★★ शिवोहम् ★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★ शिवोहम् ★★
ध्यातो आम्ही महेशा, रजतगिरी
जसा,चंद्रमौळी प्रभू तो रत्नासा कांतीयुक्ता।
परशुधर मृगाजीन धारी दिसे तो,बैसे पद्मासनी जो, स्तविती गण जया। व्याघ्रचर्मी बसे तो,विश्वाद्या विश्वावंद्या निखिल भयहरा, पंचवक्त्रा त्रिनेत्रा।।
महेशची रोजची महादेवाची स्तोत्रं ,मृत्युंजय जप सुरू होतं. दाराची बेल वाजली तशी कांता धावतच दाराजवळ गेली. जपात व्यत्यय आला म्हणून महेश ओरडलाच. “तुला किती वेळा सांगितलं आहे,माझा जप सुरू असताना दारावरची बेल,मोबाईल सगळं बंद ठेवत जा. माझं लक्ष विचलित होतं. कोण आलंय?”
कांताने दार उघडलं. कुठल्यातरी अनाथाश्रमातून एक छोटा मुलगा मदत मागायला आला होता. तिने त्याच्या हातावर शंभरची नोट ठेवली आणि पावती घेतली.
“कोण होतं?”
“एक छोटा मुलगा मदत मागत होता.त्याला शंभर रुपये दिले.”
“इतके द्यायची काय गरज होती? दहा वीस रुपये देऊन दार बंद करायचं.”
कांता काहीच बोलली नाही.
‘ओम नमः शिवाय.’ महेशचा माळेवर जप सुरू झाला. कांताने महेशकडे बघितलं. त्या दोघांच्या लग्नाला पंचवीस वर्ष होऊन गेली होती,तरी महेशच्या स्वभावात तसूभर फरक नव्हता. महेशची आणि तिची गाठ देखील महादेवाच्या देवळातच पडली होती…
***
वेळणेश्वरला राहणारे सदानंद आणि सुमा पाध्ये ह्यांचा एकुलता एक मुलगा महेश! शेजारी राहणाऱ्या माईंनी एक दिवस सदानंदला विचारलं,” सदा, महेशचं लग्न करतो आहेस का? माझी लांबची भाची उद्या इथे येते आहे. कांता मराठे नाव आहे! पोर अगदी नाजूक,साधी,गरीब आहे. तुझ्या महेश म्हणजे महादेव भक्त आणि त्याच्याचसारखा तापट! तुझ्यापेक्षा जास्त तो देवाचं करतो. त्याला सांभाळून घेणारी बायको हवी. नाहीतर सगळंच अवघड!”
“माई,लग्न तर करायचंच आहे यंदा. महेश दोन दिवसांनी पुण्याहून रजा काढून येतोच आहे. तेव्हा त्याला विचारतो.”
महेश वेळणेश्वरला आला. आल्याबरोबर महादेवाच्या देवळात गेला. पिंडीसमोर पद्मासन घालून ध्यान लावून बसला. अचानक काहीतरी हालचाल झाली म्हणून त्याने डोळे उघडले. त्याच्या बाजूला एक सात्विक सौंदर्य असलेली मुलगी डोळे मिटून मनोभावे नमस्कार करत होती. कधीही चलबिचल न होणारा महेश थोडासा विचलित झाला. त्याने नमस्कार केला आणि घरी जायला निघाला. घरी आल्यावर देखील ती शांत, सात्विक मुलगी डोळ्यासमोर सतत येत होती.
“महेश, साताऱ्याहून माईंची भाची आली आहे. तुझ्याबद्दल विचारत होत्या. मुलगी बघायला काय हरकत आहे. आवडली तर पुढचं ठरवू.”
“आई,तुम्हाला माहितीच आहे. मला देवाचं मनापासून करणारी मुलगी हवी. माझी पूजाचर्चा,जप,ध्यान हे सगळं तिला चालेल का? देवाला नमस्कार करणारे सगळेच असतात पण माझ्यासारखे शिवमय फारच कमी!”
“अरे,’शिव’ हे तत्व आहे. आदि,अनादि, अंत म्हणजे ‘शिव’. ते तत्व तुझ्यात सामावून घे. ‘शिवोहम्’ म्हणजे आपल्या आतला देव जागृत करणे. फक्त शिवाची स्तोत्रं आणि जप करून उपयोग नाही. तुझा राग कमी कर.” सदानंदने महेशला समजावलं.
“बाबा, मला ह्या विषयावर जास्त चर्चा करायची नाही.”
माई न सांगताच कांताला सदाकडे घेऊन आल्या. महेशने तिला बघितलं आणि तो चपापला. ही मुलगी माईंची कोण? कधी बघितलं नव्हतं. तिला बघून तो परत अस्वस्थ झाला. तो नकळत तिच्याकडे ओढला जात होता. माईंच्या नजरेला ते दिसलं.
“महेश,ही माझी लांबची भाची कांता. प्रथमच इकडे आली आहे.”
महेशची आणि कांताची नजरानजर झाली आणि सात जन्मांची गाठ तिथेच पडली. महेशने सदाला सांगितलं, “बाबा,कांता माझी सहचारिणी म्हणून योग्य आहे. तिच्यासारखी शांत, सात्विक पत्नी मला हवी आहे.”
कांता आणि महेशचं लग्न अगदी थोडक्यात,साध्या पद्धतीने झालं. महेश काही कामानिमित्त बाहेर गेला असता सदानंदने कांताला सांगितलं,”सूनबाई, महेशला असलेलं शिवाचं वेड तुला ठाऊकच आहे. ते तू जपत रहा. जरा तापट आहे. पण तू शांतपणे त्याला सांभाळून घेशील ही खात्री आहे.”
“आई-बाबा तुम्ही काळजी करू नका.” कांता दोघांनाही वाकून नमस्कार करत म्हणाली.
**
पुण्यात महेश-कांताचा संसार सुरू झाला. महेशची पूजा एक तास चालत असे. त्यावेळी घरात कोणी बोलायचं नाही,आवाज नको ही सगळी बंधनं कांता पाळत आली. कांताला मुलगा झाला त्याचं नाव देखील महेशने ‘शिवा’ ठेवलं. पण कांताला आता अनेकदा मनात यायला लागलं होतं की इतकी वर्षे मनोभावे पूजाअर्चा करणारा, जप,ध्यान करणारा महेश स्वभावाने तसाच होता. त्याच्यात संयम नावालाही नव्हता. शिवस्तुती करता करता तो आत्मस्तुती, आत्मप्रौढीकडे झुकायला लागला होता. ऑफिसमध्ये कुणाशी पटत नव्हतं. शिवाला सतत धाक! त्याच्यातला अहंकार वाढतच होता. पण मुळातच शांत असलेल्या कांताने कधी वाद घातला नाही.
वडिलांच्या अति देवदेव करण्यामुळे शिवा फक्त देवाला हात जोडत होता, पण त्याच्यात गुण सगळे आईचे आले होते. शांत,समंजस,लोकांना मदत करणारा,कोणालाही न दुखावणारा!
शिवाचं लग्न ठरलं आणि कांताने त्याला सरळ सांगितलं, “शिवा, ह्यांच्या स्वभावापायी तुमच्या दोघात वाद नको. तुम्ही वेगळे रहा. आम्ही थकलो की तुमच्याकडे येऊच पण तुमची सुरवातीची वर्ष तुम्ही एकमेकांना समजून घ्या.”
****
“कांता,आमचं मित्र मंडळ मानस सरोवरची यात्रा करायची असं ठरवताहेत. मी जाईन म्हणतोय.”
कांता विचारातून भानावर आली.
“अहो,मानस सरोवराची यात्रा इतकी सोपी आहे का? आणि तुमचं वय?”
“आता तू अडथळे आणू नकोस. आम्ही दोन महिने चालायची प्रॅक्टिस करणार आहोत. ज्यांनी ट्रिप अरेंज केली ते ट्रेनिंग देणार आहेत. मला शिवस्वरूप अनुभवायचं आहे.”
वडिलांचा निर्णय ऐकून शिवा देखील नाराज झाला. “आई,बाबांना ह्या वयात झेपणार आहे का? तिथे ऑक्सिजन लेव्हल कमी होते. ती यात्रा इतकी सोपी नाही. प्रचंड चालावं लागतं.”
“शिवा, त्यांना जाऊ दे! का कुणास ठाऊक,माझं मन सांगतंय की त्यांना आता खरा ‘शिवोहम्’ चा अर्थ कळेल. त्यांची यात्रा सुखकर होईल,तू काळजी करू नकोस.”
***
मानस सरोवराच्या यात्रेला महेशच्या गृपमध्ये एक कोवळा वीस वर्षांचा असीम नावाचा तरुण मुलगा होता. यात्रेत कुठे मुक्काम असला की महेश ध्यान लावून बसत असे. एकदा महेश जप करत असताना, असीमने जोरात मोबाईलवर गाणं लावलं. ते ऐकून महेशचा संताप झाला. “कशाला तुम्ही मुलं अशा यात्रांना येता? परमेश्वराच्या सान्निध्यात जाण्यासाठी,त्याला जवळून बघण्यासाठी ही यात्रा आहे. शिवाचे जिथे अस्तित्व आहे, ते अनुभवण्यासाठी आपण चाललो आहोत. हा काय थिल्लरपणा?”
“काका,रिलॅक्स! परमेश्वर सगळीकडे आहे. तुम्ही आत्ता ध्यान लावून बसला होता ना, तेव्हा मला तुमच्यात महादेव दिसले,तसेच वाघाच्या कातडीवर ध्यान करणारे.मी असं ऐकलं आहे की महादेव नेहमी ध्यानस्थ असतात, म्हणून त्यांना जागे करण्यासाठी महादेवाच्या पिंडीला नमस्कार करण्याआधी टाळी वाजवतात. माझा मोबाईल म्हणजे टाळी समजा हवं तर.” असीम हसत म्हणाला.
महेशला असीमच्या बोलण्याचा भयंकर राग आला आणि त्याने असीमशी बोलणं बंद केलं.
यात्रेचा शेवटचा टप्पा सुरू झाला आणि महेश अचानक घेरी येऊन पडला. ऑक्सिजन कमी झालं,धाप लागत होती. महेशचे मित्र आणि कॅम्पची काही माणसं थांबली. त्यात असीम पण होता. दिवसभर त्याने महेशची सेवा केली. तळहात आणि तळपाय सतत चोळत होता. ऑक्सिजनची लेव्हल सतत चेक करत होता. औषधांच्या वेळा सांभाळत होता. दुसऱ्या दिवशी हळूहळू महेशने प्रवास सुरु केला. असीम सतत महेशबरोबर होता. त्याला आधार देतच प्रवास करत होता. मानस सरोवराच्या जवळ आल्यावर कैलासाचे दर्शन झाले आणि महेशच्या डोळ्यातून अखंड धारा वाहायला लागल्या. इतकी खडतर यात्रा पार करून प्रत्यक्ष महादेवांचे निवासस्थान बघून त्याला भरून आलं. अहंकार गळून पडला. तन मन ‘शिवोहम्’ म्हणत होतं. महेशचे डोळे असीमला शोधू लागले. असीम दूरवर एकाग्र नजरेने कैलासाचे शिखर बघत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. महेशच्या शरीरातून अचानक कसलीतरी संवेदना जागृत झाली. असीमच्या रूपाने महेशला महादेव दिसला होता. त्याच्यातील शिवतत्व महेशने ह्या दोन दिवसात अनुभवलं होतं. शरीर हलकं झाल्यासारखं वाटलं. आता फक्त ‘शिवोहम्’ जागं करायचं होतं. आतल्या परमेश्वराचं स्मरण करायचं होतं. महेश धीम्या पावलाने असीमजवळ आला,त्याचा हात हातात घेतला आणि साश्रु नयनांनी त्याच्याकडे बघून हसला…
★★समाप्त★★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे