क्षणभंगुर….
क्षणभंगुर…..
पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,दुपारी साडेतीन चार ची वेळ होती, ओपीडी संपवून नुकताच जेवणासाठी वर निघालो होतो.
कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर एक पंच्याहत्तरीच्या आसपासच्या आजी बसल्या होत्या.त्यांची रक्त लघवी चेक केली होती व रिपोर्ट ची वाट बघत त्या बसल्या होत्या.
आजी नेहमी दवाखान्यात यायच्या शांत स्वभाव,चेहऱ्यावर सात्विक भाव,स्वभाव इतका व गोड की त्यांच्या सुना देखील त्यांचं कौतुक करायच्या.आजीं देखील सुनांचं कौतुक करायच्या, सून आणि सासू एकमेकींचे कौतुक करतात ही बहुतेक क्वचितच आढळणारी गोष्ट.
पण या आजींच्या बाबतीत ते खरं होतं,,,
जिना चढताना मी एक क्षण थबकलो.वाटलं आजी बराच वेळ बसून कंटाळून गेल्या असतील, त्यांना चहाला वर घेऊन जावं., पण नंतर विचार केला आता वेळ खूप जाईल जेवण उरकून मावडी च्या ओपीडीला जायचं होतं, चहासाठी आजीना वर घेऊन गेलं तर पुन्हा दहा-पंधरा मिनिटं वेळ जाईल आणि सगळे शेड्युल बिघडून जाईल.
म्हटलं बघू उद्या किंवा पुन्हा कधीतरी…
जेवण करून मग खाली आलो त्यावेळी आजी निघून गेल्या होत्या.
कम्पाउंडरला रिपोर्ट दाखवला होता व तो नॉर्मल असल्याने त्या थांबल्या नव्हत्या.उशीर झालाय उद्या येईन पुन्हा दाखवायला असे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा नाश्ता करून खाली साडेनऊ वाजता ओपीडीत गेलो तर खुर्चीवर बसल्या बसल्या कंपाउंडर ने सांगितलं की,काल लॅब साठी आलेल्या आजी रात्री हार्ट अटॅक ने गेल्या’
मी निस्तब्ध !! क्षणभर काहीचं सुचेना !
चालता-फिरता माणूस गेला की धक्का बसतो.मृत्यू अटळ आहे तो असा शांतपणे योग्य वेळी आला तर कधीही चांगलीच गोष्ट , परंतु मला खंत या गोष्टीची वाटत होती की काल आजींना चहासाठी घेऊन गेलो असतो तर किती बर झाल असतं…
मी खूप व्यथित झालो.या घटनेला इतकी वर्ष झाली पण अजूनही ही गोष्ट कायम मला खटकते.
आपल्याला नेहमी वाटत असतं की आपलं आयुष्य खूप मोठं आहे,एखादी गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो बघू भविष्यात करू…
उद्या करू पण…
बरेचदा ती वेळ व संधी हातातून निसटून जाते व उरतो तो केवळ पश्चाताप,एक गिल्टी फिलिंग!!
देऊ नंतर…
करू नंतर…
बघू नंतर…जाऊ नंतर याला काही अर्थ नसतो.
कारण तुम्ही आत्ता जो क्षण उपभोगीत असता तोच खरा असतो दुसऱ्या क्षणावर देखील तुमचा अधिकार नसतो.
मध्यंतरी ऑगस्टमध्ये माझा थोरला भाऊ covid- ने गेला उमदा निरोगी,चालता-फिरता, थोरला असूनही आमच्यापेक्षा ॲक्टिव्ह.हॉस्पिटलमध्ये घेऊन जातानाही एकदम उत्साही, त्याला सगळं टापटीप लागायचं. गाडीत बसण्यापूर्वी मला म्हणाला दाढी वाढली आहे दाढी करून घेतो…
मी म्हटलं कशाला आता वेळ दवडतो हॉस्पिटलमध्ये तर जायचंय…!पण शेवटी हॉस्पिटल मधून तो घरी परत आलाच नाही.
दोन मिनिटात त्याची दाढी झाली असती.मी त्याला उगाच अडवलं असं अजूनही मला वाटतं.आम्ही चौघं भाऊ मी धाकटा आमच्यामध्ये अजून कधीही वादविवाद भांडण तंटा झाला नाही.इतकंच काय पण आम्ही एकमेकांशी मोठ्या आवाजात देखील कधी बोललो नाही परंतु तो गेल्यानंतर अजूनही मला सतत वाटत राहते की अजूनही आपण त्याच्याशी चांगलं वागलं पाहिजे बोललं पाहिजे होतं. जास्त संवाद साधला पाहिजे होता. तो दिवाळीच्या सुट्टीत उन्हाळ्यात किंवा काही फंक्शन असेल तर मूर्टीला यायचा.
