मंथन (विचार)मनोरंजन

सोशल….. ©मंदार जोग

सोशल…..

©मंदार जोग

वार मंगळवार, वेळ सकाळचे नऊ. आमच्या घरात प्राईम टाईम. कन्येला सकाळी कॉलेजात पाठवण्याचं एक युद्ध जिंकून आमची पत्नी माझी ऑफिसात रवानगी करून स्वतः कॉलेजला जायचं नवीन समर लढण्यात गर्क. मी आज क्लायंट ऑफिस मध्ये यायच्या दिवशीच नेमका शेव्हिंग फोम संपल्याचे लक्षात आल्यावर अंगाला लावायच्या साबणाने वेळ मारून न्यायला साबण शोधल्यावर तो बाथरूम मध्ये न मिळाल्याने टॉवेल गुंडाळून तसाच बाहेर येतो. साबण कन्येने दुसऱ्या बाथरूम मध्ये नेल्याच सांगून बायको हात झटकते. मी चरफडून दुसऱ्या बाथरूम मध्ये साबण घ्यायला जाणार इतक्यात घराची बेल वाजते. मी घरात असताना आमच्या बायकोला बेल कधीच ऐकू येत नाही ह्या नियमानुसार मी गाडी धुणारा गाडीची चावी द्यायला आला असेल ह्या अपेक्षेने दार उघडतो तर दारात दादा गद्रे!
दादा- काय ओळख आहे ना? की विसरलास?
मी- बास काय? दादा गद्रे ना?
दादा- अरे वा. स्मरणशक्ती छान आहे तुझी एमजे.

माझ्या काही जवळच्या मित्रांव्यतिरिक्त मला एमजे म्हणणारे पण फारसा संबंध नसलेले दादा गद्रे आत येऊन बसले.
गद्रे- रोज सकाळी भिजवलेले पाच बदाम सालं सोलून खात जा. काय बिशाद काही विसरशील.
मी- (हळूच भिंतीवरच्या घड्याळात बघत) आपण आत्ता कसे सहज की काही काम?
दादा- अरे काही नाही. तुझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये आलो होतो. म्हटलं भेटू तुलाही. अंघोळ झाली की व्हायची आहे?
मी- जातच होतो.
दादा- मग जा. अंघोळ पहाटे करावी रे. मी गेली साठ वर्ष साडेचारच्या गजराला उठतो. पन्नास सूर्यनमस्कार, प्राणायाम करून तांब्याच्या पातेलीत ठेवलेलं पाणी पितो. काळ्या खजुराचे चार तुकडे आणि चार भिजवलेले बदाम खाऊन मग अर्ध्या तासात अन्हीकं उरकून मस्त चालायला बाहेर पडतो साडे पाचाला. व्हीआरएस घेऊन बारा वर्षे झाली पण अजूनही नेम चुकला नाही.
मी- (आता थांबलो तर बॉस मला व्हीआरएस घ्यायला लावेल ह्या जाणीवेने) ओके. मस्तच. बसा तुम्ही. मी आलोच.
दादा- बायकोला चहात साखर फक्त अर्धा चमचा इतकं सांगून जा.
मी- बरं

दादा पेपर हातात घेऊन निवांत वाचत बसतात. मी बायकोला चहाच सांगायला गेल्यावर तिने ते आधीच ऐकलं असल्याने रागाने लाल झालेल्या तिच्या चेहऱ्यावर पातेलं टेकवल असत तरी चहा उकळला असता हे पाहून मी हळूच साबण घेऊन कल्टी करतो.

मी ऑफिससाठी तयार होऊन ब्रेकफास्टला बसेपर्यंत दादांचा चहा पिऊन झालेला असतो. ते माझ्याबरोबर डायनिंग टेबलवर बसतात. माझ्याबरोबर ब्रेकफास्ट पण करतात. तो करताना आमची ओळख झाली त्या “जागरूक नागरिक समिती” बद्दल भरभरून बोलत असतात. दादा गद्रे फारच मागे लागल्याने मी पाचशे एक रुपये वर्गणी दिली ह्यापालिकडे मला शून्य इंटरेस्ट असलेल्या त्या समितीची माहिती त्यांच्याकडून ऐकत मी टोस्ट चिवडत असतो. माझा ब्रेकफास्ट होतो. मी हात धुवून बूट घालतो. दादा सोफ्यावर बसून असतात.

