मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

“विसर्जन ‘ लेखक -प्रदीप केळुस्कर

“विसर्जन ‘ ही पन्नासावी कथा पाठवत आहें, गेल्या साडेतीन वर्षातील ही पन्नासावी कथा. या दरम्याने माझे दोन कथसंग्रह “एका पेक्षा एक ‘ आणि “माणिकमोती ‘प्रसिद्ध झाले व त्यांना पण जोरदार प्रतिसाद मिळाला.”एकापेक्षा एक ‘या पुस्तकाची पहिली पाचशे प्रति संपल्या आणि आता दुसरी आवृत्ती काढली आहें.
माझे यू ट्यूब चॅनेल वर माझ्या सर्व कथा माझ्या आवाजात ऐकायला मिळतील. म्हणून माझे चॅनेल subscibe करा.
यानन्तर माझ्या नवीन कथा येतच राहतील पण अनेकांच्या सूचनेनुसार माझ्या मागील कथाचा पुढील भाग मी लिहिणार आहें. मात्र तो भाग text स्वरूपात न लिहिता, यू ट्यूब चॅनेलवार माझ्या आवाजात ऐकू शकाल.
त्यामुळे माझी पहिली कथा ्जी यू ट्यूब वर रेकॉर्ड केलेली आहें, त्याचंच पुढे नवीन भाग असेल.
त्यामुळे ज्यांनी पहिल्या काही माझ्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या नसतील, त्याना मागील भाग व नवीन पुढचा भाग ऐकता येईल.

“विसर्जन ‘
लेखक -प्रदीप केळुस्कर
9307521152/9422381299

पहाटेचे पाच वाजले तसें काशिनाथरावांना जाग आली, ही त्यांची रोजचीच वेळ, आत उठून काय करायचे हा त्याच्यपुढे प्रश्न. बेडरूम मध्ये मुलगा प्रमोद आणि सून प्रणिता नातू आदर्श झोपलेले.काशिनाथराव आणि त्त्यांची पत्नी हॉलमध्ये,त्यांच्या पत्नीला गुढगेदुखी त्यामुळे ती वर कोचवर आणि खाली चटईवर काशिनाथराव.
काशिनाथराव चुळबुळ करत पडून राहिले, त्याना माहित होत, यावेळी आपण उठलो तर सर्वांच्या तोफखण्याला तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा गुपचूप पडून राहावे. चहा चा वास आला की हळूच उठावे, कोणी चहा दिला तर गुपचूप घ्यावा.
आपली परिस्थितीच तशी आली आहें किंवा घरातील इतरांनी आपली परिस्थिती घरातील झाडू सारखी केली आहें.काशिनाथ रावांनी निश्वास टाकला. पैसे न कमवणाऱया म्हाताऱ्या माणसाची परिस्थिती ही अशीच.
काशिनाथरावांची पत्नी उठली आणि तिने चहा ठेवला हे त्यांनी ऐकले आणि ते हळूच उठले आणि बाथरूममध्ये गेले, चहा झाल्यावर ती मुलाला आणि सुनेला हाक मारायला त्याच्या बेडरूम जवळ गेली आणि दारावर थापा मारू लागली, हे त्यांनी ऐकले. त्याना वाटले ती आता आपल्याला चहा देईल, या आशेवर ते कोचवर बसून राहिले. तोपर्यत सून उठली आणि चहा घयायला किचन मध्ये गेली. मग दोघीचे बोलणे त्यांच्या कानावर येत होते.
सून -घेवढ्याच्या शेंगा आहेत, त्याची भाजी करा आणि चवळीची आमटी करा. आदर्श च्या डब्यात दही साखर घालून आणि पोळी द्या.प्रमोद ला आज डबा नको, तो बाहेर जेवणार आहें, मी आंघोळ करून येते मग पोळ्या लाटूया.
सासू -हो, तू ये आंघोळ करून, तोपर्यत मी शेंगा सोलते.
सासू सुनेचे बोलणे काशिनाथराव ऐकत होते, पण आपणास उठून पंधरा मिनिटे झाली तरी दोघीपैकी कोणी चहा दयायचे नाव घेत नव्हते.
