पिटलचे डीन डॉ. लहाने सर, अॅनेस्थेशिया डिपार्टमेंटच्या प्रमुख डॉ.कोंडवीलकर मॕडम तसेच इतर सर्व सिनिअर डॉक्टर्सही तेथे आले होते.
इतक्यात हॉस्पिटलचे सुपरिटेंडेंट मला बाजूला घेऊन म्हणाले, “सर, याच्या घरी आपल्याला कळवावे लागेल.” तो पंजाब प्रांतात राहणारा होता आणि त्याचे कोणीच नातेवाईक आजूबाजूला रहात नव्हते.त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण कोणालाच त्याच्या परिवाराविषयी फार माहीत नव्हते. तोपर्यंत पोलिसांनी त्याच्या खिशामध्ये सापडलेला मोबाईल आम्हाला दिला व म्हणाले. “यामध्ये कुठल्या नातेवाईकाचा नंबर दिसतोय का बघा सर!” आम्ही मोबाईलमधील सर्व नंबर चेक केले. सर्व नंबर्स जे.जे मधील मित्रांचे होते पण एक नंबर त्याने माँ म्हणून सेव्ह केला होता. सरांनी मला नंबर सांगितला. तो नंबर मी माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतला आणि त्यांच्याबरोबर बाहेर ग्राउंडवर आलो.
आता त्याच्या घरी हे सर्व सांगण्याची मोठी जबाबदारी होती. काय सांगावे? कसे सांगावे? हा विचार करीतच मी त्या नंबरवर फोन केला. एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते. पलिकडून लगेचच फोन उचलला गेला. वयस्कर बाईंचा आवाज होता तो. त्या म्हणाल्या, “हाँ बोलो बेटा! सोए नही अभी तक? तुम्हारा तो ये रोज का हो गया है अब ! खाना तो खाया के नही?” मी विचारात पडलो या बाई मला बेटा का म्हणताहेत? मी कुठं त्यांचा मुलगा आहे! त्यांनी मला ओळखलं कसं? आणि माझी नजर माझ्या हातातल्या फोनकडे गेली. गडबडीत मी अमनदीपच्या फोन वरूनच त्याच्या घरी फोन लावला होता आणि त्याच्या आईला वाटले होते की अमनदीपच बोलतोय. ज्या आईला फक्त आपला मुलगा व्यवस्थित जेवलाय किंवा नाही याची काळजी आहे त्या आईला मी कुठल्या शब्दात हे सर्व सांगणार होतो? माझ्या तोंडातून शब्द फुटेनात. मी पटकन फोन कट केला आणि सरांना म्हणालो, “मी नाही सांगू शकत त्याच्या आईला!” इतक्यात परत त्याच्या आईचा फोन येऊ लागला. मी सरांना फोन दिला, “सर तुम्हीच सांगा प्लीज मला नाही जमणार त्या आईला रात्री झोपेतून उठवून ही बातमी द्यायला.”
आता सरांनी जबाबदारी घेतली ते म्हणाले “मॉं जी मैं अमनदीप का दोस्त बोल रहा हूँ|. उसका भाई या पिताजी है क्या? बात करनी थी|” त्या आई विचारत राहिल्या, “मुझे बताओ बेटा| क्या हुआ है ? अमनदीप कहाँ है? तुम कौन हो?” पण सरानी त्याना काहीही सांगितलं नाही. आता फोन अमनदीपच्या मोठ्या भावाने घेतला. त्याला आम्ही सर्व हकीकत सांगितली. तो देखील डॉक्टरच असावा कदाचित! तो म्हणाला “सर अक्सिडेंट हुआ है तो सी.टी.स्कॅन में क्या दिख रहा है? अभी तक स्कॅन क्यों नही किया?” सर त्याला म्हणाले की “हमारे न्यूरोसर्जनसे बात किजिए!” आणि फोन माझ्याकडे दिला. तो मला वारंवार विचारत होता.
“सी. टी. स्कॅन क्यों नही कर रहे हो?” पण अमनदीपला सिटी स्कॅन पर्यंत नेणंही शक्य नव्हतं शेवटी मी म्हणालो “भैया सी.टी.स्कॅन नही कर सकते,अमनदीप आखरी सांसे ले रहा है|”
समोरचा आवाज अचानक शांत झाला. फोनवर पलिकडचा गोंधळ स्पष्ट ऐकू येत होता. त्याचे आईवडील त्याला ओरडत विचारत होते “क्या हुआ? हमें भी बताओ! अमन ठीक है ना?|”आणि मी फोन ठेवला.
