डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा —– भूलभुलैय्या डॉ. जी. एस. आंबर्डेकर
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
भूलभुलैय्या
डॉ. जी. एस. आंबर्डेकर
———————————
ही सुमारे ७० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक नामवंत शल्यक्रिया- विशारद म्हणून नाम कमवायचं स्वप्न मी तेव्हा उरी बाळगलं होतं. मुंबई विद्यापीठात संबंधित वर्गात मी तेव्हा प्रवेशही मिळविला होता. त्या काळात शस्त्रक्रियेसंबंधातील खास प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी बधिरीकरण, औषधशास्त्र अशा संबंधित शाखांचं तीन महिने प्रशिक्षण घेण्याची पद्धत मुंबई विद्यापीठात रूढ होती. मी के. ई. एम्. इस्पितळाच्या बधिरीकरण विभागात महिनाभर काम करायचं ठरवलं.
त्या प्रशिक्षणाच्या काळात माझा ‘बॉस’ असलेला के. इ.एम्. मधील रजिस्ट्रार हा अत्यंत निधड्या छातीचा म्हणून प्रसिद्ध होता. आणीबाणीच्या काळात गोंधळून कसं जाऊ नये ते त्यानं मला प्रशिक्षणाच्या शेवटच्या १५ दिवसांत शिकवलं. दररोज सकाळी भारतीय पद्धतीचा अगदी चारी ठाव नाश्ता करायची त्याची पद्धत होती… आणि आपल्या कोणत्याही सहकाऱ्याला तो त्यात सहभागी करून घ्यायचा नाही. एके दिवशी सकाळीच त्यानं मला पाचारण केलं. पेशंटला भूल देण्याची संपूर्ण जबाबदारी एकट्यानं स्वीकारून बघण्याची तयारी आहे काय, अशी पृच्छा करताच मी तर अगदी आश्चर्यचकितच झालो. मला बधिरीकरण विभागात काम करायला लागून १५ दिवसही झाले नव्हते. मी का कू करतोय, हे लक्षात येताच, त्यानं मला पुढचे १५ दिवस त्या भरघोस चारी ठाव नाश्त्यात सहभागी करून घेण्याची तयारी दर्शविली… तेवढं आमिष मला पुरे होतं !
मग पुढचे १५ दिवस एकदा तो नाश्ता झाला की संपूर्ण दिवस मी फक्त बधिरीकरण आणि भूल देणं एवढंच काम करीत असे. माझ्या हातून कोणतीही चूक होणार नाही, असं काहीतरी त्या नाश्त्यातच असायचं का, देव जाणे… पण मला मात्र सतत भीतीनं घेरलेलं असायचं… स्वतंत्रपणे ते काम करीत असताना पकडलो गेलो असतो, तर मला रस्टिकेट व्हावं लागलं असतंच आणि शिवाय माझ्या हातनं काही गंभीर स्वरूपाची चूक झाली असती तर माझ्यावर ‘मेडिको-लीगल’ स्वरूपाचा खटलाही होऊ शकला असता.
पण सारं काही निर्विघ्नपणे पार पडलं… ‘भूलीकरण’ या वैद्यकशास्त्राच्या शाखेनंच मला पूर्णपणे संमोहित करून सोडलं आणि अखेर मी त्याच क्षेत्रात व्यासंग करायचा ठरवलं. याच क्षेत्रात मी पुढं नाव कमावलं.
@@@@
शस्त्रक्रियेच्या आधी किमान ६ ते १२ तास रुग्णाला तोंडावाटे कोणताही खाद्यपदार्थ वा द्रव दिला जाऊ नये, अशी आमची अगदी कडक ताकीद असते. वैद्यकीय परिभाषेत त्याला आम्ही म्हणतो ‘एनबीएम’ (निल बाय माऊथ). भूल दिल्यावर रुग्णाला जर वांती झाली किंवा होईल असं वाटू लागलं, तर श्वासनलिकेत पोटातले अन्नकण येऊ शकतात आणि भूल दिलेल्या अवस्थेत जर ते तिथं अडकून राहिले तर रुग्णाच्या प्राणावर बेतणं शक्य असतं. म्हणूनच त्याचं पोट रिकामं राहील, अशी खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. रुग्णाला जिव्हालौल्याचं सुख मिळू नये, अशा दुष्ट हेतूनं काही हे आम्ही करत नसतो. पण अनेकदा डॉक्टरांची नजर चुकवून लहान बाळांना त्यांचे आई-वडील शस्त्रक्रियेपूर्वी पाणी पाजताना आम्ही बघितलं आहे. आपल्या लहानग्यावरील प्रेमापोटी ते दाखवीत असलेल्या वात्सल्यामुळे त्याच्या जिवावर बेतू शकतं, याचा मग ते विचारही करीत नाहीत.
शस्त्रक्रियेपूर्वी उपास करण्याचं हे बंधन काटेकोरपणे पाळलं न गेल्यामुळे एका पाच वर्षांच्या मुलाला आपली स्वतःची कोणतीही चूक नसताना प्राण कसे गमवावे लागले, याची ही दर्दभरी कहाणी.
आपल्या मित्रांबरोबर हुंदडत असताना या पाच वर्षांच्या मुलाचा पाय फॅक्चर झाला आणि शस्त्रक्रियेसाठी त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. एक प्रख्यात अस्थिव्यंगतज्ज्ञ त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणार होता. शस्त्रक्रियेची वेळ होती संध्याकाळी सहाची. त्याला आधी काहीही खायला-प्यायला दिलेलं नाही, असं त्याच्या आई-वडिलांकडून मी वदवून घेतलं आणि पारंपरिक पद्धतीनं ‘ओपन ईथर’- भूल देण्यास सुरुवात केली. ही १९४९ मधील गोष्ट आहे…
मी ओपन-ईथरचा वापर करायला सुरुवात केली आणि काही मिनिटांतच त्या मुलाला अगदी भडभडून उलटी झाली. अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेल्या त्या मुलाच्या उलटीतून शेव-गाठीसारखे पदार्थ बाहेर आल्याचं स्पष्ट दिसत होतं. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. त्या मुलाची तपासणी करताच त्याच्या श्वासनलिकेत शेव-गाठी अडकून बसल्याचं आढळून आलं. सक्शन पंपानं ते बाहेर येणंही शक्य नव्हतं. एका विशिष्ट प्रकारच्या चिमट्याचा वापर करून मी त्या गाठी बाहेर काढल्या. गाठीचा एक तुकडा बाहेर काढताच, तिथं दुसरा येऊन अडकला. श्वसनमार्ग मोकळा ठेवण्याचे माझे प्रयत्न विफल होऊ लागले. प्राणवायू कमी पडू लागला आणि तो मुलगा निळसर दिसू लागला. थोड्याच वेळात त्याला हृदयविकाराचा झटका आला. कृत्रिम श्वासोच्छ्वासानं आम्ही त्याचं हृदय चालू ठेवण्याचा प्रयत्न केला… पण त्यात आम्हांला यश आलं नाही. त्या पाच वर्षांच्या मुलाचे प्राण आमच्या डोळ्यादेखत त्याला सोडून गेले.
माझं मन दुःखानं अगदी भरून आलं होतं. त्या मुलाच्या आई-वडलांना ही ‘बातमी’ सांगण्याची जबाबदारीही माझ्यावरच येऊन पडली होती. डोळ्यातनं घळघळा अश्रू वहात असलेल्या स्थितीतच मी त्यांना जाऊन भेटलो. दुपारी बारा वाजता घेतलेलं दोन चमचे पाणी वगळता, सकाळपासनं त्यानं काहीही खाल्लं नव्हतं, असं त्याची आई मला अगदी शपथेवर सांगत होती.
-पण मला खरा धक्का बसला तो दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे वडील मला भेटायला आले होते. शस्त्रक्रियेच्या वेळी ऑपरेशन टेबलवरच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर उद्भवणाऱ्या कायदेशीर बाबीसंबंधात ते मला भेटायला आले असावे, असा समज करून मी त्यांना सामोरा गेलो.
पण त्यांनी मला जे काही सांगितलं, ते अगदी थक्क करून सोडणारं होतं.
शस्त्रक्रिया होण्याआधी दोनच तास, त्या दुर्दैवी मुलाच्या शेजारपाजारची ८-१० वर्षांची तीन-चार मुलं त्याला भेटायला आली होती. त्यांनीच त्याला खायला या शेवगाठी आणल्या होत्या. एक वडील म्हणून त्याला काहीही खायला न देण्याची जबाबदारी नीट पार न पाडल्याबद्दल मी अगदी कठोर शब्दांत त्यांची कानउघाडणी केली… ते अत्यंत पश्चात्तापदग्ध अवस्थेत होते…आपल्या मुलाचे मित्र येऊन बसले आहेत म्हणून नेमक्या त्याच वेळी ते जरा बाहेर गेले… नेमक्या त्या संधीचा फायदा घेऊन त्या भुकेल्या मुलानं शेवगाठीचे बकाणे भरले होते. त्या मुलाच्या मृत्यूला त्याचे आई-वडील जबाबदार नव्हते. पण त्यांनी जर अधिक दक्षता घेतली असती तर विपरीत घटना सहज टळली असती.
@@@@
डॉक्टर देखील अखेर माणूसच असतो आणि कधीकधी त्याच्या हातूनही चूक होऊ शकते. आपल्या हातून अगदी चुकून झालेल्या गफलतीमुळे डॉक्टरच्या मनावर किती ताण येऊ शकतो, त्याचं दर्शन घडविणारी ही एक घटना.
एका प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ्जाच्या नात्यातली एक महिला कुटुंबनियोजन- विषयक शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इस्पितळात आली होती. तिची संपूर्ण तपासणी केल्यावर मी तिला ‘स्पायनल अॅनेस्थिशिया’ देण्याचा निर्णय घेतला. बधिरीकरणाच्या या पद्धतीत आपल्या मज्जारज्जूतील पोकळीत एक इंजक्शन दिलं जातं. आपल्या पाठीच्या कण्यात एक द्रावण असतं. त्याला ‘सेरिब्रो- स्पायनल फ्ल्युईड’ (सी एस एफ) म्हणतात. पाठीच्या कण्यात अगदी खालच्या भागात इंजक्शन दिलं आणि या द्रावणात गुंगीचं औषध मिसळलं गेलं की कमरेच्या खालचा भाग पूर्णपणे बधीर होऊन जातो.
आवश्यक ती संपूर्ण काळजी घेतल्यानंतर मी त्या महिलेच्या पाठीच्या कण्यात बधिरीकरणाचं ते विशिष्ट इंजक्शन टोचलं. रुग्णावर या औषधाचा प्रभाव दोन मिनिटांतच झाल्याचे जाणवू लागणं, हा डॉक्टरांचा नेहमीचा अनुभव. पण इथे मात्र अर्धा तास उलटला तरी रुग्णाकडून कसलाच प्रतिसाद मिळेना…. नुसता वेळ फुकट जातोय म्हणून शल्यक्रियाविशारद अस्वस्थ झाला होता आणि आपलं काही चुकलं तर नाही ना, म्हणून मी काळजीत पडलो होतो. इंजक्शन देण्याच्या माझ्या पद्धतीत कोणतीही चूक झालेली नव्हती. पाठीच्या कण्यातलं ते विशिष्ट द्रावण आधी इंजक्शनच्या सीरीजमध्ये मी ओढूनही बघितलं होतं. अखेर, बधिरीकरणाच्या त्या इंजक्शनच्या खोक्यावरच्या तारखाही मी तपासून बघितल्या. त्या औषधाची मुदत उलटून गेलेली नाही, याची मी खात्री करून घेतली होती… मग काय झालं असावं?
-अचानक मला एक शंका आली. मी टेबलाखालच्या प्लास्टिक बादलीत टाकलेली इंजक्शनची अॅम्प्यूल उचलली. तर तिच्यावरची ‘फ्लॅक्सेडील’ अशी अक्षरं ठळकपणे मला दिसली आणि माझी बोबडीच वळली…
‘फ्लॅक्सेडील’ हे औषध नेहमी सर्वसाधारण अॅनेस्थिशिया देताना वापरलं जातं. मज्जातंतूंकडून हाडांच्या स्नायूंपर्यंत जाणारे संदेश तात्पुरते थांबविण्याचं काम हे औषध करतं. या औषधानं श्वसनक्रियेचे स्नायूही आपलं काम थांबवतात आणि मग बधिरिकरण तज्ज्ञ कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या साहाय्यानं त्याच्या संपूर्ण देहावर नियंत्रण ठेवू शकतो… असं हे भयानक औषध मी ‘चुकून’ त्या महिलेला दिलं होतं. भूल देण्यासाठी मला त्या वेळी वापरायच्या असलेल्या ‘झायलोकेन’ या औषधाच्या खोक्यात कुणीतरी ‘फ्लॅक्सेडील’ ठेवलं होतं. त्यातूनच हा अनवस्था प्रसंग गुदरला होता…
निदान त्या महिलेवर ठरलेली शस्त्रक्रिया तरी होऊन जावी, म्हणून मी तिला सर्वसाधारण स्वरूपाचा’ अॅनेस्थिशिया’ देऊन मोकळा झालो. अवघ्या तीस मिनिटांची ती शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली आणि मी रुग्णास ऑपरेशन थिएटरमधून बाहेर घेऊन जाण्यास सांगितलं. तिथं तिच्या प्रकृतीवर अगदी डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यात येणार होती.
-पण तिला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर घेऊन जात असतानाच तिनं झटके द्यायला सुरुवात केली आणि अखेर तिला जबरदस्त फिट आली. त्यावरची उपाययोजना तर मी तातडीनं सुरू केलीच आणि शिवाय एका प्रख्यात न्युरो फिजिशियनलाही तातडीनं बोलावून घेतलं. ‘प्लॅक्सेडील ‘मुळेच तिला ही फिट आल्याचं निदान त्यानं केलं आणि तिला ‘पॅराल्डीहाईड’ इंजक्शन देण्याचा सल्ला देऊन त्यानं फारशी चर्चा न करता तिथून काढता पाय घेतला. त्या फिजिशियनच्या उपस्थितीमुळे मला जरा धीर आला होता. तो जाताच माझ्या मनावर प्रचंड ताण आला. अवघ्या दोनच तासांनी त्या महिलेचे नातेवाईक असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञानं फोन करून रुग्णाला धनुर्वात कसा काय झाला म्हणून पृच्छा करण्यास सुरुवात केली…
एवढं सारं होईपर्यंत पहाटेचे दोन वाजले होते आणि मी एक क्षणभरही झोपलो नव्हतो. पहाट झाली. त्या महिलेला फिट येण्याचं प्रमाण बरचं कमी झालं होतं, पण पूर्णपणे थांबलेलं नव्हतं. मी डॉ. मोटाशा या प्रख्यात फिजिशियनना फोन केला. ते माझे अगदी जवळचे मित्र होते. त्यांना स्वतःला मधुमेहाचा विकार होता आणि कोणत्याही आणीबाणीच्या क्षणी त्यांच्या मनावर खूप ताण यायचा. ते अत्यंत भावनाप्रधान होते. पण तरीही ते तातडीनं इस्पितळात आले. रुग्णाची तपासणी करत असताना, त्यांच्या चेहऱ्यावरील आशेच्या किरणानं मला थोडा धीर आलाच होता. तरीही एखादं आश्चर्य घडल्याशिवाय ती महिला वाचणार नाही, हेही मला पक्कं ठाऊक होतं. तिच्या मृत्यूनंतरच्या शव विच्छेदन अहवालातून काय निष्पन्न होईल, या चिंतेनं आता मला घेरलं होतं.
पहाटे चारनंतर डॉ. मोटाशा यांनी मला घरी पाठवून दिलं.. आणि सहाच्या सुमारास फोन वाजला. माझ्या संपूर्ण शरीरावर भीतीनं काटा उभा राहिला. कसाबसा मी फोन घेतला. तो काय? त्या फोननं मी स्वतःच स्वर्गात जाऊन पोचलो होतो. ती महिला पूर्णपणे शुद्धीवर आली होती आणि काहीतरी खायला हवंय, असं सांगत होती. तिला खायला द्यायचं काय, असं विचारण्यासाठी इस्पितळातून हा फोन आला होता.
त्यानंतर एका आठवड्यातच, २० मार्च १९६७ रोजी मला हृदयविकाराचा झटका आला.
ही घटना मी एवढ्या तपशिलात जाऊन वर्णन केली, याची दोन कारणं आहेत. एक बधिरीकरण विभागात काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी यापासून एक धडा घ्यायला हवा. खोक्यावर ज्या औषधाचं नाव आहे, तेच त्या खोक्यात आहे का नाही याची त्यांनी दोन-दोनदा खातरजमा करून घ्यायला हवी. कोपनहेगेन – डेन्मार्क इथं तर डॉक्टर आणि परिचारिका यांनी, रोग्याला कोणतंही इंजक्शन देण्यापूर्वी इंजक्शनच्या अॅम्प्यूलवरच्या सूचना संयुक्तपणे वाचण्याचा कायदाच आहे.
दोन : एखाद्या रुग्णाच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला की, संबंधित डॉक्टरच्या मनावर त्याचा खूपच परिणाम होतो. अर्थात लोकांना तसं वाटत नाही, हा भाग वेगळा.
आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ‘मेडिकल जर्नल ‘मध्ये नोंदविण्यात आलेली, बधिरीकरण विभागातल्या अपघाताची ही अवघी तिसरी घटना आहे. अन्य दोन घटनांपैकी एक इंग्लंडमध्ये घडली होती तर दुसरी तेहरानमध्ये. मला माझ्या वाचकांना एवढंच सांगायचं आहे, की पृथ्वीच्या पाठीवर दररोज भूल देण्याच्या हजारो घटना कोणतीही चूक न होता सुरळीतपणे पार पडत असतात. मी ही घटना एवढ्यासाठीच तपशीलवारपणे वर्णन केली की, डॉक्टरही अखेर माणूसच असतो आणि त्याच्याही हातून चूक होऊ शकते, हे समाजानं लक्षात घ्यायला हवं.
@@@@
१९५०-५२ च्या सुमारास ख्यातकीर्त गायक बडे गुलाम अली खाँ शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात दाखल झाले होते. त्यांच्या कानाजवळ एक मोठी गाठ निर्माण झाली होती. आणि शस्त्रक्रियेशिवाय ती काढून टाकणं अगदी अशक्यच होतं. चेहऱ्याच्या कोणत्याही भागावरील शस्त्रक्रियेच्या वेळी बधिरीकरण तज्ज्ञ पेशंटच्या श्वसनमार्गापर्यंत जाणाऱ्या दोन नळ्या घशातून आत सोडतो. याचं कारण एवढंच की शल्यविशारदाच्या मार्गात लुडबूड न करता बधिरीकरण तज्ञ्जाला आपलं काम दोन हात दूर उभं राहून करता यावं.
बडे गुलाम हे ५० वर्षांचे अत्यंत स्थूल असे गृहस्थ होते. पण त्यामुळे मी चिंतेत पडलो नव्हतो. मला काळजी पडली होती ती त्यांच्या घशातील स्वरतंतूंची ! बडे गुलाम अली खाँ हे विश्वविख्यात गायक होते आणि भूल देण्याच्या वेळी घशात सोडाव्या लागणाऱ्या नळ्यांमुळे, जर त्यांच्या स्वरतंतूंना धक्का पोहोचला असता, तर कुणीही मला माफ केलं नसतं. कारण स्वरतंतूना बसणाऱ्या धक्क्यांमुळे त्यांच्या आवाजावर सहजच परिणाम झाला असता.
