हाफ प्लेट अनिल महाजन
हाफ प्लेट
भावेंच्या खानावळी बाहेर लावलेला बोर्ड वाचत उभा होतो. शेवटची ओळ लाल भडक अक्षरात होती. लिहिलं होतं, तुमच्या कडे प्लेट चे सात रुपये पैसे नाहीत, ही आमची चूक नाही! अर्धी थाळी आम्ही देत नाही याची नोंद घ्यावी!
मी खिश्यातली नाणी तळहातावर ठेवून मोजली. अवघे चार रुपयेच काय ते माझ्याकडे होते. आतून येणाऱ्या आमटीच्या सुगंधाने, भूक अगदी जिभेवर येऊन बसलेली. काय करायचं, सुचत नव्हतं.
खिडकीतून आत बघितलं, भावे देवपूजा करण्यात व्यस्त होते. पूजा अर्चा करणारी माणसं माणुसकी जपून असतात असं शाळेतले माझे शिक्षक सांगत असत. भावेंना भेटून विनती करून पहावी, चार मध्ये जे काही ते देतील ते, खाऊन आश्रमातल्या खोलीत जाऊन पडावं असा मध्यम वर्गीय विचार, मनात आला.
पण मग पाठोपाठ दुसरा विचार देखील दाखल झाला. कोकणातली माणसं नियमाची पक्की असतात, सात तुमच्याकडे नाहीत ही आमची चूक नाहीय, असं स्पष्ट लिहिलेलं असल्यावर भावे माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता म्हणतील, बाहेरच्या फलकावरील शेवटची ओळ वाचा!
वाढपी दोन माणसाना वाढत होता. पापड, दही, कोशिंबीर आणि काय काय…एक नाणं तुळशी खाली पुरून ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी त्याचे दोन होतात..मग दोन चे चार…आजी, गोष्ट सांगताना सांगत असे.
आश्रमात तुळशीची रोपं होती. चार आणे पुरून ठेवले तर उद्या आठ मिळतील. जेवण होईल, शिवाय बाकी एक रुपया दुसऱ्या दिवशी साठी लागणाऱ्या सात साठी पुरून ठेवण्यास कामी येईल…एक रूपया रोज शिल्लक राहिल आणि सात ची सोय लागेल..शिकला सवरलेला मी, पण असे शिक्षणावर काजळ फासणारे विचार, मनात येत होते. त्याचं कारण म्हणजे, आत उठलेला भुकेचा ज्वालामुखी!
शेवटी मनावर किलोभर वजन ठेवून आत शिरलो. भावेंची पूजा एव्हाना आटोपली होती आणि ते गल्ल्यातली नाणी मोजण्याचं काम करत होते. हात जोडून त्यांना नमस्कार केला. माझ्या सारख्या शिक्षित, तरुण माणसाने छान पैकी धोतर नेसलेलं पाहून त्यांना खूप बरं वाटलं असावं कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये मला समोरच्या गणपती समोर लावलेल्या समईची ज्योत दिसली…
विनंती करायला आलोय मी…
बोला न..
मी..मी फलकांवर लिहिलेली शेवटची ओळ दोन वेळा वाचून समजून घेतलीय..पण तरीही विनंती करायला आलोय..माझ्याकडे चार रुपये आहेत. अर्धी थाळी द्याल?
वाचून समजून घेतलीय असं म्हणालात. काहीतरी गल्लत झालीय तुमची. नीट वाचलं नसावं किंवा मग वाचलेलं नीट समजलं नसावं. हा संपन्न देश अजूनही मागासलेला आहे त्याचं कारण माहितीय? नियम न पाळणे! माझा मुलगा आला तरी त्याला देखील अर्धी प्लेट मी देणार नाही. भावे बोलले.
चूक झाली माझी पण…
पण काय?
एक प्लेट घेऊन आम्ही दोघांनी शेअर केली तर..तर चालेल?
रिकामं ताट देईन. किती काय कसं वाटायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
म्हणजे एका थाळीत दोघं जेवू शकतो ना…
हो. त्या बाबतीत फलकावर काही सूचना वैगेरे नाहीय न? मग विचारायचंच का? शंका संपल्या असतील तर आता कामाला लागू मी? भावेंनी विचारलं. बाहेर पडलो.
भाजी आमटीच्या सुगंधाने पाय, जणू आवळून ठेवले होते. अन्नाची भूक मोठी वाईट! भट्टी जळली नाही, तर भूकेशिवाय डोक्यात इतर कांही येण्याची शक्यता, अजिबात नसते. आश्रमात परतावं, तुळशीचं छान फुललेलं रोप पाहून, त्या खाली चार रुपये गाडून ठेवावेत, अश्या खूप गोष्टी मनाला जवळ दूरची फेरी मारून आणीत होते.
फलकाची बाजू पाहून उभा झालो. का कोण जाणे, भावेंचं मन लोण्या सारखं विरघळायला लागेल, माझ्या विषयी दया नाहीतर नाही, सहानुभूती वाटेल त्यांना आणि मग ते माणसाला पाठवून मला आत बोलावून घेतील आणि…भात, आमटी भाजी ची ती थाळी, माझ्या पुढ्यात असेल असं वाटयला लागलं होतं.
माझ्या खांद्याला कुणाचा स्पर्श झाला म्हणून डचकायला झालं. मग वाटलं, भावे..ते असतील..या..वैगेरे म्हणतील ते! वळून पाहिलं तर शाळेच्या शेवटच्या वर्षात वैगेरे शिकणारा तरुण मला खेटून होता. पदार्थांची यादी वाचून झाल्यावर त्याचे डोळे लाल रंगात लिहिलेल्या त्या ओळीवर थांबले. तिथेच थांबून राहिले. त्याने खिश्यातली नाणी मोजून बघितली. एकदा. दोनदा…
सात, नाहीयत? जेवायचं आहे न? माझ्या कडे पण, सात नाहीयत. एक काम करूयात? अर्धी अर्धी थाळी वाटून घेऊयात?
अर्धी थाळी? पण माझ्याकडे अर्ध्या थाळी साठी लागणारे साडेतीन पण नाहीयत. तीन..फक्त तीन रुपये आहेत माझ्याकडे! तरुण बोलला.
हरकत नाही. तीन तुझे. चार माझे. चल ये आता पटकन..खूप वेळे पासून पोटाला घट्ट आवळून उभाय मी!
आम्ही दोघं आत शिरलो. भावेंना सात देऊन टोकन घेतलं. भावे ना हसले. ना बोलले. रिकामा टेबल पाहून आम्ही बसलो…एक थाळी…बरोबर एक रिकामी आण..एका वाढपी मुलाला बोललो. हिस्से करून खाणारे कदाचित आम्ही पहिले असुत म्हणून त्या मुलाने भावेंच्या दिशेने बघितलं..भावेंनी होकारार्थी मान हलवली आणि दोन थाळ्या आमच्या पुढ्यात आल्या..एक रिकामी. दुसरी भात, आमटी ची!
छान जेवण झालं!
मुलगा म्हणाला, काका, आभारी आहे तुमचा. बारावीची परीक्षा द्यायला म्हणून इथे आलोय. घरून येतांना आई ने मोजके पैसे दिलेयत. म्हणाली, आहे त्यात आयुष्य घालवायची सवय करून घे!
उद्या दुपारी…भेटाल? तीन घेऊन येईन..तरुण बोलला. जी गोष्ट मी विचारणार होतो ती, त्याने विचारून माझ्यावर आलेलं दडपण नाहीसं केलं होतं.
आश्रमा कडे वळताना खिडकी कडे हटकून लक्ष्य गेलं..भावे माझ्याकडेच पाहात होते…उद्या येईन तेंव्हा बुडाशी अजून एक लाल ओळ असेल का कसे…एक प्लेट घेऊन दोघांना जेवता येणार नाही…विचार मनात आला काय आणि जिभेवर रेंगाळून असलेला आमटीचा स्वाद क्षणात अदृश्य झाला!
आश्रमात पोहचलो आणि नजर, तुळशी कडे गेली. बिचारी! लोकांच्या मनातल्या जाती जातीचा विचार मनात अजिबात न आणता माझी ही तुळस, कुठल्याही मातीला आपलंसं करून आपल्या बरोबर मातीचं आयुष्य फुलवीत जाते…तुळशीच्या अनेक गोष्टी आजी सांगत असे पण मी दरिद्री, तिने सांगितलेली चार चे आठ ही एकच गोष्ट मला का आठवावी? तुळशी वर एकदा मायेने हात फिरवून खोली कडे वळलो.