काय अवस्था झाली असेल त्या म्हाताऱ्या आई वडिलांची! काय करणार बिचारे? पंजाबमध्ये कुठेतरी कुठल्या गावात रहात असतील कदाचित ! रात्री २ वाजता उठून कसे येणार इकडे? प्रवासात त्यांचा जीव किती कासावीस होईल! आयुष्यातला सर्वात अवघड प्रवास असेल त्यांचा! कधीही न संपणारा!
मी हाच विचार करत तिथेच खाली पायरीवर बसलो. एव्हाना अर्धा पाऊण तास निघून गेला असेल या गडबडीत. इतक्यात लक्ष्मीकांत बाहेर आला. त्याने मानेनेच खुणावले आणि मी समजलो हृदय चालू होत नाही. मृत्यू झाला असावा! तो मला म्हणाला, “सर जरा आत येऊन बघा की!” मी आत गेलो. समोरचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. अमनदीपचा मृत्यू झाला होता! मॉनिटरींग स्क्रीनवरती सरळ लाईन आलेली दिसत होती.पण मुले मात्र थांबत नव्हती. त्याचे १०-१५ मित्र आळी पाळीने CPR देत होते. सर्व सिनिअर त्यांना सांगत होते की, “थांबा आता!संपलंय सगळं!” पण ती भाबडी मुलं थांबायला तयार नव्हती. कुणाचेच ऐकत नव्हती. त्यातला एकजण म्हणाला, “सर ,आज तक हमने CPR दे के कितने लोगोंको जिंदा किया है!तो हमारे दोस्त को हम कैसे जाने देंगे?” मुलं इरेला पेटली होती. एका पाठोपाठ एक बेडवर चढून त्याच्या छातीवर धपाधप CPR देत होती . त्यांचा मित्र त्यांना कधीच सोडून गेला होता. पण ही मुल हार मानतच नव्हती. शेवटी १०-१५ मिनिटांनी सिनिअर म्याडम ओरडल्या “Stop it, He is No More! Control Yourself!” (थांबवा सर्व! तो कधीच मरण पावलाय)आणि मुलं भानावर आली.
आता अचानक कॅज्युअल्टीमध्ये भयाण शांतता निर्माण झाली. अमनदीप शांत झाला होता. बेडच्या आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता. सलाईनच्या बाटल्या, वापरलेली इंजेक्शनची आवरणं, हातमोजे,रक्ताच्या पिशव्या यांचा खच पडला होता.व्हेंटिलेटर अजूनही त्याच्या निर्जीव शरीरात श्वास फुंकत होता. आता आम्ही सर्व जण शांतपणे अमनदीपकडे बघत होतो. ती जीवघेणी शांतता असह्य होत होती.एका सिनिअर डॉक्टरनी सर्वांची परवानगी घेतली आणि व्हेंटिलेटर बंद केला.अमनदीप आम्हाला सोडून खूप लांब निघून गेला होता.
आता हळूहळू हुंदक्याचे आवाज येऊ लागले. सुरूवातीला दबक्या आवाजात येणारे हुंदके आता स्पष्ट ऐकू येत होते. (लेडिज डॉक्टर्स) मुली समोरच रडत होत्या. तर मुलांपैकी (पुरुष डॉक्टर्स) कुणी खांबां मागे लपून तर कुणी दारामागे तर कुणी बाथरूम मध्ये लपून रडत होते , तर सिनिअर डॉक्टर्स डोळ्यातले पाणी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.
एव्हाना १००-१५० डॉक्टर्स जमले होते. अनेक स्टाफ नर्सेस त्यांची ड्युटी संपलेली असताना देखील रात्रभर इथेच थांबून होत्या. कँपसमध्ये रहाणारे बरेचसे वॉर्डबॉइज् सुद्धा आपली काहीतरी मदत होईल या भावनेनं इथंच बसून होते.पण सत्य हेच होतं की आम्ही कुणीच अमनदीपची मदत करु शकलो नव्हतो!
