मनोरंजन

#लघुकथा

#लघुकथा

नवरा दोन मुलं पदरात सोडून भाड्याच्या घराचे डिपॉझिट सुद्धा घेऊन गेल्याने मुलांसाठी त्या स्त्रीने केलेला जीवनाचा मनाला चटका लावणारा सामना.

रात्री चे दहा वाजले होते.शमिका सगळं आवरून निवांत टीव्हीवर चित्रपट पहात बसली होती.दुसरे दिवशी रविवार असल्याने ती निवांत होती.ना शाळा,ना तिचं ऑफिस.. वरद आणि रेवा जेवण करून झोपले होते. इतक्यात लँड-लाईन वाजला.त्याचा आवाज त्या शांततेत कर्णकर्कश वाटला आणि ती नकळत दचकली. तिने सावरून फोन उचलला आणि ती फक्त ऐकत राहिली शेवटी काहीही उत्तर न देता तिने फोन ठेवून दिला.तिच्या डोळ्यांत पाणी होतं ते दुःखाचं होतं की रागाचं हे मात्र कळत नव्हतं.समोरचा टीव्ही फोन आला होता म्हणून तिने म्युट केला होता. आत्ताही ती समोर चित्र पहात राहिली पण मनात विचारांनी गुंता केला होता..एकच प्रश्न होता…”का..?” आणि उत्तर होतं “नशिबाचे भोग…” मन भूतकाळात गेलं.

शमिका दोन मुलांनंतर झालेली मुलगी म्हणून लाडात वाढली.आई-वडिलांनी काही कमी केलं नाही..सुखवस्तू कुटुंब असल्याने लाडच झाले. शमिका सुद्धा खूप हट्टी.एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच..पण हट्ट पूर्ण ही व्हायचे. तसं ती रहायची ते छोटं गाव होतं.वडील नोकरी करायचे आणि वडिलोपार्जित शेती देखील होती.त्यामुळं कशाची ददात नव्हती. आई घरकामाबरोबर शेतीचं देखरेखीचं, हिशेबाचं काम चोख बजावायची..एकूण आनंदी आयुष्य होतं.त्यामुळं अगदी सुटसुटीत आयुष्य होतं.तिचं अजोळ देखील खेडेगावच.त्यामुळं लहानपणापासून आयुष्य अगदी चाकोरीबद्ध.खाण्या-पिण्याचे,कापड्या-लत्त्याचे लाड पण वावगं वागणं मात्र खपवून घेतलं जात नव्हतं.गावात दहावी पर्यंत शिक्षण झालं पण वडिलांनी ऍडमिशन घेण्यापूर्वी शमिका ला समोर उभं केलं आणि तिच्या आईसमोर समजावलं..

“चांगले मार्क मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे शिवाय तुझी देखील इच्छा आहे तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय. गावात कॉलेज नाही तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजात ऍडमिशन घ्यावं लागेल.पण खाली मान घालून जायचं,खाली मान घालून यायचं. वावगेपणा खपणार नाही.हे मान्य असेल तर बोल नाहीतर घरात बसलीस तरी माझं काही म्हणणं नाही.”

“मी नीट वागेन बाबा..काही चुकीचं वागणार नाही..वचन देते हवंतर..”

