Classified

दान

दान

एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.
या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.
तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.

अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.
अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.

तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.
माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.
चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.

अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.

आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.

अर्जुन म्हणाला “प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?”
हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.

तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा?
चालत असतांना त्याची नजर एका मासेमा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक
छोटा मासा तडफडत होता. माणसाने विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.

सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.

प्रभूची लीला पाहा…. माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.
तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला “सापडला, सापडला”
नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.

त्याने माणसाला “सापडला सापडला” असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला. चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.
हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला “जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले”

श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो”.

तात्पर्यः 👉
“दान घेण्यात वाटणारे सुख हे क्षणिक असते; परंतु दान देण्याने जे सुख प्राप्त होते ते जीवनभर पुरत असते”.

🙏श्री गुरुदेव🙏

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}