स्वभावाने अबोल,कधी कधी भरपूर वेळ असायचा पण मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा त्याच्याशी अजून जास्त गप्पा मारल्या असत्या तर खूप बरं झालं असतं असं आता वाटतं पण आता वाटून काही उपयोग नसतो.गेलेला क्षण गेलेली वेळ ही कधीही परत येत नसते.
कटू प्रसंग तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात परंतु त्याला बगल देऊन पुढे गेलं पाहिजे नाहीतर नंतर वाटत राहतं की आपण आपल्या आयुष्यातील बरेच क्षण,वर्ष,दिवस हे विनाकारण वाया घालवले आहेत.
कारण जर तर ला आयुष्यात काहीही महत्त्व नसते.
बऱ्याच वर्षापासून आम्हाला आमच्या दहावीच्या बॅचचं गेट-टुगेदर घ्यायचं होतं.अनेक वेळा चर्चा व्हायच्या तारखा ठरायच्या,कॅन्सल व्हायचं.
आम्हाला ज्या सरांनी घडवलं मार्गदर्शन केलं कुटुंबातील एक सदस्या सारखं सांभाळलं, आई वडीला नंतर त्यांचे स्थान होतं अशा त्या जे.बी.गाडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे गेट-टुगेदर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती.
मी वैयक्तिक या विषयावर त्यांच्याशी अनेकदा बोललो होतो,पण आमचं निश्चित होत नव्हतं आणि एक दिवस सर अचानक अकाली मोठा धक्का देऊन आमच्यातून निघून गेले.
खरेतर या गेट-टुगेदर चे उत्सव मूर्ती हे आमचे सरचं होते,परंतु बघू नंतर करू नंतर म्हणत आम्ही ती संधी गमावली.
नंतर १ वर्षापूर्वी आम्ही हे गेट-टुगेदर घेतलंसर्व शिक्षकांना बोलवलं.
सगळे विद्यार्थी आले होते पण गाडेकर सरांची अनुपस्थिती म्हणजे आमच्यासाठी देव्हाऱ्यात देव नसलेल्या देव्हाऱ्या सारखी सारखी स्थिती होती.
आपण साधुसंत बनू शकत नाही कारण आपण सामान्य संसारी माणसं आहोत.म्हणून माणसासारखचं वागलं पाहिजे, जास्त मित्र नाही जमवता आले नाही तरी चालेल पण किमान शत्रूंची संख्या तरी कमी करू शकतो,ते आपल्या हातात असतं.
आपण बरेचदा एखाद्याला विनाकारण अपशब्द बोलतो त्याचा अपमान करतो किंवा त्याच्याशी तुटकपणे वागतो, खरंतर या गोष्टींची काही गरज नसते आपल्या असल्या वागण्याचा पश्चाताप आपल्याला नंतर होतो.पण त्यावेळी त्याचा काही उपयोग नसतो,कारण वेळ निघून गेलेली असते आणि शब्दांनी झालेल्या जखमा या भरून येणार्या नसतात व त्याचा परिणाम म्हणजे आपण अनेक मित्र,स्नेही,नातेवाईक गमावतो.
इतकंच काय पण आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आपण बरेचदा विनाकारण बोलत असतो.कळत नकळत अपमान करीत असतो, या गोष्टींमुळे आपण आपले आयुष्य तर कमी करत असतोच पण त्यांच्या कामाचा परफॉर्मन्स देखील खराब करीत असतो.
प्रत्येक वाईट कृतीमागे,प्रत्येक रागावून चिडून बोललेल्या प्रत्येक वाक्या मागे आपण आपलं आयुष्य काही क्षणांनी,मिनिटांनी कमी करीत असतो.
म्हणून मित्रांनो….
मिनिमाईज दी एनिमी, मिनिमाईज बॅड वर्ड्स, मिनिमाईज अँगर,डिपॉझिट फ्रेंड्स अँड डिपॉझिट रिलेटिव्हस…!*
कारण गेलेला क्षण व वेळ परत येत नाही.
लेखक-अज्ञात