हे इतकं बोलली आणि शमिका जिंकली.या एका वाक्याने तिचं आयुष्य तिला सावरता आलं होतं…

शमिका चं कॉलेज सुरू झालं.शिक्षणाची आवड होती.वडिलांना दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून शिकली.वडिलांना व आपल्या या हुशार पण तरीही साध्या-भोळ्या लेकीचं खूप कौतुक वाटलं.त्यांनी पण मग तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आनंदात तिचं शिक्षण पूर्ण झालं.तिचे दोन्ही भाऊ मात्र कसंबसं एक एक पायरी चढत पदवीधर होत होते.मोठ्या भावाला तालुक्याच्या ठिकाणी ओळखीने वडिलांनी बँकेत नोकरी मिळवून दिली.त्याचं लग्न झालं शेजारच्या गावातली मुलगी सून म्हणून आणली.घर मोठं होतंच. त्यामुळं सगळं सुसूत्र चालत होतं.सून चांगली होती.मिळून मिसळून रहात होती.धाकटा भाऊ नोकरी ला लागला होता.त्याचं त्याने जमवलं होतं.नकार द्यावा असं काही नव्हतं.गावातली च मुलगी होती.चांगली होती..फक्त शमीकाच्या लग्नाची अट वडिलांनी ठेवली.शमीका शेवटच्या वर्षाला असताना तिच्या शहरातल्या आत्याने एक स्थळ सुचवलं.बघण्याचा कार्यक्रम झाला..शौनक पदवीधर होता.पाच आकडी पगार होता.मुंबईत भाड्याने फ्लॅट होता.गावाकडे घर होतं.आई-वडील,भाऊ त्याचं कुटुंब असं सगळं चांगलं होतं.शमिका दिसायला खुप सुंदर होती.गोरी पान, काळेभोर डोळे,लांबसडक केसांचा शेपटा,रेखीव अशी शमिका सगळ्यांना आवडली.त्यांचा होकार आला आणि लग्न ठरलं.त्यांनी लग्नाची घाई केली पण शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर लग्न असं शमिकाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं.नाहीतर त्यांना दुसरा मार्ग निवडा हे सांगितल्यावर मात्र ते वरमले.शमिका ची परीक्षा झाल्यावर मात्र पहिल्या मुहूर्तावर वडिलांनी तिचं धुमधडाक्यात लग्न लावून दिलं.शमिका लग्न होऊन काही दिवसच गावी तिच्या सासरी राहिली व आठ दिवसांत शौनक तिला मुंबईला घेऊन गेला.शौनक हुशार होता.हौशी होता.शमिका सुखात होती.तिच्या संसारात कशा कशाची कमतरता नव्हती.ती पदवीधर झाली मात्र शौनक ला तिने नोकरी करणं आवडणार नव्हतं..आणि तशी गरज देखील नव्हती.म्हणून मग तिनेही फारसा अडमुठेपणा केला नाही.शौनक चा मान राखला आणि ती संसारात रमली.वरद आणि त्या पाठोपाठ रेवाचा जन्म झाला..तिचं कुटुंब पूर्ण झालं.सासरचे तिच्यावर खुश होते. सगळ्यांचं ती मनापासून करायची.सण-समारंभ असेल तर आवर्जून जायची.सुट्टीत जाऊ आणि मुलांना घेऊन यायची.सासू-सासऱ्यांचं देखील मनापासून करायची.दिवस जात होते.ती संसारात गुंतत होती.

वरद चा चौथा वाढदिवस होता.रेवा सहा महिन्याची होती.तिला सांभाळून ती संध्याकाळच्या वरद च्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती.सगळी तयारी झाली.पण केक घेऊन येणारा शौनक आलाच नाही.तिने फोन केला पण तो ही लागला नाही.शेवटी तिने च शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितलं.वरद चा वाढदिवस झोकात झाला पण शौनक नसल्याने वरद नाराजच होता आणि शमिका विचारात.. आजकाल हे असं नेहमी व्हायचं.वाद घालणं हा स्वभाव च नसल्याने शमिका सगळं सहन करत होती आजही ती गप्प बसली असती.. पण वरद प्रश्न विचारणार होता.

त्या रात्री शौनक आलाच नाही आला तर वादळ आलं ज्यात शमिका चा संसार उध्वस्त झाला. ती काहीही करू शकली नाही..शमिका ला नोकरी करू न देणारा शौनक त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्या सोबत राहण्यासाठी तो यांना सोडून निघून गेला..चार दिवसांनी तो त्याचं सामान न्यायला आला तेव्हा शमिका ने अक्षरशः त्याच्या पुढं हात जोडून भीक मागितली..

“मी तुमच्यावर कोणतं बंधन घालणार नाही पण मुलांसाठी असं करू नका..घर सोडून जाऊ नका..”

