मंथन (विचार)मनोरंजन

जिद्द प्रेमाची मुग्धा कुलकर्णी

जिद्द प्रेमाची ♥️♥️♥️

पीपल्स हॉस्पिटलच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटच्या आय सियू वार्डमध्ये आज सगळे डिपार्टमेंट डॉक्टर्स, खिन्न मनाने आणि साश्रू नयनांनी उभे होते. हॉस्पिटल बेडवर प्रख्यात डॉक्टर मोहित जखमी अवस्थेत झोपले होते. सिनिअर डॉक्टर चितळे यांनी महत् प्रयासाने डॉ. मोहितची तब्येत नियंत्रणाखाली आणली होती.

” मोहितच्या घरच्यांना कळवलय का? त्यांच्या सह्या लागतील पुढच्या ट्रीटमेंट साठी.”

हे ऐकून असिस्टंट डॉक्टर अस्मिता पुढे येऊन म्हणाली,

“सर त्यांच्या घरचे थोड्यावेळात पोहोचतील. मी लगेचच फोन केला होता. ”

“ओके ठिक आहे. ते आले की मला कळवा. त्यांची परवानगी मिळाली की लगेच पुढची ट्रीटमेंट सुरू करू. तुम्ही सगळे आता आपापल्या कामाला जा. मी सिनिअर नर्सनां इथे थांबण्यासाठी सांगणार आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट.”

सगळे ओल्या डोळ्यांनी अनमनाने तिथून गेले.

डॉ. मोहित अतिशय कुशल आणि नावाजलेले डॉक्टर. तरुण देखणं हसतमुख असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना बरं केलं होतं. त्यांच सगळ्यांशी छान जमायच. पेशंट असो किंवा स्टाफ सगळ्यांचे ते एकदम लाडके डॉक्टर. बऱ्याच लोकांना ते मदतही करत.

साधारणपणे अर्ध्यातासात मोहितचे आई वडील आणि भाऊ हॉस्पिटल मध्ये आले. मोहितची आई खूप रडत होती. वडीलहि खूप घाबरलेले दिसत होते. मोहितच्या भावाने डॉक्टरना विचारल,

“हे सगळ कस झाल? काल दुपारी मी फोनवर बोललो होतो त्याच्याशी. छान बोलला माझ्याशी तो. काही टेंशन वाटल नाही मला त्याच्या बोलण्यात. मग असा ॲक्सिडेंट कसा झाला?”

डॉ. अस्मिताने पुढे येऊन त्यांना माहिती दिली,

” काल डॉक्टरना एक क्रिटिकल सर्जरी होती. ती बराच वेळ लांबली. ती झाल्यावर थोडावेळ थांबून डॉक्टर घरी जायला बाहेर पडले. बहूतेक त्यांना थकल्यामुळे झोप आली असावी. त्यांची गाडी समोरून येणाऱ्या डंपरला धडकली.”
हे ऐकून मोहितची आई मटकन खालीच बसली. रोहित, मोहितच्या भावाने त्यांना जरा शांत केल्यावर जरा घाबरतच विचारल,

” आता कसा आहे तो?”

“डॉ. मोहितना डोक्याला खूप दुखापत झाली आहे. ते जागेवरच बेशुद्ध झाले. रक्तस्त्रावही खूप झालाय. पण आम्ही त्यांना स्टेबल करण्यात यश मिळवलं आहे. आत्ता ते स्थिर आहेत. पण येत्या 72 तासात त्यांच ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही सिनिअर डॉक्टर चितळें ना भेटा. ते पुढची माहिती तुम्हाला देतील.”

एवढ बोलून तिने नर्स बरोबर त्या सगळ्यांना डॉ. चितळेंच्या केबिनकडे पाठवलं.