सून प्रणिता आपले कपडे घेऊन बाथरूम मध्ये गेली आणि धूसफासत त्त्यांची पत्नी आतमध्ये बडबडत होती
“चहा हवा तर आत मध्ये यायला काय होत, माझं पण वय झालंय, वय झाल तरी मिजास काही कमी नाही ‘अस बडबडत त्याच्या पत्नीने गार झालेल्या चहाचा कप त्याच्या समोर आदळाला.
“अग, पण तू आणि प्रणिता जेवणा संबधी बोलत होतात ना, मग मी आत कसा येऊ?’.
“ती पण सुनच ना तुमची,?आत उद्या पासून तिच्याकडे चहा मागा, माझं आत वय झाल लक्षात ठेवा ‘ अस बडबडत ती आत गेली.
काशिनाथरावांच्या मनात आले, सून चहा विचारत नाही आणि तिची सासू माझ्याकडे चहा मागू नका, सुनेकडे मागा, असे म्हंणते.
काशिनाथरावांना विल्स ओढायची त्तलभ आली, पण या घरात सिगरेट ओढायची बंदी. गेली पन्नास वर्षे आपण सिगरेट ओढतोय, रोज दोन पाकिटे अनेक वर्षे.मग डॉक्टर सूचनेनुसार कमी केले, हळूहळू रोज एक पाकीट, मग दिवसाला सहा, आत दिवसाला चार, पण तेव्हडी पण ओढू देत नाहीत. एकदम व्यसन कसे सुटेल?
काशिनाथरावांनी तल्लभ मारून टाकली, आत खाली पाय मोकळे करायला जावे, तेंव्हा एक ओढावी आणि एक पेपरमिट खाल्ले म्हणजे वास येणार नाही, त्त्यांची ही नेहेमीची आयडिया.
त्यांनी तो कोमट चहा प्याला आणि कप आत नेऊन ठेवला,आत बायको चपातीच पीठ डब्यातून काढत होती.
तिने त्याला पहिल्याबरोबर टोमणा मारला “आत काम ना धाम, चपात्या करायला शिकायला हरकत नाही, नुसत्या सिगारेटी फुकून जेवणं कस मिळायचं?
काशिनाथरावांचा संताप संताप झाला, पण आलेला राग त्यानी गिळून टाकला. आपण चिडून काही बोललो तर दुपारचे जेवणं मिळायचे नाही, त्या खेरीच अजून टोमणे ऐकावे लागतील, त्यापेक्षा गप्प बसणे केंव्हाही बरे.
ते गप्प बसले, आंघोळ करायची होती पण आता मुलगा प्रमोद उठण्याची वेळ म्हणजे तो आत उठेल, मग त्याची आई नाहीतर बायको त्याच्या हातात गरम चहा देतील, मग साहेब पेपर वाचतील आणि अंघोळीला जातील. मग साहेबनाश्ता करून डबा घेऊन बँकेत जातील.
तो बाथरूम मधून बाहेर येईपर्यत आपल्याला वाट पहात रहावे लागेल, हे त्याना माहित होत. तोपर्यत चहा प्याल्यामुळे आलेला नैसगिक ” कॉल ‘थोपवत कोचवर बसायचं.
काशिनाथरावांना रोज आंघॊळी नंतर देवपूजा करावी लागे, ही त्यांना शिक्षाच वाटे. आयुष्यात आपण देव देव कधी केल नाही.देवळात आवडीने कधी गेलो नाही.लोक देवळाबाहेर का एवढ्या रांगा लावतात याचे त्याना आश्चर्य वाटे. ्जी मूर्ती कधी हालत नाही, बोलत नाही, श्वास घेत नाही, नैवेद्य दाखवतात तो कधी खात नाही. तरीपण नवीन नवीन देवळे बांधली जातात.
काशिनाथरावांना वाटे या पेक्षा स्वामी विवेकानंद, साने गुरुजी किंवा बाबा आमटे अशी माणसे, ज्यांनी या भूमीत जन्म घेतला आहें,ज्यांनीसामान्य माणसासाठी खुप काही करून ठेवले आहें, त्त्यांची पूजा करावी किंवा त्यांची देवळे उभारावी.हे असे त्यांना वाटले तरी आंघोळीनंतर देव्हऱ्यातील देवांची तेंच पूजा करत.