पण तो ते प्रेम,विश्वास,नाती सगळं लथाडून निघून गेला.शमिका हतबल होती.तिने सासू-सासर्याना फोन केला मात्र त्यांनी सरळ सरळ किनारा केला.वाटलं मुलांना घेऊन तिथं जावं पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही. आपण तिथे नकोसे असू हे तिला माहीत होतं. तिचे आई-वडील आले..दोन्ही भाऊ-वहिनी तिला सोबत चल म्हणाले पण कोणावर भार बनून राहणं तिला आवडणार नव्हतं.तिने काही दिवस आई-बाबाना सोबत रहायला सांगितलं.
शौनकने त्यांच्या जॉईंट खात्यातील सगळे पैसे काढून घेतले होते.तेव्हा पोटा-पाण्याच्या सोयीसाठी हातपाय चालवणं गरजेचं होतं.दुसरे दिवशी पासून ती नोकरी शोधण्याच्या खटपटीत गुंतली.आठ दिवसांत एका मॉल मध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली.तिने ती पत्करली.ही नोकरी तिने करू नये असं तिच्या वडिलांनी सुचवलं पण तीने ऐकलं नाही.नंतर आठ दिवसांत रहाता फ्लॅट सोडायला लागला.शौनक deposit चे पैसे घेऊन गेला आणि मालकांनी घर रिकामं करायला सांगितलं.तिने वडिलांच्या मदतीने एका चाळीत एक छोटी खोली मिळवली.अजून शिक्षणाचे खर्च नव्हते.पण पाळणाघराची सोय करावी लागणार होती. चाळीच्या शेजारी असं एक पाळणाघर मिळालं.हा नवा संसार उभा करण्यासाठी वडिलांनी आर्थिक मदत केली त्यामुळं सोनं-नाणं वडिलांकडे गहाण ठेवलं. मानाने तिने तिचं आयुष्य सुरू केलं.आई-वडिलांना परत गावी पाठवलं.. सेल्समन म्हणून काम सुरू केलेलं तिनं व महिन्याभरात काऊंटर सांभाळायला लागली.पगार वाढला. हळूहळू कॉम्पुटर, बिझनेस याचं शिक्षण घेणं सुरू केलं.वर्षात टायपिंग चे कोर्स केले. नोकऱ्या बदलत राहिली..नवीन शिकत राहिली.दोन वर्षात स्टेनो-टायपिस्ट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवला.शिक्षण होतंच..पण संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास हरवला होता.या दोन वर्षात तो आत्मविश्वास परत मिळवला.दिवस रात्र राबत होती.मुलांना मात्र वेळ द्यायची.चार वर्षे अखंड मेहनतीचं फळ हे होतं की आज एका बड्या कंपनीत, चांगल्या पोस्ट वर काम करत होती.सोडलेला फ्लॅट स्वहिमतीवर परत मिळवला.तिचं घर तिने पुन्हा सजवलं.आज हे सगळं तिचं होतं. आज ती या घराची मालकीण होती.तिला उठ म्हणायची कोणी हिंमत करणार नव्हतं.आज ती एक यशस्वी working-woman होती. शिवाय मुलांना तिने जीवापाड जपलं होतं. तिला मिळालेल्या शिक्षणाचं तिने चीज केलं.
आज पाच वर्षांनी अचानक शौनक ला या घरकुलात परत यायचं होतं.आज पत्नी म्हणून ती जिंकली होती.उद्या तो येणार होता.ती दचकली भानावर आली.समोर टीव्ही चालू होता तो बंद करून ती झोपायला गेली.तिची चाहूल लागताच तिची दोन्ही पिल्लं तिला बिलगली.त्यांना थोपटत राहिली.

पहाटे उठली. रात्रभर झोपलीच नव्हती.एक एक काम आवरत राहिली.कामवाल्या मावशींना सूचना देत राहिली.नऊ च्या सुमारास बेल वाजली तिने दार उघडलं.तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं.अर्ध्या तासाने शौनक आला.त्याच्या हातात दोन सुटकेस होत्या.आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता.मधली पाच वर्षे तो विसरला होता.मुलांना जवळ घेतलं, त्यांना खाऊ-खेळणी दिली.मुलं मात्र त्याला टाळत राहिली. वरद ला तो पुसट सा आठवत होता. रेवा मात्र शमिका ला येऊन चिकटली.शमिका मुलांशी नेहमी खरं बोलली होती.आमचे बाबा कुठं आहेत यावर तिने मुलांना..”तुमच्या बाबांना मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले ” हे उत्तर दिलं होतं..

मावशींनी चहा नाष्टा आणून ठेवला..त्यांनी शमिकाकडे पाहिले..

