मनोरंजन

पाऊस पागोळी ✒️ वासुदेव पाटील…………

पाऊस पागोळी

✒️ वासुदेव पाटील…………

पाऊस!.….पाणी!…..वर्षा!……… बरखा!…….!….. पाऊस पडकयीत पडतो, पडघरावर पडतो! पाऊस परसरीत पडतो, पडवीत पडतो, पाऊस पागोळीत पडतो, पाणंदीत पडतो! पाऊस पाईनघाटात पडतो, ओवरी- देवळीत पडतो. रानात खपत, संसाराच्या कुतर ओढीनं रापलेल्या, चांदी चमकणाऱ्या दाढीत पडतो, बीन बॅगेत बसून काॅफीचा घोट वा वाफाळलेला चहा पित पेपर चाळत गंमत पाहणाऱ्याच्या गढी-माडीवरही पडतो! वडा, पिंपरणीच्या- लिंबाच्या कट्ट्यावर पडतो देवळाच्या पारावर गारवा करत पडतो! मारवा छेडत पडतो. यमदंडागत पडतो सैरावैरा सैराटल्यागत करत तर कधी यतीच्या समाधीगत पडतो! पडतो की झरतो? स्फुरतो की दाटतो?पुरुन उरुन पडतो की उरुन पुरुन पडतो? आभाळ फुटल्यागत की महादेवाच्या पिंडीवरच्या गळती गत मेघडंबरीस गळवत सृष्टीवर जलाभिषेक करत पडतो? आभाळातून पाऊस पडतो की पावसातून आभाळ? आभायात पाऊस व्याकुळते की पावसात आभाळ?

कातरवेळ….तिन्हीसांजेची वेळ…दिवेलागणीची दिम्हय वेळ…या वेळी पडणारा पाऊस बोहरा असतो!? बाबो….! लाघव वेळ, माधववेळ, कातरवेळ, मुहुर्त वेळ? कोणती वेळ कोणत्या वेळेला येत येत कुणास शुभ होते की कुणास अशुभ? मनातल्या कंगोऱ्यातील हे सारे खेळ! रुढी, रिती पंरपरेच्या लेपणाची पुटे चढवत माणूस कल्पना करत राहतो. पाऊस तो पाऊसच! जो धरणीची कुस उजवत बहराचं दान देत सृष्टीचं उदरभरण करतो तो कातरवेळी पडला तर बोहरा कसा? असो पड बाबा खुशाल पड. पण वेळच्या वेळी पड! पुरेसा पड! तुझी मृगसर, आखाड सावन सर, झाडत झडीनं ये वा तरणा ये पण यावा पाऊस झडावा झकूबदलीगत झगार पांघरत! हवं तर तू झगार पांघर!

पारणीकर दरबाऱ्या बसलाय मारतीच्या देवळानजीकच्या पिंपरणीच्या पारावर पावसाळी कर्दमलेला गारवा साहत व कातरवेळचा बोहरा पाऊस झेलत वरच्या खबदाळीतल्या पारव्यागत! पाऊस वाऱ्यासवे टिपरी खेळत पिंपरणीच्या पानाच्या सनईवर ठेका धरत पडत नाचतोय अन दरबाऱ्या सरणाऱ्या कमल बिडीचे दम(कश) मारत धूर सोडतोय कमळनच्या यादीचा पाऊस सोलत! वरच्या पिंपरणीतल्या झावळ्यातल्या चित्रविचीत्र अभ्रात तो गुदस्ताच गेलेल्या कमळणीस शोधतोय!

” दरबार! झडीवाकनचा काय बसलाय रे पारावर?” पायातली बुटं खाली ठेवत उडी मारत पारावरच बसणारा परबतसिंग पुसतोय.

” परब्या, पाऊस! बघ चिखलाची पचकावणी करतोय!” पाण्याच्या थेंबाची बतावणी करत ओलावल्या पापणकडा पुसत दरबाऱ्या बोलतो.

” दरबाऱ्या, पाऊस आभायातून झरतो तसाच दिठीतही झरतो ना?”

” अभ्रातल्या पावसाच्या निमीत्तानं मनाच्या प्रस्तरभंगातल्या
घळईतला आठवाचा सोंगा उचकवत ओघळ धावून येतात दुसरं काय? चल येतो (कमळण वाट पाहत असणार) दिवाबत्ती करायचीय”

दरबाऱ्या गोणपाटाची घोंगडी न करता गोणपाट तसंच हातात धरत निघाला. पावसात भिजणं हेही कोण अप्रुक असतं पहिल्या पावसास आरस्तोल केल्यासारखंच! पण कोणताच पाऊस पहिला नसावा! कोणता कुणाचा शेवटचा होईल हे ही सांगता येत नाही! कमळण गेली आवंदाचा पाणकाळा न झेलताच! आपण झेलतोय हा पाणकाळा ही अखेरचा होईल का? की अजून किती पावसाळे झेलायचे बाकी!
दरबाऱ्या नं घराच्या दाराची कडी उघडली. एक येली घराच्या दारालगतच अर्ध्या गाळ्यात न्हाणीघर…पुढे लोखंडी पट्ट्याचा पलंग. मेंढीच्या बालाची लोकर घातलेलं जीन, गादी अंथरलेला. सरावानं अंधारात पलंग धरत दरबाऱ्या पुढे चाललाय! भिंतीच्या कडेला काळपट पारले बिस्कीटाचे पत्री डबे व मडक्या बिटक्याची उतरंड! खालच्या जमिनीनं ओल धरत सारवणाची खपली धरलीय! सानं (झरोका) उघडं राहिल्यानं घरात पाणी पाहुणं म्हणून आलेलं. सरावानं चाचपत दरबाऱ्यानं बोखल्यातली सनफ्लावरची की घोडाछाप काडपेटी हुडकत पेटवली. दिवा लावताच पिवळी वलयं डोळ्यासमोर फेर धरत तांबकट होऊ लागली . वलयात पिवळीधमक कमळण तरारली.

” गोणपाट हातावर टाकण्यासाठी दिलं होतं की घोंगडी करायला? आलात ना भिजून?” वलय हसत हसत जणू मोठी होत गेली. दरबाऱ्या यंत्रवत रुमाल उचलत डोकं पुसतोय व पलंगावर बसतो. त्या सरशी लोखंडी पट्ट्या कचकच कचाकच कुचकुच वाजतात! आठवाचा सोंगा उचकटत राहतो.

.
.

गावची जत्रा…कमळीनं वर्षभर पै पै जमवलेले व बापामागं लागून हट्टानं हा पलंग घेतलेला…. पहिला पाऊस..पलंगाचा की आपला….. आशा ..स्वप्ने लिप्सेचे इमल्यावर इमले…..पण येणाऱ्या नंतरच्या प्रत्येक पावसात जणू हळूहळू वाहून गेलेले….आठवाचा पूर….याद सोलत….झरतोय…

सान्यातून येणारा पाऊस कमी की काय पलंगावरच्या धाब्यातच उंदरानी केलेल्या बिळातून बुरुबुरु खारी वदरते अन पाण्याची धार…..

” अहो चढा वर अन नळा ( उंदरा- घुशीचं बीळ) दाबा…”
दरबाऱ्या घोंगडी पांघरत वर चढतो कमळी घालून कळकेची इट्टी आढ्यास ठोकत जागा दाखवतेय….

दरबाऱ्याचा आठवणीच्या पुरात डोळा लागतो…
शेजारचं पडघर राहिलेल्या आढ्या – कड्यासहीत धडाड धप्पकन आवाज करत वदरलं. आवाजानं दरबाऱ्याचा डोळा उघडला. आपणही आता पडघरच..आपणही असंच लवकरच ….मग पडतीथ… मग फोटो भिंतीला याच घराच्या पोपडा निघालेल्या भिंतीवर कमळण शेजारी…अन हे घरही असंच पडघर होत वदरणार लोखंडी पट्ट्याच्या गंजक्या पलंगावर! या पलंगाचा तोच शेवटचा पाऊस….

टाक…सटवाईचा टाक…चेतन अचेतन वस्तूलाही लागू…पलंगाच्या पहिल्या पावसाच्या सोहळ्याचं कोण कौतुक! कोण गाजावाजा! पण शेवटच्या पावसाच्या घटकेचं कुणास सोयरसुतक? मातीच्या ढिगाऱ्यात उंदीर घुशीच्या साथीनं सडणं….मृत्यू अन जन्म या दरम्यानच्या प्रवासास जीवन हे नाव. पण त्याच्या अंताचं सत्य किती दाहक व विदारक….
.
.तिकडं पावसात पार पुरा ओलेता झालाय आता! पिंपरणी पावसाचा मारा कुठवर सोसवेल. तिनंही आता शरणागती पकडत वाऱ्यावर अंग टाकलंय! पारावरची सारी माणसं मन नाही म्हणत असतांनाही घराकडं पडत्या पावसात परतली! परबत विचार करतोय पारावर येणारी सारी माणसं आडमुठीच असतात? साव पापभिरू माणसं पारावर यायला घाबरत असावीत का या आडमुठी माणसांना!’ परबत स्वत:च स्वत:ला विचारत दरबाऱ्याची खाली जागा भरण्यासाठी पिंपरणीच्या खोडास टेकला.

पाऊस आडमुठीपणा करत गावातल्या दर्ज्यातून रौं रौं करत लोंढा वाढवतोय. रात्र चढतेय.

आडमुठेपणा….आडमुठी….आडमूठ….

