★★सांगू कशी कुणाला★★(१) ११ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(१) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा .
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(१)
रागिणी..
मी माप ओलांडून देशपांड्यांच्या घरात आले. मोठी नणंद गमतीने म्हणाली,”तेरे हुस्नकी क्या तारीफ करू…” मी संकोचले. मला पंकजने पसंत केलं तेव्हा माझ्या मनात हाच विचार आला होता. केवळ दिसायला सुंदर म्हणून मी पंकजला आवडले होते का? तो तर उच्चशिक्षित, दिसायला अतिशय देखणा, सहा फूट उंच आणि आर्थिक स्थिती उत्तम असलेला होता. मी फक्त एम कॉम केलं होतं आणि एका छोट्या घरगुती व्यवसायात अकोन्ट्सचं काम करत होते. पंकजच्या वडिलांच्या मित्राच्या घरी,जे आमच्या कुटुंबाचे पण स्नेही होते,तिथे एका फंक्शनमध्ये पंकजने मला बघितलं आणि मागणी घातली. मला खरं तर इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं. नोकरी करून थोडे दिवस स्वछंदी आयुष्य जगायचं होतं. आणि…आणि काय? माझ्या चित्रकलेच्या छंदाला मला आकार द्यायचा होता. मला इंटिरिअर,लँडस्केपिंग ह्याची मनापासून आवड होती. मी त्याचा स्पेशल कोर्स करून,त्यात करिअर करणार होते,पण पंकजने मागणी घातली आणि आईबाबांनी जबरदस्तीच केली म्हणा ना!
“रागिणी, आपण आर्थिक दृष्ट्या मध्यमवर्गीय! लग्नाला हल्ली किती खर्च येतो ह्याची तुला कल्पना असेलच. मी प्रायमरी शिक्षक आणि आई बालवाडीत शिक्षिका! तुला आणि सुगंधाला मोठं करताना,आम्ही बऱ्याच गोष्टीत आमचं मन मारलं. तुमची हौसमौज केली पण ती देखील पैशाचा विचार करूनच! आता फ्लॅटचही कर्ज फेडतोय. पंकज देशपांडे सधन घरातील आहे. तुला आईसारखं मन मारून जगावं लागणार नाही. तुझ्या आवडीनिवडी जपल्या जातील. आणि मागणी घातली आहे तुला!”
बाबांची अगतिकता मी समजू शकत होते आणि पंकजला मी नाकारण्यासारखे काही नव्हतेच!
लग्नाआधी मी पंकजला भेटले तेव्हा माझी इच्छा त्याच्याजवळ बोलून दाखवली. “पंकज,मला इंटिरिअर डेकोरेटर व्हायचं आहे. माझं ते स्वप्न आहे.”
“मग कर की प्रयत्न!” पंकज अगदी सरळ,शांतपणे म्हणाला.
“प्रयत्न?”
“हो म्हणजे कोर्स तर कर. पुढचं नंतर बघू.”
त्याचं असं बोलणं ऐकल्यावर एक क्षण वाटलं, मी घाई करतेय का? पण सगळ्या दृष्टीने विचार केल्यावर मी नकार देणं, हा अविचार ठरला असता. मी होकार दिला.
“वहिनी,कुठे हरवली आहेस? एक झकास उखाणा होऊन जाऊ दे.” माझा धाकटा दीर मिश्कीलपणे म्हणाला.
अग्नीच्या पवित्र साक्षीने
सुरू झाली कहाणी
सात जन्मांचे सोबती
पंकज आणि रागिणी
“क्या बात है,वहिनी.” सगळे टाळ्या वाजवत असताना मी पंकजकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. माझी काही वेगळीच अपेक्षा होती का? मलाच कळत नव्हतं.
इतर मुलींसारखी मीलनाच्या पहिल्या रात्रीची मी स्वप्न रंगवली होती. तरुण वयात हिंदी चित्रपट बघून तसंच काहीसं आपल्या आयुष्यात घडावं असं प्रत्येकीला वाटतं. पण खरं तर तसं काहीच घडलं नव्हतं. मीच स्वप्नाळू होते का? एका खोट्या दुनियेची सफर करणारी! पण तसं नसेलही. काही जणींच्या वाट्याला हे रोमांचक क्षण येतही असतील.
माझं मात्र तसं झालं नव्हतं. लग्नाची पहिली रात्र हा सोहळा झालाच नाही.
मीलन झालं होतं पण तन,मनात काहीतरी उणीव भासत होती. माझ्या शरीरातील हक्काचं असं काहीतरी,जे आजवर मी जपलं होतं, ते मी पंकजला अर्पण केलं होतं, पण मी समाधानी,तृप्त नव्हते..
सकाळी उठले तेव्हा गळा भरून आला होता. आईबाबांची,सुगंधाची प्रकर्षाने आठवण आली. कोणाच्या तरी कुशीत शिरून रडावस वाटत होतं. मी शेजारी बघितलं. पंकज शेजारी नव्हता. मी घाईतच उठले आणि रुमच्या बाहेर आले. पंकज आंघोळ करून तयार होता. नणंदेनी माझी चेष्टा केली,जरा चिडवलं पण मी मोहरले नाही. हे असं का होतंय मला? नवी नवरी होते मी! आत्ता ह्या क्षणी माझं जग म्हणजे फक्त माझा नवरा असायला हवं होतं. मी पंकजकडे बघितलं. त्याचं माझ्याकडे लक्ष पण नव्हतं. कसलीतरी फाईल घेऊन बसला होता. हिरमुसल्या मनाने मी फ्रेश व्हायला गेले…..
पंकज…….
काय ते लग्नाचे विधी,ती गर्दी,ते भारी कपडे! ओह गॉड! कधी त्या कार्यालयातून एकदा घरी जातोय असं वाटत होतं. मला खरं तर रजिस्टर लग्न करायचं होतं पण आमच्या मातोश्री,त्यांची हौस होती ना! पण रागिणी फार सुंदर दिसत होती. जरा अबोल,बुजरी वाटतेय. कालची रात्र ती खुलली नाही. मला काही ते फिल्मी हिरो सारखं वागणं जमत नाही. आय एम अ प्रॅक्टिकल मॅन! लग्न हे सुद्धा दोघांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच असतं. इट्स अ डील. एनिवेज,मला आज महत्वाची मिटिंग आहे. बॉसने विनंती करून थोडावेळ येतोस का विचारलं. आय एम फीलिंग प्राउड. बॉसला माझी गरज पडली. मला खूप पुढे जायचं आहे. आयुष्याचा एक क्षणही वाया घालवायचा नाही. पैसा माझ्या पायावर लोळायला हवा. सत्यनारायणाची पूजा झाली की मी लगेच निघणार. आता आठ दिवस रागिणीला घेऊन सिंगापूरला जायचं आहे,त्यामुळे आज मला जायलाच हवं…..
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे