मनोरंजन

कथा : अद्भूत नातं लेखक : प्रकाश विनायक रायकर

कथा : अद्भूत नातं
लेखक : प्रकाश विनायक रायकर
———————————
ऑफिस सुटल्यावर रमतगमत मी घरी निघालो होतो. येणारी एक स्त्री मला ओळखीची वाटली. अनेक वर्षांनी तिला बघत होतो. ओळख पटली. परकरी असताना ती आमच्या बाजूच्या घरात राहत असे. आमच्या अंगणातील प्राजक्ताची फुलं वेचण्यासाठी येत असे.

मी शाळेत असताना तिच्या वडिलांची बदली झाली आणि त्यांचं बिऱ्हाड आमची आळी सोडून गेले हेही मला समजलं नाही.

पण आता ती अनेक वर्षांनी भेटली. जुनी ओळख उकरली गेली आणि एक दिवस दोघांत नात्याची भावना निर्माण झाली. नातं मानलेल्या बहिणीचं नव्हतं. माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी, माया करणारी माझी सख्खी बहीण होती. बहिणीच्या आणि मैत्रिणीच्या पलीकडे आमचं भावविश्व एकमेकांत गुंतलं गेलं आणि त्याचे धागे नकळत एकमेकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचले.

आमचं नातं दिवसेंदिवस दृढ होत होतं. आम्हाला एकमेकांच्या शरीराचं आकर्षण बिलकूल नव्हतं. तरीही एकमेकांवाचून राहणं अशक्य आहे. अशी आमची स्थिती झाली.

आमचा स्नेह सारा या दोन-तीन वर्षांचा. या काळात आम्ही पुष्कळ वेळा भेटलो असू आणि आताशा भेटी तुटपुंज्या होऊ लागल्या. भेटून बोलायचं काय? नुसतं बघणं, स्मित करणं, मान डोलावणं आता पुरेसं होतं. तेवढ्याने माझ्या काळजाचे ठोके तालावर पडतात. जगण्यातला एक अदृश्य अर्थ हाती लागतो. कसलंसं बळ येते. असार आयुष्य सरळसूत होतं.

तिला मी बघितलं आणि कसं ओळखलं ह्याचंच मला आश्चर्य वाटलं. तब्बल दोन तपानंतर मी तिला बघत होतो. बटांनी भरलेलं कपाळ, गळ्यात काळा दोरा, काचा मारलेला परकर आणि लबलब हालचाल. एवढीच पुसट आकृती आठवत होती.

आणि आता पांढरी शुभ्र साडी नेसलेली. आंबाडा बांधलेली प्रौढ स्त्री. कपाळावर ठसठशीत कुंकू आणि गळा भुंडा.

तरीही मला वाटलं आमच्या शेजारी राहणारी प्राजक्ताची फुलं वेचायला येणारी ती परकरी मुलगी रेवती असावी.

ती फळविक्रेत्याच्या गाडीपुढे उभी होती. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर माझी खात्री पटली. आणि तिला विचारायचं धाडस करायचं ठरविलं. तिची खरेदी संपली. ती वळली. मी तिला सामोरा गेलो आणि म्हटलं,

“एस्क्यूज मी, आपण रेवती म्हणजे पूर्वी सांगलीला ब्राह्मण आळीत… कौलारू
घरात राहत होता…!”

कुणा तिऱ्हाइतानं अडवलं म्हणून प्रथम तिच्या कपाळावर आठ्या आल्या. मग एकदम तिचा चेहरा सौम्य झाला. तिला ओळख पटली, “अय्या! तू सुभाष ना?”

“हो.”

माझा अंदाज चुकला नव्हता. विस्मृतीतील व्यक्ती मला आढळली ह्याचा मला आनंद झाला.

” इकडे कुठे?” मी विचारलं.

“कॅनरा बँकेत आहे. तीन वर्षे झाली. “अस्सं? कधी पाहिलं नाही.”

“एवढ्या गर्दीत आणि या अफाट मुंबईत कुठल्या चटकन भेटी व्हायला? घरचे ठीक आहेत सगळे? आई-बाबा तुम्ही इथं असता?”

“हो, सर्व सुखरूप आहोत. दोघेही गावी असतात. मी ओरिएंटल इन्शुरन्समध्ये कामाला आहे.”

“खूप वर्ष झाली. आम्ही सांगलीहून नगरला गेलो. नानांच्या सारख्या बदल्या
होत गेल्या. आता ते मजजवळ असतात.” लंच टाईम संपत आला होता. जुन्या आठवणी उगाळण्यात फारसं स्वारस्य नव्हतं आणि आम्हाला कामावर परत जायची घाई होती.

“चला, याच दिशेने जाणार ना तुम्ही?” हात दाखवित मी म्हटलं. “हो.”

आम्ही निघालो. तिला घरी यायचं आमंत्रण द्यायचं, तिच्या वडिलांना भेटायला जायचं मी ठरवित होतो. तेवढ्यात तिने विचारलं, “कुठं राहता तुम्ही?”

“दादरला, तुम्ही?”

“अंधेरीला, माझे सासू-सासरे आहेत.”

“आलं पाहिजे एकदा. काय करतात तुमचे मिस्टर? ओळख करून….”

“ते ह्यात नाहीत. वर्षापूर्वी…”
“अॅम सॉरी, माफ करा हं, कल्पना नव्हती.”

ती काही बोलली नाही. एकदम रस्ता ओलांडू लागली. मला विचित्र वाटलं, वाईट वाटलं. मीही तिच्या पाठोपाठ रस्ता ओलांडला आणि परत फूटपाथ धरून बरोबरीनं चालू लागलो. आणि कुठं तरी थबकलो. डाव्या दिशेला हात दाखवित

ती म्हणाली, “मी याच लेनमधून जाते. भेटा परत. जुनी माणसं भेटली की बरं वाटतं.”

ती निघून गेली. मी ऑफिसमध्ये गेलो. हिला आपण कसं नेमकं ओळखलं ह्याबद्दल स्वतःचं कौतुक वाटलं. काय करायचं हिला परत भेटून, असा विचार करीत मी तिला विसरायचं ठरवलं.

संध्याकाळी घरी आल्यावर मी सौ. ला म्हणालो, “अगं, आज गंमत झाली. चोवीस वर्षांपूर्वी आमच्या आळीत एक मुलगी राहत असे. ती अचानक भेटली. इतकी वर्षे झाली, इतकी वेगळी दिसते ती. पण मी तिला नेमकी ओळखली. बघ, माझी स्मरणशक्ती.”

“झाला का तुमचा पूर्वीचा खेळ सुरू? नेहमी काहीतरी चाळा हवा असतो तुम्हाला.”

मी चमकलो. आमच्या सौ.
ला वाटलं, माझा पूर्वीचा हा चाळाच अजून चालू आहे. होय! माझ्या मनाला काहीतरी चाळा हवा असतो. तसे छंद मी पूर्व वयात केले होते. पण आता वयपरत्वे त्याचा रस वाटेनासा झाला. आता गंभीरपणे वेगवेगळी कल्पनाचित्रं रंगवतो.

आयुष्यातील कोडी सोडवत राहिलो. कधी विनोदी तर कधी अभद्र वाटणारी चित्रं पण मी मनःपूर्वक अशी कल्पना दृश्य काढी आणि त्यात रमे. अगदी बालपणीच्या आणि न भेटलेल्या व्यक्तींचे जीवनक्रम आता कसे चालू असतील. त्यांचा वर्तमानकाळ, पण माझ्या मनात ती भविष्यभाष्यं। आयुष्याला कसं वळण लागतं. संधी येते म्हणजे काय. अपघात का व्हावेत. माणसाचं प्राक्तन अखेर कसं ठरविलं जातं. हलके हलके आयुष्याचा अर्थ लावू पाहत होतो. जीवनाचं कोडं सोडविण्यात गुंग होतो. केवळ कल्पना, नुसता विचार.

ऑफिसमधून घरी आल्यावर मी आराम खुर्चीवर स्वस्थ बसलो होतो. रेवतीची भेट मी मनाआड केली होती. ती माझ्या लेखी कोणी नव्हती. एकदा माझ्या मनातले विचार मी सौ. ला सांगितले तेव्हा ती म्हणाली, “असे अभद्र विचार मनात आणू नका, विचारसुद्धा करू नका” अशी शपथ घातली होती. मी सौ. ला तसं वचन दिलं तरीही तिचं समाधान झालं नाही. सौ. ने मोठ्या भावाला सांगून माझी पत्रिका दाखवून आणली आणि डॉ. शिरोडकरांकडे मला घेऊन गेली. डॉक्टर म्हणाले, “सर्व नॉर्मल आहे. काळजी करण्याचं कारण नाही.”

रेवती आठवडाभरात मला दिसली नाही आणि मला फारशी तिची आठवणही आली नाही. किंवा बँकेत जाऊन चौकशी करावी असंही वाटलं नाही.

शनिवारी माझं काम संपवून मी घाईघाईनं निघालो. तो ऑफिसच्या खाली रेवती उभी असलेली मला दिसली. मला आश्चर्य वाटलं. हिचं कुणाकडे काम आहे? की माझ्यासाठी!

मला बघून ‘तुमच्यासाठी थांबले आहे’ विलक्षण आपलेपणाने म्हणाली, “वेळ आहे तुम्हाला?”

खरं म्हणजे मला वेळ नव्हता. सौ ला लवकर येतो म्हणून कबूल केलं होतं. नाटकाची तिकिटं मिळाली तर ती काढून ठेवणार होती. पण रेवती मुद्दाम आली आहे. तिचं काही काम आहे हे उमगून मी म्हटलं, “हो भरपूर.”

“आपण कुठेतरी बसू.”

“कुठे?”

आम्ही एका गार्डनमध्ये जाऊन बसलो.

“मला तुमच्याशी बरंचसं बोलायचं . राग नाही ना येणार?”

“राग! नाही अगदी बोला तुम्ही”
“मिसेस शिरोडकर माझी मैत्रीण आहे. शिरोडकरांकडे गेला होतात…”

“हो परवा चेक केलं. त्याचं म्हणता काय? अहो, तो माझ्या बायकोचा खुळेपणा. उगाचच ती भेदरली. डॉक्टर म्हणाले, अगदी ठणठणीत प्रकृती आहे तुमच्या मिस्टरांची.”

“तुम्हाला काही झालं नाही. डॉक्टर त्यांच्या पत्नीलाही म्हणाले.”

ती अंमळ थांबली. माझ्या मनात विचार आला. डॉक्टरांच्या पत्नीने हे सारं रेवतीला का सांगावं? नाहीतरी बायकांना कसलेही विषय गप्पांना चालतात.

तेवढ्यात ती माझ्याकडे टक लावून म्हणाली, “तुम्ही धडधाकट आहात, पण धडधाकट माणसेही अचानक मरतात.” “अभद्र!” माझ्या सौ चे उद्‌गार मला आठवले आणि मी विचित्रपणे हसलो,

“का हसलात?” तिने विचारले. “तुमच्यापर्यंत आमचा खेळ पोचला वाटतं. अहो, हा माझ्या मनाचा नुसता चाळा.आयुष्याकडे अनेक अंगांनी बघण्याकडे माझा ओढा आहे. पण ते माझ्यापुरतें इतरांनी उगाच…”

“मला याबद्दल कुतूहल आहे. मी याच कोड्यात अडकले आहे सांगा, मला सांगा सारं प्लीज..”

मी थबकलो. आणि रेवतीकडे न्याहाळून पाहू लागलो. ही स्त्री चारचौघींसारखी नाही. ही वायफळ बोलणारी नाही आणि अभद्र म्हणणारी नाही. हिलाही आपल्यासारखं जाणवलं आहे. आपल्या चिंतनात, चाळ्यात ही सामील होईल.

एकदम मी बोलू लागलो. घरी बोलायला बंदी होती. माझं म्हणणं कुणी सरळपणे समजून घेईल हे अशक्य होतं. आणि रेवती माझ्याकडे डोळे लावून बघत होती.

‘स्वतःसंबंधी नाही, पण मला कल्पना कराव्याशा वाटतात. कशी सुरुवात झाली कोणास ठाऊक! कदाचित काही वर्षांपूर्वी आमच्या खात्यातला शिपाई रामू बसमध्ये अटॅक येऊन गेला. ती आठवण आली असेल. कोणीतरी यात्रेहून परत येत असताना अपघाताने मृत्यू पावला वाचलं म्हणून असेल. पण माणसांनी असं अचानक मरावं? संसार करायचा, कन्यादान करायचं, आपली कर्तव्यं पुरी करायची. आयुष्याच्या शेवटी निरवानिरव करायची. हे सगळंच न करता अकस्मात नाहीसं व्हायचं काही माणसं अशी मृत्युमुखी पडतात. धडधाकट चालती बोलती. आयुष्याचा डाव रंगून खेळणारी अर्ध्या डावातून निघून जातात. त्यांना उचललं जातं. त्यांना मृत्यूची चाहूल लागली असते काय? आणि मग अर्धवट सोडलेल्या खेळाचं काय? खेळ मांडायला तरी काय अर्थ? कोण याला जबाबदार?” मी थबकलो. रेवती अजून तशीच होती. तशीच बघत होती. मला वाटलं ती बोलेल.

पण ती नुसतं म्हणाली, “बोला ना… तुम्ही असं बोललात की बरं वाटतं.” “आमच्या खात्यातला शिंदे गेला.

आणि काय गोंधळ झाला. महत्त्वाचे कागदपत्रं त्याने कुठे ठेवले हे कुणालाच कळेना. शोधले, शेवटी सापडले. काही दिवसांपूर्वी त्याचा वाङ्निश्चय झाला होता. जोशी मास्तर एकसष्टीचा समारंभ आटोपून आले. सगळी निरवानिरव केली आणि रात्री निजले. सकाळी उठवायला गेले तर सर्व आटोपलेले… हे सारं काय आहे?

“जीवनाला अर्थ आहे. सूत्र आहे. प्राक्तन म्हणून काही चीज असेल. आयुष्य हे वाहतं आहे मानलं… काही सरत नाही…. मरत नाही, हे खरं धरलं तर ह्या अपघाती अकस्मात मृत्यूमागेही काही कार्यकारण भाव असेल!”

“खरं आहे तुमचं म्हणणं”, रेवती म्हणाली.

“मी उलटा सुलटा विचार करतो. फक्त स्वतःपुरता. मला माझ्याबद्दल भय नाही वाटत. मी स्वतः एकाएकी जरी…” तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी थबकलो. माझ्या मुखातून असे उद्‌गार निघाले की सौ म्हणायची, “असे अभद्र
बोलू नका हो.”

पण ती काहीच बोलली नाही.

क्षणभर कोणीच काही बोललं नाही.

नंतर ती म्हणाली, “माझे पती अचानक गेले.”

ती विधवा आहे हे मी विसरून गेलो होतो. ती त्या दिवशी अस्वस्थ का झाली हे मला लगेच उमगले नव्हते. माझी गाठ घेऊन ही चर्चा करण्यात तिचं वैयक्तिक दुःख गुंतलं असेल ही कल्पना त्या क्षणापर्यंत मला शिवली नव्हती.

रेवती अचानक म्हणाली, “एक दिवस ऑफिसमधून घरी येत असताना वाटेत कुठल्याशा विजेच्या तारेचा धक्का लागून लगेच तिथेच गेले. ऑफिसात जाताना वाण्याचे पेपरवाल्याचे बिल फेडून ऑफिसला जाईन असं ते म्हणाले होते. ऑफिस सुटल्यावर तासभर बसून कामं पूर्ण करून निघाले. उद्या येणार नाही बहुतेक असं सहकाऱ्याला म्हणाले होते. मी त्यांची गॅलरीत वाट पाहत होते. ते आले पण…”

रेवती एकदम थांबली. तिचे डोळे कोरडे होते. पण काळजातली कालवाकालव लपत नव्हती. थोडा वेळ असेच बसलो तर ती ओक्साबोक्शी रडेल असं मला वाटलं. कदाचित तिलाही. कारण घाईने उठत ती म्हणाली, “उशीर झाला. तुमची बायको वाट पाहत असेल. उगाच काळजीत पडतील त्या. तुम्ही वेळेवर नाही गेलात तर.”

भ्रमिष्टासारखा मी घरी आलो. बायको काळजी करत दारात उभी होती. माझा हात धरून तिनं विचारलं, “उशीर झाला का?”

मी उलट तिला विचारलं, “नाटकाची तिकिटं मिळाली?”

“हो मिळाली. ही बघा. मी चहाचं आधण ठेवते. तोपर्यंत तुम्ही तयार व्हा.”

आयुष्य वेगानं धावत होतं. आखीव, अखंड, काही थबकलं नव्हतं, थांबलं नव्हतं. मी हलत बोलत होतो. हसत खिदळत होतो. फक्त काही काळापूर्वी रेवतीच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला
होता.

आठवडाभर रेवती मला दिसली नाही म्हणून एक दिवस लंच टाईमच्या वेळी सरळ मी तिच्या बँकेत गेलो. “सुभाष!” ती दचकून म्हणाली. जणू काय माझं अस्तित्व ती विसरून गेली होती. मी चालता बोलता ठणठणीत होतो आणि हिला मात्र त्याचं… माझ्या विचाराची मला लाज वाटली. रेवतीचा काय दोष? मी अचानक आलो म्हणून ती चकित झाली असेल… मनाआड झालेली माणसं तिच्या लेखी मृत्युमुखी पडलेली असतील. माझ्या भरकटणाऱ्या विचारांना मी खीळ घातली.

“चला, कॉफी घेऊ” ती म्हणाली. “नको. जेवणाची वेळ आहे.

काहीतरी खाऊया.” आम्ही जवळच्या हॉटेलात गेलो, सॅन्डविच आणि ज्यूस मागविला.

समोरासमोर बसताच मला विचित्र झालं. कशाला मी आलो मला उमगेना. “रागावलात त्या दिवशी भेटले तुम्हाला म्हणून!” ती ज्यूसचा आस्वाद घेत म्हणाली,

“छे छे, असं म्हणू नका. उलट तुम्ही आपलेपणानं आलात ते मला फार आवडलं. आलात, माझं मन समजून घेतलंत.”

“मला मग फार वाईट वाटलं तुम्हाला अडवलं त्याचं. तुमची पत्नी वाट बघत होती.”

‘तुम्हाला कसं…”

त्या दिवशी तुम्ही दोघे नाटकाला गेलात. मी त्या दिवशी मिसेस शिरोडकरबरोबर नाट्यगृहावर गेले होते. नाटकाचं तिकीट मिळालं नाही. परत जात होतो. तेवढ्यात तुम्हाला आणि
तुमच्या मिसेसला बघितलं. तुम्ही तिला गजरा घेऊन दिलात. किती फुलून गेली होती ती तुम्ही जवळ होता म्हणून.”

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही.

“तुम्ही गप्प का? त्या दिवशी तुम्हा दोघांना हसतमुख बघितल्यावर मला मनापासून आनंद झाला. पूर्वी मला असूया वाटायची. संतापून मी सवाल करायची, सगळे नीट जगताहेत आणि माझं आयुष्य दुःखमय का? मीच काय पाप केलंय ? माझं सुख अचानक का संपावं? नंतर मी शांत झाले. अंतर्मुख झाले. तुम्ही करता तसलाच विचार, तोच विवेक.”

“तुम्ही भेटलात. माझ्या काळजातले पडसाद मला ऐकवलेत. तुमचं सुरळीत चाललेलं आणि आनंदमय आयुष्य बघितलं आणि तेव्हापासून माझ्या मनात एक चाळा सुरू झाला. तुम्ही करता तसा… सांगू?”

“एखादे वेळेस माझे विचार, माझं म्हणणं तुम्हाला विचित्र वाटतील. पण तुम्ही समजून घ्याल अशी खात्री आहे. मला असं वाटू लागलं की दोन वर्षांपूर्वी श्रावण अमावस्येला हे अचानक गेले आणि त्या क्षणी तुम्ही कसल्याशा भीषण अपघातातून वाचलात. वेळ आली होती, पण काळ आला नव्हता. आमचं आयुष्य थबकलं. पण तुमचं सुरळीत चालू राहिलं. जणू काय माझ्या पतीच्या आयुष्याचं दायित्व तुमच्यावर टाकलं गेलं. ते गेले. मी भोवंडत बसले. पण तुम्ही अजून आहात. तुमचा संसार सुरळीत चालू आहे. माझ्या मनातील विचार कसे व्यक्त करू हेच मला समजत नाही. पण आता मला आधार सापडल्यासारखं वाटतंय. धीर येतोय. आयुष्यातल्या अपघाताचा आणि वाटचालीचा अर्थ उमगतोय. तुमच्यापासून मी अपेक्षा करत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यातच राहा. माझ्यासाठी काही करू नका. पण तुमचं अस्तित्व हेच मला खूप आधार देतंय!”

तिच्या बोलण्यानं मी चक्रावून गेलो.

दोन वर्षांपूर्वी श्रावण अमावस्येला रस्ता पार करताना मला एका पथिकाने मागे खेचले नसते, तर मी लॉरीखाली चिरडलो गेलो असतो. लंच टाईम संपत आला होता. आम्ही दोघं निघालो. निघताना तिने परत भेटा म्हटलं नाही. माझ्या सहवासाची अथवा सांत्वनाची तिला जरूरी नव्हती.

मी लवकर घरी आलो याचं बायकोला आश्चर्य वाटलं. मी सौ ला म्हटलं, “पुष्कळ दिवस सुमन आत्याकडे गेलो नाही. विचार केला जाऊया…”

“काय योगायोग आहे बघा. दुपारी आत्याचा फोन आला होता.”

“काय म्हणाली ती?”

“पुष्कळ दिवस आला नाहीत. सर्व ठीक आहे ना. हे विचारण्यासाठी फोन केला होता.”

एका अकारण अचानक नाहीसा झालेल्या संसारी तरुणाच्या आत्म्याचं ओझं माझ्यावर होतं. मला आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगायचं होतं. जीवन भरभरून लुटायचं होतं.

काही दिवसांनी अशीच अचानक आमची भेट झाली.

“कुठे निघालात?” तिनं विचारलं. “आनंदाची बातमी न सांगताच ? वहिनींना दिवस गेले आहेत ना. मिसेस शिरोडकर सांगत होत्या.”

“मिसेस शिरोडकर तुमची खबरी दिसतेय.” मी मिश्कीलपणे म्हणालो.

“नाही हो. कालच अचानक भेटली. खरं म्हणजे मी तिला टाळते हल्ली. तुम्हाला असे वाटेल म्हणून.”

“थट्टा केली मी, घरी या ना एकदा.”

“पूर्वी आले असते, पण आता नको तुमचं आयुष्य पाहायला. तुमच्याबद्दल बातमी काढायला नको वाटतं. फक्त तुमचं अस्तित्व ! तुमचा संसार वाढतो आहे. सुखानं चाललाय ह्याचं किती बरं वाटतं.”

मातृत्वाची इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच ती विधवा झाली होती. म्हणूनच तिला आता माझ्या संसारात भर पडते आहे ह्याने मनःशांती मिळत असावी. तिच्या समाधानी वृत्तीचं, शांत बोलण्याचं मला कौतुक वाटलं. आता तिच्या हालचालीत मोकळेपणा आला होता. चेहऱ्यावरचा चिडीचा भाव लोपला होता.

माझ्या मनावरचा जडपणा ओहोटून गेला. मृत्यूची धास्ती. दुस-याच्या दुःखाबद्दलचा अपराधीपणा, एका आत्म्याचे ओझे काही मला जाणवेनासं झालं. प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाल मला सुंदर दिसू लागली. माझ्यासाठी मी जगत आहे आणि माझ्या आयुष्याच्या आधाराने ती.

तिचे जीवन वाहतं आहे.

असेच आम्ही कधीतरी भेटतो. बस स्टॉपवर, फळ विक्रेत्याजवळ, कॉफीगृहात.

तुटपुंज्या, धावत्या भेटी.

“घरी निघालात?”

“हो.”

“लवकर जा.”

शब्दाचीही फारशी गरज भासत नाही. नुसता दृष्टिक्षेप. अस्पष्ट हास्य. ती दिसताच मी फुलून जातो. हात हलवतो. ती मान डोलावते. डोळे भरून पाहते. तिचं भोवंडलेलं मन भानावर येतं. काही संपलं नाही. काही तुटले नाही अशा भावनेने ती चालू लागते. आणि क्षणभंगुरत्वाचा विचार करणारा

मी अधिक जिद्दीने आयुष्यात मिसळून जातो.

जणू काय रेवतीच्या पतीचा जीवनौघ मला पुढे रेटायचा आहे. मला दुप्पट बळ येतं,

आणि तिला नवा हुरूप वाटतो.

आमच्यात एक अद्भुत नातं निर्माण झालं आहे. आकर्षण नाही, सहवास नाही. पण मैत्रीण, प्रेयसी या पलीकडचं असं काही आत्म्याला जोडणारं लेणं.

प्रकाश विनायक रायकर साभार..🙏🏻🙏🏻
पूर्वा अपार्टमेंट, फ्लॅट नं. ४०४, कानसई गाव, अंबरनाथ (पू.) ४२१ ५०१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}