Classified

#अक्षयनातं ©स्वप्ना मुळे(मायी)छ. संभाजीनगर

#कथा
#अक्षयनातं
©स्वप्ना…
“आजही उठायला उशीरच केला ना,…अग आज अक्षयतृतीया माझ्या लेकाला पाणी पाजयचं करा केळी घेऊन यायची,..निदान मेल्यावर तरी त्याला वेळेत दे सगळं,..मालतीबाईचा तोंडाचा पट्टा सुरूच झाला अवनीला उठलेलं बघून,..तिने आपले लांबसडक केस बांधले आणि दोघींचा चहा टाकला,..त्या कितीही घालून पाडून बोलत असल्या तरी ती शांत असायची,..चहा त्यांना देत ती म्हणाली,”रात्रीच ताईचा फोन आला होता,.. करा केळी तिचा मुलगा आणून देणार आहे,..बाकी काय करायचं सांगा मग मला लवकर निघायचं आहे आज ,..त्यांनी रागारागाने सगळा स्वयंपाक सांगितला,.. ती पटकन पळाली आंघोळीला,.. लगेच स्वयंपाक घरात वळाली,.. कुकर लावला,कणिक भिजवली,..अंबे पाण्यात टाकले आणि शिट्ट्या होईपर्यंत ती आपल्या आवडत्या अंगणात पळाली,.. खिडकीतून कितीवेळ खुणावणाऱ्या मोगऱ्याजवळ आधी गेली,.. मोगरा गच्च बहरला होता,..त्या घमघमाटाने तिला एकदम प्रसन्न वाटलं,..पटकन पाण्याचा पाईप घेऊन सगळ्या तहानलेल्या झाडांना पाणी दयायला लागली,…कडकडीत उन्हामुळे झाडांची जमीन सुकून गेलेली होती,..अवनीला वाटलं आपल्याला संध्याकाळी लवकर येणं होत नाही तर आईंना झाडांची सुद्धा किव येत नाही,..त्यांना पाणी देत नाहीत,..हा विचार मनात सुरू होता आणि एकीकडे ती रखरखीत माती गटागटा पाणी पीत होती आणि अहाहा,..मातीचा सुंदर सुगंध आला,…अवनीने आपले डोळे मिटले आणि तो गंध श्वासात भरून घेतला,..तिला त्या क्षणी,..भोवताली अवीच्या श्वासाची जाणीव झाली,..त्यानेच तर शिकवलं होतं आपल्याला निसर्गात येऊन त्याचे आनंद घ्यायला,..आपलं पहिलं मुल पोटात गेल्यावर आपलं नैराश्य त्यानेच तर साथ देऊन पळवून लावलं नाहीतर डॉकटर म्हंटले होते,..”ह्या अश्याच शॉक राहिल्या तर अवघड आहे,..सतत मिळणारा आंनद शोधा..” त्यांच्या ह्या वाक्याला अविने उचललं आणि सुरू केला असा आनंद मिळवण्याचा शोध,..एकदिवस हि सगळी रोपं आणली आणि म्हणाला,”चल आज आपल्या घरामागच्या मोकळ्या जागेत आपण आपला टी पॉईंट बनवू..”म्हणत त्याने ओढत आणलं आपल्याला आपण मरगळलेल्या मनाने आणि चेहऱ्याने आलो होतो अशीच कोरडीठाक माती त्याने खड्डे बनवले आणि हि रोपं आईकडून आणि आपल्याकडून लावून घेतली,..त्यांनंतर ह्या पाईपने पाणी मारलं त्याने आणि असाच सुंदर सुगंध आला होता,..मग सगळ्या झाडांवर पाणी मारलं आणि म्हणाला,”बघ कशी छान चकचकीत दिसत आहेत,..त्यावरचे थेंब बघ जरा,..”बळच ह्या मोगऱ्याजवळ बसवलं खरंच आपणही हरखलो मग ह्या आनंदात मग रोजचंच झालं हे अवि आवर्जुन पकडून आणायचा इथं आई रोज येत नव्हत्या अगदीच त्याने आग्रह केला तर आणि आता तर नाहीच येत,..