बडे गुलाम अलींवर शस्त्रक्रिया करणार होते डॉ. ए. व्ही. बालिगा. त्यांच्या कानावर मी माझ्या मनावर आलेल्या तणावाचं कारण घातले. आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी सांगितलं ते प्रख्यात गायक आहेत यात शंका नाही. पण आपण डॉक्टर मंडळींनी त्याबद्दल बिचकून जाता कामा नये !
हे सांगणं सोपं होतं. मी स्वतः बडे गुलाम अलींचा एक निस्सीम चाहता होतो. त्यांच्या आवाजाला काही झालं, तर शस्त्रक्रियेनंतर संपूर्ण जगातले त्यांचे लक्षावधी चाहते किती संतापतील, याची मला कल्पना होती. रोजच्या रोज पडणाऱ्या दुःस्वप्नांमुळे माझी झोप पार उडून गेली होती.
अखेर बडे गुलाम अलींवरील ती ९० मिनिटांची शस्त्रक्रिया पार पडली. माझी जबाबदारी मी अगदी काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला होता… शस्त्रक्रियेनंतर ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचा आवाज ऐकण्यास माझ्याइतका उत्सुक दुसरा कोणीही नव्हता. त्यांच्या आवाजाला काहीही झालेलं नव्हतं, याची खात्री झाल्यावरच मी सुखानं अंथरुणाला पाठ टेकली.
त्यानंतर मी बडे गुलाम अलींच्या दोन-तीन मैफलींनाही उपस्थित राहिलो होतो. मैफलीत त्यांना मिळणारी दाद बघून, मला स्वतःलाही मी किती कौशल्यानं माझी कामगिरी पार पाडली, ते पुनःपुन्हा जाणवत असे… पण त्या शस्त्रक्रियेपूर्वीच्या ७२ तासांमधील माझी मानसिक अवस्था आठवली, की आजही आयुष्यातली पाच वर्षं एकदम पार केल्यासारखं वाटतं.
@@@@
ज्योत्स्ना भोळे. महाराष्ट्राच्या’ गेल्या पिढीतील ख्यातनाम अभिनेत्री आणि गायिका. मूत्रपिंडावरील शस्त्रक्रियेसाठी त्या इस्पितळात दाखल झाल्या होत्या आणि त्यांना भूल देण्याची जबाबदारी माझ्यावरच आली होती. शस्त्रक्रियेला त्या अत्यंत घाबरलेल्या आहेत, असं मला आधीच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याच्या एकमेव उद्दिष्टानं मी त्यांचं एक गाजलेलं गीत गुणगुणत त्यांच्या खोलीत प्रवेश केला ! माझा ‘मधुर’ आवाज ऐकून ज्योत्स्नाबाईंनी कुस वळवून माझ्याकडं तोंड केलं. मी माझा परिचय
करून देताच त्या उद्गारल्या: तुमच्या ‘मधुर’ आवाजामुळे माझी शुद्ध तर आताच हरपली आहे ! मला आता त्यामुळे कसलीच भीती उरलेली नाही !
तरीही, आपल्या स्वरयंत्रावर या शस्त्रक्रियेच्या वेळी काही परिणाम होऊ शकतो काय, हे जाणून घेण्यास त्या उत्सुक होत्या. बडे गुलाम अलींवरील शस्त्रक्रियेच्या वेळी आलेल्या अनुभवामुळे मी स्वतःला या तंत्रातला अगदी वाकबगार समजू लागलो होतो. मी त्यांना अगदी शांतपणानं धीर दिला…
शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. दुसऱ्याच दिवशी मी आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तर काय? मी भीतभीत केलेल्या विनंतीनंतर त्यांनी चक्क ‘बोला, अमृत बोला…’ हे आपलं अत्यंत गाजलेलं नाट्यगीत मला म्हणून दाखवलं! त्या इतक्या सहजतेनं आणि इतक्या मधुर आवाजात गात होत्या, की त्यांच्यावर आदल्याच दिवशी शस्त्रक्रिया झाली आहे, याजर कोणाचाही विश्वास बसला नसता. ज्योत्स्नाबाईंची आणि माझी त्या दिवशी झालेली मैत्री आजतागायत कायम टिकून आहे…