मनोरंजन

चाँकलेट काका © दीपक तांबोळी 9503011250

चाँकलेट काका

-दीपक तांबोळी

धावपळ करत मी मुंबई पँसेंजर पकडली.आतमध्ये नेहमीप्रमाणेच गर्दी होती तरीही मला बसायला जागा मिळाली. पँसेंजरचा प्रवास कंटाळवाणा असला तरी प्रत्येक छोट्या छोट्या स्टेशनवर थांबणारी गाडी,त्यातून उतरणारी आणि चढणारी वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं मला मोठी इंटरेस्टिंग वाटतात.विशेष म्हणजे त्यांच्या कोणाचीही भीडभाड न बाळगता आपापसात मारलेल्या गप्पा फारच मजेदार असतात.या गप्पांमधूनच त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनाची बरीच कल्पना आपल्याला येत असते.
माझ्याच बेंचवर बसलेल्या लहान मुलांची आपसातील भांडणं हसूही आणत होती आणि वीटही.म्हसावद आलं.माझ्यासमोरचे दोनजण उतरुन गेले आणि त्याजागी एक साठी उलटलेला माणूस येऊन बसला.माझ्या बेंचवरच्या मुलांची खिडकीत कोण बसेल यावरुन भांडणं झाली.नंतर मारामारीही.मग दोघांनीही मोठ्याने भोकाड पसरलं.त्यांची आई आणि बाप त्यांना समजवायला लागले तेवढ्यात…
“चाँकलेट खाता कारे पोरांनो”असा आवाज घुमला.सगळे त्या आवाजाकडे बघू लागले.पोरांनीही रडणं सोडलं आणि त्या आवाजाकडे बघू लागले.
“कारे खाता का चाँकलेट?”माझं लक्ष गेलं.माझ्या समोर बसलेला तो साठी उलटलेला इसम त्या मुलांना विचारत होता.चाँकलेटला नाही म्हणणारी लहान मुलं त्यातून पँसेंजरमध्ये प्रवास करणारी गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीयांची मुलं जवळजवळ अशक्यच. दोघांनीही होकारार्थी माना हलवल्या.मग त्या माणसाने बँग उघडून तिथल्या पोरांना चाँकलेट्स दिली.पोरं खुष होऊन हसायला लागली आणि पोरांचं रडणं थांबलं म्हणून त्यांच्या आया खुष झाल्या.एक चाँकलेट माझ्याकडेही सरकवत तो माणूस म्हणाला
“घ्या साहेब”
” अहो नको.चाँकलेट खायला मी लहान थोडीच आहे?” मी आढेवढे घेत म्हणालो खरा पण मलाही मिळालं तर हवंच होतं चाँकलेट.
“अहो चाँकलेट खायला कुठं वय लागतं का?मी आता म्हातारा झालोय तरी मला चाँकलेट खायला आवडतात.घ्या लाजू नका”
मी ते चाँकलेट घेतलं आणि लहान मुलांसारखं पटकन खाऊन टाकलं.एवढ्यात माझ्या मागच्या कंपार्टमेंटमध्ये मुलाच्या रडण्याचा आवाज आला.तसा माझ्यासमोरचा माणूस उठला.उठताउठता त्याने बँग उघडून त्यातली चाँकलेटस् काढली तेव्हा त्याची ती बँग पुर्ण चाँकलेट्सनी भरलेली दिसली.तो त्या कंपार्टमेंटमध्ये गेला आणि मुलांच्या रडण्याचे आवाज बंद झाले.
थोड्या वेळाने पाचोरा आलं आणि मी उतरुन गेलो.

