मंथन (विचार)मनोरंजन

   ★★साद★★ ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

आमच्या मधुर ची या चॅनेल वर ची १५ वी कथा

★★साद★★

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

अनुश्री क्लासच्या बाहेर आली.आज तिचा बी कॉम,शेवटच्या वर्षाचा पेपर संपला होता.मोकळं मोकळं वाटत होतं. घरी जाऊन मस्त थंडगार पन्ह पिऊन झोप काढायची तिने ठरवलं.गेले दोन महिने तिने नेटाने अभ्यास केला होता.तिला सी ए व्हायचं होतं. त्याची एन्ट्रन्स एक्झाम ती पास झाली होती.आता आठ दिवस आराम करून सी ए च्या तयारीला लागायचं आणि दोन वर्षे मेहनत करून चांगलं यश मिळवायचं तिने ठरवलं होतं.

घराच्या दाराबाहेर तिला खूप जेन्ट्स चप्पल दिसल्या.दादाचे मित्र आलेले दिसताहेत.तिने बेल वाजवली.वंदनाने दार उघडलं.
“कोण आलंय आई?बाहेर चप्पल किती दिसताहेत.”
अनु पायातली चप्पल काढत म्हणाली.

“सुजयचे मित्र आले आहेत.बऱ्याच दिवसांपासून त्याचं चाललं होतं,मी म्हटलं, आज बोलावं, अनुची पण परीक्षा संपतेय.” वंदना दार लावत म्हणाली.

“अनु,जरा तेवढं पन्ह कर बरं. मी गर आणि गूळ एकत्र केलाय.”

“आई,मलाच आयतं पन्ह हवं होतं आज.छान गार पन्ह पिऊन ताणून देणार होते.” अनुश्री नाराजीनेच म्हणाली.

पन्ह घेऊन अनु सुजयच्या खोलीत जायला निघाली. ती आत जायला आणि एक मुलगा बाहेर यायला एकच गाठ पडली.दोघांची जोरात टक्कर झाली.ग्लासमधलं पन्ह हिंदकळून जरासं सांडलंच. त्या मुलाचा टी शर्ट देखील थोडा खराब झाला.त्याने अनुला दोन्ही हातांनी घट्ट धरून सावरलं.त्याच्या स्पर्शाने मोहरलेल्या अनुने त्याच्याकडे बघितलं. तिच्या अंगावर रोमांच उभं राहिलं. सहा फूट उंच,त्याला साजेशी शरीरयष्टी,गोरापान,देखणा.अनु त्याच्याकडे बघतच राहिली.

“अनु,हा मयंक.आमच्या मित्रांच्या कम्पुत नवीनच आलेला.आपल्या घरी प्रथमच आलाय.राजेशचा हा बालमित्र. एम एस सी,एम फिल झालाय आणि लेक्चररचा जॉब मिळालाय. मयंक,ही माझी लहान बहीण अनुश्री.

“हाय अनुश्री,माझ्यामुळे थोडं पन्ह वाया गेलं. मी काही मदत करू का?” मयंक अनुश्रीकडे बघत म्हणाला.

“नको,ग्लासमध्ये जेवढं उरलंय ते संपवू.” सुजय सगळ्यांच्या हातात ग्लास देत म्हणाला. “अनु,पेपर कसा गेला ग? आज फ्री झालीस न? ” सुजयने विचारलं.

“पेपर छान गेला. तुम्ही एन्जॉय करा.मी जाते.” अनु खोलीतून बाहेर पडली खरी पण मयंक तिच्या मनातून बाहेर पडायला काही तयार नव्हता.तिने पन्ह घेतलं.खोलीत जरा झोपावं म्हणून आडवी झाली,तर डोळ्यापुढे सतत मयंक येत होता.त्याचा स्पर्श आठवून तिची झोपच उडाली.सुजयचे इतके मित्र घरी येत होते,कॉलेजमधे किती मित्र होते,पण असं आजवर कधीच झालं नव्हतं.
—————————————————————
मयंकचे सुजयकडे येणे वाढले.काहीतरी कारण काढून तो घरी येऊ लागला.अनुशी गप्पा मारू लागला.तिच्या डोळयातून त्याला प्रीतीची साद दिसत होती.तो देखील तिच्याकडे ओढला जात होता.दोघांनीही नजरेच्या भाषेतून अव्यक्त प्रेमाची कबुली दिली होती.

अनुचा रिझल्ट लागला.प्रथम श्रेणीत पास होऊन तिने यश मिळवलं.सी ए च्या तयारीला लागायचं होतं पण चित्त सगळं मयंक मधे गुंतलं होतं.

एक दिवस घरात कोणी नसताना अचानक मयंक अनुकडे आला.हिम्मत करून तो म्हणाला,”अनु, मला काही सांगायचं आहे तुला.”