दुसऱ्या दिवशी अकरा च्या आधीच भावे भोजनालया च्या पुढ्यात जाऊन उभा झालो. आधी फलक वाचला..मला अपेक्षित होतं तशी नवी ओळ वैगेरे तिथे नाहीसं पाहून मनातल्या मनात भावेंचे आभार मानून कोपरा गाठला. भावें आतून कुठूनही मला पाहू शकले नसते, अशी ती जागा होती. कडक माणूस आहे, न जाणो उद्या डोक्यात कांही नवी गोष्ट शिरली तर?
बारा कडे काटे वळले. बारावीची परीक्षा द्यायला म्हणून आलेला तो तरुण अजूनही आला नव्हता. तो आला नाहीतर? विचार मनात आला काय, माझी तगमग वाढीस लागली. मन समुद्रात एकाच वेळी भरती, ओहोटी सुरु होत्या. जागा सोडली तर भावे बघतील, माझा भुकेला आणि मग केविलवाणा चेहरा पाहून त्यांना काय काय वाटेल! वेळ प्रसंगी माणसाला पाठवून ते मला धक्के मारून जागा सोडायला लावतील, असा विचार देखील आला.
शेवटी तो, आला! खूप अवस्थ होता. म्हणाला, काका, आज चार पुरवण्या घेतल्या. शाळा सोडायला वेळ लागला मला. धावत आलो. वाटत होतं, माझी वाट पाहून तुम्ही निघून गेला असाल…मला उपाशी राहावं लागलं असतं..तो, बोलला. प्रत्येक शब्दा परत त्याच्या फासळ्या वर खाली, खाली वर होतांना पाहून मला भरून आलं. एक वेळचं अन्न अन्न निर्मिती साठी जगभर पर्सिध्द असलेला हा देश माझ्या सारख्या लोकांना देऊ शकत नाही?
चल आता आत जाउयात. तू येशील की नाही, काळजी करत उभाय इथे. ये…
भावेना सात रुपये देऊन कुपन घेतलं. त्यांची कैची छाप मिशी आमच्या दोघां कडे पाहून छान पैकी हसली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू? माणूस पलटी तर मारणार नाही ना? नाहीतर असं हसू का म्हणून?
वाढपी, आला. एक थाळी, एक रिकामी. कुपन त्याच्याकडे देत मी बोललो. तो पण, हसला. म्हणाला, आता सांगायची गरज उरली नाहीय! त्याची नजर चालत धावत भावे बसून होते तिथे पोहचली. भावेंनी होकारार्थी मान हलवली. माझा जीव, जीवात परतला!
पाकातल्या पुऱ्या आणि आळूची वडी आजची स्पेशल डीश होती. आपल्या या देशात परीक्षे इतकं मोठं ओझं दुसरं कुठलही नसावं. भूक, वस्त्र वैगेरे गोष्टी त्या नंतर येणाऱ्या. सगळ्यांनाच परीक्षेत घवघवीत यश हवं असतं. अगदी वरचा वर्ग, मिळवायचा असतो. पुढे आयुष्यात सतत अपयशी होत जाणाऱ्या माणसाची मात्र आम्ही फारशी दखल घेत नाही…शाळेची पुस्तकं म्हणजे कोवळ्या मनांना लागलेली वाळवी…हसण्या खेळण्याच्या वयाचा भुसा पाडत जाणारी…
माझा तरुण मित्र अभ्यासा पेक्षाही आईच्या आशा, अपेक्षांचं ओझं वाहून किती पांढरा पडलाय, पाहात होतो. अर्धी प्लेट ठीकय पण आज, आज मी वाटे करतानाच सात तीन असा हिशोब ठेवला होता. म्हणजे सात हिस्से त्याला…अभ्यासाचा शिल्लक डोंगर त्याला सहज चढता यावा, माझी धडपड म्हणून होती. त्याने आढेओढे घेतले पण मी नाही ऐकलं…
पुढचे सहा दिवस असे छान गेले. माझा तरुण मित्र आज ना उद्या त्याच्या गावी जाईल. पुढे चार-तीन कुणा बरोबर, हा प्रश्न मन ढगाळून आलं की इंद्रधनु बनून प्रगट व्हायचा आणि मग…नाहीसा व्हायचा. आश्रमाच्या पायरीवर निवांत बसून राहायचो तेंव्हा वाऱ्याच्या हलक्या झोक्या बरोबर छान पैकी डुलणारी तुळस पाहून मनात विचार यायचा, तुळशीच्या बुडाशी बुद्धी पेरली, तर ती दुप्पट व्हायची नाही?