दोनतीन दिवसांनी मी चाळीसगांवला जायला निघालो.म्हसावद आलं तसे ते चाँकलेटवाले ग्रुहस्थ योगायोगाने माझ्यासमोरच येऊन बसले.मी त्यांना ओळखलं पण त्यांनी मला ओळखल्याचं दिसलं नाही म्हणून मी त्यांना त्यादिवशीची ओळख करुन दिली.ते हसले
“हो आठवलं.रोज नवीननवीन माणसं बघतो ना म्हणून विसर पडतो”
“काका आजही चाँकलेट्स देणार का?”
“हो तर! हे तर माझं रोजचंच आवडतं काम आहे.रोज याच गाडीने इगतपुरीला अशीच चाँकलेट्स वाटत जातो.तिथं परत चाँकलेट्सनी बँग भरुन घेतो आणि तिकडून पँसेंजरनेच परत येतो”सांगताना त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला
आता मात्र या माणसाबद्दल मला उत्सुकता वाटू लागली.मी आश्चर्यचकीत होऊन विचारलं
” काका तुम्हांला त्यात आनंद मिळत असणार हे नक्की पण अजून काही विशेष कारण आहे का?”
“साहेब मी निव्रुत्त शिक्षक.बायको दोन वर्षांपूर्वी वारली.एकुलता एक मुलगा खुप शिकला आणि नोकरीसाठी आँस्ट्रेलियात जाऊन बसला.म्हसावदसारख्या खेड्यात त्याला आणि त्याच्या बायकोला यायला आवडत नाही. मागच्या वर्षी त्याला मुलगा झाला.त्याला तरी तो घेऊन येईल असं वाटत होतं पण त्याने फक्त फेसबुकवर त्याचे फोटो पाठवले.कधीतरी व्हिडिओ काँलवर नातू दिसतो .त्याला घेण्याची,त्याचे लाड करण्याची खुप इच्छा होते पण काय करणार?”
“मग तुम्हीच का जात नाही आँस्ट्रेलियात?”
” साहेब आपलं सगळं आयुष्य म्हसावदसारख्या खेड्यात गेलं.इथं शेती आहे.ती सोडून कुठे जावंस वाटत नाही.बहुतेक नातेवाईक इथंच आहेत.त्यांच्यामुळे तरी थोडा जीव रमतो. मुलाला म्हंटलंय,उन्हाळ्यात इथे येऊन मला आँस्ट्रेलियाला घेऊन जा आणि पावसाळा सुरु होण्याआधी इथे आणून सोड.हो हो म्हणतोय.बघू कधी नेतो ते?मुलगी औरंगाबादला आहे पण दुर्देवाने तिला मुलबाळ नाही. कधी होईल सांगू शकत नाही.त्यामुळे नातवांशी खेळण्याची,त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याची इच्छा अपुर्णच राहिली.ती या गोरगरीबांच्या मुलांना चाँकलेट वाटून मी पुर्ण करतोय.रडणारी पोरं जेव्हा चाँकलेट पाहून हसायला लागतात तेव्हा खुप बरं वाटतं”
” छान. पण तुम्हांला असं वाटत नाही की असं चाँकलेट्स देऊन तुम्ही त्या मुलांचे दात खराब करताय?”
” अहो रोजरोज चाँकलेट्स खायला ती काय श्रीमंताची पोरं आहेत?कधीतरी आईबापाने घेऊन दिलं तर खाणार बिचारी.आणि असंही मी त्यांना दोन चाँकलेट्सच्यावर देत नाही”
” फक्त गाडीतच वाटता की अजून इतर कुठं…?”
” कधी झोपडपट्टीत वाटतो तर कधी आदिवासी पाड्यांवर जाऊन वाटतो.आसपासच्या खेड्यातल्या शाळांमध्ये जाऊनही वाटतो”
“अरे वा!” त्यांच्या या कार्याने मी चांगलाच प्रभावित झालो.मग मी पाकिट काढून पाचशेच्या दोन नोटा त्यांच्या हातात देऊन म्हंटलं
” हे तुमच्याकडे असू द्या.माझ्याकडूनही चाँकलेट्स देत चला”
त्यांनी त्या नोटा मला परत केल्या
“नाही साहेब. मी माझ्या समाधानाकरीता हे करतो.तुमच्या पैशांनी चाँकलेट्स दिल्याचं समाधान मला मिळणार नाही. तुम्ही असं करा ना तुम्ही एक्स्प्रेसनेही जात असता.एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातही बरीच गरीब मुलं तुम्हांला भेटतील.त्यांनाही चाँकलेट्स मिळाली तर आनंदच वाटेल”
त्यांचं म्हणणंही योग्यच होतं.पण का कुणास ठाऊक असं चाँकलेट्स देणं मला माझ्या स्टेटसला न शोभणारं वाटलं.
मग त्यांनी माझी चौकशी केली.मलाही दिड वर्षाची लहान मुलगी असल्याचं मी सांगितल्यावर त्यांना आनंद झालेला वाटला.म्हणाले
“कधी या मुलीला घेऊन.मजा येईल तिच्याशी खेळायला”
” हो जरुर आणेन” मी आश्वासन दिलं
त्यानंतर आमच्या भेटीगाठी होत गेल्या.त्यांचं नांव काशिनाथ पाटील होतं तरी मी त्यांना चाँकलेट काकाच म्हणायचो.