कॅज्युअल्टीमध्ये आतापर्यंत २०-२५ इतर पेशंट व त्यांचे नातेवाईक जमा झाले होते. डॉक्टरांनी वेळेचं भान ठेऊन डोळे पुसत या बाकीच्या पेशंटना तपसायला चालू केलं. कारण या चार- पाच तासांमधे इतर पेशंटकडे फार ध्यान देणं शक्य झालं नव्हतं. त्यातल्या एका पेशंटला बघायला मी गेलो. तरुण मुलगा होता. तो पण गाडीवरून पडला होता. पण त्याला फार काही लागलं नव्हतं. मी त्याला म्हणालो. “डोक्याला थोडा मार लागलाय! टाके टाकावे लागतील!” तो मला म्हणाला, “सर मला काही नाही झालं .मी थांबू शकतो.तुम्ही प्लीज तुमच्या मित्राला आधी वाचवा!” त्याचे नातेवाईक देखील म्हणाले “सर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. टाके नंतर टाकले तरी चालतील पण तुमच्या मित्राकडे आधी लक्ष द्या.” माणुसकीचं हे दर्शन माझ्यासाठी नवीन होतं .
कॅज्युअल्टीमधील सर्व पेशंट संपेपर्यंत अमनदीपची बॉडी आता शवागृहात पाठवली गेली होती. एव्हाना सकाळ झाली होती. सर्व सिनिअर डॉक्टर्स तसेच डीन डॉ. लहाने सर सकाळपर्यंत कॅज्युअल्टीमधेच बसून होते. त्यांनी सर्व कायदेशीर बाबींमध्ये स्वतः जातीने लक्ष घातलं होतं.आता सर्व सिनिअरनी मुलांना रूमवर जाऊन फ्रेश व्हायला सांगितलं . काहीजणांकडे अमनदीपच्या परिवाराच्या संपर्कात रहाण्याची जबाबदारी दिली आणि विमानतळावरून त्यांना इथे घेऊन येण्याची व रहाण्याची व्यवस्था केली गेली.
डॉ. वर्णन वेल्हो सरांनी मला बोलावून सांगितलं की, “आज ऑपरेशनसाठी रेग्युलर पेशंट्स ठेवू नका. आजच्या पेशंटची ऑपरेशन्स उद्या करूया. फक्त जे पेशंट इमर्जन्सी आहेत किंवा सिरिअस आहेत त्यांचीच ऑपरेशन्स आज ठेवा. पूर्ण अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट रात्रभर इथंच आहे. त्यांना मानसिक धक्क्यातून सावरायला थोडा वेळ द्यायला हवा.” सराना ठीक आहे म्हणून मी रूमवर परत आलो.
डोकं जड झालं होतं. त्याचे आईवडील कुठेपर्यंत पोहोचले असतील? ते या मृत शरीराला बघू शकतील का? डेड बॉडी परत कसे घेऊन जातील ? पुढचं आयुष्य कुणाकडे बघून जगातील? विचार बंद झाले होते. समोर टेबलावर मिसेसनी चिट्ठी लिहून ठेवली होती. “अमनदीप बरा आहे ना? फोन करा प्लीज!तुमचा फोन लागत नाही.मी ड्युटीसाठी निघते आहे .” काय सांगणार होतो मी त्यांना? इतक्यात मला ऑपरेशन थिएटरमधून फोन आला. सिस्टर बोलत होत्या. मी त्यांना म्हणालो “सिस्टर सॉरी, मी सांगायला विसरलो. आज कुठलीही रुटीन केस (ऑपरेशन) होणार नाही. सर्व अॅनेस्थेशिया डिपार्टमेंट आतापर्यंत कॅज्युअल्टीमध्येच होतं . मी वॉर्डमध्ये फोन करून सांगतो की, कुठलाही पेशंट ऑपेरेशनसाठी पाठवू नका. फक्त इमर्जन्सी केसेस करू!”
पण त्या म्हणाल्या “सर, पण OT (अॉपरेशन थिएटर) मध्ये सगळे अॅनेस्थेटिस्ट आलेत. त्यांनी पेशंट पण बोलावून घेतलाय! “काय?” माझा मलाच विश्वास बसेना. मी तोंड धुवून तसाच OT मध्ये गेलो.