काशिनाथरावांनी आंघोळ केली आणि ते देव पूजेला गेले. त्यांना देवाची आवड नाही, हे त्यांच्या पत्नीला माहित होते, त्यामुळे ती लक्ष ठेऊन असे. आज पण त्यांनी देव ताम्हणात घेऊन धुतले आणि तोंडाने “ॐ केशवन., माधवन. म्हणू लागले. खरं तर त्याना तेवढेच स्तोत्र यायचे, त्यामुळे हे दोन शब्द मोठ्याने म्हणायचे आणि बाकी नुसते काहीतरी पुटपुटायचे. बाहेर कान धरून राहिलेल्या बायकोला वाटले पाहिजे, स्तोत्र म्हणत आहेत असे.
तोपर्यत प्रमोद नाष्टा करून गेलेला असे आणि सून ्जी बालवाडी शिक्षिका होती, ती पण आपला नाश्ता करून डबा घेऊन घेऊन घराबाहेर पडे.
पूजा आटोपल्यावर काशिनाथराव गॅलरीत आले. या लहानशा प्लॅटमध्ये त्यांना ही एक हक्काची जागा वाटे.दुसऱ्या मजल्यावरून खालचे जग त्यांना दिसायचे, त्याना भूख लागली होती, किचनमध्ये जाऊन पत्नीला म्हणावे तर ती मांजरीसारखी फसकन अंगावर येणार, त्यापेक्षा वाट पहावी कोणी बोलावते काय ह्याची.
मुलगा आणि सून कामावर गेली तशी त्यांच्या बायकोने बशीतून पोहे आणून दिले.कोचवर बसून काशिनाथराव खाऊ लागले, तशे ती बोलू लागली
“बिल्डिंग मधील बायका दक्षिण भारताच्या ट्रिप वर चालयात, पण आमच्या नशिबात नाहीना..’
“मग तू पण जा, तेव्हडाच बदल..
“हो जा म्हणे, पैसे कुठून आणू? नोकरीं करत होतात तेंव्हा पैसे फिक्स्ड मध्ये नाहीतर जाहिरात दाखवतात काय ते कसलासा फण्ड मध्ये ठेवला असतांत तर आत कुणाकडे हात पासरायला नको होते ‘ती मुसमूसत म्हणाली.
“त्यावेळी पगार कसले? रोजची फिरती माझी. त्या पगारात घरभाडे, लाइटबील आणि घरखर्च करून पैसे उरायचे काय?
“मग सिगारेट्स कमी ओढायच्या? आणि दारू..
“सिगारेट चा असा कितीसा खर्च. आणि रोज टूर करणाऱ्या माणसाला काही तरी विसावा हवा की नको ‘.
पैसे प्रमोद ला विचार?
“तो काय देतो? प्रणिता रोज पैसे पुरतं नाही, म्हणून चिडचिड करत असते ‘.
एवढ्यात त्त्यांचा नातू शाळेतून आला म्हणून ते दोघे गप्प झाले.
काशिनाथराव गॅलरीत आले, आपल्या नातवाला सुद्धा आपल्याबद्दल ओढा नाही. घरात आपल्याला कोण जवळ नाही मग त्याला तरी कशी ओढ वाटणार? आपण वयाच्या साठ वर्षापर्यत नोकरीं केली पण साबण, तेल बनविणाऱ्या कंपनीत सेल्स माणूस म्हणून.रोजची टूर, कधी मराठवाडा, कधी विदर्भ, कधी कोकण.
आपले काय चुकले याचा ते विचार करत राहिले, मुळात आपल्याला गाव नाही.. ही हुरहूर त्यांना आयुष्यभर पोखरत राहिली. आपले गाव होते चंदगड जवळ, पण आपल्या वडिलांनी चुलत्याबरोबर भांडण केले आणि आपण गावाला कायमचे मुकलो. गाव असता तर गावी जाऊन राहिलो असतो, या प्रमोद च्या संसारात अडकलो नसतो आणि अपमानाचे जिणे जगलो नसतो.