मोहितच ऑपरेशन दोन दिवसांनी ठरलं. तेहि चांगल्या कुशल डॉक्टरांच्या टिमने यशस्वीपणे पार पाडलं. पण दुर्दैवाने मोहित डिप कोमात गेला. डॉक्टरांनी मोहितच्या घरच्यांना सांगितले की तो आऊट ऑफ डेंजर आहे. पण तो कधी ऊठेल यांचा काहिच अंदाज देता येत नाही.
हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटलं. थोडे दिवस मोहित ची आई तिथे राहिली. पण त्यांच्या वयामुळे त्यांना मोहीतच करायला जमेना. असाच एक महिना गेला शेवटी त्यांनी मोहितसाठी एक केअर गिव्हर ठेवली. नंतर ते मोहितला ठराविक दिवशी भेटायला येऊ लागले.

त्याच्याशी रोज संवाद साधणं हा एक उपाय आहे. अस डॉक्टरनी सगळ्यांना सांगितलं होतं.‌त्यामुळे सगळे थोडावेळ जाऊन रोज त्याच्याशी बोलत होते पण डॉक्टर अस्मिता रोजंच त्याच्याशी बोलायला जाऊ लागली. ती आधी कोणी नाही असं बघून मोहितशी बोलायला जाई. पण जशी त्याची जबाबदारी केअर गीव्हर वर आली तशी अस्मिता रोज ठरलेल्या वेळेत येऊ लागली.

कधीकधी मोहीतची आई त्याच्याजवळ बसून बोलत होती. ती त्याला त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती. तो एकदा सायकलवरून पडला होता आणि त्याचा हात दुखावला होता. तेव्हाचा सगळा प्रसंग बोलताना आई खूपच हळवी झाली. ते बघून रोहित तिला शांत करायला बाहेर घेऊन गेला.
मोहितची आई बाहेर गेलेली पाहून मोहिताचे बाबा मोहित जवळ बराच वेळ बसून होते.. आज बरेच वर्षांनी दोघं असे जवळ बसले होते. पण आत्ता मोहित काही न बोलता बिछान्यावर पडून होता. हे पाहून त्याच्या वडीलांना अश्रू अनावर झाले . त्यांनी मनाचा धीर करून बोलायला सुरुवात केली.

“मोहित बाळा हे असं काय बरं…! आता या वयात आम्ही बेडवर… पडून राहायचं आणि तुम्ही आमच्याकडं बघायचं तर तू असा बेडवर पाहवत नाही रे. तुला कधी बोललो नाही पण मला कायमच तुझा अभमान वाटत आला. तू कधीही फारशी काळजी करायला लावली नाहीस. अभ्यास कायम मन लाऊन केलास.
जेव्हा तुला बेस्ट डॉक्टरच अवॉर्ड मिळालं ना तेव्हा मी सगळ्यांना अभिमानानं सांगायचो तुझ्याबद्दल. आता असं तू झोपलेलं पाहवत नाही. लवकर बरा हो बाळा. आईची अवस्था बघ कशी झाली ते…! तिला मी कसा धीर देऊ मला कळत नाही.”

त्या दोघांचं बोलणं ऐकून अस्मिताच्या डोळ्यातही पाणी आलं. मोहितचे बाबा जेव्हा खूप रडायला लागले तशी ती पुढे झाली. त्यांना समजावून बाहेर घेऊन आली.

अस्मिता मोहीतशी रोज बोलत असे कधी त्याला काही पुस्तकं वाचून दाखवत असे. कधी तिचा दिवस कसा गेला ते सांगत असे. रोज स्वतः मोहितच्या हाता पायांचे व्यायाम करून घेत असे.
त्याला पायाला मालिश करून देत असे. त्याचे हात, बोटं सगळ्याला तेल लाऊन व्यायाम देत असे.

त्या नंतरचे बरेच दिवस असेच नेहमीच्या रूटीन प्रमाणे गेले. मोहितच्या ॲक्सिडेंटला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आल. पण त्याचं शुद्धिवर यायचं काही लक्षण दिसेना. सगळे काळजीत होते.