OT मध्ये आल्या आल्या एक अॅनेस्थेशिया रेसिडेंट (शिकाऊ डॉक्टर) समोर आला व म्हणाला, “सर दोन्ही पेशंट ओ.टी.मध्ये बोलावलेत. कुठला पेशंट पहिल्यांदा चालू करायचा?”रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. तरी देखील तो अगदी निर्विकारपणे मला हे विचारत होता. मी निमुटपणे त्यातल्या एका पेशंटकडे बोट दाखवलं.
पेशंटला ऑपरेशनला न्यायच्याआधी आम्ही पेशंटच्या नातेवाईकांना भेटायला बोलावले. ते देखील म्हणाले,”सर काल रात्रभर तुम्ही सगळे कॅज्युअल्टीमध्येच होता. आम्ही बघितलं, आमच्या पेशंटचं ऑपरेशन उद्या केलं तरी चालेल. आमची काही तक्रार नाही!”
एरवी हेच नातेवाईक आमच्या मागे लागायचे की ‘आमच्या पेशंटचे ऑपेरेशन लवकर करा म्हणून!’ एकंदरीत सर्वच अनपेक्षित घडत होत. आज ऑपरेशन केली नसती तरी फार काही बिघडलं नसतं, तरी पण हे काय चालू आहे काहीच समजेना . मी सिस्टरना जाऊन विचारलं, त्या म्हणाल्या “काही माहित नाही सर. पण सर्व अॅनेस्थेटिस्ट म्हणालेत कोणतीच केस (ऑपरेशन) कॅन्सल करायची नाही म्हणून!” पुढच्या तासाभरात त्यांनी दोन्ही पेशंटना भूल दिली व ऑपरेशन सुरु झाले.
ऑपरेशन करण्याची मनस्थिती नव्हती! तरी पण एकदा का ऑपरेशन सुरु झालं की इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. तसंच झालं. माझं ऑपरेशन संपता संपता संध्याकाळचे ६ वाजले होते . दोन्ही पेशंट व्यवस्थित झाले व मी बाहेर सर्जन रूम मध्ये येऊन बसलो. सिस्टरनी चहाचा कप माझ्यासमोर ठेवला व म्हणाल्या, “ घ्या,दमला असाल!” एव्हाना दोन्ही पेशंट I.C.U. मध्ये शिफ्ट झाले आणि पेशंटबरोबर अॅनेस्थेटिस्टही बाहेर पडले. त्यातला एक जण येऊन मला म्हणाला, “सर दोन्ही केसेस चांगल्या झाल्या. चला, निघतो. बाय!” आणि तो निघाला.
आता मात्र मला हे सर्व काही सहन होईना. अपराध्यासारखं वाटत होतं. आम्ही त्यांच्या मित्राला वाचवू शकलो नाही म्हणून ते माझ्याशी असे वागत असावेत असं वाटत होतं. मी त्याला हाक मारली व म्हणालो “का ? कशासाठी ? आज ऑपरेशन नसते केले तर काय बिघडलं असत का?” तो काही न बोलता तसाच परत निघाला. मी त्याला परत बोललो ” अरे कशासाठी हा अट्टाहास ? काय गरज होती आज ऑपरेशन करायची? ”
आता मात्र तो थांबला, माझ्यासमोर येऊन बसला आणि त्याने मान खाली घातली. डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तो म्हणाला, ” सर , अमनदीप सर माझे सिनिअर होते. He was one of the best .ते सर्वात हार्डवर्किंग आणि ऑनेस्ट होते. कुठलीच केस ते पोस्टपोन होऊ द्यायचे नाहीत. कधीकधी मला त्यांचा राग पण यायचा. कारण ते कॉल डायरेक्टर असले की, रात्रभर केसेस चालायच्या.स्वतः पण काम करायचे आणि आम्हाला पण काम करायला लावायचे.””सर तुम्हाला माहित आहे का ? आज आपल्या हॉस्पिटलच्या सर्व डिपार्टमेंटच्या मिळून जवळजवळ ३०-३५ केसेस झाल्या असतील ! आम्ही एक पण केस कॅन्सल होऊ दिली नाही!”
