★★सांगू कशी कुणाला★★(२) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग पहिला
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(२)
रागिणी….
फ्रेश होऊन आले तर सुरुचीचा फोन!
“काय ग नवराई माझी? सुहाग रात झाली का?”
“सुरू,काय हा चावटपणा!”
“आता ह्यात कसला चावटपणा? तुझ्या बाजूला कोणी आहे का?”
माझ्या बाजूला कोणी असतं तरी मी ह्या प्रश्नाने मी काही रोमांचित वगैरे झाले नसते. एकदा वाटलं,सुरुला आत्ता घरी बोलवावं. तिच्याजवळ मन मोकळं करावं. सुरुची..माझी जिवलग मैत्रीण! आईबाबा किंवा सुगंधाजवळ जे मी बोलू शकत नव्हते,तिथे सुरू हक्काची होती. मला योग्य तो सल्ला नेहमीच देणारी! आम्ही दोघी अगदी बालवाडीपासून मैत्रीणी! एकमेकींची आवड निवड पूर्ण जाणून होतो. आम्ही दोघी स्वभावाने अगदी भिन्न होतो पण एकमेकींच्या भावनांचा आदर करत होतो. मी मुळातच हळवी, स्वप्नरंजनात रमणारी! वयात आल्यावर माझ्या रोमान्सच्या कल्पना सुरुजवळ बिनधास्त बोलणारी मी! ते टिपिकल गजरा आणणे वगैरे अशा माझ्या रोमान्सच्या कल्पना नव्हत्याच.नवरा बायकोने एखादया छान विषयावर खूप वेळ गप्पा मारणे, एक चोरटा कटाक्ष,एक अलगद पुसटसा स्पर्श; ज्यात अवघी काया मोहरून आणण्याची ताकद असते, एकमेकांना जाणून घेणं,हे देखील प्रेम वाढवायला पुरेसं असतं. त्या स्पर्शात फक्त गरज नको तर प्रीती बरोबर काळजी असावी. गेले दोन दिवस पंकजच्या स्पर्शात,मला हे काहीच जाणवत नव्हतं म्हणून मी अस्वस्थ होते. त्याने मला मागणी तरी का घातली? एक सुंदर बायको असावी म्हणून? की फक्त एक गरज म्हणून?
पण आत्ता हे सुरुचीला सांगितलं असतं तर फार घाई झाली असती. एका दिवसात असं माणूस कळतं का? आणि मी तक्रार तरी काय करणार होते? श्रीमंता घरची सून झाले होते. सौख्य पायाशी होतं. देखणा नवरा मिळाला होता. मी काही तक्रार केली तर मी बालिश ठरले असते. सुरुची बरोबर थोडा वेळ बोलल्यावर मला जरा बरं वाटलं. मी माझी बॅग उघडली. सत्यनारायणासाठी नऊवारी घालायचं ठरवलं होतं पण पैठणीच निवडली. तयार होऊन आरशात बघत होते,इतक्यात पंकज रुममध्ये आला. माझ्याकडे बघून म्हणाला,”सुंदर दिसते आहेस.” बस इतकंच? माझ्या सौंदर्याची तारीफ करण्यापलीकडे मला पंकजकडून काहीतरी वेगळं हवं होतं,हे त्याला कळत कसं नव्हतं? नवीन लग्न झालेल्या नवऱ्याला जी बायकोची ओढ असते,ती त्याच्या वागण्यात मला कालपासून एकदाही दिसली नव्हती. ह्याने माझ्या सौंदर्यावर भाळूनच तर माझ्याशी लग्न केलं होतं,मग हा असा का?
“रागिणी,लवकर तयार हो.”
पंकजच्या बोलण्याने मी भानावर आले.
सत्यनारायण झाल्यावर मी दागिने काढायला खोलीत निघाले तर आजी म्हणाल्या,”भाग्यवान ग बाई तुम्ही पोरी! आम्ही नवऱ्याशी चार शब्द सुध्दा चारचौघात बोलू शकत नव्हतो.”
मनात आलं,त्यांना सांगावं की आजी तुमचा नातू एकांतात सुद्धा माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही.
जेवणं झाल्यावर रुममध्ये येऊन सुरुचीला फोन लावला.
“सुरू, काहीतरी मिसिंग आहे ग. खूप आनंदी,उत्साही वाटतच नाहीय.”
“माय डिअर! उद्या सिंगापूरला जाते आहेस न? मग तिकडून आल्यावर मला सांग,कसं वाटतंय.”
कसं सांगू हिला तरी! सुरू,अग मी नवी नवरी आहे. लग्नाला पाच-दहा वर्ष होऊन गेलेली बायको नाही. माझ्या ह्या नवलाईच्या दिवसात माझ्या जोडीदाराकडून काही अपेक्षा आहेत,आणि त्या करणं चुकीचं आहे का? माझ्या मनातली घालमेल,अस्वस्थता मी कोणालाच सांगू शकत नव्हते….
पंकज…
लग्नविधी,सत्यनारायणाची पूजा हे सगळं आईसाठी मला करावं लागतंय. माझा ह्या कशावर विश्वास नाही. आज सकाळी आजीची काहीतरी कुरकुर ऐकू आली. आईचं आणि तिचं बोलणं कानावर पडलं.काहीतरी बोलत होती.”संध्या,सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय तिला पंकजच्या खोलीत का जाऊ दिलं?”
व्हॉट रबीश! ह्या खुळचट कल्पना कधी बदलणार ? आईला माझा स्वभाव माहिती आहे म्हणून तिने आजीकडे दुर्लक्ष केलं. मला कंपनीत जायचं आहे,हे रागिणीला मला सांगावं लागेल. आज बॉसने इतक्या तातडीने मला बोलावलं म्हणजे माझ्या फ्युचरसाठी ते नक्कीच चांगलं असणार. रागिणी शांत का आहे पण? कदाचित माहेरची आठवण येत असावी.
“रागिणी,पूजा झाली की मी कंपनीत जाणार आहे. महत्वाचं काम आहे.”
“पण जेवण करून जा.”
“रागिणी, प्लिज आता मला उशीर होईल. आणि आराम कर! उद्या सिंगापूरला निघायचं आहे.”
सत्यनारायणाची पूजा लवकर संपली हे नशीब! नाहीतर हे गुरुजी प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगतात की काय असं मला वाटलं. लवकर निघायला हवं. वेळेत पोहोचायला हवं.
मिटिंग बरीच लांबली. काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी बोर्ड मिटिंग दोन दिवसांनी होणार होती. बॉसने मला सिंगापूरहून लवकर यायची रिक्वेस्ट केली. मी लगेच होकार दिला. सिंगापूरला नंतर परत कधीही जाता येईल. मला आता व्हाईस प्रेसिडेंट होण्याचे चान्सेस प्रचंड असल्यामुळे मला ही संधी गमवायची नव्हती. मी सिंगापूरचं बुकिंग कॅन्सल केलं. रागिणी नाराज होईल,पण नाईलाज आहे. रग्गड पैसा मिळायला लागला की सिंगापूरला दरवर्षी जाता येईल. खरं तर हनिमून वगैरे हा प्रकारच मला आवडत नाही,सगळ्या खुळचट कल्पना! पण ताई मागे लागली म्हणून मी बुकिंग केलं. आता दोन दिवस रागिणीला महाबळेश्वरला घेऊन जाईन. तिच्या काही फारशा अपेक्षा नसतीलच. मध्यमवर्गीय घरातून आलेली मुलगी ऍडजस्ट करतेच. हनिमूनपेक्षा माझं करिअर महत्वाचं आहे……
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे