वाळवणं…..
@सौ विदुला जोगळेकर
पाडव्याची लगबग संपली की आईआजीची वाळवणं करायची घाई सुरु व्हायची.नेमक्या आमच्या शालेय वार्षिक परीक्षांची वेळ त्या दोघी साधत.सरधोपट पणे म्युन्सिपाल्टीच्या शाळेतले आमचे शिक्षण!
आमची लुडबुड तशीही त्यांना नकोच असायची.तेंव्हा आतासारखे मिक्सर वगैरे नव्हतेच कुणाकडे…नवा आलेला गहु..भरपूर सत्व असलेला तीन दिवसासाठी भिजत रहायचा.तांब धरलेलं पाणी दोघी एकमेकींच्या मदतीने दोन दिवस बदलत.गल्लीतून अधुनमधुन कल्हईवाला ओरडत जायचा…मोकळी जागा बघून त्या कल्हईवाल्याची भट्टी लागायची…मोठमोठी पितळी पातेली माळ्यावरुन खाली यायची.गल्लीचा सार्वजनिक कल्हई लावायचा कार्यक्रम मस्त रंगायचा.कल्हईचा विशिष्ट गरम वास…मनभर रेंगाळत राहायचा.भिजलेला गहू पाटावरवंट्यावर बारीक करुन शुभ्र पंचातून दोघीजणी गाळून घेत.वरचा गव्हाचा लालसर थर वारंवार गाळून,पाणी बदलून पांढराशुभ्र सत्व भाग पातेल्याच्या तळाशी बसायचा.आम्ही वह्यापुस्तकांच्या आडोशाने त्यांची लगबग बघत असायचो.शिजलेल्या नेमक्या आंबट वासानेच आमची सकाळ उजडायची..पांढर्याशुभ्र कुरडया अंगणात पलंग/बाजेवर विराजमान झालेल्या असायच्या.शेजारीपाजारी चीक वाटायचे वाटे पण तयार असायचे.ते पोहचवण्यासाठी मात्र त्या आमची मदत घ्यायच्या.पातेल्याची खरपुस खरड सांडगे तोडून कुरडयाच्या मधेमधे उठून दिसायची.दुपारी दोघी झोपल्या की..अभ्यासाचं पुस्तक घेउन हि वाळवणं राखायचं काम आम्हां पोरांवर.त्यावेळी येताजाता ते अर्ध ओले सांडगे आम्ही एकमेकांत वाटून फस्त करायचो…वर्षे उलटून गेली तरी त्याची चव अजुनही जिभेवर रेंगाळते…
चीक काढुन उरलेल्या चोथ्याच्या सालपापड्या मला तर कुरडयांच्या सावत्र बहिणीसारख्याच वाटायच्या.नेमकं सत्व काढुन घेतलेल्या त्या चोथ्याला जीरं,तिखटमीठ घालून त्या दोघी छान नटवायच्या.वाया काही जाउ द्यायचं नाही हे एकच तत्व.बटाट्याचा किस,कडधान्यांचे सांडगे.शाबुदाण्याच्या पळीपापड्या…आमच्या परीक्षेच्या दिवसांचं आकर्षण असायचं.इतकं नेटकं,निगुतीने केललं वाळवण…दुपारी आमच्या ताब्यात देउन त्या खुशाल झोपून जायच्या.वळवाचा पाउस,पाखरं यापासुन वाळवणं जपायचं म्हणुन
आम्ही हातात काठी घेउन…येताजाता..तो अर्ध ओला चटकदार मेवा अलगद फस्त करायचो.
आता डाएटच्या नावाखाली हे सगळे घरगुती पदार्थ करण्यात कमीपणाचे वाटायला लागले आहे.
मला वाटतं आताची लहान पिढी किती साध्या पण मजेशीर गोष्टी हरवून बसलीय.
आमच्या वार्षिक परीक्षेची छान सोबतीण होती हि वाळवणं म्हणजे.त्यामुळे कधी परीक्षेचा बाऊ आम्हालाही वाटला नाही…आणि आईबाबांना तर नाहीच नाही…. परीक्षा झाल्या…रिझल्ट ही लागले…फक्त पास का नापास यावर तरलेली आमची पिढी फार समृद्ध आयुष्य जगली…असं मला नेहमीच वाटतं.
आमच्यातलं तरल चैतन्य आजही जिवंत ठेवायला हे बालपण,तरुणपण आणि प्रौढत्व ही खुपदा कारणीभूत ठरतय हे मात्र नक्कीच!
कारण गोष्टी आम्ही खुपदा अनुभवल्याच….माहिती मात्र वाचली ऐकली.
@सौ विदुला जोगळेकर