बाप नावाचा वेडा … ….. . विनोद दरेकर
बाप नावाचा वेडा …
हा लेख मी अॅड. विनोद दरेकर म्हणून नाहीतर स्वानुभवातून एक बाप म्हणून लिहिला आहे … जगातील सर्व बाबांना समर्पित 👏👏👏
तर बाप ह्या वेड्या माणसाची सत्यकथा सुरू होते जेंव्हा त्याच्या होणाऱ्या बाळाची आई दवाखान्यातल्या बेडवर कळा घेत असते आणि अस्वस्थ होऊन जो दवाखान्याबाहेर चकरा मारत असतो तो एक बाप असतो …
बाळाच्या रडण्याचा आवाज येतो तेंव्हा डोळ्यात आश्रू येऊन जो हात जोडून देवाचे आभार मानतो तो एक बाप असतो …
आपल्या बाळाला सुखरूपपणे या जगात आणलं म्हणून केवळ डॉक्टरच नाहीतर तिथे उपस्थित नर्सचे सुदधा पाय धरतो तो एक बाप असतो …
खुशीत पागल होऊन जो सगळ्या लोकांच्या तोंडात पेढा बर्फी घालतो तो एक बाप असतो …
मुलगा आणि मुलगी सारखीच नव्हे तर मुलीवर कांकणभर जास्तच जीव असणारा तो एक बाप असतो …
बाळ घरी आल्यावर स्वतःच्या हाताने जो त्याच्यासाठी अंथरुण तयार करतो तो एक बाप असतो …
रोज कामावरून येताना आपल्या बाळासाठी खाऊचा पूडा आणि खेळणं घेऊन येतो तो एक बाप असतो …
बाळ दचकू नये म्हणून बाहेरच आपले बूट काढून दबक्या पावलांनी घरात येतो तो एक बाप असतो …
रात्री पाळण्यात बाळ हलून पाळणा तिरका होऊन बाळ पडू नये म्हणून उठून पाळण्यात सारखं बघणारा तो एक बाप असतो …
शेजारी बाळ झोपलंय ते आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणजे कित्येक रात्री न झोपलेला तो एक बाप असतो …
बाळ झोपेत खाली वर तर सरकलं नाही ना म्हणून झोपेत शंभर वेळा चाचपडणारा तो एक बाप असतो …
बाळाला उभं करताना अजून त्याची पायाची हाडं नाजूक आहेत त्याला बाक तर येणार नाही ना म्हणून उभं न करता परत बाळाला झोपावणारा तो एक बाप असतो …
बाळाचा हात घट्ट पकडून ते पडू नये याची काळजी घेऊन चालायला शिकवणारा तो एक बाप असतो …
बाळाला शाळेत पहिल्या दिवशी सोडून ते रडतंय म्हणून हिरमुसला होऊन शाळासुटेपर्यंत शाळेच्या व्हरांड्यातच अडखळलेला तो एक बाप असतो …
शिक्षक फी साठी मुलांना काही बोलू नयेत म्हणून कामावर बॉसच्या शिव्या खाऊन अपमानित होऊन सुद्धा ऍडव्हान्स पगार घेणारा तो एक बाप असतो …
मुलांना कमी मार्क्स पडले तर प्रसंगी काळजावर दगड ठेऊन कडक शब्दांत समज देऊन त्यांच्या नजरेत हिटलर ठरणारा तो एक बाप असतो …
पुढे मुलीचे लग्न जमवताना अनेकांचे उंबरे झिजवणारा तो एक बाप असतो …
पसंती झाल्यावर घेतलेला निर्णय नक्की बरोबर आहे ना म्हणून रात्ररात्र अंथरुणावर कूस बदलणारा तो एक बाप असतो …
नवरदेवाची बारीक चौकशी करण्यासाठी जीवाचं रान करणारा तो एक बाप असतो …
लग्नमंडपात केविलवाणे सगळ्या वऱ्हाडाला वारंवार हात जोडून नमस्कार करतो तो एक बाप असतो …
मुलगी सासरी जाताना तिची चुकभुल सांभाळून घ्या लहान आहे अजून मी आधीच तुमची माफी मागतो म्हणून तिच्या सासरकडच्यांचे पाय धरणारा तो एक बाप असतो …
तिची आई मनसोक्तपणे रडत असते पण डोळ्यात आलेले आश्रू धीराने थांबवून तिची गाडी गेल्यावर कोणाला दिसू नये म्हणून मांडवाच्या कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडणारा तो एक बाप असतो …
मुलीच्या सासरी सारखा फोन करणे बरोबर नाही म्हणून, लग्नात आधीच जाणूनबुजून तिच्या शेजारच्यांची ओळख काढून, त्यांना रोज दहा वेळा फ़ोन करून आमची ताई दिसली का हो?, ती ठीक होती ना?, हसत होती ना?, काय दुखत तर नाही ना? म्हणून चौकशी करून परत अदबीने तुम्हाला उगीच त्रास दिला असं म्हणून, तिच्या घरच्यांना सांगू नका असे विनवणारा तो एक बाप असतो …
मुलांना गरुडभरारी घेताना त्यांच्या पंखात बळ यावं म्हणून स्वतःची कुवत नसताना उडी घेऊन परिणामी धडपडणारा, ठेचकळणारा तो एक बाप असतो …
मुलांना आकाशाला गवसणी घालता यावी म्हणून उर फुटलं तरी आयुष्यभर घोड्यासारखा धावणारा तो एक बाप असतो …
मुलांनी इप्सित धेय्य गाठलं की कृतार्थ होऊन देवाला आता मला बोलावलं तरी चालेल म्हणणारा तो एक बाप असतो …
आपल्या ऑफिसर मुलांचे कपडे कडक इस्त्री करण्यात तासंतास घालवण्यात ज्याला खेद ना खंत वाटते तो एक बाप असतो …
दुधापेक्षा दुधाच्या सायीवर म्हणजे तुमच्या मुलांवर प्रेम करणारा तो एक बाप असतो …
तुम्ही तुमच्या मुलांना ओरडला तरी तुम्हाला काहीही न बोलता नातवंडांना जवळ घेऊन आतल्या आत धायमुकुल रडणारा तो एक बाप असतो …
मित्रांनो त्या बाप नावाच्या वेड्याला ना गाडी-बंगल्याची अपेक्षा असते ना शान शौकतीची, ना पंचपक्वानाची ना पिझ्झा-बर्गर ची, त्याला तुम्ही तुमच्यातली चटणी भाकरी दिली तरी तो आनंदानी खातो. त्याला दिवाळीला एखादा कपडा आणला तरी कुबेराची संपत्ती मिळाल्याचा त्याला भास होतो … असा हा बाप … मातृत्वाची सर कोणालाच येणार नाही पण मित्रांनो बाप नावाचं हे छत्र सतत तुमचं रक्षण, पालन-पोषण करत असतं … काहीही अपेक्षा न करता तुमच्यावर निर्व्याज प्रेम करत असतं … तुमच्या नकळत … काहीही न बोलता तुमची काळजी करत असतं… ते वेळेवर उमगलं तर ठीकच नाहीतर … 😢