एक दिवस चाळीसगांवला बायकोच्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी जायला निघालो.बाकीच्या गाड्या लेट झाल्यामुळे पँसेंजरने जायला निघालो.सोबत मुलगी होतीच.मग मी चाँकलेट काकांना फोन करुन बोलावून घेतलं.म्हसावदला ते आले.माझ्या मुलीला मांडीवर घेऊन बसले.तिच्याशी खेळतांना ते खुप आनंदी वाटत होते.तिच्या बोबड्या बोलांनी ते हरखून जात होते.चाळीसगांव येईपर्यंत मुलगी त्यांच्याकडेच होती.चाळीसगांव आलं तसं त्यांनी मुलीचा मुका घेत माझ्याकडे दिलं.
“खुप गोड आहे तुमची मुलगी” तिच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले.मग खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून त्यांनी माझ्या हातात दिली.
” हे कशासाठी?”मी आश्चर्यचकित होऊन विचारलं
“माझ्याकडून तिला फ्राँक घेऊन घ्या”
“अहो कशाला काका?”
“असं कसं नातीला पहिल्यांदा बघितलं.तिला काही द्यायला नको?”बोलताबोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

काही दिवसांनी माझं पाचोऱ्याचं काम संपलं आणि बऱ्हाणपूरकडचं सुरु झालं.चाँकलेट काकांशी भेट होणं मुश्कील होऊन बसलं.अधूनमधून फोन करुन मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचो.आँस्ट्रेलियातला त्यांचा मुलगा येऊन गेला का याचीही मी चौकशी केली.त्याला अजून सुटी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
दोन महिन्यांनी बऱ्हाणपूरकडचं माझं काम संपल्यावर चाळीसगांवकडची साईट सुरु झाली.आता चाँकलेट काकांची रोजच भेट होणार याचा मला आनंद झाला.मी त्यांना फोन केला पण त्यांचा फोनच बंद होता.दुसऱ्या दिवशी मी पँसेंजरने जायला निघालो.काकांना फोन लावला.आताही फोन बंदच होता.म्हसावदला दोन माणसं माझ्यासमोरच येऊन बसली.मी त्यांना विचारलं
“काहो तुम्ही म्हसावदचेच ना? त्या काशिनाथ पाटलांना ओळखता का?”
“कोणते काशिनाथ पाटील?गावात चारपाच काशिनाथ पाटील आहेत.त्यातले नेमके कोणते?”
“ते निव्रुत्त शिक्षक होते.आणि रेल्वेत नेहमी लहान मुलांना चाँकलेट्स वाटायचे”
“ते व्हय?ते तर गेले”
“गेले म्हणजे आँस्ट्रेलियाला गेले?त्यांचा मुलगा आला होता की काय त्यांना घ्यायला?”
“अवं एवढं कुठं नशीब त्या म्हताऱ्याचं !.पोरगा यायच्या आतच म्हतारा वारला ”
” काय?ते वारले?”कसे काय?”मला प्रचंड धक्का बसला
” हाँर्ट अटँक.दुसरं काय!झोपेतच गेला म्हतारा”
“अरेरे!फार वाईट झालं “मला गहिवरुन आलं
” व्हय.म्हतारा लई दिलदार व्हता.कुणालाबी मदत करायचा.पोरासाठी आणि नातवासाठी लई तगमग व्हती.शेवटी पोराची आणि नातवाची काई भेट झालीच नाई”
“म्हणजे मुलगा आलाच नाही?”
“आलता पोरगा पण चार दिसांनी. मग काय पुतण्यानेच डाग दिला.पोरगा आलाबी तर एकटाच आला.बाईला अन् पोऱ्याले काय आनलं नवतं ”
मला खुप वाईट वाटलं.दुसऱ्याला आनंद वाटणारा हा माणूस स्वतः मात्र आनंदाला पारखा होता.

दुसऱ्या दिवशी मी माझ्या बँगेत चाँकलेटचं एक पाकीट सोबत घेतलंं.पँसेंजरमध्ये बसलो.पाचोऱ्याला खिडकीत बसलेला एक पोरगा कचोरीसाठी हट्ट करु लागला पण त्याच्या आईकडे पैसे नसावेत.तेवढ्यात गाडी हलली.पोरगा जोरात रडायला लागला.त्याच्या आईने त्याला दोन थपडा लगावल्या तसं पोरगं जास्तच रडू लागलं.मी बँग उघडून त्यातली दोन चाँकलेट्स पोरासमोर धरली.पोरगा एकदम शांत झाला.त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं.त्याने ती चाँकलेट्स घेतली.त्याच्यासमोर बसलेल्या त्याच्या बहिणीलाही मी दोन चाँकलेट्स दिली.तिचाही चेहरा आनंदाने फुलून आला.त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघतांना मला चाँकलेट काकांची आठवण आली.त्या आठवणीने मला गलबलून आलं.मनात म्हंटलं “काका तुम्ही काही काळजी करु नका.तुमचं अर्धवट राहिलेलं कार्य मी पुरं करणार आहे”

© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “अशी माणसं अशा गोष्टी ” या पुस्तकातील आहे.माझ्या पुस्तकांबद्दलच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}