दुसरी आपली चूक म्हणजे आयुष्यात भाड्याच्या घरात राहिलो, स्वतःची जागा घेऊ शकलो नाही. पगार तुटपुंजा, त्यामुळे ते जमलेच नाही, त्यामुळे या वयात स्वतःच्या नावावर एक इंच पण जमीन किंवा घर नाही.
प्रमोद फार हुशार नव्हता, त्यामुळे तो जेमतेम B. COM. झाला, त्यामुळे त्याला काशीबशी छोटया अर्बन बँकेत नोकरीं मिळाली, पण स्वतः ची जागा नाही म्हणून त्याचे लग्न होत नव्हते. त्याचसुमारास आपण निवृत्त झालो, मिळालेला फण्ड बायकोच्या सूचनेनुसार त्याच्या हवाली केला, या शहरात जागा घयावी म्हणून, त्या पैशात आणि त्याच्या बँकेकडून मिळालेल्या कर्ज मिळवून त्याने ही जागा घेतली, त्याच्या नावावर. मग वर्षाने त्याचे लग्न झाले त्यात आपल्यकडील थोडे होते पैसे संपले आणि आपण उघडे पडलो.
प्रमोदच्या नावावर घर झाले त्यामुळे तो आणि त्याची पत्नी शिरजोर झाली, ती दोघ आपल्या पत्नीला संभाळून असतांत कारण तिने त्याच्या मुलाला सांभाळले. शिवाय तीच घरातील जेवणं, भांडीकुंडी करते, म्हणजेच त्याना मोलकरीण ठेवण्याची गरज नाही.
आपणाला जेवणं करता येत नाही, काही शिकावे म्हंटले तर त्या दोघी आपल्याला घरात घायचंय नाहीत आणि आता या वयात शिकण्याची उमेद ही नाही.एकांदरीत आपला त्याच्या संसाराला आपला उपयोग नाही, आपल्याला पेन्शन मिळत असती तर?
इतरांसारखी आपली नोकरीं नव्हती त्यामुळे इतर नवऱ्यासारखे बायकोल स्कूटर वर मागे बसवून आपण फिरू शकलो नाही किंवा मुलाला शाळेतून आणायला गेलो नाही, शनिवारी रात्री टूरवरून येणे आणि परत रविवारी रात्री दुसरी बॅग घेऊन दुसऱ्या टूर वर निघणे, यामूळे मुलाला आपला लळा लागला नाही, सर्व खर्च आईच करत होती, त्यामुळे त्याला आई एवढे पैसे मिळविते असे वाटले असेल. पण घाम गाळून आणि पायी, सायकल चालवत मी अनेक गावे घेत होतो, कंपनीला धंदा मिळवून देत होते, त्याबदल्यात कंपनी जो पगार देत असे तो त्याच्या आईच्या हातात देत होतो, याचीच त्याला कदाचित कल्पना नसेल.
प्रमोद ची बायको प्रणिता, आपला नवरा आपल्या बापाला किंमत देत नाही शिवाय आपला सासरा काही कमवत नाही हे ती पहाते आहें, मग ती का किमत देईल?
आपल्या नातवाला सुद्धा आपल्याकडे देत नव्हते त्याच्या लहानपणी, आपण त्याच्यावर माया केली ती लांबून. मग त्याला कसे आपल्याबद्दल प्रेम वाटेल?
अशा कोंदट वातावरणात त्याच्या डोळ्यासमोर आली सुलभा.त्याना सहा महिन्यापूर्वीची संध्यकाळ आठवली.
सहा महिन्यापूर्वी….
काशिनाथराव रोज संध्याकाळी नदीकडे फिरायला जात. नदीचा घाट ज्या बाजूला होता त्याच्या विरुद्धबाजूला. नदीच्या घाटाच्या बाजूला जास्त गर्दी असायची. फिरायला येणारी जोडपी, वृद्ध लोक, तसेच क्रियाकर्म करणारे. गणपती विसर्जन पण त्याच बाजूला.
नदीच्या या बाजूला फार गर्दी नसे. तुरलक लोक असत.काशिनाथराव म्हणून मुद्दाम या बाजूला येत, एक विल्स ओढत, नदीकडे पहात आपला कोंडमारा तिला सांगत. दिवसातला हा एक तास त्यांचा असे. गेले आठ दिवस त्यांच्या लक्षात आले की एक पसतीस चाळीस वर्षाची लग्न झालेली स्त्री रोज त्याच बाजूला बसे. रोज अंदाजे अर्धा तास ती तेथे असे. नदीकडे पहात हळूच पदर डोळ्याला लावी.
गेले आठ दिवस रोजच ती एकटी येई. कधीही तिचा नवरा सोबत दिसत नसे.काशिनाथरावांना आश्यर्य वाटे. एकदा धाडस करून त्यानी तिला विचारले
“अहो बाई, तुम्ही रोज एकट्या कशा काय नदीवर येता? तुमच्या घरी कोणी सोबत नाही काय?
“माझा नवरा आहें पण तो कामाला आहें कंपनीत, तो साडेसातला येतो, त्या आधी मी घरी पोहोचते.
“मी तुम्हला पहातो, तुम्ही एकसारखा पदर डोळ्याला लावत असता, तुम्हला कसला त्रास आहें का ‘.
“काय सांगू, माझं फुटक नशीब त्याला दोष देत असते मी ‘.
“काय झाल? मला सांगाल काय? मी पण रोज इथे या नदीपाशी येतो, माझं नशीब सांगायला ‘
“तुम्हाला कसला त्रास आहें काय, तरी मी पहाते तुम्ही सिगरेट ओढत अधूनमधून डोळे पुसत असता ‘
“होय, आहें बाई, कुटुंबात कोण विचारत नाही मला बायकोसकट. मला पेन्शन नाही, कंपनीकडून मिळेलले पैसे मुलाला दिले ब्लॉक घ्यावा म्हणून,आतां मी कफ्फलक झालो आहें, कुणालाच प्रेम नाही माझ्याबद्दल.तुझं काय? तुझं माहेर असेल ना?
“होत, माझ्या सावत्र आईने विकलं मला आणि बिजवराच्या गळ्यात बांधलं, माझा नवरा आहें दुप्पट वयाचा. पहिल्या बायकोला मूल झाल नाही म्हणून सोडल तिला. माझ्या सावत्र आईचा भाऊ तो. माझे बाबा गेल्यानंतर तिने आपल्या भावाशी माझा पाट लाऊन दिला, पाच वर्षे झाली मला पण मूल झाल नाही, म्हणून छळतोय तो मला ‘.
एव्हडयात तिला आठवण झाली.
“जाते मी, साडेसातला येईल तो, त्याच्या आधी घरी पोचायला हवं ‘
अस म्हणत ती उठली आणि झापझप अंधारात नाहीशी झाली.
ती गेली त्या दिशेने ते पहात राहिले. अस मनापासून बोलणारे आपले तीन मित्र होते. अश्या, मोहन आणि आपा.
अशया आणि मोहन आधीच वर गेले, राहिला आपा. आपा फोनवर बोलतो अधूनमधून. म्हणतो ये मुंबईत, पण आपल्यकडे जायला यायला पैसे कुठे आहेत? आपा म्हणतो, वृद्धाश्रमात जा, तुझा खर्च मी करतो, त्याला पेन्शन आहें म्हणून तो म्हणतो, पण तो आपल्या आधी वर गेला तर? मग?
नकोच ते.
दुसऱ्यादिवशी काशिनाथराव नदीवर गेले, थोडयावेळाने ती स्त्री आली, येताना वाटी घेऊन आली, त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यानी पाहिले, वाटीत खरवस होता. कितीवर्षांनी त्यानी खरवस खाल्ला.
मग ती रोज काहिबाई आणत राहिली. कधी दुधीहलवा, कधी कुंदा…
काशिनाथरावांना कळेना, आपण तिला काय द्यावे? त्याच्या खिशात फारच थोडे पैसे असत. नदीकडे येताना त्याना एक फुलवाला दिसला, त्यानी ठरवले मोगऱ्याची वेणी घ्यावी, आज सिग्रेट घेऊ नये, ते पैसे वेणी साठी वापरावे.त्यानी मोगऱ्याची वेणी घेतली, नदीवर ती आली असताना तिला दिली. ती खूपच खूष झाली.
“मी तुझं नाव विचारलं नाही अजून ‘
“मी सुलभा, माहेरची सुलभा विचारे. कोकणात मालवण जवळ माहेर माझं ‘आणि मग ती मालवणबद्दल आणि तिच्या माहेरबद्दल सांगत राहिली. तीच बोलण ऐकत राहावे असे कशिनाथ रावांना वाटले.
घरी जाताना तिने केसात माळलेली वेणी परत त्याच्या हातात दिली.
“नवरा बघेल तर कोणी दिली म्हणून खडसावेल ‘.
ती वेणी हातात घेऊन ते खुप वेळ तिच्या वाटेकडे पाहत राहिले.
मग रोज संध्याकाळी सुलभा येत राहिली, गप्पा मारत राहिली, येताना कधी लाडू कधी एखादा खायचा पदार्थ आणत राहिली, काशिनाथराव तिला एखाद फुल देत राहिले.
खुप वर्षांनी काशिनाथरावांना जीवनात आनंद आहें, असे वाटू लागले होते, संध्याकाळ झाले की त्यांची पाऊले नदीकाठी वळू लागली होती.
असेच सहा महिने गेले आणि सुलभा यायची बंद झाली, काशिनाथराव तिची वाट पहात राहिले, एक दिवस.. दोन दिवस.. आठ दिवस. सुलभाचा पत्ता नव्हता.
काशिनाथराव अस्वथ झाले, गेली कुठे सुलभा? त्यांना आठवले तिने आपण वृंदा दूध डेअरी च्या मागे राहतो अस म्हंटल होत.वृंदा डेअरी चें मालक कुलकर्णी आपल्यावर मुलीप्रमाणे प्रेम करतात असे ती म्हणाली होती, हे त्यांना आठवले.
दुसऱ्या दिवशी त्यांची पावले वृंदा डेअरी कडे वळली. ते कुलकर्णीच्या समोर उभे राहिले.
काशिनाथराव -अहो, या बाजूला सुलभा नावाच्या बाई राहत होत्या, त्या कुठे गेलय तुम्हांला काय माहिती आहें का?
कुलकर्णी -होय, सुलभा आणि तिचा पाठीमागे राहतात. पण सुलभाचा नवरा विक्षिप्त आहें, वयाने पण मोठा.हल्ली तो तिच्यावर चिडला होता. ती नदीवर फिरायला म्हणून जायची तेंव्हा कुणाबरोबर तरी बोलत बसायची अशी त्याला बातमी कळली. शेवटी त्याने तिला खुप मारले आणि त्याच्या गावी मला वाटते राजापूर जवळ पाठवून दिले. आता ती परत यायची नाही. जाताना ती मला भेटली, तिचे तोंड सुजले होते. खुप रडत होती.तुमची तिची कशी ओळख?
काशिनाथराव -मीच तो नदीवर तिच्या सोबत गप्पा मारणारा. कुलकर्णी, मी आता आजोबा झालोय. माझ्या घरात माझ्याशी कोण प्रेमाने बोलत नाही, सर्वाना मी नको झालोय, मी नदीवर फिरायला जातो, तेंव्हा ही नदीकडे पहात रडत पदर डोळ्याला लावताना दिसायची. मी तिची आस्थेने चौकशी केली. तिने तिची दुःखे मला सांगितली, मी माझी सांगितली, एवढेच.
कुलकर्णी -हो मला कल्पना आहें, ती मला सर्व सांगायची, मोकळ्या स्वभावाची आहें ती. पण या धटिंगणाच्या तावडीत सापडली. मला सर्व समजत होते पण शेवटी ती त्याची बायको होती. सुलभा मला सांगायची, काकांना म्हणजे तुम्हाला खरवस फार आवडतो. ते म्हणजे तुम्ही कदाचित तिची चौकशी करत इथे आलात, तर त्यांना खरवस द्या.
कुलकर्णीनी प्रीझ उघडून भांडे काढले आणि एका बशीतून खरवस त्यांच्या हातात दिला.
डोळे भरून आलेल्या काशिनाथरावांनी सुलभाची आठवण काढत तो खरवस खाल्ला आणि त्यानी कुलकर्णीचा निरोप घेतला.
काशिनाथराव आताशा निराश असायचे. घरची माणसे परक्यासारखी वागत होती, जवळचे दोन मित्र देवाघरी गेले होते,एक मित्र त्यांच्यासारखाच मुलाच्या घरात अडकला होता, खिशात पैसे नसायचे, मनमोकळे बोलावे अशी सुलभा होती, ती पण आता येणार नव्हती.
पावसाळा सुरु झाला, नदी दुथडी भरून वाहत होती. आता रोज नदीवर जाणे पण शक्य होत नव्हते. त्त्यांचा जीव घुसमटून गेला होता. कुणाशी मोकळेपणाने बोलावे असे कोण दिसत नव्हते.
गणपती आले, त्याच्या घरात गणपती येत नव्हते, पण गावात घरोघरी आणि सार्वजनिक गणपती बसले होते. काकांना गणपतीचे फारसे सोयरेसुतक नव्हते, पण त्याच्या घरची माणसे गणपती पहायला जायची.
सार्वजनिक गणपती विसर्जनाचा दिवस आला. घरची माणसे कुणाकडेतरी जेवायला जायची होती, बायकोने त्यानां गार झालेलं उप्पीट दिले, ते खात असताना अचानक त्यांच्या नातवाने आदर्शने टप्पा बॉल खेळता खेळता बॉल त्याच्या चषम्यावर मारला. एक क्षण भर त्यांना तिडीक आली आणि एक फटका आदर्शवर मारला. आदर्शने मोठ्याने भोकाड पसरले आणि घरातील सर्व त्यांच्यावर तुटून पडले.
प्रणिता – काही वाटतं नाही का लहान मुलाला मारताना? केव्हड्याने मारलं माझ्या बाळाला. तुमच्यकडून मार खायला जन्म घेतला नाही त्याने.
प्रमोद -रिकामटेकडे झाला आहात तुम्ही. काहीतर्री कामे करा. गप दोन वेळ घालतोय ते खायचे सोडून…
बायको -म्हाताऱ्या माणसाने कशाला लहान मुलाच्या खेळत पडावं, वेळ जात नसेल तर भांडी घासून द्या नाहीतर देवाचे स्तोत्र म्हणा..
एकापाठोपाठ त्यांचेवर आरोप सुरु झाले. त्यांनी कान बंद करून घेतले.
त्यांना मित्रांची आठवण झाली, मित्र असते तर त्यांच्याशी बोललो असतो. सुलभा होती तेंव्हा तिच्याशी बोलता यायचं.सुलभा पण गेली.
म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी बोलणार हवं असत. कोणी तरी त्याच ऐकणार हवं असत. आपल्याशी बोलणार कोणी नाही राहील, ऐकणार कोणी नाही राहील. कशासाठी आणि कुणासाठी जगायचं…
सायंकाळी गणपती विसर्जन सुरु झाल… गावात ढोलाचे, ताशाचे आवाज घुमू लागले. काशिनाथरावांच्या घरची सर्व मंडळी कुणाकडे तरी जेवायला गेली होती. सायंकाळ झाली तशी त्त्यांची पावले नदीकडे चालू लागली. वाटेल त्यानी एक विल्स घेतली, फुलवाल्याकडून मोगऱ्याचा गजरा घेतला.
गणपती विसर्जन नदीच्या घाटाकडे येत होते.
“मोरया रे बापा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे..’
काशिनाथकाका नदीशेजारी आले. नदी दुथडी भरून वाहत होती. त्यानी सिग्रेट काढली, त्याचे मोठे मोठे झुरके घेतले. ज्या ठिकाणी सुलभा बसायची तेथे त्यांनी मोगऱ्याची वेणी ठेवली.
एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि नदीच्या दिशेने चालू लागले.
दुसऱ्या घाटावर जोरात विसर्जन सुरु होते. फटाके फुटत होते. झंजी मृदंग वाजत होते. भाविक मोठया आवाजात म्हणत होते.
“गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला ‘
काशिनाथराव पाण्याच्या दिशेने चालले होते, पाणी गुढगाभर झाले, अजून पुढे पुढे…
दुसऱ्या घाटावरचे विसर्जन सुरूच होते.. सुरूच होते.
प्रदीप केळुस्कर 9422381299/9307521253

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}