ह्या मोगऱ्याला आणि ह्या लडिवाळ चाफ्याला कळी आली तेंव्हा तर किती खुश झाला होता अगदी लहान लेकरसारख्या उड्या मारत आपल्याला दाखवल्या होत्या आपणही असंच खुश झालो होतो आणि आपल्यालाही आवडायला लागलं होतं हे सगळं रोपटी छान फुलं दयायला लागली होती,..त्या फुलांचे गंध देवासाठी अशी झाडावरची ताजी फुलं घेताना किती प्रसन्न वाटायचं,.. त्या लडिवाळ चाफ्याखाली त्याने हौशीने आणून मांडलेल्या त्या केनच्या खुर्च्या तो सोबतीचा चहा सगळं अगदी छान,.. पण अविला लिव्हर सोरायसिस झाल्यावर मात्र आपण हादरून गेलो,…..प्रत्येक वेळी डॉकटर कडून आलं कि अवि बागेत यायचा हे माझं खरं औषध आहे ग हा आयुष्यातला अक्षय आनंद आहे अवनी,….हा पैसा, आता तर शरीरही वाटतं काही कायम टिकणार नाही पण हा मातीचा सुगंध हा फुलांचा गंध हा तर कधीही न संपणारा आहे बघ,.. अवनीच्या जवळ येत तो म्हणायचा, “अवनी आज डॉकटर म्हंटले आता फार तर महिना आहे हातात,..मला जर बेडवर पडून राहायची वेळ आली तर बागेजवळच्या खोलीत माझा बेड टाकू,..तू असं झाडांना तृप्त केलं कि ती माती आपल्याला सुखावेल शेवटी नातं तिच्यापाशी संपत आपलं हे हि किती छान ना शेवटी आपलं देह सोडून आत्म्याचं अक्षय जगणं तिच्यात एकरूप होऊन सुरू होत असेल म्हणून तर हा तिचा सुगंध हा मला कायम अक्षय आनंद देणारा वाटतो,..मग आपला हात हातात घेत म्हंटला होता अवि,..”अवनी मी जाणार हे तर आता नक्की आहे तू दुसरं लग्न कर नको करू तू ठरव,..आई जगेल तिला जस परमेश्वर बुद्धी देईल,..माझ्या आजारपणात एवढं घर सोडलं तर तसं हाताशी काही नाही त्यामुळे मी तुला मला गवसलेल्या ह्या अक्षयआनंदाशिवाय दुसरं काही देऊ शकत नाही ग..” म्हणत अवी अक्षरशः ढसाढसा रडला होता,..आपण कोलमडून गेलो नाही कारण सहा महिन्यात तशी अवीने आपली मानसिक तयारी करून घेतली होती,..राहिलीस ह्या घरात तर भेटू रोज ह्या जागेत आणि गेलीस जरी इथून तरी ह्या सुगंधा सोबत आठवेल मी तुला आनंद दयायला,..म्हणून तर आताही तिला वाटलं तो आहेच सोबत,.. कारण आज तर अक्षय तृतीय ना,..मनात ती म्हणाली ,”अवी रितीप्रमाणे पितरांना पाणी तर दिलं जाईलच पण मला तर आताच ह्या सगळ्या आठवणी आणि ह्या सुगंधाने तुला तृप्त केल्या सारख जाणवलं रे म्हणत तिने आपले पाणावलेले डोळे पुसले,…
घरात येताच तिला सासुबाईंची चिडचिड जाणवली,..मनात तिला फार वाईट वाटलं ह्यांच्या साठी मला नाही थाटावा वाटला संसार,त्यांच्या साठी तर आपण हि नोकरी करतोय पण ह्या मात्र सतत आपल्याला त्यांच्या मुलाची मारेकरी म्हणून बघतात पण असो पोटातलं न बघितलेलं बाळ गेलं तर आपण उद्धवस्त झालो होतो त्यांचा तर एवढा मोठा मुलगा गेला म्हणून अश्या वागत असतील,..मनातला विचार बाजूला करून त्या सांगतील तसं सगळं आटपून ती निघाली,..
