स्वस्तिक★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★स्वस्तिक★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
कल्याणशी लग्न ठरल्यावर सई प्रथमच त्याच्या घरी येत होती. वधू-वर सूचक मंडळाकडून दोन्ही स्थळांनी एकमेकांशी संपर्क साधून पुढची बोलणी केली होती. कल्याण सैन्यात नोकरीला असल्यामुळे कित्येक मुलींचा नकारच येत होता. सई कल्याणला भेटली आणि त्याचं देशप्रेम, त्याचं सात्विक रूप बघून त्याच्या प्रेमातच पडली. तिने तात्काळ लग्नाला संमती दिली. कल्याणचे वडील डॉ विकास देशपांडे प्रख्यात सर्जन होते आणि आई, सौ नीला देशपांडे कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल होत्या. दोघेही सईला प्रथम भेटले तेव्हा इतकं मोकळेपणाने बोलले की सईची भीड चेपली. साखरपुडा होऊन दोनच दिवस झाले होते. सईने शनिवारी कल्याणला फोन केला.
“कल्याण,मी उद्या आपल्या घरी येते आहे. आपलं घर ओझरतच बघितलं होतं. आज छान पूर्ण बघते.आणि उद्या रविवार असल्यामुळे ममा आणि पपांना पण सुट्टी असेल ना!”
“सई, किती छान वाटलं,तू आपलं घर म्हणालीस. मोस्ट वेलकम! तुला घ्यायला येतो. मला वेळ कळव.”
कल्याणने गाडी गेटच्या आत घेतली आणि सईचं लक्ष बंगल्याच्या नावाकडे गेलं..’स्वस्तिक’. ती पहिल्यांदा कल्याणला भेटायला आली होती, तेव्हाच तिला ते नाव खूप आवडलं होतं. सईने दारावरची बेल वाजवली. गाडी पार्क करून मागून कल्याण आला. नीलाने दार उघडलं. “सई, मी वाटच बघतेय. माझ्यापेक्षा पपा तुझी जास्त वाट बघताहेत.”
“आहेत कुठे पण पपा?” सईने विचारलं.
“पूजा करताहेत.” नीला हसत म्हणाली.
“पपा आणि पूजा?” सईने आश्चर्याने विचारले.
“रविवारी पूजा विकासच करतो.”
सईला घेऊन नीला देवघरात आली. तिथे विकास डोळे मिटून ध्यान लावून बसला होता. इतकं प्रशस्त देवघर, फुलं आणि उदबत्तीचा मोहक दरवळ आणि फुलांनी सजवलेले सुंदर देव बघून सईला अगदी प्रसन्न वाटलं. तिने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि मनात म्हणाली, “देवा, माझ्या ह्या सौख्याला कुणाची दृष्ट न लागो!”
जेवण झाल्यावर मनसोक्त गप्पा करून सई घरी जायला निघाली. तिच्या हातावर एक सुंदर ड्रेस मटेरियल ठेवत नीला म्हणाली, “आज खऱ्या अर्थाने आमची सून घरात आली. सई,आमच्यात अगदी एकरूप झालीस.”
“नीला, त्या ड्रेस मटेरियलवर कुंकवाने एक छोटं स्वस्तिक काढ आणि मग तिच्या हातात दे.” विकास म्हणाला.
“पपा,एक विचारू?तुम्ही डॉक्टर असून ह्या गोष्टी इतक्या पाळता? आणि स्वस्तिक तुमच्या खास आवडीचं दिसतंय.” सई हसत म्हणाली.
“सई,आता तू विषय काढलास म्हणून सांगतो. नीला,आता बाईंना अजून एकेक कप चहा ठेवायला सांग. सई थांबते आहे.”
गाडीची किल्ली टेबलवर ठेवत कल्याण हसला, “सुनबाई, आता सासरी अडकलात तुम्ही!”
“सई, डॉक्टर होणं आणि आध्यात्मिक असणं ह्याचा काहीच संबंध नाही. ही तुमची मतं असतात. रोज मी आणि नीला इतके घाईत असतो. माझं क्लिनिक,तिचं कॉलेज! रोजची पूजा गुरुजी येऊन करतात,पण रविवारी मात्र मीच पूजा करतो. प्रसन्न वाटतं, मानसिक बळ मिळतं. अग,मी हार्ट सर्जन आहे. एक बायपास करताना किती तणाव असतो. ते मानसिक बळ मला ह्यातून मिळतं. आध्यत्मिक माणूस खूप चांगला आणि नास्तिक माणूस वाईट,असंही नसतं. एखादा नास्तिक माणूस,त्याच्या समाजसेवेतून, चांगल्या कृत्यातून पुण्य कमावतो. मी लहानपणापासून बाळबोध वातावरणात वाढलो, त्याचा कदाचित परिणाम असेल,मी ह्या सगळ्या गोष्टी मानतो. आता स्वस्तिक मला आवडतं हे तर नक्कीच! पण त्यामागे भारतीय संस्कृती दडली आहे. आपल्या संस्कृतीत स्वस्तिक हे शुभ चिन्ह मानतात. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र,वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती, श्रीगणेश अशा अनेक देवतांचा समावेश आहे. स्वस्तिक हे शांती,समृद्धी आणि मांगल्याचे प्रतिक आहे. स्वस्तिकाचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म,अर्थ,काम,मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूंचे हात असून,त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात. सुसंवाद,उल्हास,प्रिती, सौंदर्य ,आशीर्वाद, कल्याण,शांती हे गुण स्वस्तिक ह्या शुभचिन्हात आहेत. स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात. चार बिंदू हे चार रेघांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेघा छेडतात म्हणजेच मध्यबिंदू! देवाजवळ रोज न चुकता रांगोळीने स्वस्तिक काढावे. तू देखील इतक्या मोठ्या कंपनीत काम करतेस पण तिथे देखील कसली पूजा असेल तर पहिला मान स्वस्तिकाचा असतो,हे तू बघितलंच असशील.”
“हो पपा, स्वस्तिकाची तुम्ही किती छान माहिती दिली. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे,इतकंच मला माहिती होतं.”
“माझे आजोबा पौरोहित्य करत असत. ते मला ह्या सगळ्या गोष्टी सांगत.”
“आणि माझं नाव कल्याण त्यासाठीच ठेवलं. एम आय राईट पपा?”
“अबसुल्यूटली राईट कल्याण. तुझा जन्म झाल्यावर विकासने नाव ठरवूनच टाकलं होतं.” नीला चहाचा ट्रे टेबलवर ठेवत म्हणाली.
सईचा पाय निघत नव्हता. आता सासरचीच ओढ वाटायला लागली. गाडीत तिने कल्याणचा हात धरला आणि म्हणाली, “कल्याण,मी खूप भाग्यवान आहे. आज माझ्या घरी जावंसं वाटत नाहीय. हेच घर माझं वाटतंय.”
“वाटतंय म्हणजे काय सई, आहेच हे घर तुझं!”
लग्न अगदी छान वैदिक पद्धतीने पार पडलं. कल्याण आणि सईचा संसार सुरू झाला. कल्याणची रजा असेपर्यंत सईने रजा वाढवून घेतली. एकमेकांच्या सहवासात एकमेकांना समजून घेत गुलाबी दिवस सरत होते. कल्याणला बॉर्डरवर रुजू व्हायची ऑर्डर आली आणि सईची घालमेल सुरू झाली.
“सई, बी ब्रेव्ह! एका सैनिकाची तू पत्नी आहेस.” कल्याण सईला जवळ घेत म्हणाला.
“हो मी आहेच रे शूरवीराची पत्नी,पण थोडंसं अस्वस्थ वाटणारच ना! पण तू एकदम निर्धास्तपणे जा. मातृभूमीचं रक्षण कर. मला तुझा खूप अभिमान आहे.”
कल्याण बॉर्डरवर जॉईन झाला. सईचे रोजचे रुटीन सुरू झाले. रेंज असेल तेव्हा कल्याणशी व्हीडिओ कॉलवर बोलायची. विकास आणि नीला सईला फुलासारखं जपत होते. एक दिवस कल्याणचा विकासला फोन आला. “पपा,इथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कदाचित मी ह्यापुढे काही दिवस तुमच्या संपर्कात नसेन. बट यु डोन्ट वरी. आय विल फाईट फॉर माय कन्ट्री.”
“ऑल द बेस्ट बेटा! जयहिंद!”
“कल्याण, जयहिंद!” डोळ्यातलं पाणी लपवत सईने कल्याणला हसत विश केलं.
फोन बंद झाला आणि तिला अश्रू अनावर झाले. नीलाचेही डोळे भरून आले. तिने सईला जवळ घेतलं.
“काळजी करू नकोस. कल्याणला काही होणार नाही.”
दोन दिवस झाले,कल्याणविषयी काहीच कळलं नाही. टीव्हीवर बातम्यात कळत होतं तेवढंच! सईचं कशातही लक्ष लागत नव्हतं. विकासने तिला बोलावलं आणि म्हणाले,”सई, आजपासून देवाजवळ रोज तू स्वस्तिक काढत जा. रांगोळीने स्वस्तिक काढून त्याला हळदीकुंकू वाहायचं आणि तेच कुंकू तुझ्या कपाळावर लाव. स्वस्तिक स्त्रियांच्या सौभाग्याचं पण रक्षण करतं. तुला आत्मिक बळ मिळेल. करून तरी बघ. कधी कधी आपली निस्सीम श्रद्धा पण साथ देते.”
सई रोज स्वस्तिक काढून त्यावर हळदीकुंकू वाहून ते कपाळावर लावायला लागली. तिचं मन शांत शांत होत गेलं. अखेर एक दिवस टीव्हीवर बातमी आली– ‘परिस्थिती आटोक्यात आली आहे. भारतीय सैनिक प्राण पणाला लावून लढले. सगळे सुखरूप आहेत.’–
सई विकासला म्हणाली, “पपा,प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. तुमची आणि माझी श्रध्दा फळाला आली असंच मी समजते.”
विकासने तिच्या डोक्यावर थोपटलं,”खरंय बेटा!”
इतक्यात कल्याणचा व्हीडिओ कॉल आला. विकास आणि नीला त्याच्याशी बोलत असताना,सई तिचं सौभाग्य भरल्या डोळ्यात साठवून घेत होती…
××समाप्त××
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे