माझी कंडक्टरी लेखक : संतोष अरविंदेकर साभार अनुबंध प्रकाशन,पुणे
माझी कंडक्टरी
लेखक : संतोष अरविंदेकर
साभार अनुबंध प्रकाशन,पुणे
हृदगत…
‘माझी कंडक्टरी’ ही माझी नोकरीविषयक कहाणी आहे. ‘नोकरी’ हीच या सत्यकथेची नायिका आहे. ही संपूर्ण आत्मकथा नाही. आजवर बारा वर्षे मी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये ‘वाहक’ म्हणून कर्तव्य बजावले आहे. एका तपाच्या या कालावधीत मी जे काही पाहिलं, अनुभवलं, भोगलं, ऐकलं, घडलं ते जसंच्या तसं शब्दबद्ध केलंय. वाणीतला भिडस्तपणा लेखणीत उतरू दिला नाही. अत्यंत अलिप्त आणि तटस्थपणे ही कहाणी कागदावर उतरवली आहे. या पुस्तकाचे लिखाण करताना मी माझा राहिलो नव्हतो. त्यामुळे या लेखन प्रपंचाला माझ्याकडून उचित न्याय मिळाला आहे, असे वाटते.
कंडक्टरची नोकरी करत असताना दररोज असंख्य प्रवाशांशी माझा थेट संपर्क होत होता. या समृद्ध अनुभवविश्वावर लिहिण्याची गेल्या काही वर्षांपासूनची माझी तशी मनिषा होतीच. परंतु काही गोष्टींसाठी काळ-वेळ यावी लागते हेच खरं! तसा ‘योग’ दुर्दैवानं माझ्या वाट्याला आला; आणि त्याचमुळे ‘माझी कंडक्टरी’ चे लिखाण माझ्या हातून घडले. १९९७ ते २००९ या काळातील माझी नोकरीविषयक वाटचाल मी प्रामाणिकपणे चित्रीत केली आहे. प्रवासी, सहकारी आणि अधिकारी यांच्या संपर्कात (बि) घडत गेलेल्या ‘मी’ ची सत्यकथा हा या पुस्तकाचा गाभा आहे. कोणालाही दुखविण्याच्या उद्देशातून या पुस्तकाचे लिखाण झालेले नाही. ज्यांच्याबाबतीत मला तसे वाटले त्यांची मी नव्याने बारशी घातली आहेत. मुळात मी माझे स्वतःचे मान-अपमान, गुण-अवगुण, माझ्यातील दोष, माझ्याकडून झालेल्या चुका इत्यादी बाबी प्रामाणिकपणे नमूद केल्या आहेत. त्यामुळे कोणाचेही बाबतीत काही लपवून ठेवणे, झाकून ठेवणे मला जमलेच नाही. तमाम मराठी वाचकांना अत्यंत सर्वसामान्य चालक वाहकांच्या दैनंदिनीचा जवळून परिचय घडावा, त्यांच्या सुख-दुःखांची जाणीव व्हावी आणि एका आगळ्या-वेगळ्या अनुभूतीचा खराखुरा साक्षात्कार व्हावा, हाच प्रस्तुत सत्य लिखाणामागचा उद्देश आहे. या पुस्तकातील काही घटना-प्रसंग हे इतर वाहक मित्रांचे बाबतीत घडलेले असले तरी ते उल्लेखण्याचा मोह मला अनावर झाल्यामुळे ते मी माझेबाबत घडल्याचे इथे दर्शविले आहे. असे असले तरी काल्पनिकतेला कुठेही थारा दिलेला नाही. मनात असूनही आणखी काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. अपघात, रास्ता रोको, दंगल, जाळपोळ अशा संकटग्रस्त परिस्थितीबाबत केवळ पुस्तकाची पाने वाढू नयेत, पाल्हाळीकता हा दोष जडू नये म्हणून जरी मी लिहिले नसले तरी या विषयांची जाण वाचकांना आहे. ज्या अनुभूतीबाबत मराठी वाचक अनभिज्ञ आहेत, त्या अनुभवविश्वावर प्रकाशझोत टाकणे मी उचित समजलो.
अत्यंत तणावग्रस्त मनःस्थितीत असताना ‘माझी कंडक्टरी’ चे लिखाण माझे हातून घडले आहे. ही परिस्थितीच माझ्या लिखाणाची खरी प्रेरणा होती. त्यामुळे मला भेटलेली माणसं जशीच्या तशी प्रतिबिंबीत करण्याच्या ओघात माझे हातून काहीसे अर्वाच्य, शृंगारिक, अश्लिल लेखन झाले आहे. याबाबत मराठी रसिक वाचक समजून उमजून मला माफ करतील, याची खात्री वाटते.