मी परत विचारलं , “अरे पण का ? हे सगळं कशासाठी? ” तो म्हणाला, “अमनदीप सर जर कुठे असतील आणि आम्हाला बघत असतील तर त्यांना काय वाटलं असतं! त्यांच्यामुळे आम्ही सगळ्या केसेस कॅन्सल केल्या म्हणून ? आम्हाला सकाळी सिनिअरनी सांगितलं होतं की आज सुट्टी घ्या म्हणून. पण आम्ही सर्वांनी ठरवले की, नाही! आज केसेस कॅन्सल नाही होऊ द्यायच्या.”“ आज झालेल्या या सगळ्या केसेस हीच अमनदीप सरांना आमच्याकडून खरी श्रद्धांजली ! आदरांजली!!”एवढे बोलला आणि तो निघून गेला. मी बराचवेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतो. कपातला चहा तसाच ठेऊन मी देखील ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडलो.
त्या दिवशी जे.जे.हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते अद्भुत आणि अनाकलनीय होतं.मनातल्या मनात मी जे.जे च्या पूर्ण अॅनेस्थेशिया टीमला सलाम केला. तसं बघितलं तर हे सर्वच अॅनेस्थेटिस्ट माझ्यासाठी’ सायलेंट हिरोज् ‘आहेत कारण कुठलंही ऑपरेशन यशस्वी करण्यामध्ये सर्जनचा जेवढा सहभाग असतो तेवढाच यांचा देखील असतो. हे लोक पेशंटला बेशुद्ध करतात. पूर्ण ऑपरेशन चालू असताना पेशंटच्या प्रत्येक प्रक्रियेला कंट्रोल करतात आणि ऑपरेशन नंतर पेशंटला अलगद शुद्धीवर आणतात. ऑपरेशन चांगलं झाल्याचं सर्व श्रेय शक्यतो सर्जनलाच मिळतं. ऑपरेशन चांगल झाल्यावर डिश्चार्ज घेऊन घरी जाताना बरेच पेशंट आणि नातेवाईक सर्जनचेच आभार मानतात. परंतू मी आज पर्यंत कधी कुठल्या नातेवाईकांनी अॅनेस्थेटिस्टचे आभार मानताना बघितले नाही.बऱ्याच पेशंटना तर त्यांना कोणी भूल दिली त्या डॉक्टरांचे नाव देखील माहित नसतं. तरीदेखील कशाचीही अपेक्षा न करता, रोज नव्या उत्साहात नवीन केसेससाठी हे ॲनस्थेटिस्ट तयार असतात. हे लोक आपलं काम अतिशय चोखपणे बजावतात. त्यामुळे माझ्यासाठी हे लोक पडद्यामागचे “सायलेंट हिरोज्” आहेत!
आणि तसाच विचार केला तर प्रत्येक डॉक्टरचं आयुष्य असंच आहे. प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी असतात .कुणाला कौटुंबिक समस्या, तर कुणाला शारीरिक तक्रारी , तर कोणाला अर्थिक अडचणी असतात . प्रत्येक डॉक्टर स्वतःच्या खाजगी आयुष्यात एक वेगळीच लढाई लढत असतो पण डॉक्टरांकडे ज्यावेळी पेशंट येतो, त्यावेळी आपल्या वैयक्तिक अडचणीं चेहऱ्यावर न दाखवता , प्रत्येक डॉक्टर आपल्या पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरं सांगायचं तर या सर्वांच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आपला पेशंट बरा होऊन घरी जातोय या एकाच गोष्टीमध्ये या लोकांना खरं सुख सापडतं!
मी माझ्याच विचारात कधी होस्टेलपर्यंत आलो कळलंच नाही. होस्टेलच्या लॉबीमध्ये अमनदीपच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम झालेला दिसत होता. त्याचा फोटो लावला होता व फोटोला फुले वाहिलेली दिसत होती.माझे देखील हात आपोआप जुळले आणि मी नमस्कार केला. फोटोमध्ये किती सुंदर आणि हसरा दिसत होता तो. त्याच्या नजरेला नजर देण्याचे धाडस नाही झालं माझं! त्याची नजर चुकवून जायला निघालो आणि लिफ्टचे दार उघडले ,एवढ्यात आवाज आला.
“अरे किधर जा रहे हो सर? आज मैं ही कॉल डायरेक्टर हूँ! कितने भी केसेस आने दो, कोई टेन्शन नही.सारे केसेस कंरेंगे!”

डॉ.प्रविण सुरवशे.
कन्सल्टंट न्युरोसर्जन
कोलंबिया एशिया हॉस्पिटल, पुणे.
फोन-७७३८१२००६०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}