“बसा ना मावशी..तुम्ही घरच्या आहात ना.. तुमच्यापासून काय लपलंय..?”

शौनक मात्र तिला थांबवत मध्येच बोलला…

“शमिका….”

“एक मिन आले मी..” असं म्हणत शमिका आत गेली ; बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि ते तिने शौनक च्या हातात दिले.

“डीव्होर्स पेपर्स..?हे काय आहे…?डोकं ठिकाणावर आहे का..?” शौनक चा आवाज चढला.

“आवाज खाली मिस्टर शौनक..कारण तुम्ही माझ्या घरांत उभे आहात.तेव्हा आपल्या मर्यादेत रहा.”

शमिका शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली. तिचा तो थंडपणा पाहून शौनक दचकला. तिच्या सासू-सासर्यानी मधे बोलायचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले.

“हे जेव्हा घर सोडून गेले तेव्हा काही बोलला असतात समजुतीने तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं.पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलंत.. मी मुलांना घेऊन गळ्यात पडेन अशी भीती वाटली तुम्हाला. मग आज खरं तर कोणत्या नात्याने आलांत तेच कळलं नाही..बरं आलातच तर स्पष्ट सांगते जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी घरांत घेतलं त्यामुळं विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत.काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलावणं मला अवघड नव्हतं.पण आज पर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली तशीच यापुढेही मिळवेन.
तर मिस्टर शौनक तुम्हाला परत यायचं आहे पण मला तुमची गरज नाहीये.माझी मी समर्थ आहे जगायला.”
कथाविश्व
“तुला कोणी भेटलं आहे का दुसरं..?”

“त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही.ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्याक्षणी आपल्यातील नातं संपलं. या घराचं तुमचं डिपॉसिट तुम्ही परत घेऊन गेला होतात हे घर मालक सांगतील.हे घर माझं आहे,माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतलंय याचे पेपर्स आहेत..तेव्हा या तुम्ही कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जातोय.आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते..”

“ही मुलं माझी आहेत…” मी हे सिद्ध करेन.

“मुलांना विचारा तुम्ही..?ओळखतात तरी का बघा..हं..?”

“वरद बेटा…मी बाबा आहे तुझा..ये माझ्या जवळ…” शौनक निर्लज्जपणे म्हणाला.

“पण आई तुम्हाला आवडत नव्हती तुम्ही सोडून गेलात.मग आम्हाला का नाही घेऊन गेलात..?”

नऊ वर्षांचा वरद आईला बिलगत बोलला..रेवा तर त्याच्याकडे पहात देखील नव्हती.शमिका ने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेम ही दिलं होतं.नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं. स्वतः त्रास सहन केला होता.पण त्याचं निरागस बालपण हरवू दिलं नव्हतं. ती जिंकली होती..

“मी कोर्टात जाईन..”

“कोर्ट पाच वर्षांचा हिशेब मागेल..आणि हो सज्ञान होईपर्यंत मुलं आईकडेच राहतील.. बाकी ती यायला तयार असतील तर घेऊन जा..मी आड येणार नाही.”

ती असं बोलली आणि शौनक चपराक बसल्यासारखा गप्पं बसला.कारण तिच्यासहीत मुलं हवी होती.नाहीतर मुलांचं लोढणं नको होतं..त्याने हार मान्य केली..हात जोडले..
कथाविश्व ग्रुप
“मी देखील भीक मागितली होती.तिच्यासह तुम्हाला स्वीकारायला तयार होते ओ मुलांसाठी पण तुम्ही लाथाडलं..आता नाही.. आणि हो मुलांना मधे घेऊन शह देऊ पहात असाल तर सांगते..मुलांनी एक तर मला निवडावं नाही तर तुम्हाला पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही..हा माझा अंतिम निर्णय आहे..”

असं म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभी होती.शौनक बॅगा ओढत बाहेर गेला आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं..तिने दार लावलं आणि इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यांतून ओघळले..तिची दोन्ही पिल्लं तिला येऊन बिलगली..आज एक आई जिंकली होती.एक स्त्री जिंकली होती..खऱ्या अर्थाने आज ती ‘स्वयंसिद्धा’ होती.

समाप्त.

लेखक अनामिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}