एसटी चालक-वाहक यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा काहीसा दूषित आणि संकुचित आहे. ही मंडळी म्हणजे व्यसनी, दुराचारी, व्यभिचारी, उद्धट, गावंढळ, अशिक्षित, असंस्कृत आणि गबाळ्या अस्वच्छ राहणीमानातील असतात, असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात तो खराही आहे. मी एसटीत नव्याने भरती झाल्यावर मला एका सहकाऱ्याने, ‘तू ड्रिंक घेतोस का?’ असे न विचारता ‘तुझा ब्रँड कुठला?’ असे विचारले. दुसऱ्याने तर कहरच केला, ‘तुझ्याकडून ब्रह्मचारी व्रताचे आत्तापर्यंत किती वेळा उल्लंघन झाले?’ असे मी अविवाहीत असतानाही मला चारचौघांत अत्यंत गलिच्छ भाषेत विचारले. यावर ‘मी अजूनही ब्रह्मचारी आहे,’ असे सांगितल्यावर ते कोणालाही खरे वाटले नाही. हे जे गृहीत धरणे आहे ना ते वाईट आहे. असो… पण आता परिस्थिती बदलते आहे. नव्या पिढीतील शिकली-सवरलेली मुलं-मुली वाहकपदी भरती होत आहेत. अनेक पदवीधर चालकदेखील मी एसटीत पाहिले आहेत. त्यामुळे चालक-वाहक पदाला एक नवे रंग-रुप प्राप्त होते आहे. परिणामी एसटी महामंडळाची प्रतिमा उजळते आहे. महामंडळ तोट्यातून सावरते आहे. नाहीतर, ‘आबाची गाडी, बाबाची बैलं, सख्या हाकणार आणि तुक्या बसणार’ असा एसटीचा आजवरचा कारभार होता. परंतु आता यातही परिवर्तन होते आहे. आशिया खंडातील प्रवासी वाहतुकीची सर्वात मोठी यंत्रणा असलेले आपले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अजूनही खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकून
आहे. अद्ययावत बसेस आणि प्रवाशाभिमुख सेवा यामुळे एसटीने कात टाकून नवा जन्म घेतला आहे. असे असले तरी एसटीचा अधिकारीवर्ग मात्र अजूनही ‘जैसे थे’ आहे. चालक-वाहकांचे शोषण करून त्यांना गुलामगिरीची वागणूक देण्यातच त्यांना धन्यता वाटते. ‘देणार पै आणि मुके घेणार लै,’ ही म्हणदेखील यांच्याबाबतीत फिकी पडावी. याउलट कामगारांकडूनच ‘घेणार पै तरीही लचके तोडणार लै’ अशा पाशवी मनोवृत्तीच्या या अधिकारीवर्गात बदल घडणे अपेक्षित आहे. परंतु त्यासाठी सर्वसामान्य एसटी कामगारांनी कविवर्य नारायण सुर्वे यांनी म्हटल्याप्रमाणे,
“एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे
सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे कामगार आहे
मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा घडणार आहे”
असे म्हणून तळपती तलवार बनून पेटून उठण्याची गरज आहे. युनियन प्रतिनिधींनीदेखील स्वार्थ बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने लढा देण्याची आवश्यकता आहे. पण त्याकरिता ‘… आधी केलेची पाहिजे’ हेच खरे !
‘माझी कंडक्टरी’ च्या हस्तलिखिताचे प्रथम वाचन माझे गुरुवर्य आदरणीय प्रा. श्री. वि. द. कदम आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. शरदचंद्र वाळिंबे यांनी अगत्याने केले आणि पाठीवर शाबासकीची थाप मारली. कदमसरांनी तर ‘ शब्दशिल्प’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात माझ्या या साहित्यकृतीची जाहीर प्रशंसा केली. अशा अनेक जणांचे प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद मला भरभरून मिळाले. यामध्ये मित्रवर्य श्री. रमेश वेंगुर्लेकर, श्री. दत्तात्रय जाधव, प्रा.डॉ. नंदकुमार इंगळे, नगराध्यक्ष अॅड. श्री. चिमण डांगे, प्राचार्य श्री. विश्वास सायनाकर, कादंबरीकार श्री. दि.बा.पाटील, एसटी परिवारातील अनेक सहकारी मित्र, अधिकारी, प्रवासी यांच्याशिवाय बहीण सौ. मंजिरी आणि मेहुणे श्री. अभय ग्रामोपाध्ये, मामा श्री. प्रसाद शिवकामत, बंधु श्री. अवधुत भेण्डे, कारखानीस, घोलकर आणि कामत कुटुंबीय या सर्वांची प्रेरणा व प्रोत्साहन माझ्या पाठीशी आहेच. माझी सहचारिणी सौ. सुप्रिया, कन्या कु. दीक्षा, चि. सिद्धेश या चिमुरड्यांसह ति. आई ही मंडळी तर सर्व सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभी असतात. यांच्याचमुळे तर मी नोकरी गमावूनदेखील पुन्हा ताठ मानेने उभा राहू शकलो.
माजी ग्रामीण विकास मंत्री माननीय श्री. आण्णासाहेब डांगेसाहेब आणि कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक माननीय डॉ. श्री. सुभाष भेण्डेसर या मान्यवर प्रतिभावंतांची, प्रज्ञावंतांची माझ्या या पुस्तकासाठी लाभलेली शब्दसुमने म्हणजे माझे आणि ‘माझी कंडक्टरी’ चे परमभाग्यच म्हणायला हवे.
अनुबंध प्रकाशनचे अनिल कुलकर्णी यांनी माझ्यासारख्या नवोदितावर भरवसा ठेवून माझे पुस्तक प्रकाशित केले, हा त्यांचा मोठेपणा ! सौ. मनिषा पवार यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ उत्कृष्ठ आणि बोलके आहे. मुद्रण करणारे श्री, दुधाने बंधू व अक्षरजुळणी करणाऱ्या सौ. राखी शिलम यांनी सुबकता आणली आहे. या सर्वांच्या सहकार्याने ‘माझी कंडक्टरी’ प्रत्यक्षात साकारली आहे.
महाराष्ट्रातील मराठी रसिक वाचकांनी माझ्या या पहिल्या-वहिल्या पुस्तकाची मनोभावे दखल घ्यावी. काही चुकले असेल तर माफ करावे आणि तसे जरूर सांगावे. मी अभिप्रायाची वाट पाहत आहे.
संतोष अरविंदेकर