मी- दादा निघुया का?
दादा- कुठे निघुया? मी रिटायर्ड मनुष्य आहे. तू जा पाट्या टाकायला. मला सुनबाई सोडेल कॉलेजला जाताना.
मी- बरं.

मी निघतो. मला खात्री असते की आधी अनेकदा झालं तेच आजही होणार. बायको त्यांना अगदी त्यांच्या गल्लीच्या नाक्यावर सोडणार. ते करून ऑफिसला जाण्यासाठी यु टर्न घ्यायला तिला दोन किलोमीटर पुढे जावं लागणार. तिथे ट्रॅफिक नेहमीच असतो. त्यामुळे तिला लेक्चरला उशीर होणार आणि संध्याकाळी-

बायको- हे दादा गद्रे वगैरे लोक तू कशाला लटकवून घेतोस?
मी- मी काय लटकवून घेतले? आपली बिल्डिंग त्यांना दिली गेली आहे त्यांच्याच समितीने नागरिक संपर्कासाठी. मी फक्त वर्गणी दिली एकदा.
बायको- मग सकाळी नेमक्या घाईच्या वेळी ते कसे येऊन बसतात. काही काम नाही का त्यांना?
मी- ते “रिटायर्ड पर्सन” आहेत. ऐकलस ना तू?
बायको- हे बघ नेक्स्ट टाईम मला त्यांना ड्रॉप करण जमणार नाही. आणि इतके फिट आहेत. पाचशे मीटरवर तर राहतात. मग ड्रॉप कशाला हवा? सुनबाई म्हणून इमोशनल ब्लॅकमेल करतात बाकी काही नाही. आळशी नुसते. मला उगाच फेरा पडतो आणि वीस मिनिटं फुकट जातात!

हा संवाद ह्या आधी चारेक वेळेला झाला आहे. पण दादा गद्रे आणि त्यांच्यासारख्या हजारो “रिटायर्ड पर्सन” ची परिस्थिती माहीत असल्याने मी आणि बायको त्यांच्या नको त्या वेळी येण्याने आम्हाला किती त्रास होतो हे त्याना कधीच जाणवून देत नाही आणि देणाराही नाही!
दादा गद्रे म्हणजे शिस्तीचा माणूस. वय सत्तरच्या आत बाहेरच. अत्यंत डिसीप्लिन्ड आयुष्य जगल्याने ह्या वयातही ठणठणीत. पांढऱ्या केसांच्या मधोमध गुळगुळीत टक्कल, गोरा तांबूस चेहरा, पाच फूट पाच इंचाच्या आतबाहेर उंची, कधीच इनशर्ट न केलेला हाताच्या बाह्या बंद असलेला फुलशर्ट, उजव्या मनगटावर हाताच्या आतल्या बाजूला डायल ठेवलेलं घड्याळ, हातात एक कापडी पिशवी, रोखून बघणारे डोळे, बारीक पांढरी मिशी आणि तपकीर ओढत असल्याने त्यांच्याबरोबर सतत येणारा तापकिरीचा वास! एकुलता एक मुलगा इंजिनियर होऊन “आयटीच्या ऐटीत” अमेरीकेत स्थायिक होऊन डॉलर मियाँ झाल्यावर त्याच लग्न लावून देऊन या जीवनची इतिकर्तव्यता पूर्ण झाल्याच्या आनंदात व्हीआरएस घेऊन, बँकेत आणि पोस्टात एफडी करून त्याच्या व्याजावर मज्जानी लाईफ जगायची इच्छा असलेले गृहस्थ! त्यांचं आयुष्य म्हणजे कोथरूड, पार्ले पूर्व, डोंबिवली, दादर, गिरगाव भागात रहात असलेल्या त्यांच्यासारख्या अनेक लोकांच्या आयुष्यच प्रातिनिधिक रूप!

“आपल्या रात्री” (मुलाचा उल्लेख आला की आपला आणि त्यांचा टाईम वेगळा असतो हे अधोरेखित करत आमचा मुलगा अमेरिकेत असतो ह्याची अभिमानास्पद जाणीव करून देताना असे लोक वापरात असलेला शब्द!) मुलाशी व्हिडियो चॅट करताना “यु नो आजोबा (ह्यातील जो चा उच्चार जोश मधील जो सारखा असतो) हॅलोविन वॉज सो मच फन!” वगैरे गंमती अमेरिकन ऍक्सेन्ट मध्ये सांगणाऱ्या आठ वर्षांच्या नातवाशी कॉल झाल्यावर दादा ते ॲप बंद करतात आणि फेसबुकडे मोर्चा वळवतात. त्यांचं घर वायफाय, आय फोन, सफरचंदाचा लॅपटॉप अश्या सर्व अद्यावत तंत्रज्ञानाने सज्ज असत. मग फेसबुकवर ते सभासद असलेल्या काही समूहात दादा चक्कर मारतात. चार कॉमेंट करतात. काका काका म्हणत टॅग करणाऱ्या पुतणे आणि पुतण्याच कौतुक करतात. वेळ मस्त जातो. तशीही आताशा झोप कमी झालेली असते. स्काईप नंतर पुस्तक वाचत बसलेल्या त्यांच्या पत्नी शामल काकू घड्याळात दहा वाजलेले लक्षात आणून देतात आणि दटावतात. दोघे म्हातारे त्या मोठ्या घरातील त्यांच्या लहानश्या बेडरूम मध्ये दिवा घालवून शांत झोपी जातात!

शामल ताई पूर्वीपासून गृहिणी असल्याने घर हेच त्यांचं कार्यक्षेत्र असतं. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना कधीच पडत नाही. काहीतरी पदार्थ करणे, शिलाई, वाचन, स्वयंपाक, वनिता मंडळ, भिशी आणि टीव्ही वरील मालिका ह्यात त्यांचं उत्तम सुरू असत. प्रॉब्लेम होतो तो “रिटायर्ड मॅन” झालेल्या दादांचा! अचानक आजपासून वेळच वेळ हातात असल्याचं लक्षात येत. आयुष्यात बैलासारखं फक्त काम केल्याने छंद असे नसतात. सोशल लाईफ देखील तीन चार मित्र वगळता यथातथा असतं. त्यातले काही मित्र आता आजारी असतात आणि काही लांब गेलेलं असतात तर काही वर गेलेले असतात.

ह्यांना फेसबुक नामक विरंगुळ्याची गुहा एक दिवस सापडते. मग त्यात अनेक समूह आणि त्यातून ओळखी होतात ज्याला हे आपलं सोशल लाईफ समजू लागतात. मग ह्या काकांच्या घरी त्यांच्यासारख्या रिकाम्या पुतणे आणि पुतण्याचं येणं जाणं होऊ लागतं. हेच काका मग वेळ घालवायला अचानक सोशल वर्कर देखील बनतात. आपल्या परिसरात स्वच्छता, शिस्त, रस्त्याची कामं, कुत्र्यांचे निर्बीजीकरण, नगरसेवकावर दबाव आणणे, पाण्याचा प्रश्न अश्या गोष्टीत लक्ष घालू लागतात. त्यातून मग अश्या “सम रिकामी” लोकांच्या माध्यमातून जागरूक नागरिक समिती सारख्या रिकाम्या संस्था जन्माला येतात. प्रॉब्लेम हा असतो की गतिमान समाजाने त्यांच्या वयानुसार गद्रे सारख्यांना रिटायर केलेलं असत. पण अजूनही धडधाकट असलेल्या त्यांना ही समाजाने लादलेली व्हीआरएस मान्य नसते. मग अशी ओढून ताणून नाती निर्माण करत ही मंडळी सोशल लाईफ निर्माण करतात. त्यात मश्गुल रहातात.

