सुखी माणसाचा सदरा…
सुखी माणसाचा सदरा….
रस्त्याच्या कडेला झगमग करणाऱ्या दोन-चार दुकानांच्या पुढे वळणावर,पंधरा-सोळा वर्षाचा मुलगा शर्ट विकत होता. कधी १०० ला एक तर कधी २०० ला तीन ओरडताना तो दिसायचा. संध्याकाळी साधारण पाच ते नऊ दरम्यान,मी त्याला न चुकता गेली सहा महिने तिथे बघत होतो.अतिशय बोलका आणि मनमिळावू असल्याने त्या चादरीवर मी एखादा शर्ट दोन आठवड्याच्या वर कधी पाहिला नाही.
त्याच्या परिस्थितीची काजळी त्याच्या पेहरावावर कधीच दिसली नाही पण स्व:कष्टाचा स्वाभिमान हा मात्र त्याच्या चेहर्यावर एखाद्या दागिन्यासारखा लख्ख चमकत असायचा.
कधीकधी आमचा एकमेकांना हाय-बाय ही व्हायचा पण गेली दोन-तीन दिवस झाले ना ती चादर दिसली ना तो.
कुतुहल म्हणून त्याच कोपऱ्यावरच्या चहावाल्याला विचारलं,म्हणाला,”दोन-तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण पथकानं त्याचं दुकान उचललं.म्हणे पाच सहा हजाराचा माल होता. बिचाऱ्या पोराचं नुसकान!पण कधीतरी हे होणारचं होतं,दुसऱ्याचं चांगलं थोडीच बघवतं हितं,जाऊ दया,चहा घेणार का?”
चहाचे दोन-तीन घोट शांततेत गेले.मी त्याच्या शाळेचा पत्ता काढला.दुसऱ्या दिवशी सुट्टी टाकून शाळा गाठली.समजलं की ती रात्र शाळा आहे म्हणून,तिथून त्याच्या घरचा पत्ता काढला आणि तडक त्याचं घर गाठलं.जेमतेम बारा x पंधरा ची एक खोली.त्यात तो आणि त्याचे चार मित्र हसत-खेळत,जोक्स करत बसले होते.मला आश्चर्य वाटलं.मला बघून पटकन पुढे आला,म्हणाला “नमस्कार सर,इकडे कुठे?”.
मी-“अरे तू दिसला नाही,म्हणून आलो.दुकानाचं काय झालं?”.
तो- “सर,सेटलमेंट केली.दहा शर्ट सोडून,उरलेला सगळा माल मागच्या दुकानदाराला चार हजाराला विकला.”
मी थोडासा चक्रावलो मग तो म्हणाला,”सर,२-४ आठवडे खेपा मारायच्या,रात्रीची शाळा बुडवायची,दिवस दुःखात घालवायचा,यापेक्षा एक दोन हजाराचं नुकसान परवडलं.”
“अरे,पण मग तू कमावलंस काय ?” मी त्याला प्रश्न केला.
“सर,घामाचा आनंद आणि माणसं कमावली तुमच्यासारखी.आज तुम्ही दहावे व्यक्ती जे माझ्या घरापर्यंत पोहोचले”.
मी त्याच्या व्यवहार बुद्धीने आधीच अवाक झालो होतो त्यात पंधरा सोळा वर्षाच्या मुला कडून हे वाक्य आल्यानं ओशाळलो सुद्धा.त्याच्याबरोबरचीे सगळीचं मुलं अगदी खुशीत आणि त्याच्या सारखीेच आनंदी दिसत होती.या चौघांच्या अंगात कधीतरी त्याच्याच चादरीवर पाहिलेले शर्ट दिसत होते.त्यांच्या अंगावर ते आणखीनच खुलून दिसत होते.
“आता पुढे काय?” मी त्याला थेट प्रश्न केला.
“आता…दुसरं काहीतरी विकू. नाहीतरी शाळेला सुट्टी लागणारचं आहे,आम्ही पाच जण मिळून भेळ-पाणीपुरीची गाडी टाकू,तेवढेच दोन-तीन महिने निघतील”. अगदी सहजपणे त्यानं पोटापाण्याचा प्रश्न सोडवला.मी निशब्द होतो…
न राहवून मी त्याला प्रश्न केला, “काही मदत हवी का?”त्याच्या अनपेक्षित उत्तराने मी उडालोच. “सर,नक्कीच लागेल.पण आज नाही उद्या कधीतरी, ज्या वेळी मी पूर्ण हरलो असेन.आज एवढीच प्रार्थना करा की तो दिवस कधीच येऊ नये.” मनमोकळेपणाने हसला. एकाच वेळी संभ्रम आणि अनेक विचार मनात घेऊन मी उभा होतो आणि तो अविचल आणि निश्चिंत उभा होता.
शेवटी निघता निघता मी त्याला प्रश्न केला,”त्या,दहा शर्टचं काय केलं?”म्हणाला,”चार तुम्ही इथे बघताच आहात,पाच अतिक्रमण पथकाला वाटले आणि एक तसाच आहे.” मी पटकन म्हणालो,”मला तो देशील?”
पुढच्याच क्षणी पैसे देऊन मी त्याच्या घरातून बाहेर पडलो.मी त्याला काहीच देऊ शकलो नाही पण तरीही एक वेगळा आनंद, एक प्रसन्नता मला स्वतःला जाणवत होती,कदाचित त्याचं कारण…
आज मला “सुखी माणसाचा सदरा” गवसला होता.
🙏🏻 शुभ दिवस. 😊🌹