“तुला काय सांगायचं आहे,हे मला माहितीय.शब्दांची गरज नाही.”अनु त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.

मयंकने तिच्याकडे फक्त अनिमिष नेत्रांनी बघितलं आणि “येतो” म्हणाला.

तो गेल्यावर अनु कितीतरी वेळ त्याच विश्वात होती.मन फुलपाखरू झालं होतं.
————————————————————-
अनुने सुजयला सगळं सांगायचं ठरवलं.
“दादा, एक कबुली द्यायची आहे.आधी तुला सांगावं असं वाटलं.”

“कसली ग.” सुजय तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला.

“दादा,मला मयंक आवडतो आणि तो देखील माझ्यात गुंतला आहे.मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.” अनु एका श्वासात बोलली.

“हं,माझ्या लक्षात आलं होतं. पण अनु,मयंकचे बाबा ज्योतिषी आहेत.त्यांच्याकडे अनेकजण गुण जुळतात का ते बघायला पत्रिका घेऊन येतात.स्वतःच्या मुलाचं लग्न पत्रिका जुळल्याशिवाय ते करतील असं मला नाही वाटत.”

“प्रेमात पडणं म्हणजेच गुण जुळणं ना रे. आणि मयंक त्या गोष्टीला महत्व देणार नाही.”

“अनु,मी आईबाबांना सांगतो. पुढच्या गोष्टी रीतसर होऊ दे.आणि तुझं सी ए चं काय? लग्नानंतर अभ्यासाला इतका वेळ देणं जमणार आहे का तुला?” सुजयने विचारलं.

“मयंक मला म्हणालाय,तुझं सी ए तू लग्नानंतर पूर्ण कर. तू आईबाबांशी बोल.माझी हिम्मत होत नाहीय.” अनुच्या डोळ्यात आर्जव होतं.

“तुम्ही दोघेही बोहल्यावर चढलाच आहात, हार घालायचेच बाकी आहेत.पण मयंक तुझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे.”

“हो माहितीय मला.चांगलंच आहे न.माझे खूप लाड करेल तो.” अनु हसत म्हणाली.

“उतावीळ नवरा माहित नाही,पण आमच्याकडे ही उतावीळ नवरी आहे.” सुजय तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला.
————————————————————-
सुजयने रात्रीच जेवताना विषय काढला.
“बाबा,अनु आणि माझा मित्र मयंक जोशी एकमेकांत गुंतले आहेत.त्यांना लग्न करायची इच्छा आहे.मयंक अतिशय चांगला,निर्व्यसनी मुलगा आहे,नोकरीही चांगली आहे. घरचा सधन आहे.तुम्ही त्याच्या आईवडिलांशी बोलून बघा.”

“अनु,हे काय ऐकतोय मी? आणि तुझं सी ए?”
प्रसन्न अनुकडे बघत म्हणाले.

“बाबा,मी लग्नानंतर पूर्ण करेन.माझं मयंकशी ह्याबाबतीत बोलणं झालंय.” अनु खाली मान घालत म्हणाली.

“त्या दोघांनी ठरवलं असेल तर तिचं शिक्षण होईपर्यंत थांबायला नको.मयंक सेटल झालाच आहे,हुशार आहे. नाकारण्यासारखं काहीच नाही.ती शिकेल नंतर.आपण त्यांच्या घरी जाऊन भेटून येऊ.” वंदनाने तिचं मत दिलं.

“मी मयंकशी बोलतो,उद्या आईबाबा येतील म्हणून.”
सुजय म्हणाला.
————————————————————-
दुसऱ्या दिवशी प्रसन्न आणि वंदना,मयंकच्या आईवडिलांना भेटून आले.त्यांनी अनुची पत्रिका मागवून घेतली.

“अनु,त्यांचा पत्रिकेवर भर आहे.मी ह्या गोष्टी कधीच मानत नाही तुला माहितीय,पण त्यांनी मागितली म्हणून तुझी पत्रिका मी त्यांना व्हाट्स अप वर पाठवली आहे.” प्रसन्न म्हणाले.

बाबांचे बोलणे ऐकून अनुने मयंकला फोन लावला.
“मयंक,पत्रिका जुळली नाही तर तू माझ्याशी लग्न करणार नाहीस का?”

“जुळत नाही हे कुठे कळलंय अजून. बाबांना बघू तर दे.जुळेलच, माझी खात्री आहे.” मयंक हसत म्हणाला.

मयंकच्या बोलण्याने अनुचे समाधान झाले नाही.
————————————————————–
मोबाईल वाजला म्हणून प्रसन्नने बघितलं. मयंकच्या वडिलांचा फोन होता.
“माफ करा.हा योग जुळून येईल असं मला वाटत नाही.मुलीला सौम्य मंगळ आहे.थोडी हट्टी वाटतेय मुलगी.संसारात बायकांना तडजोड करावीच लागते.पुढे काही प्रॉब्लेम येण्यापूर्वीच आपण इथेच थांबू.मी दिलगिरी व्यक्त करतो.” मयंकच्या वडिलांनी इतकं बोलून फोन बंद केला.