माझा तरुण मित्र गावी परतला. त्याला निरोप द्यायला म्हणून बस स्टेशन वर गेलो होतो तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. गाडी सुटायच्या बेतात असताना अचानक तो मला येऊन बिलगला…दादा..तुम्ही नसता तर…
खांद्यावर ओल्या झालेल्या सदऱ्याला सोबतीला घेऊन जेंव्हा आश्रमा कडे जायला निघालो तेंव्हा, मन भरून आलं होतं. त्याला वाटलं होतं, माझ्या मुळे दहा एक दिवस अर्ध्या पैश्यां मध्ये त्याचं भागलं होतं पण वस्तुस्थिती वेगळी होती…तो भेटला म्हणून माझ्या पोटाची सोय लागली होती!
भावें भोजनाल्याच्या समोर उभ्या पिंपळा खाली उभा होतो. आतल्या मुलांची धावपळ सुरु होती..त्यांना पाहून आई आठवली..मला, बाबां ना जेवण मिळावं म्हणून ती अशीच चोवीस तास राबायची…ही मुलं कुणाच्याही आई पेक्षा कमी नाहीयत, माझी खात्री पटली होती!
खिश्यातली नाणी काढून मोजून घेतली. आज माझ्याकडे फक्त तीन रुपयेच होते! हाफ प्लेट घेणारा माझ्या सारखा दरिद्री मिळायला हवा होता. खानावळीच्या दिशेने जो कुणी येईल, आशाळभूत नजरेने मी त्याचा वेध घेत होतो. मंदिरा बाहेर उभ्या भिक मागून जगणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेत माझी भर पडलीय, वाटून गेलं…
एक वयस्कर गृहस्थ फलक वाचल्या नंतर खिश्यातून नाणी काढून मोजताना पाहिलं मी. रस्ता ओलांडून पलीकडे पोहचलो. भावे पूजा करत होते म्हणून खिडकी बाहेर त्याचं लक्ष्य अजून यायचं होतं.
आधी मी माझा परिचय दिला. त्यांचा परिचय असणं, गरजेचं नव्हतं. हाफ प्लेट महत्वाची होती. त्यांना मी समजावून सांगितलं आणि अजिबात वळण न घेता त्यांनी तयारी दर्शवली.
त्यांचे चार, माझे तीन…भावें कडून सात रुपयांचं टोकन घेतलं. भावें पहिल्यांदा छान पैकी हसले. म्हणाले, पोरगा..तो, गेला?
जेवण झाल्यावर आम्ही आमच्या वाटेला लागलो…
पुढचे अकरा दिवस असे जसे गुलमोहोराच्या पाकळ्यांच्या सड्यात न्हाऊन जायचे…कधी तीन, चार तर कधी, चार तीनचे…पोटात थोडं फार पडलं की माझं तुळशीकडे हटकून दुर्लक्ष्य व्हायचं. पण ती बिचारी, कधी एका शब्दाने बोलायची मात्र नाही!
आता माझे वयस्कर मित्र देखील, गाव सोडून गेले. त्या दिवशी पिंपळा खाली उभा मी, नवा भागीदार धुंडत होतो. दीड झाला पण फलका पाशी थांबून एका ने देखील खिश्यातून नाणी काढून मोजली नव्हती…आज उपास ठेवावा लागणार असल्याची एकूण चिन्हं होती…
बाहेरच्या लोकां साठी दोन वाजता खानावळ बंद होते…भावे आणि काम करणारी मंडळी दोन ते तीन च्या मध्ये जेवतात, वाढपी पोरा कडून मला समजलं होतं…वेळ वाढवून द्या, भावेंना सांगून ते काय ऐकणार होते?
शेवटी दोन ला दोन मिनिटे कमी होती. रस्ता ओस पडला होता. या पुढे कुणी येऊनही उपयोग होणार नव्हता. जड पावलांनी आश्रमाकडे जायला म्हणून वळलो इतक्यात…माझ्या खांद्यावर कुणी आपला हात ठेवल्याचं लक्ष्यात आलं..वयस्कर गृहस्थ गावी गेलेच नसावेत…
वळून पाहिलं..भावे होते! त्यांच्या निळ्या डोळ्यां मध्ये नीळं, शांत हसू होतं…माझ्या बरोबर हाफ प्लेट चालेल…? या…खूप म्हणजे खूप भूक लागलीय…भावे बोलले.
माझ्या हाताला त्यांनी आपल्या बोटां मध्ये, बांधून ठेवलं होतं..त्यांचा मागोमाग, आत शिरलो….
+++
शुभेच्छा
अनिल महाजन
मुंबई.२७०५२३