वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कृतज्ञता (ग्रॅटिट्यूड) ©कांचन दीक्षित

कृतज्ञता (ग्रॅटिट्यूड)

कृतज्ञतेचा सराव करता करता तुम्ही कृतज्ञताच होता,ती कृतज्ञतेची परिसीमा असते,
करते करते हो जाना!
एखाद्या गोष्टीचं चिंतन करता करता ते रुप होऊन जाणं,
कृष्णाची मधुराभक्ती करणारे अनेक राधा होतात,भूमिका जगता जगता राधाच होऊन जातात.
तसं कृतज्ञता व्यक्त करता करता ‘कृतज्ञता’होऊन जाणं.तशी Identity तयार होणं.

एखादी गोष्ट मिळाल्यावर किंवा काहीतरी चांगलं प्राप्त झाल्यावर थँक्यू म्हणणं किंवा धन्यवाद म्हणणं नाही आता ती व्यक्तीच कृतज्ञता होऊन जाते.

काही नाही मिळालं,मनासारखं नाही झालं तरी थँक्यू !

अशा व्यक्तीसाठी जगणंच एक कृपेचा वर्षाव असतो अशी व्यक्ती प्रत्येक गोष्टीला धन्यवाद देत असते कारण तिची कृतज्ञता सूक्ष्म होते.

आपल्याला श्वास मिळतोय या श्वासासाठी आजूबाजूच्या प्रत्येक पानापानाला आणि झाडाला ती व्यक्ती थँक्यू म्हणायला लागते.

आकाश,पाणी,अन्न,वस्त्र,निवारा जे काही मिळालं आहे त्यासाठी आपण काहीच केलेलं नाहीये,आपण ते मिळवलं असलं तरी त्याची मूळ निर्मिती आपण केलेली नाही तरी आपल्यासाठी आज ते उपलब्ध आहे याची जाणीव झाल्यामुळे अशी व्यक्ती कायम सुखातच असते.

सुख ही एक काल्पनिक भावना आहे जी फक्त कृतज्ञतेनं निर्माण होतं सुखाची किल्लीच कृतज्ञता आहे.

जगणं गृहित न धरता लहान मुलासारखं जेव्हा आपण जगण्याकडे पहायला सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त करावेसे वाटू लागतात.

काहीच कारण नाहीये खरंतर की आज खात्रीनं आपण जिवंत असायलाच हवं, किंवा आज माझ्या आयुष्यात चांगले अनुभव यायलाच हवेत,कशाचीच गॅरंटी नसते पण तरीही मला मिळतंय,मिळालंय म्हणून मी कृतज्ञ असायला हवं.

कशाचीच गॅरंटी नसते हे कळल्यावर लोकांनी किंवा विशेषतः नातेवाईकांनी अमुक पद्धतीनंच वागायला हवं किंवा लोकांनी,विश्वासानं आणि चांगलंच वागायला हवं असा हट्ट संपतो,गृहीत धरणं संपतं.

या माईंडसेट नंतरही जी माणसं चांगली वागतात त्यांच्याबद्दल खरी कृतज्ञता वाटायला लागते.
तुला वाईट वागण्याचं स्वातंत्र्य आहे तरीही तू चांगलं वागलास यासाठी आभार

मदत न करणारे,टिका करणारे,तुमचं वाईट चिंतणारे,वाटेत अडचणी निर्माण करणारे सुध्दा आयुष्यात एक भूमिका बजावत आहेत हे कळल्यावर कृतज्ञता वाटायला लागते.

जगण्याचा ड्रामा त्यांच्यामुळेच तर पूर्ण होतोय नाहीतर तो स्टेजवर आलाच नसता,या ड्राम्यातच संदेश आहे,धडा आहे.

रामायणात मंथरा आहे,कैकयी आहे,रावण आहे म्हणून राम आहे सीता आहे.
आपण आज जे आहोत ते आपण व्हावं म्हणून ही पात्रं महत्वाचा रोल करताहेत ही कृतज्ञता!

मला स्वतःच्या शोधात निघायला भाग पाडणारी ही माणसं खरंतर माझी मदत करत आहेत,ही कृतज्ञता!

मी निखा-यांवर चालू शकते किंवा नाही हे माझं मलाच कळावं आणि मला माझी बलस्थानं सापडावी,शक्तीचा साक्षात्कार व्हावा यासाठी जळते निखारे वाटेत फेकण्यासाठी जे आधी स्वतःचे हात पोळून घेतात तेच तर खरे सहाय्यक,ते खरे हितचिंतक!

माझे गुरु एकदा म्हणाले,त्या सगळ्यांना थँक्यू म्हणा ज्यांनी तुम्हाला ढकलत ढकलत माझ्यापर्यंत आणलंय,नाहीतर तुम्ही इकडे वळणारे नव्हता,बसला असता मजा करत!

त्यांच्यासाठी कृतज्ञता!

आता या जगात काळं पांढरं,चांगलं वाईट असं काहीच नाही,प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे आणि ते कारण चांगलंच आहे,मूळ कारण आहे,
विकास,आत्मोन्नती.
वाटेतली दगडं सुध्दा पाय-या आहेत आणि काटे सुध्दा डुलकी लागू नये म्हणून सावध करणारे मदतनीस आहेत हे ज्या दिवशी वाटायला लागेल त्या दिवशी आपण कृतज्ञ नाही कृतज्ञता झालो असं समजायला हरकत नाही.
©कांचन दीक्षित

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}