पावसानं वाफसा झाल्यावर गावातली साव माणसं पारावर न येता रानात मूठ धरतील. साऱ्या रानात वेगळ्या वाणाची मूठ पण शेताच्या बांधा कडेनं काफ्टा..आडबांधानं कुळीथ आयसची जी मूठ धरतील ती आडमूठ….आडचाचावर धरली जाते ती आडमूठ…आडमूठीची पिकं ही मधल्या मुख्य पिकाचं रक्षण करतात. पशुपक्ष्यापासून वाऱ्यापासून वा इतर साऱ्याकडून..भड ही तसंच…

पारावरची ही आडमूठी माणसं भले घरात मुख्य असोत नसोत पण गावातल्या साव माणसाच्या रक्षणाची जबाबदारी जणू हीच पेलतात. बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येकाशी हीच आडमुठी माणसं आधी भिडतात. म्हणूनच की काय हेच आडमुठेपण याच्या रक्तात पारावरच भिनत असावे. गावातील कज्जा खटल्याचं निवारण हेच करतात, साव माणसाच्या गुणदोषाचंही विश्लेषण हीच पारावरची माणसं करत असतात..पण हल्ली येणाऱ्या पावसाळ्यागणिक ही आडमुठी माणसं कमी कमी होत चाललीय! कुणी जोडीदाराच्या गेल्यानं( दरबारागत) तर कुणी घरातल्याच माणसांकडून होणाऱ्या ससेहोलपटीनं! गावाला आपल्या आडमुठेपणानं आपण सरळ केलंय अन घरातच आपणास किंमत नाही ही सल …..

परबत ही उठला व आडमुठ्या पावसातच घरी चालू लागला. सून दार उघडणारच नाही व मुलगाही काही बोलणार नाही हे माहीत असूनही…..

गढीतल्या बीन बॅगेवर बसत ट्युबच्या चंदेरी दुधाळ प्रकाशातून खिडकीतून खामकराची शिल्पा पडणारा पाऊस न्याहाळतेय! अंधारात काय पाऊस दिसणार! पण कृष्णधवल अभ्राच्या दाटीतून चंद्र डोकावून पाहतोय तिच्यागतच! चंद्र तिला पाहतोय की ती चंद्राकडे? ओलेत्या पावसाला ओलीस ठेवून! दूर दूर नजरेपलीकडचा नदीचा काठ….न दिसणारा पण पावसात जाणवणारा…पाऊस साक्ष! नदीकाठावर बैरागी पाऊस पेटलाय…. झड गुंसावी बनत ऐलतीर पैलतीर भिंगारतेय! काठावरची हारीनं डवरलेली मव्हाची जांभळाची झाडं चांदण्याच्या पाणकळा कोळून पिताहेत. तो नाही, ती नाही तरी पावसाच्या साथीनं साक्षीला असणारी ही झाडं झड सोसत आपलं काम इमानेइतबारे करत आहेत! तिच्या अपरोक्ष त्याला व त्याच्या अपरोक्ष तिला भावनेचं भरत़ं आणण्याचं काम ही झाडं पावसात करत आलेली.

मव्हा जांभळीकडून राघू अंधारी झडकणीत आवाजाचा गिल्ला उठवत खामकराच्या गढीकडं झेपावतोय…….पाऊस…….

पाऊस केवळ आभाळातूनच झडत नाही तर तो मनातून ही झरतो आठवाचा पूर आणत…..कुणा शिल्पदेही मनातही तवंग उठवत….. कबीर शेला झुगारत की धानी चुनर गोंजारत!

जांभळबनाकडं नदीचा पूर पाहण्यासाठी गर्दी जमलीय..जागोजागी डबक्यात पिवळेधम्मक बेडूक हळदाळल्या अंगानं एकेकटे वा युग्मकतेनं डराव डराव करताहेत, कुठं लालभडक मृगकिडे घाई घाईनं निघालेत..पावशा मात्र शांत झालाय आता.

पारणीकर दरबाऱ्याच्या घरासमोर परबतनं उता गायकवाडास हलगी बडवायला लावलीय. हलगीही पावसाची नुसती ढबडब करतेय!
कसं असतं…घर पडलंय मलबा होत…दरबाऱ्यास मलब्यात काढला तरी तो गेलाय तरी कुणीही विचारतोय ” डफळं कुठं वाजतं?” तरी उत्तर एकच

” दरबाऱ्याच्या घरासमोर..”

दरबाऱ्या रात्रीच्या सैनधार पावसात घर पडल्यानं गेला…घर ही पडलं तरी ‘ दरबाऱ्याच्या घरासमोर!’ एवढं सांगण्यापुरतं तरी दरबाऱ्या हयात आहेच अजून…..एव्हाना आता त्याची तसबीर तयार करत परबतनं कमळी सोबत पोपडा आलेल्या भिंतीवर ठोकली ही असती पण घर कुठाय?

पाऊस यमदंड होत दरबाऱ्याच्या घरावर रात्रभर कोसळला होता.. तोच पाऊस कातरवेळी सुरु झालेला बोहरा पाऊस का?…..

8275314774

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}