त्याच दरम्यान हॉस्पिटलने अस्मिताला स्कॉलरशिपवर लंडनला पाठवायचे ठरवले. यात तिला न्युरोसर्जन होता येणार होतं. तिला यासाठी कमीतकमी दोन वर्ष लंडनमधे रहावं लागणार होतं. तीनं ही बातमी मोहीतला सांगितली.

अस्मिता लंडनला जाण्यापूर्वी आठ दिवस आधी मोहितच्या बेडजवळ बसून खूप रडली होती. तिला मोहीतला सोडून जायचं नव्हतं. पण अशी संधी परत परत येत नाही. त्यामुळं तिला ही संधी सोडाविशी वाटत नव्हती.

शेवटी तिचा लंडनला जायचा दिवस आला. त्या दिवशी ती मोहित जवळ येऊन त्याच्याशी बराच वेळ बोलून गेली. जाताना ती मोहितला म्हणाली.

” मोहित मला माहित नाही तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय की नाही. पण जर येत असेल तर आता उद्यापासून माझा आवाज तुम्हाला ऐकू येणार नाही. मी आज लंडनला जातेय. मी तिथून शिकून आले तर त्याचा काही उपयोग तुम्हाला होत असेल तर मला तो करायचा आहे म्हणून मी जातेय. मोहित या दोन वर्षात जर तुम्हाला जाग आली तर मला विसरू नका. आपण मी आल्यावर परत भेटू.”

एवढं बोलून तीने कोणी नाही बघून मोहीतच्या कपाळावर आपले ओठ टेकले. ते टेकाताना तिचे दोन अश्रू त्याचा कपाळावर पडले पण तिला ते कळलं नाही.
आणि ती गेल्यावर मोहितच्या डोळ्यातून गाळलेले अश्रू हि तिला दिसले नाहीत.

अस्मिता विमानात सुद्धा बराच वेळ रडत होती. तिला सकाळचा सगळा संवाद आठवत होता. आज तिने मोहित पुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तिला ते सगळ बोलणं आठवत होत.

” डॉक्टर मोहित आज मी इथ बराच वेळ थांबणार आहे. तुमच्या केअर गिव्हरला सुट्टी हवी होती. आणि मी या संधीचा फायदा घेऊन इथं तुमच्याशी बोलायला आले. ”

ती अगदी हळू आवाजात मोहितच्या कानजवळ जाऊन महणाली.

“कारण मला तुमच्याशी माझ्या मनातलं बोलायच आहे. पण तुम्हाला आधिच सांगते माझ बोलण ऐकून एकदम डोळे उघडून मला घाबरवू नका. हळूहळू जागे झालात तरी चालेल. ”

” असो मी जोक केला. पण खरंच माझ बोलणं ऐकुन जर तुम्ही उठलात तर मला खूप आनंद होईल.
तर… मोहित तुम्हाला आठवतं का नाही मला माहित नाही पण तुम्ही आमच्या मेडिकल कोलेजवर एकदा ‘न्युरोलोजी का घ्यायला हवं’?,’ त्याची आपल्या देशात किती गरज आहे’. ह्या विषयावर लेक्चर घ्यायला आला होता. त्यावेळी मी पहिल्या ओळीत बसून तुमचं लेक्चर ऐकलं होतं. त्याचदिवशी मी तुमच्या प्रेमात पडले.‌ मग तुमच्या बद्दल मिळेल ती माहिती वाचत राहिले. ”

ती जरा थाबली पाणी पिऊन पून्हा मोहितचा हात हातात घेऊन बसली.

” जेव्हा मी डॉक्टर झाले. तेव्हा ठरवून मी तुमचं हॉस्पिटल ईंटर्नशिपसाठी निवडलं. तुमच्या हाताखाली खरंच खूप शिकायला मिळालं. तुमच्या बरोबर वेळ घालवायला ही मिळाला. पण मी माझ्या भावना कधी व्यक्त करूच शकले नाही. तुम्हाला मी कितीदा तरी अडून अडून सांगायचा प्रयत्न केला. खर तुमच्या कधी हे लक्षात आलंच नाही.”

अस्मिताने हलकेच मोहितचा हात दाबत त्याच्या हातावर ओठ टेकवले.

” पण आज मी माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. मोहित माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. मला माझ सगळं आयुष्य तुमच्या बरोबर घालवायच आहे. इतके दिवस तुमच्या जवळ कोणी ना कोणी कायम असतं होतं त्यामुळं मला बोलायला मिळालं नाही. तुम्ही लवकर जागे होऊन मला मझ्या प्रश्र्नाच उत्तरं द्या. जरी ते ‘नाही’ असेल तरी चालेल पण तुम्ही जागे व्हा आणि मला तुमचं उत्तरं द्या.”

तिनं त्यादिवशी तो जागा होईल म्हणून वाट पाहिली पण मोहित काही उठला नाही. शेवटी एअपोर्टवर जाण्यासाठी ती जड पावलांनी बाहेर पडली. हे आठवल्यावर अस्मिताला परत एकदा भरून आलं. आपल्या कोणत्याच बोलण्याला काहीच प्रतिसाद न मिळालयाने ती निरशही झाली.

अस्मिता लंडनला जाऊन आता जवळपास सहा महिने होऊन गेले होते. या काळात ती तिच्या हॉस्पिटलमधल्या कलिग्जच्यां संपर्कात होती. पण डॉक्टर मोहित बद्दल कोणी काही बोलत नसे.

एक दिवस ती तिचे क्लासेस संपवून कॉलेजमधून बाहेर पडत असताना तिला डीनच्या ऑफिसमध्ये बोलावल्याचा निरोप मिळाला.
अस्मिता डीनच्या ऑफिसकडे गेली. तिथे गेल्यावर तिने ऑफिसच्या दारावर टकटक केलं,
परवानगी घेऊन आत गेली तेव्हा तिथे कुणीतरी आस्मिताकडे पाठ करून बसलं होत. तिने तिकडे फारस लक्ष दिलं नाही.

“हॅलो सर. आय ॲम अस्मिता देव. यू आस्क फॉर मी?”

तिचा आवाज ऐकून खुर्चीतली व्यक्ती जराशी चाळवली. पण वळली नाही. डिन अस्मिताकडे पाहून हसले.

” येस मिस अस्मिता प्लिज हॅव अ सिट. समवन ईज हिअर टू मिट यू.”

हे ऐकून आस्मिताच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती हळूच पुढे झाली आणि डीनच्या समोर दुसऱ्या खुर्चीत बसली. डीन नी त्या समोरच्या खु्चीत बसलेल्या व्यक्तीकडे हात करून अस्मितेची ओळख करून दिली.
” मिट डॉक्टर मोहित फ्रॉम इंडिया.”

हे नाव ऐकून अस्मिताने चमकून त्या व्यक्तीकडे निरखून पाहिलं. आणि तिला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. तिचे डोळे विस्फारले. घशाला कोरड पडली. आणि अचानक डोळ्यात पाणी तरळल. श्वासाचा वेग वाढला. कारण तिच्यापुढे दुसरं तिसरं कोणी नसुन मोहित बसला होता. तो तब्बेतीने खूपच खराब झाला होता. पण चेहऱ्यावरच तेज तसच होतं.

तिची ही अवस्था बघून मोहितने तिला पाणी दिलं. तीनं ही ते घेतल आणि एका घोटात संपवलं. हे पाहून मोहिताला त्याच हसू लपवता आल नाही.
त्यानं हात पुढे करत मिश्किल स्वरात अस्मिताला विचारलं,

” हाऊ आर यू डॉक्टर अस्मिता? आय डीडन्ट हियर यू फॉर अ व्हेरी लाँग टाईम. अँड आय मिस द्याट स्विट ह्वॉईस व्हीरीईई मच.” त्याच असं सूचक बोलण ऐकून अस्मिताला काय बोलावं तेच कळेना. ती कसबस,

” आ…आय… एम फा…फाईन. डॉक्टर मोहित. तू… तूम्हि ईथे कसें काय?” अस्मिता त्याचा हात हातात घेत बोलली.
तिचं चाचरण पाहून मोहित गालातल्या गालात हसला,

” आय एम हीअर टू मिट यू. डोन्ट यू शो मी अराऊंड युअर कॅम्पस?” हे विचारत त्याने डीन कडे पाहिलं आणि त्यांना विचारलं,

” मे वी टेक द लिव्ह सर. वी हॅव मच टू टॉक. वी डोन्ट डिस्टर्ब यू एनिमोर. थॅन्क्स फॉर द टाईम” एवढं बोलून तो उभा राहिला आणि त्याने डीन बरोबर शेक हॅण्ड केलं. मग अस्मीताकडे पाहत त्यानं तिला बाहेर चलण्याचा इशारा केला.

अस्मिता अजूनही त्याच्याकडे स्वप्नात असल्याप्रमाणे बघत होती. पण मोहित उभा राहिलेला पाहून ती भानावर आली. त्याच्यामागे ऑफिसच्या बाहेर आली. बाहेर येताच मोहितने तिचा हात हातात घेतला आणि तिला कॉलेजच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीकडे नेलं. गाडीजवळ गेल्यावर ती हळूच त्याच्याकडे वळली आता ती पूर्णपणे धक्क्यातून सावरली होती. तिने हळूच मोहितला विचारलं,

“मोहित तुम्ही इथं कसे? मी इथं आहे हे तुम्हाला कसं कळलं? आणि तुम्ही शुध्दीवर कधी अलात? मला कोणीच कसं काही बोलल नाही? ” मोहित तिच्याकडे वळला आणि म्हणाला,
” तू तुझ्या आवाजाची इतकी सवय मला लाऊन ठेवली होतीस की तुझा आवाज ऐकायच्या ओढीनं मी शुध्दीवर आलो. मग शुध्दीवर आल्यावर पहिले काही दिवस बोलायला येत नव्हतं. पण मी सगळ्या स्टाफला सांगितलं की तुला काही सांगू नका. तू इकडे आलीस त्यानंतर मी साधारण आठ ते दहा दिवसात शुध्दीवर आलो. नंतर मात्र रिकव्हरीला जरा वेळ लागला. ”

ते ऐकून अस्मीतानं त्याला अपादमस्तक न्याहळलं. ते पाहून मोहित ने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला.

“आता मी छान आहे. सगळ ओके आहे. मी इथे आलो कारण मला तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तू सांगितलं होतास ना तस!”

आता मात्र अस्मितेचे गाल थोडेसे लाल झाले. तो कश्याबद्दल बोलतो आहे हे तिला कळालं. तीनं लाजून खाली मान घालुन विचारलं?

” म्हणजे तुम्हाला सगळं ऐकू येत होतं मी बोललेल? ”

मोहिते ने तिचा चेहरा आपल्या हातात धरून वर केला आणि तिच्या डोळ्यांत बघत तो म्हणाला,

” होय अस्मिता तुझा शब्दन् शब्द मी ऐकला आहे. तू बोललेल प्रत्येक वाक्य मला आठवतं.
अस्मिता आज मी तुला सांगायला आलो आहे. हो… माझं पण तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि मला सुद्धा माझं सगळं आयुष्य तुझ्याबरोबर घालवायला आवडेल. हां आता इथे येऊन तू कोणा दुसऱ्याच्या प्रेमात पडली नसलीस तर.”

हे ऐकून अस्मिता गडबडीने पुढं होत म्हणाली,
” नाही नाही डॉक्टर, माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे.”
हे बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण काय बोललो ते आणि तिनं लाजून आपला चेहरा हातानी झाकून घेतला. हे बघून मोहित खूप मनापासून हसला आणि त्याने अस्मिताला आपल्या बाहुपाशात ओढलं.

मुग्धा कुलकर्णी ✍️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}