अर्थात चूक त्यांची नसतेच. काळच पत्ते असे वाटतो की सरळ आयुष्याची हँड रमी मिळालेल्या अश्या लोकांचा शेवटच्या डावात मात्र हाताशी सगळे जोकर असून देखील साधा सिक्वेन्स लागत नाही! दादा गद्रे तर त्याही बाबतीत आघाडीवर. सहा महिन्यांपूर्वी एका रात्री शामल ताई झोपल्या त्या सकाळी उठल्याच नाही! *पुण्यवान आमची शामल! काहीही त्रास न होता गेली” अस दादा सर्वांना सांगत होते. फेसबुकवर “काकू rip आणि श्रीराम” अश्या कॉमेंट्स दादांनी तिथे डकवलेल्या शामल ताईंच्या फोटोला मिळाल्या. दादांच्या सोशल नातेवाईकांनी काकूंना सार्वजनिक श्रद्धांजली वाहिली! काकू गेल्या त्या रात्रीपासून का कुणास ठाऊक पण काका रात्री झोपताना दिवा सुरू ठेऊ लागले! काकूंशिवाय घर भकास झालं. त्यांचा एकाकीपणा कमालीचा वाढला! त्यातून येणारे नैराश्य त्यांच्या सोशल वर्क मध्ये आणि फेसबुकवरच्या सोशल लाईफ मध्येही दिसू लागलं. सोशल वर्क म्हणजे रिक्षावाले, टॅक्सीवाले ह्यांच्याशी हुज्जत होऊ लागली. फेसबुकवर क्वचित रागीट कॉमेंट होऊ लागल्या. मुलाकडे अमेरिकेत महिन्याच्या वर जीव रमत नसल्याने सहा महिन्यांसाठी गेलेले दादा दीड महिन्यात परत आले. ते पण दोनदा. मग मुलानेही नाद सोडला! एकेकाळी एका सहकारी बँकेत हेडक्लार्क असताना टेचात राहिलेले दादा गद्रे आज त्यांचा एकाकीपणा संपवायला वेळ काळ न बघता लोकांकडे जाऊ लागले, फेसबुकवर भेटलेल्या लोकांना भेटून त्यांना घरापर्यंत आणू लागले! ओढुन ताणून काहीतरी सामाजिक कामाच्या निमित्ताने लोक संपर्क ठेऊ लागले! ज्यांना त्यांची परिस्थिती माहीत होती त्यांनी समजून घेतलं. ज्यांना फार कल्पना नव्हती त्यांनी पकाऊ म्हातारा म्हणून मागे चेष्टाही केली!

आताशा त्यांना झोपही फार लागत नसे. त्या रात्री “त्यांच्या सकाळी” व्हिडिओ कॉलवर नातवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आपल्या मध्यरात्री दीडच्या सुमारास डोळा लागला असावा. पण साडेचारची जाग पक्की. ते उठले. ठरलेले सर्व कार्यक्रम उरकून नऊ वाजता आमच्या घराची बेल वाजवली. त्या दिवशी रविवार. कन्येने धावत जाऊन दार उघडलं. समोर दादा गद्रे. हातात मोठा केक आणि चॉकलेट घेऊन आले होते. कन्येला चॉकलेट दिलं आणि आपल्या नातवाचा वाढदिवस असल्याचं सांगितलं. मग बिल्डिंग मधल्या सर्व पोंरांना बोलावून नातवाच्या वाढदिवसाचा केक कापला. ते करताना पोरांबरोबर नाचले. पोरं गेली. कन्या त्यांना म्हणाली-

कन्या- आजोबा तुमचा नातू अमेरिकेत राहतो मग तुम्ही इथे का राहता?
दादा- मला अमेरिकेत कंटाळा येतो.
कन्या- मग त्याला इथे राहायला बोलवा.
दादा- त्याला इथे कंटाळा येतो.
कन्या- पण तुम्हाला एकट्याला कंटाळा नाही येत? आणि रात्री एकट्याने झोपायला भीती नाही वाटत?
दादा- मी एकटा कुठाय? तुम्ही आहात ना माझी नातवंड आणि तुझ्या बाबा सारखे खूप मित्र आहेत माझे फेसबुकवर आणि आपल्या एरियात. आणि रात्री भीती नाही वाटत बाळा. कारण मी एकटा नसतो. आजी असते तुझी माझ्याबरोबर! खूप रागावतो मी तिला आधी गेली म्हणून!

अचानक दादांचे डोळे पाणावतात. आवाज घोगरा होतो. कन्या काहीतरी चुकलंय हे जाणवून आत निघून जाते. दादा उगाच घसा खाकरत आत बघत आवाज देतात-

दादा- सुनबाई चहा टाक जरा. (मग मला) एमजे तुमच्या सोसायटी मध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प करायचा विचार आहे आमच्या समितीचा. फेसबुकवरचा माझा एक मित्र तज्ञ आहे ह्या विषयातला. तुला काय वाटतं?
मी- दादा मी बोलतो सेक्रेटरीशी. नक्की करूया हा प्रोजेक्ट!

दादा खुश होतात. चहा पिऊन निघतात. निघताना माझ्याकडे बघून एक स्माईल देतात. त्यात खूप प्रेमाबरोबर मला कुठेतरी कृतज्ञता जाणवते! मनात चर्रर्र होत! दादा मात्र आपल्या एकाकी आयुष्याला सोशल करायच्या नवनवीन संधी शोधायला, अजून एक प्रोजेक्ट सुरू करायला बाहेर पडतात! काळ पत्ते पिसत हसत असतो!

©मंदार जोग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}