रात्री प्रसन्नने सगळ्यांना एकत्र बोलावून सांगितलं.
“अनु,तुमच्या दोघांची पत्रिका जुळत नाहीय.त्यांची इच्छा नाही.त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं आहे.”

ते ऐकून अनुच्या डोळ्यात पाणी आलं. ती ताबडतोब तिच्या खोलीत आली आणि तिने मयंकला फोन लावला.
“मयंक,हे काय ऐकतेय मी?तुझ्या वडिलांनी नकार दिला? तुझं उत्तर ऐकायचं आहे मला.तुझी इच्छा असेल तर मी कुठलंही दिव्य पार करायला तयार आहे.”

पाच मिनिटं शांतता होती.मयंक काहीच बोलला नाही.

“मयंक,माझं उत्तर मला मिळालं. ह्यापुढे कुठल्याही मुलीच्या प्रेमात पडू नकोस आणि प्रेम करायचंच असेल तर आधी तिची पत्रिका बघ.” अनुने फोन बंद केला. संतापाने तिच्या डोळ्यात अश्रुंचे कढ येत होते.
—————————————————————
अनुने अथक परिश्रम करून सी ए मधे उत्तम यश संपादन केलं. तिला एका छोट्या फर्म मधे नोकरी पण लागली.

अनुला अंगद साठेचं स्थळ सांगून आलं.मुलगा एम बी ए झाला होता.मोठ्या फर्म मधे उच्चपदावर होता.अंगद तिला बघायला येण्यापूर्वी तिने अंगदला फोन लावला.
“मला बघायला येण्यापूर्वी माझी आणि तुमची पत्रिका जुळतेय का ते बघा.” अनु रागातच बोलली.

“पत्रिका? ते काय असतं? मला लग्नाची पत्रिका माहितीय.पण आवडलं,तुमचं रोखठोक बोलणं. मी पण तसाच आहे,छान जुळेल आपलं.” अंगद हसत म्हणाला.

अनुला अंगद आवडला. उंच,सावळा,चेहऱ्यावर मिश्किल भाव,हसरा,बोलण्यात लाघवी.अंगदने अनुला बघायला आल्यावर तिथल्या तिथेच होकार दिला.अनुचा गोडवा,तिची बुद्धीची चमक त्याला आवडून गेली.

एका सुमुहूर्तावर अनु अंगदची झाली.
सौ अनुश्री अंगद साठे.
—————————————————————–
अनुश्री ऑफिसमध्ये जायला निघणार इतक्यात मोबाईल वाजला.तिने बघितलं. नंबर सेव्ह केलेला नव्हता.

“हॅलो, मयंक बोलतोय.एका कॉमन फ्रेंडकडून तुझा नंबर घेतला अनु.”

“अनु नाही.सौ अनुश्री अंगद साठे.”

“सॉरी,तो हक्क मी कधीच गमावलाय.माफी मागण्यासाठी फोन केला.बाबांनी माझं पत्रिका बघून लग्न केलं पण दोन वर्षात घटस्फोट झाला.सतत वाद,भांडणं. एकमेकांची मन कधी जुळलीच नाही.
पत्रिकेत छत्तीस गुण जुळले होते पण मनाने एकही नाही.” मयंकच्या बोलण्यात विषाद होता.

“माझ्यासाठी तो विषय संपला आहे.पत्रिकेत तथ्य नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही,पण पत्रिकेतील गुणांपेक्षा एकमेकावरचा विश्वास आणि प्रेम संसार पुढे नेतो. प्रेम केल्यावर त्यात तन मन धन सगळं अर्पण करायचं असतं ही माझी भावना आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते,मी माझ्या नवऱ्याला तन मन धन सगळं अर्पण केलंय. नितांत प्रेम करते मी त्याच्यावर.यापुढे मला संपर्क करायचा प्रयत्न करू नका.” अनुने फोन बंद केला.डोळ्यात पाणी साठलं होतं. वॉशबेसिन वर तिने चेहरा स्वच्छ धुतला आणि अंगदला फोन लावला.

“अंगद,आज मी हाफ डे घेतेय,तू पण लवकर ये.लॉंग ड्राइव्हला जाऊ आणि बाहेरच जेवू.”

“आणि….” अंगद तिची चेष्टा करत म्हणाला.

“अंगद, ये लवकर,मी वाट बघतेय.” नववधूसारखी अनु लाजली.

तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अंगदबरोबर आज तिला सौख्याचे क्षण अनुभवायचे होते. तिचं हृदय आज परत अंगदला प्रीतीची साद घालत होतं……

–×× समाप्त ××–

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}