सासूबाईंनी आपल्या खास मैत्रिणीला फोन करून बोलावलं होतं जेवायला,..जेवण सगळं छान झालेलं बघून मैत्रीण म्हणाली,”मालती अग लेक गेला तरी ह्या सुनेच्या रुपातल्या लेकीने तुला नाही सोडलं अग अक्षय साथ दिली आहे तिने तुला आज तिच्यासाठी काहितरी सोनं घे,..परवा तुला माहेरच्या शेतीचे पैसे आले ना मग काय करती ते बँकेत ठेवून तिला छोटेसे कानातले तरी कर तुझ्या लेकाच्या आजारात सगळं मोडलं ना तिने चल मला आज माझ्या सुनेसाठी बांगड्या करायला जायच आहे तू चल आणि तिथे बघ आवडलं तर,….मैत्रिणीच्या वाक्यावर चिडत मालती म्हणाली,”काही नको माझ्या लेकाला खाल्लं आणि आता नोकरीच्या नावाखाली हिंडते बाहेर काय करते मी तर कधी विचारलं नाही पण नट्टापट्टा करून जाते घरातून,..मी तुझ्या सोबत येते पण मला तिला काही घ्यायला लावू नको,..तशी मला पोसते ती पण उगाच लाड नको भटक भवानीचे,..मालतीचं वाक्य ऐकून मैत्रिणीला वाईट वाटलं अवनी खुप कष्टाळू मुलगी ,..अवी नंतर सासूची जबाबदारी झटकून पळाली नाही ,..उलट एका सोन्याच्या शो रूम मध्ये कामाला लागली पण हिला कधी विचारायचं नसतं तिला काय काम करते ?कसे पैसे आणते,..?उलट तिच्या विषयी मनात वाईट विचार करते,..मग मैत्रिणीला वाटलं,..हिला तिच्याच शोरूम मध्ये घेऊन जाऊ,..दोघी रिक्षात बसुन शो रूम समोर आल्या,..तसं दोन मिनीट मालतीला तिथंच उभं करून मैत्रीण आत गेली,..अवनीला म्हणाली,”आम्हाला दागिने दाखवायला तू येऊ नकोस,..तुझ्या सासूला घेऊन आली आहे मी इथल्या तुझ्या एखादया छान मैत्रिणीला सांग आम्हाला अटेंड करायला,..अवनी हसत बरं म्हणून गेली,..”
मालतीबाई शोरूम बघुन जरा बिचकल्या,…मैत्रिणीला जवळ ओढत म्हणाल्या,”एवढ्या मोठ्या दुकानात कशाला? किती गार आहे इथे,..आणि लखलखाट तर बघ उगाच जीव दडपल्यासारखं झालंय मला,..हसत मैत्रीण म्हणाली ,”अग आपल्याला कुठे इथे नोकरी करायची आहे मस्त बस ह्या खुर्चीत आणि बघ इथे ह्या बायका कशी नोकरी करतात,… मालतीने सभोवती बघितलं,..अगदी सुंदर सगळ्याजणी मस्त साड्या,लांब बाह्यचे ब्लाऊज त्यावर छान हेअरस्टाईल,हलका मेकअप आणि अगदी तरतरीतपणे त्या गुळगुळीत फरशीवर अगदी पटपट चालत होत्या,हसऱ्या चेहऱ्याने कस्टमर सोबत बोलत होत्या,..प्रत्येकीवर त्या सोन्याची जबाबदारी होती ती अगदी सजग पणे निभावत होत्या,..मालती म्हणाली,”बघ किती छान राहतात आणि कामही किती चपळतेने करतात इतक्या नजरा त्यांच्यावर पण त्यांना फक्त कामपूरत बोलून आपली नोकरी सांभाळणं सोपं नसेल नाहीतर आमची भटक भवानी कुठे हिंडते की,..तेवढ्यात बांगड्या डिझाईन ट्रे आले त्यांच्या समोर,..मैत्रिणीने सुनेला व्हिडीओ कॉल करून डिझाईन निवडलं,…. मालती मध्येच एकदोन डिझाईनवर बोट फिरवत होती,..मध्येच ती मैत्रिणीला म्हणाली,”कशाला ग सुनेला घेते स्वतःला घे,..”मैत्रीण हसुन म्हणाली,”अग झाली आपली हौस आता ह्या लेकरांचे दिवस आणि ह्या पोरी आपल्या पोरांना एवढी साथ देतात म्हणून तर आपले पोरं समाजात एवढे सोन्यासारखे चमकतात मग खरं सोनं ह्या पोरी हे वस्तुरूपी सोनं गौण आहे ग त्यांच्या पुढे म्हणून हि नात्यातली अक्षय प्रेमाची भेट मी या वेळी सुनेला द्यायची ठरवली,.. मालती बाईने सवयीप्रमाणे तोंड वाकडं केलं,..त्या समोरच्या मुलीला कोणीतरी जेवायला चल कोणाला तरी उभं करून असं म्हणताच मालती म्हणाली,”दुपारचं जेवण चार वाजता का,..?तशी ती मुलगी म्हणाली,”हो काकु आज अक्षय तृतीयेची गर्दी आहे म्हणून पण रोजही असाच वेळ होतो,..तासनतास उभं राहून पाय दुखतात पण काय करणार त्याशिवाय पैसे कोण देईल आम्हाला ती निघून गेली,….तश्या मालतीबाई सभोवती काचेवर हात फिरवत त्यातले चमकणारे दागिने बघू लागल्या,…. एका मोहरी दाण्याच्या माळेवर त्यांची नजर थांबली तिथल्या एका लेडीजला बोलवून त्यांनी किंमत विचारली,..मैत्रिणीला दाखवली म्हणाल्या,”मंगळसूत्र तर तारुण्यात उतरलं अंगावरून आता हि माळ आवडली पण फार महाग आहे चाळीस हजार म्हणे,..बरं चल झालं का तुझं सगळं,.. ती म्हणाली ,”हो ऑर्डर दिली आहे,..आठ दिवसांनी मिळतील,..”दोघी निघाल्या,..रात्री अवनी उशिरा आली,..
दोघी न बोलताच जेवल्या,…झोपताना अवनी त्यांच्या जवळ गेली,..”आई अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा म्हणत तिने ती माळ त्यांच्या समोर धरली,..तश्या त्या बघतच राहिल्या तुला कसं कळलं मला हि आवडली म्हणून?आणि खुप महाग आहे ती,..अवनी म्हणाली,” आई त्या शोरूम मध्येच मी काम करते,…तुम्ही हि माळ निवडली त्याच्या काचेपलीकडे होते मी तुम्हाला बघत होते,…खरंच खुप दिवसांनी तुम्हाला काहितरी आवडलं ना आई आणि पैश्याची काळजी करू नका,…स्टाफला अक्षय तृतीयेच्या निमित्त हप्त्याने सोनं घेता येत होतं,.. म्हणून घेतलं,…”
त्या दुकानातली अवघड वाटणारी नोकरी आपली सुन करते,..जेवते उशिरा,..दिवसभर उभी आपल्यासाठी आणि आपण वाट्टेल ते बोलते हे सगळं मनात येऊन सासुबाईला आता घळाघळा रडू आलं ,..अवनीला त्यांनी घट्ट मिठी मारली,..अग मी अशी वागते तरी तू नातं अक्षय्य टिकवलं आहेस गं म्हणत,.” मनापासुन दोघी रडत होत्या अश्रू जमिनीवर पडत
होते आणि आताही मातीचा सुगंध आला अवनी मनात म्हणाली,”आलास का आमचं अक्षय प्रेम बघायला,..तिच्या कानात आवाज घुमला,” हो तर ह्या प्रेमातला दुवा मी अक्षय नसलो तरी तू टिकवल माझ्या आईसोबत अक्षयनातं खुप थँक्स अवनी,..”
त्या जमिनीवर पडलेल्या अश्रुतूनही अवनीला घमघमणारा सुगंध आला,..आयुष्यातलं अक्षय नातं टिकवणारा,..(repost)
वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा,.धन्यवाद.
©स्वप्ना मुळे(मायी)छ. संभाजीनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}