काश्मीर हे नक्की कोणाचे
काश्मीर हे नक्की कोणाचे? याबद्दल अनेकांना कुतुहल व औत्स्युक्य वाटत असेल.
तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपां पासुन. ‘काश्यपः मीर’ !
संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सद्य वैवस्वत मन्वंतरातील सप्तॠषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे.
प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत.
मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासुन या सरोवराला ‘सतीसार’ हे नाव पडले.
जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय ‘अनंत नाग’ नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातुन मारावयाची नीती आखली.
याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला ‘वराहमुख’ (सध्याचे बारामुल्ला) नावाची दरी (घाटी) खोदुन त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वहावुन देण्यात आले. या सागराचे नाव होते ‘काश्यप सागर’ (सध्याचा कॅस्पियन सी). स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या मैदानात आला तेव्हा श्री विष्णूंनी त्याचा वध केला.
कोरड्या पडलेल्या या सरोवराच्या ठिकाणी मग वेद उपनिषद आदी शास्त्रांचे अध्ययन केंद्र विकसीत झाले. ज्या जागेत अशा अतिशय समृद्ध संस्कृतीचा उगम व विकास झाला त्या जागेवर वसलेल्या नगराचे नाव आहे ‘श्रीनगर’. काश्यपांच्या ‘अनंत नाग’ नावाच्या मुलाने श्रीनगरच्या बाजूलाच अजून एक शहर वसवले होते जिथे आज ‘अनंतनाग’ जिल्हाचे मुख्यालय आहे व त्या नगराचे नाव आजदेखील ‘अनंतनाग’ आहे.
श्रीनगर हे लवकरच भरभराटीस व प्रसिद्धीस आले. देवी गौरी व गणेश हे नियमितपणे इथे येत असत. गौरींच्या येण्याचा मार्ग ‘गौरी मार्ग’ म्हणजेच आजचे ‘गुलमर्ग’ म्हणुन ओळखल्या जातो. कल्हणाने ‘नीलमत पुराणाच्या’ संदर्भाने लिहीलेला ‘राजतरंगिणी’ हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासाचा प्रमाणग्रंथ मानल्या जातो. जगभरातील विद्वान काश्मीरच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी याच ग्रंथाचा संदर्भासाठी वापर करतात.
ब्रिटीश पुरातत्वविद एम् ए स्टेन यानी राजतरंगिणीचा तीन खंडांमध्ये सरल आंग्ल अनुवाद केला आहे.
काश्मीर नक्की आहे तरी कोणाचे?
काश्मीर हे काश्मीरची अधिष्ठात्री देवी देवी शारदेचे आहे.
“नमस्ते शारदा देवी, काश्मीरपूरवासिनी,
त्वमहे प्रार्थये नित्यम् विद्यादानीच देहिमे”.
शारदादेवीला काश्मीरपुरवासिनी म्हटले आहे. काश्मीरी भाषेच्या लिपीला ‘शारदा’ म्हटले जात असे व काश्मीरातील अध्ययनाच्या अनेक केंद्राना ‘शारदा पीठ’ म्हणत असत. संपूर्ण काश्मीरलाच कधी काळी ‘शारद देश’ म्हणुन ओळखल्या जायचा.
आठव्या शतकात आद्य शंकराचार्य काश्मीरला आले तेव्हा काश्मीर हे शैव संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. गोपालाद्री पर्वत शिखरावरच आद्य शंकराचार्यांनी शिव व शक्तीच्या एकरूपतेचे वर्णन करणाऱ्या ‘सौंदर्य लहरी’ ची रचना केली. त्या टेकडीलाच आज ‘शंकराचार्य टेकडी’ म्हणुन ओळखले जाते.
सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या कृष्णगंगा नदी काठी असलेल्या शारदा मंदिराचे सौंदर्य बघुन शंकराचार्यांना तुंगा नदीच्या तीरावर वसलेल्या शृंगेरी येथे तसेच मंदिर बांधण्याची प्रेरणा मिळाली.
शृंगेरीच्या मंदिरातील शारदेची चंदनाची मुळ काष्ठमूर्ती (विग्रह) काश्मीरमधुनच आणण्यात आली आहे.
आद्य शंकराचार्य आपल्या शिष्यांसहित काश्मीरात फिरत असताना एक प्रसंग घडला. एका काश्मीरी पंडित जोडप्यानी शंकराचार्यांना काही दिवसांसाठी त्यांचे आतिथ्य स्वीकारण्याची प्रार्थना केली.
शंकराचार्यांनी त्यांची प्रार्थना मान्य करण्यापूर्वी ते व त्यांचा शिष्य परिवार स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खातील ही अट घातली. ही अट ऐकून त्या जोडप्याला त्यांच्या आदरातिथ्याबद्दल शंका घेतल्यासारखे वाटले परंतू त्यांनी ही अट मान्य केली. सायंकाळी पाकसिद्धीसाठी आवश्यक तो शिधा व इंधनादी देऊन यजमान दाम्पत्य निद्रीस्त झालं. परंतू या सर्वांसोबत ते अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काही सामान द्यायचे विसरले होते. शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांना यजमानांना त्रास देण्याची मनाई केली व त्या रात्री ते काहीही न खाताच झोपलेत.
दुसऱ्या दिवशी शंकराचार्यांना उपवास घडला हे ऐकल्यावर त्या दाम्पत्यास अतिशय वाइट वाटले.
शिष्यांनी रात्री पाकसिद्धीसाठी वन्हीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा त्या गृहिणीने थोडे पाणी हातात घेऊन लाकडांवर शिंपडून अग्नी प्रज्वलित केला हे बघुन शंकराचार्यांना मोठेच आश्चर्य वाटले. काश्मीरच्या सामान्य जनांकडूनही खुप काही शिकण्यासारखे आहे हे शंकराचार्यांना कळून चुकले होते.
रामानुजाचार्यांनी अकराव्या शतकात काश्मीरला भेट दिली. केवळ काश्मीरातच उपलब्ध असलेल्या ‘ब्रह्मसुत्रां’चा अभ्यास करून ‘श्रीभाष्य’ लिहीले. रामानुजांना तो ग्रंथ ग्रंथालयात केवळ वाचण्यासाठी बघण्याची अनुमती मिळाली होती. तिथे कोणतेही टिपण काढण्याची त्यांना अनुमती नव्हती.
रामानुजार्य व त्यांचे शिष्य कुरूत्थलवर प्रतिदिनी ग्रंथालयात जाऊन अक्षर अन् अक्षर पाठ करून घेत. शारदापीठात परतल्यावर सगळे पाठांतर आठवून त्यांनी ग्रंथरचना केली. असे तीन महिने त्यांनी पाठांतर करून व आठवुन ‘श्रीभाष्य’ ग्रंथ पूर्ण केला. हाच ‘श्रीवैष्णवां’चा आद्यग्रंथ आहे.
काश्मीरची अधिष्ठात्री विद्येची देवी श्री शारदा प्रसन्न होवून रामानुजांसमोर प्रकटली व तिने त्यांना हयग्रीवाचे शिल्प आशीर्वाद म्हणुन दिले.
काश्मीर आहे तरी कोणाचे?
तर काश्मीर आहे भट्ट पंडित व विद्वानांचे.
नीलमत पुराणानुसार काश्मीरला 5100 वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. काश्मीरची सगळी लोकसंख्या हिंदू व बौद्ध होती.
जगभर इस्लामी आक्रमक एक एक प्रदेश पादाक्रांत करत असताना लोहाणा वंशाच्या शूर राजांनी भारताच्या पश्चिमी सीमांचे त्यांच्या आक्रमणापासुन यशस्वी संरक्षण केले होते. हे लोहाणा प्रभू रामांचे पुत्र राजा लव यांच्या सैन्यातील खड्गवीर होते. आजचे लाहोर हे रामायण काळातील ‘लवपुरी’ होते.
जे इतिहास विसरतात त्यांच्यावर इतिहासाच्या पुनरावृत्तीचे दुर्भाग्य ओढवते.
🙏🙏🏻.. विंग कमांडर सुदर्शन
यांच्या मुळ इंग्लीश लेखाचा मराठी
अनुवाद – श्रीपाद जोशी.